Friday, July 13, 2018

ट्रेकर्सना खुणावत असलेले भीमाशंकर

⛰भीमाशंकर ट्रेक⛰
⛳ आयोजक :- शिवप्रेमी गडयात्री⛳
मोहीम प्रमुख :- अमोल राऊत
मोहीम कार्यवाह :- निकेत राऊत
दि. १०-११-१२/०८/२०१७
सस्नेह जय शिवराय मित्रहो...
____मी ट्रेकची सुरवात केली ती मुळातच भीमाशंकर ट्रेकने. आणि माझ्या अंतरातील आसुसलेल्या भटक्याला या वाटांनी मोहिनी घातली. तदनंतर माझ्या आयुष्यात रान वाटांच्या भटकंतीचे एक नवे पर्व, उशिराने का होईना, पण चालू झाले. आकालनिय सौंदर्याच्या मोहात मी पडलो. आणि या सौंदर्यवती वसुधेची अनेक रूपे मला पहावयास मिळाली. तिने माझ्या आयुष्यातील शीण नाहीसा केला. मला एक नवी उभारी दिली, माया दिली. अन मी ही तिच्या समवेत वाहवत गेलो. कधीही न पाहिलेलं सुख, मजा अनुभवता आली. प्रत्येक ट्रेक दरम्यान एक आल्हाददायक, रोमहर्षक असा अविस्मरणीय अनुभव मी गाठीशी बांधू लागलो. त्याचा खूप परिणाम माझ्या अलिप्त राहू पाहणाऱ्या देहावर झाला. निसर्गाच्या रूपाने मला आजीवन असा साथी मिळाला,  त्याच्या सानिध्यात जाण्याची मला नेहमीच मुभा असेल. आणि मी कधीही एकटेपणा वाटून घेणार नाही.

"रानवाटा रानवारा, मोहिनीचा हा पसारा
आभाळाची माया त्यावर, शिल्पकार तोच त्याचा"

____भीमाशंकर अभयारण्यात ही माझी दुसरी पदभ्रमंती. बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे स्थान असलेले सुप्रसिद्ध असे भीमाशंकराचे मंदिर या पर्वत शिखरावर आहे. दोन वर्षांपूर्वी मी ही भटकंती केली होती. जवळपास साडे तीन हजार फूट उंच असलेले हे शिखर मी चढून जेव्हा खाली उतरलो, तेव्हा मागे दिसणारे ते अभयारण्यातील महाकाय शिखर सर करून आलो यावर माझा विश्वास बसला नाही. पण मी समीट  करून आलो होतो. आणि आज पुन्हा त्या दिशेने जात असतांना माझे मन त्या समवेत व्यतीत केलेल्या भूतकाळात रमले होते. त्या अनुभूतीतून बरच काही शिकलो होतो.

सारं काही सोपं असतं कठीण होईपर्यंत
आणि एकदा कठीण झालं
की सोपं अस काहीच उरत नाही
उरतो तो केवळ संघर्ष
जो कुणासही चुकत नाही

____तारीख वेळ ठरलेली होती. महिन्याभरापासून नियोजन चालू होते. चर्चेतून एकवाक्यतेकडे आम्ही पोहचल्यानंतरच इतर मुलांना मोहिमेची रूपरेषा कळवली. आणि साऱ्यांची मते जाणून घेऊन नेहमीप्रमाणेच रात्री आम्ही चौतीस जणांनी बसने खांडसकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी श्रीफळ फोडून श्रीगणेशा केला. पावसाची हलकी रिपरिप चालू होती. वातावरणात थोडासा गारवा होता. रस्त्यावर अंधुक प्रकाशात गाडी जरा दमानेच चालत होती. रस्त्याच्या दुतर्फा तृणावर पावसाचे थेंब चमकून मागे सरत होते. मेघांतून येणारे काही थेंब गाडीच्या काचेवर आदळून आपले अस्तित्व संपवत होते. किर्रर्र अंधारात आम्ही तेवढा प्रकाश घेऊन पुढे चाललो होतो. रात्रीच्या प्रवासाचा दांडगा अनुभव गाठीशी होता, म्हणूनच आजही वाटेत काही अकस्मात दिसून धडकी भरू शकते यावर चर्चा रंगत होत्या.

ती दिसते खिडकीतून... अनोळखी अशी... शुभ्र वस्त्रात
नथ नाकात... अंधाराला घाबरवणारी...
कधी तोही दिसतो... किर्रर्र रानात...शुभ्र वस्त्रात...
वावळीचा घोट घेणारा
आम्हीही सारे... थांबतो कधी... किर्रर्र रानात
भर रस्त्यात... अंधाराच्या जोडीला
कुणीच नसते... तेव्हा तेथे... टपटपणारे...
फक्त थेंब मोठे... आमच्या वाटेला.

____तोच ढोलकीच्या तालावर सुमधुर संगीताची नेहमीप्रमाणेच मैफिल चालू झाली. गीत वाद्य झंकारू लागले. यावेळेस ट्रेकला सारेच शिवप्रेमी गडयात्री समूहाचे महानुभाव (अनुभवी) उपस्थित होते. काही नविनही होते. ताल सूर लय या साऱ्यांचा अनोखा मेळ जमून आला होता. बस पालघर, मनोर, वाडा, तानसा, आठगाव, शहापूर, साथगाव, किन्हवली, सरळगाव, मुरबाड, म्हसा, ऐनाची वाडी, बलीवरे, मार्गे नांदगावला सकाळी पोहचली. तिथे चौकट मामा कड़े चहाची चुस्की घेऊन खांडस कड़े रवाना झालो. खांडस सोडून गणेशघाट आणि शिडीघाट यांच्या सुरवाती संगम पुलावर आम्हाला बसने सोडले. तिथेच शरीरशुद्धी उरकून ओळखपरेड घेतली.


