Thursday, March 17, 2016

शिवप्रेमी गडयात्री ट्रेक समूह नियम

शिवप्रेमी गडयात्री ट्रेक समूह नियम
 सस्नेह जय शिवराय 
⛳ शिवप्रेमी गडयात्री ⛳
ट्रेक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आनंदसह माहितीचा स्रोत आहे, धकाधकीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारा एक उत्तम दुवा आहे, कट्ट्याच्या निमित्ताने हा दुवा जपता येतो, गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो.     चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक हा समूह निर्माण केला आहे. शिवप्रेमी गड यात्री...
      ट्रेकिंगला जाताना काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.
* प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत.
* मोठ्या आवाजात बोलू नये.
* चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत.
* बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.
* कुणीही चुकीचं वर्तन करू नये.
* टीम लिडरने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करणे.
* ट्रेकला जाताना व्यसन करू नये.(मद्यपान,अल्कोहोल,ई.) नाहीच राहवत असेल तर येऊच नये.
* ट्रेकिंगला म्हणून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या सॅकमध्ये फर्स्ट एड बॉक्स (यामध्ये तुम्हाला लागणारी औषधे असावीत), खाण्याचे कोरडे साहित्य (चिवडा, लाडू, ठेपले थोडक्यात ज्या वस्तू टिकू शकतील असे.), प्लॅस्टिक बॅग्ज, साखर, मीठ, छोटी बॅटरी,त्यासाठी आणि कॅमेरा सोबत नेणार असाल तर त्यासाठी लागणारे सेल, पाण्याच्या दोन बाटल्या आणि सर्वात महत्त्वाचं एक कपडय़ाचा जोड,स्लिपर आणि रोप. या सर्व गोष्टी एक प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून सॅकमध्ये असावेत. अथवा ज्या समूहाबरोबर आपण जाणार असाल त्यांनी आवश्यक ती साधने, उपकरणे सोबत घेतली आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी.
* ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे जाताना रुळलेल्या वाटेवरूनच शक्यतोवर जावे. पावसाळ्यात नवीन मार्ग शोधण्याचे साहस करू नये.
* ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंग पँट, आणि पूर्ण बाहय़ाचा शर्ट घाला. शक्यतो कॉटनचे कपडे न घालता ओले झाल्यानंतर पटकन वाळू शकतील, असे कपडेच घालावेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पायात चांगल्या प्रतीचे सॉक्स आणि ट्रेकिंग शूजच घाला. दागिने घालणे टाळा.
* तुमच्याकडे त्या ठिकाणी चालणारया नेटवर्कचा मोबाईल अवश्य जवळ असणे गरजेचे आहे. ट्रेकला जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच त्यांचा नंबरही सोबत ठेवावा. ट्रेक दरम्यान एखादी अडचण निर्माण झाली तर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
* धबधब्याच्या किंवा एखाद्या नदीच्या पात्रात डुंबायला जाता तेव्हा पाण्याचा अंदाज खूपच महत्त्वाचा असतो. तुम्हांला जर पोहोता येत नसेल तर खोल पाण्यात जाणे टाळा. पाण्यात गेल्यावर वेळेचे भान रहात नाही. पावसाळ्यात नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असल्याने पात्रात खोलवर जाणे टाळा. तुम्ही जिथे आहात तिथे पाऊस नसेल पण लांबवर पडणा-या पावसामुळे पाण्याची पातळी कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते.
* उंचावरून कोसळणारा धबधबा प्रत्येकालाच आकर्षति करत असतो. पण या धबधब्यांमधून लहान मोठे-दगड येण्याची शक्यता असते. वरून येणारा लहानशा दगडामुळेही इजा होण्याची शक्यता असल्याने अशा धबधब्यांखाली खाली उभे राहणे टाळा.
* पावसाळ्यात धबधब्यांमध्ये रॅपिलग करताना यामध्ये धोका असतो हे लक्षात असू द्या. प्रत्येक रॅपिलग झाल्यावर दोर चेक करायलाच हवा. रॅपिलग करणा-याला हेल्मेट घालणे बंधनकारक असते तो नियम काटेकोरपणे पाळावा.
* निसर्गाचे सौंदर्य कॅम-यामध्ये टिपत असताना वेळेचेही भान असू द्या. एखाद्या अवघड जागी उभे राहून फोटो काढणे, दंगामस्ती करणे टाळावे,तसे करणा-यांना त्यापासून प्रवृत्त करावे.
* ज्या ठिकाणी जाणार आहात तिथल्या स्थानिक गावक-यांची कधीही मदत लागू शकते हे ध्यानात घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागा. जर गावाबाहेर किल्ल्यावर तुम्ही जाणार असाल आणि तिथे जर तुम्ही वास्तव्य करणार असाल तेव्हा गावातील काही लोकांचे दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, तिथल्या पोलिस ठाण्याचा क्रमांक जवळ ठेवा. शक्य झाल्यास तिथल्या एखाद्या गावकऱ्याला तुमच्यासोबत न्या.
* तुमच्या ट्रेकिंगमध्ये एका रात्रीचा मुक्काम असेल तर सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, शक्य असेल तर स्लििपग बॅग बाळगा. तसेच रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर त्या ठिकाणची स्वच्छता अवश्य ठेवा.
* ट्रेकिंगच्या दरम्यान तुमच्याकडे असलेला कचरा, खाद्यपदार्थाची वेष्टणे, फळांची साले, थंड पेयांचे डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद,निरुपयोगी वस्तू इकडेतिकडे फेकू नका. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा.
* ट्रेक संपल्यानंतर ओले झालेले बूट, सॉक्स काढून ते सोबत असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत आणि पाय कोरडे करून स्लिपर घालाव्यात.
ट्रेकिंगला निघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखूनच ट्रेकिंगला/फिरायला जाण्याचे ठिकाण निवडावे.
* तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर आधी एका दिवसाच्याच ट्रेकला जा आणि अनुभवी व्यक्तीं/ ग्रुप्स सोबतच जा. जर मित्रमंडळींच्या ग्रुपबरोबर जाणार असाल तर गावातील स्थानिक व्यक्तीला वाटाडय़ा म्हणून सोबत घ्या.
* ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथले मार्गाची माहिती असावी, सोबत त्या भागाचे नकाशे असावेत. त्यामुळे परतीच्या मार्गात जर काही अडचण आली तर पर्यायी रस्ता वापरता येऊ शकतो.


