Friday, August 9, 2019

नाणेघाट भ्रमंती

#नाणेघाट_भ्रमंती #शिवप्रेमी_गडयात्री



चैत्रातच गुंफलेला वैशाख संपतो. फुलांचे बहर गळून पडलेले असतात. उन्हे जास्त तापून दिवस मोठे करून थकलेली असतात. तळ्यांच्या पायातील भेगा स्पष्ट दिसू लागलेल्या असतात. अशातच जेष्ठातले पांढरे भुरके ढग आकाशभर पसरू लागतात. काहीसे पाणी उरलेल्या धरणात, आपले प्रीतिबिंब न्याहाळून पाहू लागतात. थंड, ओलसर वाऱ्याचे मंडळ, पावसाळ्याचे संकेत घेऊन वसुंधरेच्या भेटीस येते. वसंताचे अल्लड वातावरण संपून प्रौढत्वाची सावली वसुंधरेवर पडते. रात्री नक्षत्रांची लुकलूक दिवासोदीवस झाकोळून जाऊ लागते. आणि अधीर झालेला पहिला पाऊस, आपली पर्जन्यपुष्प उधळीत वसुंधरेच्या भेटीस येतो. दोघांच्या तृप्ततेतून अगणित हिरवे कोंब उदयास येतात आणि वसुंधरेवर हिरवं उधाण येतं.

आपल्या वसुंधरेवर, कणखर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, वरुण देव पर्जन्यपुष्प उधळू लागतो. गड-किल्यांवर, डोंगर-कड्यांवर, दरी-खोऱ्यात, घाटरस्त्यांवर सलग पाच सहा महिन्यासाठी हे उधाण येतं. रानोमाळी धबधब्याच्या लकेरी जागृत होतात. तळ्यांच्या भेगा चिंब भिजून नाहीशा होतात. पुसलेल्या हिरव्या जागा चमत्कारिकपणे पुन्हा हिरव्या होतात, नदीच्या खोडलेल्या रेघां पुन्हा खळखळ हसून, लांबच लांब समुद्राच्या दिशेने वाढत जाताना दिसतात. सह्याद्रीच्या कणखरतेला अभिषेक करणाऱ्या असंख्य लहान मोठ्या लकेरी डोळ्यात साठवत, त्यांना बळ देणारे पर्जन्य पुष्प अंगावर घेत, हिरव्या उधानात विहार करण्याची मौज काही औरच असते.

या मोसमात ट्रेकची सुरवात म्हणून, आमची पहिली भ्रमंती आम्ही नाणेघाट ठरवली. मी हिमालयीन ट्रेक करून आल्याला तीनच दिवस झाले होते. त्यात दोन दिवस पाऊस अगदी मनसोक्त बरसत होता. बरसणाऱ्या पावसातच बस आम्हाला घेऊन नेहमीप्रमाणे रात्रीचा प्रवास करणार होती. आसपासचे अगदी मोजके किल्ले सोडले तर, आम्हाला तसे प्रत्येक भ्रमंतीसाठी एका बाजूने पाच ते सहा तास प्रवास हा ठरलेलाच आहे. दुसरा पर्याय नाही. म्हणूनच कामाचे दिवस वाचवण्यासाठी रात्री प्रवास करून सह्याद्री सानिध्यात जाणे हे आमचं नेहमीचंच.
रात्री दहा वाजता बस सर्वांना घेऊन निघाली. सुर्या नदीच्या गढूळ झालेल्या पात्रात, पुलाच्या दोन्ही बाजूने पावसाचे सहस्रावधी बाण आपली जागा मिळवून ठाण होण्याच्या प्रयत्न करत होते. नदी मात्र त्यांना नेऊन तिच्या बांधावरून खाली ढकलून देत होती. त्याची तडतड आमच्या बसच्या छापरिवर जाणवत होती. ती दुर्लक्षित करून बस पुढे निघाली. मनोरच्या आधी दोन जीर्ण विशाल गुलमोहराच्या कमानीतून घुसण्याआधी दुरूनच बसच्या उजेडात ती दोन्ही झाडं, आपापल्या हातात अगदी भली मोठी छत्री घेऊन उभी आहेत असे वाटले. पण जवळ जाताच त्याचे पान न पान पाऊस पिण्याच्या नादात पूर्णतः चिंब झालेली दिसली.