_____सर्वानाच पुन्हा प्रत्यक्षात सूचना केल्या गेल्या, आणि त्याचं तंतोतंत पालन व्हावं त्यासाठी पहिले, मध्य आणि शेवटी अशी प्रत्येकी दोन स्वयंसेवाकांची निवड केली गेली. तसे पाहायला गेले तर आम्ही सारेच नवीन. मी, सुदेश, अजय, अक्षय, मनीष आम्ही फक्त एकदा या अभयारण्यातील पाऊस अंगावर घेतला होता. पण मुख्य मार्गदर्शक म्हणाल तर अमूल आणि त्याचबरोबर परेश, यांना या अभयारण्यातील पदभ्रमंतीचा दांडगा अनुभव. खरंतर त्यामुळेच आम्ही हा ट्रेक करण्याचे योजिले होते. ट्रेक करतांना अनुभव आणि त्याहून अधिक अनुभवी माणसांची संगत असणे अनिवार्य असते. सोबतच लागणारी सर्व साधने असायला हवीत. तशी रस्सी आणि दूरभाषयंत्र आमच्याजवळ यावेळेस उपलब्ध होतीच.

_____पावसाने दडी मारलेली असली तरी उजव्या हातावर पदरगड मात्र मेघांसोबत लपंडावात रमला होता. डाव्या हातावर भीमाशंकर शिखरमाथा लपुन बसला होता. पायथ्याशी भाताची शेतं वाऱ्याने फरफरत होती. वनराईचे अंगण हिरव्या नवपर्णानी सजलेले दिसत होते. सकाळचे कोवळे ऊन त्यावर बागडत असतानाच मेघ मधेच खोडा घालत होते. दूर डोंगरउतारावर चाललेला ऊन सावलीचा खेळ मोहक वाटत होता. पुलाखालून नितळ ओढा आपल्या धुंदीत खळखळून वाहत होता. मधेच दगडावर आदळून उसळत होता. त्या उसळणाऱ्या पाण्यात उगाच बुडबुडे तग धरन्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. पुलाच्या डाव्या बाजूला खाली बैलांची आंघोळ घालण्यात एक आजोबा व्यस्त होते. त्यांना मात्र त्या बुडबुड्यांचे काही घेणेदेणे नव्हते. कदाचित ते नलेशजींच्या,  टिंब पाण्याचे झेलीत, पान फुटले वेलीत, किती दिसांनी ओढा, मंजुळ झाला गs झाला गs पाऊस आला गs आला गs... हे गीत गाण्यात रमले असावेत.


____खांडस गाव आता पूर्णतः झोपेतून जागे झाले होते. रस्त्यावर माणसांची तुरळक वर्दळ चालू झाली होती. आम्हीही आमचा मोर्चा कच्च्या डांबरी रस्त्याने पुलाच्या डाव्या बाजूने शिडी घाटाकडे वळवला. पाऊस नसल्याने दमछाक होणार होती हे अटळ. मात्र चित्र तितकंसं वाईट नव्हतं. आशेचे मेघ आकाशातुन अधून मधून बरसत होते. मातीचा ओलावा, गवतावरचे थेंब, पाऊस पिऊन नवीन झालेली वृक्षवल्ली न बोलताही बरच काही सांगत होती. पाऊस नुकताच पडुन गेलेला. श्रावणातील निळ्या मेघांचा वर्षाव अधून मधून चालूच होता. आणि वर पाऊस असणार याची तर खात्री होतीच. पाऊले झपझप पुढे पडू लागली. 


_____खांडस गावातील हनुमान मंदिरापाशी पोहचलो. या मंदिराचे अंगण भातशेतीने फुलून गेले होते. नभात श्रावणातील निळे मेघ वाऱ्याबरोबर खेळत होते. पण खेळताना वारा पाऊस घेऊन मंदिरावर शिडकाव करण्याचे मात्र विसरत नव्हते. राहून राहून तो आपले पुत्रप्रेम जाहीर करत होता.

हनुमंताच देऊळ जर्द हिरव्या रानात
देव एकटा देऊळी वर कळस नभात
गर्द हिरवे अंगण निळ्या नभाची छाया
श्रावण मासी भिजते पितापुत्राची माया