*मान्सून ट्रेकवर जाताना काय खबरदारी घ्यावी ??

१) नेहमीच्याच स्पॉट्सना भेटी देण्याऐवजी नव्या गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा प्रयत्न ट्रेकर्सनी करावा. एकटे जाण्यापेक्षा संस्थांमार्फत जाणं कधीही उत्तम. त्यामुळे मुलं-मुली जबाबदारीने ट्रेकिंग करतील आणि प्रत्येकाची वर्तणूकही जबाबदारीपूर्ण राहील. पालकांनीही ही काळजी घ्यावी. 

२) पावसाचा आनंद लुटा, पण जिवाची सुरक्षितता महत्त्वाची.

३) मद्यपान पूर्णत: र्वज्य करावे. मद्यपानामुळे तोल तर सुटतोच शिवाय डिहायड्रेशन किंवा थंडी भरण्यासारखा त्रासही होऊ शकतो. 

४) पुरेसे पाणी प्या. 

५) नायलॉन, पॉलिप्रॉपिलीनसारखे सिंथेटिक मटेरिअल किंवा टेरिकॉटचे लवकर वाळणारे कपडे वापरावेत. सुती कपडे नकोत.

६) बोटे उघडी राहतील अशा चपला किंवा स्लिप-ऑन शूज वापरू नका. रबर सोल असलेले नाडीवाले बूट वापरा.

७) पावसाळ्याच्या रेनकोटबरोबरच विण्डचिटर वापरणेही चांगले. खूप वारा असल्यास त्याचा चांगला वापर होतो.

८) वेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुक्या कपड्यांचे दोन स्वतंत्र जोड ठेवावेत. ट्रेक संपल्यावर आवर्जून सुके कपडेच घालावेत. एका रात्रीचा मुक्काम असेल तर सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, स्लीपिंग बॅग अवश्य बाळगा. या बाबतीत दुसऱ्याच्या भरवशावर राहू नका.

९) रस्त्याबद्दल अचूक माहिती नसेल तर जवळपासच्या गावातून वाटाड्या सोबत घ्यावा.

१०) निसरड्या वाटेवरून चालताना खूप काळजी घ्यावी. विशेषत: कड्यावरून थेट उतार असलेल्या वाटांवर धोका संभवतो. 

११) ओढे ओलांडताना पाण्याची खोली, जमिनीचा उतार, पाण्याचा जोर आणि पावसाचा जोर यांचा अंदाज घ्यावा. 

१२) डोंगराच्या वरच्या भागात जोराचा पाऊस सुरू झाल्यास अचानक ओढ्यातल्या पाण्याचा जोर वाढू शकतो. तेव्हा इतर परिसरातल्या पावसाचाही अंदाज घेत राहा.

१३) वेगवान ओढे न ओलांडता प्रतीक्षा करणं केव्हाही उत्तम. 

१४) ग्रुपमधल्या किमान एका सदस्याने तरी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतलेले असावे. 

१५) ट्रेकरूटच्या प्लॅनची माहिती घरच्या मंडळींनाही असावी. त्यामुळे संपर्क साधणे सोपे जाईल. 

१६) छोट्या ट्रेकमध्येही एक किंवा दोन बॅटऱ्या तसेच स्वेटरही जवळ ठेवावा. उशीर झाल्यास कामी येऊ शकेल. 

१७) वाट चुकलात तर एखाद्या सुरक्षित स्थळी थांबून राहणे केव्हाही योग्य. इतर जण तुम्हाला शोधू शकतील. 

१८) नैसगिर्क आपत्तीबद्दल ग्रामस्थांच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्यावे. त्यांना त्याचे अचूक ज्ञान असते. 

१९) आणि सगळ्यात महत्वाचे निसर्गाची काळजी घ्या. 

आलेल्या पावसाळ्यातील तुमचे सगळे ट्रेक सुरक्षित, सुखरूप आणि धम्माल होवोत... !!
___संकलित
*तुही गडयात्री मी ही गडयात्री*

संग्रहित...
धन्यवाद....
संकलन :- नितेश पाटील (पालघर,धनसार)
मोबाईल नं. ०९६३७१३८०३१
email :- nitesh715@gmail.com

No comments:

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...