त्यांना मागे सोडून आमच्या बसने NH48 ची वाट धरली. "आधी पोटोबा आणि मग विठोबा" ही म्हण काही माणसांसाठी आहे असं नाही. ती गाड्यांसाठी आहे. म्हणूनच इंधन भरून आम्हास नियोजित स्थळी पोहचवण्यासाठी बस पुन्हा धावू लागली. काचेवर आदळणारे थेंब आता तिला थांबवू शकणार नव्हते. ते तितके प्रभावी नव्हते. रस्त्यावर सखल भागात थांबलेलं पाणी ती पायाखाली तुडवत निघाली आणि आम्ही निवांत होऊन ढोलकी बाहेर काढली. ढोलकीच्या तालावर श्रीगणेशा केला आणि गाण्यांची मैफिल सुरू केली. त्या मैफिलचा सूर नकळत विठ्ठलाच्या पंढरीस पोहचला आणि बसला जणू वारीचे स्वरूप आले. विठ्ठल स्तुतीने रात्रीची पहाट कधी झाली ते देखील कळलं नाही.

शहरं मागे सोडून बस टोकवाडे गावा नजीक तीन वाजता एका हॉटेलच्या परिसरात थांबली. फार जुने नाही, हॉटेल नवीनच होते. स्वच्छ आणि प्रशस्थ असे. रात्री विचारणा केली तर चहा मिळेल म्हणाले. पाऊस चालूच होता, म्हणून बसमध्येच सार्यांनी ताणून दिली. सहा वाजता उठून पडत्या पावसातच फ्रेश झालो. सकाळी चहा तर मिळाला पण नाश्ता मिळणार नाही असं कामगारांनी सांगितलं. तरीही आम्ही त्यांना विनवणी केली तुमच्या मालकांना फोन करून कळवा. सात ते आठ जण युनिफॉर्म मध्ये वावरणारे कामगार होते. पण मालक आणि कुकचा पत्ता नाही. सकाळी सात वाजता पन्नास वाटसरू तुमच्या दारात असताना त्यांना नाश्ता देणं नाकारणं हे धंद्याच्या दृष्टीने सोयीचं नाही. असो... सोबत ब्रेड, बटर, जाम होते ते फस्त केले. पुढे जाऊन हॉटेल समाधानला बस थांबली. मिसळपाव, पोहे खाऊन पायथ्याशी असलेल्या वैशाखरे गावाजवळ जिथून नाणेघाटाची वाट सुरू होते तिथे जाऊन पोहचलो....नित

पुढे माळशेज, नगरकडे जाणारा रस्ता भिजून निथळत होता. रस्त्याच्या बाजूलाच वनक्षेत्र टोकवाडे विभागाने लावलेले माहिती फलक, कमान पाहून बरे वाटले. पुढे रस्त्याला जागोजागी माहितीचे फलक मग त्यात घाटरस्त्याचा इतिहास असेल, वन्य पशुपक्षांची माहिती असेल, झाडांची माहिती असेल, असे फलक जागोजागी दिसतात. सोबतच विसाव्यासाठी काही अंतराच्या दुरीने बाकडे लावलेले आहेत. एकंदरीतच सारं समाधानकारक आहे. पण काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी त्यावर कुठे दगड फेकून तर कुठे आपली नावं लिहून त्याला नव्हे माणसांच्या सुशिक्षितपणावरच गालबोट लावलं आहे.