असचं काहीसं दृश्य डोळ्यासमोर होते. मागच्या वेळेस इथून आमचा ट्रेक चालू झाला होता. त्या आठवणी टिपत अंतरी मारुतीरायाचे स्मरण करून आगेकूच केली. पहिलीच लाल मातीतली चढण थकवून जागेवरच थांबली. आम्ही मात्र पुढे सरकलो. निथळत्या अंगाने छोट्या मोठ्या झाडांच्या वस्तीतून ओढ्यापाशी पोहचलो. या वेळेस तितका जरी नसला तरी बऱ्यापैकी ओढा खळखळून वाहत होता. साऱ्यांनीच तिथे मनोसोक्त आनंद लुटला. निसरड्या पाषाणावरून कित्येकजण वाहत्या ओढ्यात घसरून पडले. पण भिजून मौज करण्याची ओढ मात्र कमी झाली नाही.
चढ चढून थकल लाल मातीच पाऊल
अंग घामान भिजलं सर श्रावणी चाहूल
येई विसाव्याची कळ दिसे नदीचा ओघळ
निसरड जरी तळ केली साऱ्यांनी आंघोळ
_____ओढ्यापाशी नाश्ता करून पुढे मार्गस्थ झालो. लगेचच ओढा पार करून काही अंतर वर गेल्यावर, उजव्या हातावर पुन्हा दमछाक करणारी चढण लागते. इथे वाट चुकण्याची शक्यता असते. पक्षांच्या सुमधुर अशा संगीतमय जुगलबंदीने आपण त्यांना शोधण्यात व्यस्त होऊन जातो. साग, मोह, आंबा, जांभुळ, करवंदीच्या जाळीतून चढ उताराची वाट चालून आपण पुढे चालत असतो. एव्हाना आपण विहीर सोडून पुढे निघतो. आणि समोर भारदस्त अशा शिखरावरून कोसळणारे अनेक प्रपात मन मोहून टाकतात.

_____पावसाची बुंदाबुंदी चालू होऊन थांबलेली असते. पानांवर रेषा आखून डाव मांडलेले पाण्याचे थेंब वाऱ्याने छेड काढताच अलगद खाली पडत होते. ते अंगावर घेत शिड्यांखालची खडी चढण चढून शिड्यांचा थरार अनुभवला. पावसामुळे स्लीपरी पायरींवर जरा जपूनच पावलं टाकली. तसा दीड फुट रुंदीचा जिनाच म्हणावा लागेल पण एका वेळी एकच जण चढू शकत होता. शिडी थोडी हरकत ही घेत होती.

_____पहिली शिढी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारी जागा येते. तत्पूर्वी निसरड्या पाषाणावरून चढ चढावी लागते. उगा साधन असताना रिक्स नको म्हणून आम्ही वर जाऊन रोप खाली देतो, आणि एक एक करून वरच्या शिढीवरून रस्ता मोडत गुहा म्हणता येणार नाही परंतु उजव्या हातावर छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी. तिथे जमा होतो. येथून खाली शर्थ करणारी आमची मित्रमंडळी नजरेत असतात. पावसाची रिपरिप वाढली होती. वर कातळकड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या जाळीदार खिडकीतून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते .
थेंब थेंबात गुंफले वीण जाळीदार झाली
शृंगारन्या धरतीला सर पावसाची आली
_____एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो. पण खाली काही दिसत नव्हते, दिसले ते सगळे मेघांचे पांघरूण घेऊन सुस्त पहुडलेले.पावसाने पुन्हा आपली रिपरिप चालू केली होती. विसाव्याच्या जागेच्या उजव्या हाताला दुसरी शिडी आहे. ही शिडी त्याहीपेक्षा सांभाळूनच चढावे लागते, ती काही फिक्स नाहीये. ही शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत अशी चढाई येते जिथे दोरीने चढावे लागते. पुढे जाऊन रस्सी खाली टाकली जाते आणि एकेक करून सारे वरच्या दिशेने कूच करतात. रस्सी पकडून चढण्यात काय ती औरच मजा. पण पहिल्यांदाच ते साऱ्यांना तितकंसं जमत नाही. कारण रस्सीच्या साहाय्याने वर चढताना व खाली उतरतांना रस्सीवर आपला भरोसा पाहिजे.

चढ उताराची वाट आहे जंगल हे दाट
दरी खोऱ्यातून चढे घाटमाथ्यावर वाट
___पुढे निघतो तोच एक मोठे ठिगळ ओलांडून जावं लागतं ते करून हुश्श करेस्तोपर्यंत दुसरा एक अॅनाकोंडासारखा आ वासून उभा असतो. याचे वैशिष्ट्य असे कि हा नागमोडी आहे. इथे आपली पाठपिशवी आधीच पुढे किंवा मागे घेणे इष्ट. कारण ती त्या जबड्यातून शिरतांना आपल्याला धक्का देऊ शकते. आणि तिथून धक्का मिळणे म्हणजे सापशिडीच्या खेळात अगदी ऐशी वरून थेट विसावर आणून सोडले जाऊ शकते. आणि पुन्हा बोंबलायचीही सोय राहणार नाही की स्वतःच्या पायावर खालीही जाण्याची सोय उरणार नाही म्हणून दक्षता घेउनच पुढे सरकलो.
नागमोडी वळणांची वीण एकात गुंफते
धुके लाजुनिया जाता झाडा झाडांत बसते
येता पावसाची सर वारा करतो बोभाट
____पहिला टप्पा पार केल्यावर आपणास दोन दगडाच्या मधुन वाकुन उजव्या बाजुला वळायचं असतं. पहिला ठिगळ तुलनेने सोपा आहे. परंतु दुसऱ्या ठिगळच्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत. या दगडावर प्रत्येकी एक माणूसच राहू शकतो. इथे सौंदर्य पाहण्याची मुभा नव्हती. हा पॅच पार केला आणि मग हुश्श केलं. सांगायचं म्हणजे शिडी घाटाचा हत्ती आता सर झाला होता. शेपूट तेवढं बाकी होतं.

____ही शर्थीची चढाई केली की पुढे परत एक उजव्या हातावर धबधबा आपले लक्ष आकर्षून घेतो. तिथे मात्र भरभरून भिजलो. धमाल केली. साऱ्या सफरीचा शीण दूर झाला. येथे एक उदास झाड आपल्या नजरेस पडते. नि त्या झाडाच्या मागे धुक्यात लपलेला पदरगड शोधण्यात आपण व्यस्त होतो. इथली बहुतांशी झाडे शेवाळानी भरलेली आहेत. धुकं आणि पावसामुळे गारवा इथल्या नसानसांत भिनलेला आहे. आणि त्याचा प्रत्येय आम्हाला प्रत्येक  पावलागणिक येत होता. शिढी घाटाचा हत्ती आता पार झालाच होता.
येतो ओढा खळखळ अंगी मातीचं उटनं
शृंगारात रमलेली जाते भिजुनिया वीण
डंख सावराया आले मेघ काळोख करत

पुढे साधी चढण आहे. ती पार केली की थोड्याच अंतरावर गणेश घाटातून येणारी वाट इथे मिळते. ईथे एक चहाची टपरी आहे. मंदिराकडे जातांना शिडी घाटने आल्यास आपणास ही टपरी लागते. पुढे रस्ता फार अवघड नाही पण हा पार करतांना खरोखर अभयारण्यात आल्याचा अनुभव येतो . वाटेत पडलेली झाडे ओलांडताना चिखल रस्त्याच्या दोन्ही बाजुला महाकाय असं दाट जंगल. पर्णपालविच्या गर्दीतून मातीसाठी आसुसलेली किरणे इथे क्वचितच जमिनीच्या दिशेने येऊन निघून जातात. या ट्रेकला मोजकेच फोटो काढता येतात. कारण म्हणजे पाऊस नि धुके.



___पुढे अंगावर येणारी चढण चढून डोंगर उतारावरच्या सरळ जाणाऱ्या निसरड्या वाटेवरून, खाली पठारावरची दहा बारा कौलारू घरांची  वस्ती पाहताना, पाय जागीच खिळून राहिले. शेत शिवारात लावलेल्या भातशेतीमुळे रंगांच्या वेगवेगळ्या छटा नजरेस सुखावत होत्या. गर्द, फिक्या हिरव्या रंगात पावसाचे पाणी मातीत लोळून सुस्तावले होते. त्याची मरगळ दूर करण्यासाठी हिरवे रान, सुर्यकीरणाची आतुरतेने वाट बघत होते पण ते सावळ्या मेघांस मंजूर नव्हते. ते उन पडू नये म्हणून तो आपली भली मोठी छत्री घेऊन बसला होता. पण तो त्यांचा आपसी मामला होता. त्याच्यात न पडता मी पुढची धुक्यातली वाट धरली.
सारे निवळले वर खाली कोरडे पठार
रंग पाण्यात भिजले नाचे फुलले शिवार
छत्री उघडून मेघ उन्हे झाकतो नभात

भिमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे कळते. सिगारेटचा धुरही त्यात दिसणार नाही असं धुक्याचं साम्राज्य असतं. अखेर १च्या सुमारास आम्ही हनुमान तळ्यापर्यंत पोहोचलो. मागच्या वेळी इथे आम्ही थांबलो होतो. माणसांनी केलेल्या घाणीमुळे तेव्हा त्याचा श्वास उग्र घाणेरड्या वासात गुदमरत होता. पण या वेळेस मात्र तळ्याचा परिसर काटेरी कुंपणात बंदिस्त झालेला दिसला. "मोकाट माखण्यापरी मी बंदिवान चांगला.'' याचा प्रत्येय त्याला आलेला असावा. इथुन एकदा मागे वळून खाली पाहिलं. म्हंटल क्षणिक मेघ सरल्या खिडकीतून काहीतरी दिसेल पण नाही. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवली. तळ्यापासून अगदीच काही अंतरावर उजवीकडे धुक्यात लपलेली पुढची वाट धरली. धुके लाजून बाजूला सरत होते.