आम्ही काउंटिंग घेऊन भ्रमंतीस सुरवात केली. यावेळेसही आमच्या सोबत सहा छोटे ट्रेकर्स होते आणि आम्ही ४२जण. पाऊस थांबला होता. समोर धुक्यात की ढगात लपलेला नाणेघाट. एक दोन-अडीच तासांचा रस्ता आणि आम्ही थेट त्या ढगांना स्पर्श करणार होतो. उजव्या बाजूला जीवधन तर डाव्या बाजूला भैरवगड पलीकडे गोरखगड,मच्छीन्द्रगड, सिद्धगड, हरीचंद्रगड, कोकणकडा यांच्याबरोबर ढगांना वारा खेळवीत होता. पावसात भिजून अधिकच गहिरी लाल झालेली वाट धरली. मधेच कुठेतरी साचलेल्या पाण्यात आपले प्रतिबिंब पाहणारे भुरटे आकाश लालसर दिसत होते. वाटेच्या दोन्ही बाजूने हिरवाईने नटलेली झाडे निथळत होती. कुडीच्या झाडांवर पाने कुरतडत बसलेल्या विभिन्न रंगांच्या किड्या जणू पाने खाण्याच्या शर्यतीत होत्या. झाडांवर बहरलेल्या पांढऱ्या फुलांना स्पर्शही न करणाऱ्या, पण झाडांवर एकही पान पूर्ण न ठेवण्याची त्याची स्पर्धा असावी. हिरव्या तृणाच्या टोपलीत पावसाने झाडाखाली पाडलेली पांढरी फुलं काठ सोडून फाकली होती. कारवीच्या कोवळ्या पानांची छोटी छोटी झाडं आपल्या खरभरीत देहावर थेंबाना मिरवत होती. "जंगलाची मैना" ख्याती मिरवणाऱ्या, मैनेविन तरीही जागोजागी उभ्या असलेल्या करवंदीच्या जाळ्या प्रफुल्लित दिसत होत्या. आपले घर सोडून सोलार दिव्यांच्या आडोशाला आश्रयास असलेल्या टप्पोऱ्या मधमाश्या घट्ट चिटकून बसल्या होत्या. वाटेत अडथळ्यास असलेले नुकतेच सुरू झालेले सौम्य ओढे दगड गोट्यांना गोंजारत होते. झाडावरून गळून पडलेल्या सुकल्या पानांचा, ओढ्यातून निरर्थक खाली वाहत जाण्याचा प्रयत्न चालू होता.

हलकी चढण चढून मोकळ्या जागेत आम्ही पोहचलो. सोबत असलेला सुका खाऊ आपापसात वाटून खाल्ला. पुढे दगडांनी रचलेल्या वाटेवरून चढाईस सुरवात केली. डोंगरावरून खाली उतरणारे पुसटसे झरे खाली येताना दिसत होते. एक हलकीशी खळखळ ऐकू येऊ लागली होती. पावसाने पुन्हा आपली रिपरिप चालू केली. पावसाळी चिलखतं सॅक मधून आम्ही बाहेर काढली आणि अंगावर चढवली. रस्त्यावरून पाणी पायऱ्या उतरू लागले होते. आम्ही मात्र वर चढत होतो. खुबे, गोगलगायी संथ गतीने निवारा शोधत होते. तर खेकडे मात्र तरातरा आम्हाला पाहून अदृश्य होत होते. मधेच एखादा झरा आडोसा सोडून अगदी वाटेवर येत होता. रविवार असूनही वाटेत गर्दी जाणवली नाही. पण जसजसे ऐतिहासिक घाटाच्या जवळ आम्ही पोहचू लागलो तसतशी वर माणसांची वर्दळ स्पष्ट दिसू लागली....नित

दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण वाट दगड गोट्यांच्या पायऱ्यांनी रचलेली होती. साहजिकच थोडी दमछाक झाली असती. पण पावसाची सोबत असल्यामुळे निभावून गेलं. आणि आम्ही पहिल्या पावसाच्या साक्षीने हरीचंद्राच्या डोंगररांगेतील २७२४ फूट उंच असलेल्या जुन्नर ते कोकण याना जोडणाऱ्या ऐतिहासिक नाणेघाटात पोहचलो. मागे वळून पाहिले तर कोकणचा बरासचा सपाट प्रदेश नजरेत येत होता. इथे कातळात आजूबाजूला पाण्याचे बरेच टाके दिसत होते. वर्षभर या टाक्यांना पाणी असते. त्यात प्रशासनाने गप्पी मासे सोडलेले आहेत. काही वेळ त्या पाण्यात हात टाकून बसलो आणि न सांगताच माशांनी मसाज चालू केली. ती अनुभूती घेऊन, वर एक ५०जण मावतील इतकी कातळात कोरीव गुहा आहे. त्याच्या शेजारी आणि वरसुद्धा पाण्याचे टाके आहेत. गुहेत भिंतीवर ब्राम्ही लिपीत कोरलेले लेख आहेत. आता त्याची पडझड झाली आहे पण बऱ्यापैकी लेख दृष्टीस पडतात. त्यात अंकांचा समावेश जास्त दिसला. गुहेच्या वर एक प्रचंड कातळ भिंत दिसते यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात.
दुपार झालीच होती, पण पावसाळी. सोबत डबे होते. जेवून काही वेळ गुहेत आराम केला. आणि वरच्या दिशेने म्हणजे घाटरस्त्यातुन जुन्नरकडे आम्ही चढण्यास सुरवात केली. साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नळी आहे. पाऊस चालूच होता. धुक्यात घाटवाट अस्पष्ट दिसत होती. दोहो बाजूंच्या कणखर पाषाणाच्या भिंती आणि पायाखालाच्या पाषाणाच्या काळभोर गडद रंग पाहून हा रस्ता बनवणाऱ्यांची इच्छाशक्ती किती त्याच तोडीची नव्हे त्यापेक्षा बळकट असेल याची कल्पना करता येते. हा घाट चढून गेलो की अगदी समोरच पुढे सपाट मैदानात घाटाच्या तोंडावर, घाटघर जुन्नरकडे जाणारा डांबरी रस्ता नजरेस पडतो. डाव्या बाजूला एक चार फूट व्यास आणि पाच फूट उंचीचे दगडी रांजण नजरेस पडते. तर उजविकडे कातळात कोरलेले गणपतीची छोटी मूर्ती आहे त्याच्या काही अंतरावर डाव्या बाजूने वरून खाली वाहत येणारा पाण्याचा झरा वाहताना दिसत होता. तिथूनच नानाच्या अंगठ्याजवळ जाण्याचा मार्ग आहे. हा घाटरस्ता वापरणाऱ्यांसाठी पूर्वी जकात भरावा लागत असे. इथे ठेवलेल्या रांजणात तत्कालीन कर्षापण नावाची नाणी जकात स्वरूपात यात टाकली जात होती. म्हणजे त्यावेळचा तो टोल हा प्रकार होता.

आताही इथून उच्च दाबाची वीज वाहून नेणारे भव्य टॉवर जोडीने खाली उतरले/चढले आहेत. त्यावरून हे सहज लक्षात येते की हा मार्ग जुन्नर आणि कोकण यांना जोडणारा जवळचा रस्ता होता. पूर्ण परिसर धुक्यात हरवला होता. काही माजूरडी लोकं संगीताच्या तालावर आपापल्या गाडीसमोर नशेत कर्कश आवाजात ओरडत थिरकत होती. ते दृश्य व्यथित करनारे होते. याआधी इथे येण्याचा रस्ता फक्त घाटघर पर्यंत होता तेथून पाच किलोमीटर चालून नाणेघाटात येता येत होते पण आता थेट गाडी घाटाच्या तोंडावर येते. आणि हीच सोय घाटसौंदर्याच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. बहुतांशी अशा ऐतिहासिक ठिकाणी जिथे वाहनाने पोहचता येते तिथे निसर्गप्रतिमेला विकृत माणसांनी हानी पोहचवली आहे हे सांगायची गरज नाही. अशा वातावरणात निसर्गसौंदर्याशी ओढ असली तरी आम्हाला फार काळ तिथे राहता आलं नाही. आल्हाददायक वातावरणात असूनही त्या विकृतीची घुसमट होऊ लागली आणि आम्ही तात्काळ खाली उतरण्याचा निर्णय घेतला. पुन्हा काउंटिंग घेऊन दीड तासात खाली उतरलो. खाली छोट्या बंधाऱ्यावर पडत्या पावसातच दोनचार बुडक्या मारल्या आणि बसपाशी आलो. भूमाता वन धन विक्री केंद्रात विनंती केल्यास त्यांनी एक कंटेनर रूम आम्हाला फ्रेश होण्यासाठी दिली. फ्रेश होऊन रानात घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत पडत्या पावसाचे संगीत ऐकत सर्वांनी चहाची चुस्की घेतली. आणि आलो त्याच मार्गाने सुमंगल रात्री दहाच्या सुमारास घरी पोहोचलो. एकूणच या वर्षीच्या पहिल्या पावसात पहिल्या भ्रमंतीने ट्रेकिंगच्या पानावर आणखी काही आल्हाददायक आठवणी जमा केल्या, ज्या निरंतर जगण्याचे बळ देतात.
©___नित (नितेश पाटील)













देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...