___ रस्त्यावरील धुक्यात कुंपणाच्या आत असलेले हनुमान तळे, उजव्या हातावर मागे सोडून आम्ही नागफणीच्या वाटेवर प्रस्थान केले. एक ते दीड किमी अंतरावर काहीसे खाली उतरून  सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर, तेथून काहीश्या अवघड वाटेने वर चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर(१२३० मीटर) गाठले. येथून धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान सौंदर्यवान दिसत होते. त्या माळरानातुन वर येणारा हवेचा दबाव प्रचंड होता. काही वेळा तो ईतका प्रचंड  असतो की रुपयाच नाणं देखील, खाली जात नाही असं म्हणतात, पण मी मात्र माझा रुपया खर्ची केला नाही. या उंच अशा शिखरावर खाली गावांच्या आजोळातून, घोंगावत येणारा मायेचा वारा. अन त्या वाऱ्याने नागफणीच्या डोईवरला हिरवा पदर, सावळ्या मेघांशी हितगुज करत असलेला. असं निसर्गरम्य वातावरण कोणास सोडून जावं वाटेल..!!!
अंग भिजले वाऱ्याचे त्याला होईना ग थारा
आजोळातून आला हिरवा कंच शहरा 
रान जोरात हलले मेघ भयभीत झाले
अडकले डोंगरात रिते बरसून झाले
___मला आठवतंय आजही याच उंचीवर मागच्या वेळी(२२/८/२०१५) मी इथे एक पण केला होता. माझ्या आयुष्यातील तो पहिला ट्रेक होता . म्हणूनच असेल. वेळ संध्याकाळची होती. इथून मी जेव्हा खाली पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की आपण खालती कुठल्या उंचीवर वावरत असतो...!! अन आयुष्य एका उंचीवर नेवून ठेवण्याच्या धावपळीत आयुष्य म्हणजे काय हेच विसरून जातो. त्यातून जेव्हा उसंत मिळेल तेव्हा मोबाईल मध्ये  कँडी क्रशचे टप्पे पार करत बसतो. पण मी ठरवलं' नव्हे तत्काळ मोबाइईल मधून कँडी क्रश बाद करून टाकला. 556 वा टप्पा क्षणात दिसेनासा झाला. आणि या पुढे सृष्टीने दिलेल्या सौंदर्याने ओतप्रोत असे जिवंत नैसर्गिक टप्पे पार करण्यात, आपल आयुष्य खर्ची घालायचा प्रयत्न करायचा, कारण या निसर्ग सानिध्यात परमसुख आहे. आणि ते प्रत्यक्ष अनुभवाने मी प्राप्त केलं होते. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. पावसाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. हा, ईथे नागफणीवर मात्र सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये. नाहीतर सेल्फी स्टीक वर आणि आपण कुठे घरंगळत जाऊ याचा पत्ता लागणार नाही...

___तिथून खालची वाट धरली. सीताराम बाबंचा मठ पार करून, वर चढून मंदिराकडे प्रस्थान केले. शिवलिंग, त्रिशूलमध्यस्थी असलेल्या कमानी खालून दगडी चिऱ्याच्या पायऱ्यांवरून, खाली मुख्य मंदिराच्या दिशेने उतरलो. मुंबई डबेवाला वसतिगृहात राहण्याची सोय पूर्वनियोजित होती. तिथे पाठपिशव्या टाकल्या, चहाचे दोन घोट घेतले आणि अंधार दाट होण्यापूर्वी परतायचे म्हणून मंदिराच्या अजून खाली दाट जंगल वस्तीत नदीच्या पोटात स्वयंभू अवतरलेले गुप्त भिमाशांकाराचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झालो. भीमा नदीचा मुळ उगम ज्योतिर्लिंगात आहे असं म्हणतात.

मंदिराच्या डाव्या बाजूने एक पाण्याची वाट खाली उतरते. त्याचं वाटेने आम्ही खाली उतरू लागलो. वाटेत न धड जमीन दिसत होती न पाणी. अस्ताव्यस्त दगडांवर विखुरलेले निर्माल्य.  मंदिरात भक्तिभावाने चढवलेल्या फुल हारांना निर्माल्य हे नविन नाव देऊन, त्या पाण्याच्या वाटेवर विसर्जित केलं होत. मानवनिर्मितच कचरा आणि विष्ठेच्या पसाऱ्यात त्यांचा जीव गुदमरत होता. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू त्या पाण्यात मिसळून त्वरेने खाली उतरत होते, त्यांना तिथेच ठेवून. आणि ओढ्याच्या काठी झाडांवर, रान फुलांच्या पाकळ्यांवर, पानांच्या गर्दीतून वाट काढून, थेंबा थेंबावर अवतरलेले अंबर ते दृश्य जड अंतःकरणाने पाहत होते. आम्हीही त्याचं अवस्थेत खाली उतरलो.

फुल हारांची दुकाने देवळांच्या वाटेवर
दरवळतो सुवास गाभाऱ्यात पिंडीवर
वाट देवळाच्या पाठी ओढा मंजुळ वाहतो
देव पुजल्या फुलांचा घरी मुक्काम असतो
फुल देवास चढले त्याचा मुक्काम हलला
नाव गेले बदलून नदी ओढ्यात कुजला
झाले ओढ्याचे गटार नाही कोणाचा आधार
सारे फसवे देखावे सवालांचा भडिमार
मेघ बरसून रिते कुणा पुसावे उत्तर
भुई हळव्या मनाचे थेंबा थेंबात अंबर


संध्याकाळ जवळ येऊ लागली होती. घनदाट अभयारण्यात, डोंगर उतारावर दोन ओहोळ पार केल्यानंतर वीसएक मिनीटात आम्हास  धबधब्याचा मोठा आवाज कानी पडला. आणि गुप्त भीमाशंकराचे ठिकाण जवळ आल्याची चाहुल लागली. तत्पूर्वी एक उजव्या हातावर मंदिर लागते. त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरलो. काही क्षणातच डावीकडे एक धबधबा नजरेस पडला. त्याच्या वर वाहत येणाऱ्या पाण्यातून पलीकडे जाऊन खाली उतरलो. जिथे धबधब्याचे पाणी पडते. तिथेच एका बाजुला छोटे स्वयंभू / कोरलेले शिवलिंग आपल्या नजरेस पडते. त्याचे दर्शन घेऊन धबधब्याखाली अंग मोकळे केले. याची उंची सहा ते सात फुट आहे. धबधब्याचा प्रवाह मात्र खूप जोरात होता. मनसोक्त भिजून माघारी फिरलो. रानातल्या निर्जन वाटेवर असणाऱ्या गणपती मंदिरात दिवाबत्ती करून आरती केली. इथे मंदिराजवळ शेकरू हमखास दिसते असे ऐकून होतो. पंख असलेली मोठी खारुताई, अतिशय लाजाळु अशी... चौफेर भिजून चिंब झालेला निसर्ग न्याहाळून पहिला पण पदरी निराशा आली. प्रवाहाच्या उलट्या दिशेने माघारी वसतिगृहात परतलो.


मंदिराचा कळस धुक्यात अस्पष्ट दिसत होता. फ्रेश होऊन मुख्य मंदिरात दर्शनासाठी गेलो. अगदी पायऱ्याशी रेंगाळत असलेल्या मेघांमुळे, दिव्यांचा प्रकाश अंधुक झाला होता. तरीही दुकानांच्या रांगेत काही ठिकाणी उब घेत असलेल्या, टोपलीतील मक्याच्या कणसातून निघालेल्या वाफा, अगदीच स्पष्ट दिसत होत्या. तूर्तास जड अंतःकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले असले तरी, ती उब घेण्यासाठी लाळग्रंथी आसुसल्या होत्या.  दिवसभराच्या भक्तांच्या पायपिटीने आणि वाऱ्याने फटकारलेल्या पावसामुळे, काळ्या पाषाणी पायऱ्या लाल रंगात भिजल्या होत्या. त्या भिजल्या पायऱ्यावरून पायतनावीण चालताना एक अद्भुत अनुभूती घेत मंदिरात पोहचलो. हे सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे जुने मंदिर. छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजन असलेली लोखंडी घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 अशी इंग्रजीत नोंद आहे. महादेवाच दर्शन घेवून सभामंडपात काही वेळ शांततेची अनुभूती घेतली. वस्तीगृहात परतून जेवण उरकले. गाण्यांची मैफल सजली आणि रात्र निद्रेच्या अधीन केली.


 सकाळ झाली आणि बैल घाटाचे वेध लागले. महादेवाला नमस्कार केला आणि चहा नाश्ता उरकून परतीची वाट धरली. पुन्हा सर्वाना सूचना केल्या गेल्या. मंदिर खाली सोडून वर कमानीजवळ चीत्रखेचक यंत्रात आठवणी साठवल्या. मेघांनी जणु प्रणच घेतला होता, की इथून हलायचं नाही. धुके अधिकच दाट झाले होते. सकाळचे नऊ वाजले होते. सूर्याचा दूर दूर कुठे मागमूस नव्हता. एक वीस फुट अंतरावरच काहीच दिसत नव्हत. भक्तांची वर्दळ चालू झाली होती. भीमाशंकर बसआगाराच्या पुढे डाव्या हातावर, झाडीतून एक चिंचोळी ओढ्याची वाट खाली मोठी मोठी होत जाते. तिच्या कडेकडेने तर कधी त्या मोठ्या होत जाणाऱ्या पात्रातून आम्ही खाली नांदगावच्या दिशेने उतरू लागलो. जसजसे खाली उतरत गेलो तसतशी मेघांची गर्दी वर सरकू लागली.


काही अंतर चालून लगेचच वरून भरधाव वाहत येणारा ओढा पार करावा लागतो. भल्या मोठ्या दगडाच्या कधी आडोशाला तर कधी त्यावरून तो खळाळून वाहत होता. दगडांचा मुळी त्याला अडसरच नव्हता. दुतर्फा पाऊस भिजल्या वृक्षांच्या भिंतीने त्यास आसरा दिला होता. पावसाचे थेंब त्याला न्हाउ घालण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. धुके मायेच्या स्पर्शाने त्याला गोंजारण्याचा प्रयत्न करत होते. पण कसलं काय..!! भाई थांबण्याच्या मुड मधे नव्हते. मग आम्हीही सावध पाऊले टाकून त्याचा पल्याड गेलो. पुढे वाटेत खाली उतरताना छोटे छोटे प्रपात मोहवीत होते. पावसात भिजत असलो तरी त्याखाली भिजण्याचा आम्हास मोह आवरता येत नव्हता. काही क्षण का होईना..!! त्याची थाप पाठीवर घेऊनच पुढे चाल करत होतो.


जसजसे खाली उतरत गेलो तसतसे धुके विरळ होत गेले. पावसानेही लपंडाव खेळण्यास सुरवात केली. भिजलेल्या दाटीतून खाली उतरणारी पायवाट दमछाक करत होती. मधेच विसावा घेऊन तिच्याशी सलगी करून पुन्हा खाली उतरताना ती आधार देत होती. मध्यंतरी एक चहाची टपरी लागते. तिथे चहाची चुस्की घेतली. चुस्की घेताना मनात विचार आला ह्या घाटाच नाव बैलघाट कुणी ठेवलं असावं. तसा ठळक नामनिर्देश कुठे नाही आढळला आणि बैल या घाटाने वर जाणे सोपे नाही. खरंतर ही धबधब्याची वाट इथून पावसाळ्यात फक्त उतरायचं. आणि चहा संपवून उतरायला सुरुवात केली. पावसात भिजत असलेलं सौंदर्य वर सोडून, खाली भिजून वाऱ्यावर सुकत टाकलेल्या सौंदर्याशी जुळवून घेतले. पायाखाली गवताची हिरवळ तुडवत... तर कधी चिखल पाण्याच्या लाल पायवाटेने... तर कधी जीर्ण गंजलेल्या पाचोळ्यावरून चाल करत असताना होणारे स्वरसंगीत ऐकत खाली मैदानी जागेत उतरलो.

मागे वळून पाहिलं तर विश्वास बसला नाही एवढा महाकाय असा पर्वत आम्ही चढून सुखरूप खाली उतरलो. ही त्या महादेवाची आणि बजरंगाचीच कृपा.... हुश्श करून सुस्कारा सोडला आणि काही वेळ न्याहळत राहिलो. इथली प्रत्येक वाट आम्हा भटक्यांना खुणावत होती. आम्हीही तिच्या कलेनेच चालतो हे खरं असलं तरी प्रत्येक वेळी तिचं सौंदर्य वेगळे भासत होते. हिरव्या वनश्रीसोबत काळ्या कातळावरुन उड्या मारत असलेले पाण्याचे प्रपात, मेघांनी मायेने दिलेले पांघरुन, त्याच्या कुशीत वसलेले डोळ्यांना तृप्त करणाऱ्या अशा आल्हाददायक निसर्गसौंदर्याची अनुभूती घेऊन आम्ही खाली उतरलो. पुढे अर्धा तास पायपीट करून नांदगावात पोहचलो. गावाच्या आधी एक बंधारा ओसंडून वाहत होता त्या वाहणाऱ्या पाण्यात  मनसोक्त आंघोळी केल्या आणि चौकट मामा च्या घरी जेवणाची व्यवस्था होती, फ्रेश होऊन जेवण केलं .अप्रतिम रुचकर अशा जेवणाचा आस्वाद घेतला. खासकरून तांदळाची भाकरी आणि ठेचा...

परतीची वाट धरताना पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिले. या अभयारण्यातून निसर्ग सौंदर्याची सलगी करून त्याचा मान राखत हा ट्रेक आम्ही पूर्ण केला आणि त्याने करू दिला याचा निश्चितच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. कुठलाही ट्रेक करतांना तो मनोरंजनासाठी करू नये. मनोरंजन हे माणसांनी निर्माण केलेल्या आधुनिक ठिकाणी सोईचे असू शकते, पण निसर्गापुढे अदबीने चालनेच सोईचे ठरते ही गोष्ट प्रत्येक ट्रेकर्स जाणतो. अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण स्वतः कारणीभूत असतो, इतर कोणालाही आपण दोषी ठरवू शकत नाही. आपली पायरी ओळखूनच आपण पाऊल टाकणे सोईचे असते. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे वागणे चुकीचे आहे याची जाणीव आम्हा प्रत्येकाजवळ असली की सर्व काही सुरळीत होते आणि झाले. माघारी फिरलो आणि पुन्हा त्याच वाटेने सुखरूप घरी पोहोचलो. हा ट्रेक आम्ही जवळपास अकरा महिन्यापूर्वी केला होता. आणि मी ब्लॉग आता काही दिवसांपूर्वी लिहायला सुरवात केली. म्हणून काही मुद्दे निश्चितच सुटले असतील. पण मी आज पुन्हा या ट्रेकची सफर केली, बघा तुम्हालाही झाली का ...!!!
धन्यवाद
___नित...  नितेश पाटील ( धनसार, पालघर ) ९६३७१३८०३१
⛳तुही गडयात्री..मीही गडयात्री⛳

पालघरहून भीमाशंकराला जाण्यासाठी मार्ग ब्लॉगवर नमूद आहे. मुंबईपुण्याहून कर्जतला यावे लागते. कर्जतहून खांडस या गावी यावे (३४ कि.मी.) खांडस गावातून शिडी घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते.उतरतेवेळेस बैल घाटाचा उपयोग करू शकता.

दुसरा मार्ग

माळेगाव बु|| (आंदर मावळ) -  नाकींदे पाणी (वांद्रेखिंड)-भोरी विहीर- रामखिंड-कळमजाई मंदीर-भीमानदी पात्र-अभयारण्य- श्रीभीमाशंकर.
कान्हे  (मावळातील)रेल्वे स्थानकावर उतरुन,
सावळा लालपरी (एसटी) ने माळेगाव बु|| अथवा खाजगी गाडीने माळेगाव बु|| येथे
येणे.
व जंगलवाटेने येथुन भिमाशंकर ट्रेक करु शकता.
पायथ्याशी राहण्याची व्यवस्था होईल
संतोष आलम फोन नं.९६८९४९१८९२



Wednesday, February 7, 2018

कलावंतीण हाईक

सस्नेह जय शिवराय
कलावंतीण रपेट (हाईक)२९/१०/२०१७ 
शिवप्रेमी गडयात्री पालघर (धनसार)

___कार्तिक महिन्यात दिवस आखूड होत जातात. संध्याकाळ दिवसाला भेटण्यासाठी लवकर येते आणि सरून जाते. रात्र धरेवर तितक्याच घाईने निजण्यास येते. जशी जशी ती वर येते तशी आणखीनच दाट होते. आणि पहाट होता होता ओसरून जाते. आणि आम्ही मात्र तिला नेहमी जागवत सफर करत असतो.  तिलाही आता सवय झालंय, आमच्या सोबतीची कधी मधी. आमचा प्रवास हा नित सूर्योदय घेऊन चाललेला आसतो. कार्तिक शु. अष्टमीचा दिवस. कार्तिक महिना म्हंटला म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ सोनेरी ढगांची नभात ढवळाढवळ चालू असते. दुपार मात्र निरभ्र दिसते. संध्याकाळ सरली होती आता सकाळ ठाकूरवाडीत कलावंतीणच्या पायथ्याशी उजाडणार होती. कलावंतीण शिखर माथ्यावर नभात मेघांना चढणारा सोनेरी साज अनुभवण्यासाठी आम्ही उत्सुक होतो.

___जेवण उरकून सॅक भरली. सोबत असावी म्हणून स्लीपिंग बॅग घेतली. पल्ला तितकासा लांब नसल्याने जरा उशिरानेच घर सोडलं. रात्रीचे साडे दहा वाजले होते. आम्ही एकतीस जण, आई जगदंबा, आणि गणेश वंदन करून  बसने मार्गस्थ झालो. शिवरायांचा जयघोष केला आणि महाराष्ट्र गीताने जोर धरला. ढोलकीच्या पाठीवर थाप, तालात थिरकू लागली. हवेत थोडासा गारवा होता. अष्टमीच्या चंद्राचे, सुर्या नदीच्या पात्रात लोभसवाणे प्रतिबिंब उमटले होते. त्याचा मोह नदीकाठच्या झाडांना झोपू देत नव्हता. झाडांच्या सावल्या त्या मोहक प्रतिबिंबास, गोंजारत जखडून ठेवण्याच्या प्रयत्नात होत्या. त्याचं हितगुज चालू असतानाच आमची पाठ वळली आणि बस पुढे मार्गस्थ झाली. बंधाऱ्यावरून ओसंडणाऱ्या पाण्याची धार आज थांबलेली होती. पण आम्ही पुढे निघालो.

___भातशेतीच्या लगबगीतून नुकताच शेतकरी मोकळा होण्याच्या तयारीत आहे. पाऊस आमच्या भागात या वर्षी अतिरिक्त गोंधळ घालून गेल्याने पिकांचे नुकसान झाले हे खरे असले तरी, जे आहे, जसे आहे ते पिक शेतातून काढणे अनिवार्यच आहे. त्याचा दरवळ परिसरात पसरला होता. आणि हा दरवळ भरभराटीचा असो, ही आमचीच नव्हे तर आपली सर्वांचीच मनोमन इच्छा असते. काही वेळातच मासवण गाठलं. बसला आहार देणं गरजेचं होतं. आणि बरं हिला खाणं चालत नाही पिणंच द्यावं लागतं. नाही दिलं तर जागची हलायची नाही. म्हणून तिचा कोठा भरून घेतला. गोवाड्याचा घाट पार केला आणि दोन जीर्ण गुलमोहराच्या सावलीतून मनोर मध्ये प्रवेश केला. मनोर झोपेच्या अधीन झालं होतं. काय तो रस्त्यावर खांबदिव्यांचा जागता पहारा चालू होता. त्याला छेद देऊन आम्ही वैतरनेच्या पात्राजवळून, डाव्या हातावर असलेल्या सिद्धिविनायकला वंदन करून, मुंबई अहमदाबाद महामार्गावर पोहचलो.

___गाड्यांच्या गर्दीतून गाडी वेगात पळू लागली. पश्चिमेस सूर्या नदीच्या पात्रात पाहिलेला चंद्र, आता नभात अधिक तेजस्वी आणि मोठा दिसत होता. मावळतीला जात असतांना देखील त्याचं सौदर्य अधिक खुलून दिसत होतं. पण त्याची काया मात्र मळकट झालेली भासत होती. अन रस्त्यावर गाड्यांची वर्दळ वाढली होती. गाड्यांच्या लाल पिवळ्या रोषणाईत मधेच एखादा पांढरा दिवा डोळ्यांच्या नाजुकतेवर पाशवी वार करत होता. रात्रीची मध्यान उलटली होती. वाटेत थोडी ओस पडलेली जाणवत होती. तीन लेनच्या रस्त्याशेजारी उगवलेल्या झाडांची ड्यूटी अजून संपली नव्हती, आणि कधी संपणारही नव्हती. या झाडांना उसंत मिळत नाही. सतत त्यांना वाहनांच्या वेगाने वाऱ्याची, त्यांच्या प्रकाशाची धडक होतच असते. बाकी निसर्गाचा मार तर त्यांना सहन करवाच लागते. त्यामुळे झोप हा शब्द त्यांनी त्यांच्या आयुष्यातून हद्दपार केलेला असतो. म्हणूनच कितीतरी वाहनांच्या धडकांच, त्यात दगावलेल्या जीवांचे ते मूक साक्षीदार, मला केविलवाणे दिसत होते. आजही ते अढळ नजरेने तग धरून उभे आहेत हे विशेष. त्यांची ती धडपड पाहत आम्ही घोडबंदर गाठलं.

___काट्यावर काटा चढून खाली उतरला होता. घोडबंदरच्या आधी वसई खाडीवरील वसईपूल आजकाल नेहमीच आजारी असतो. मुंबईला जोडण्यासाठीचा हा राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील महत्वाचा दुवा असल्यामुळे, साऱ्यांची निस्सीम ओढ त्याच्यावर आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आणि म्हणूनच त्याला पाहण्यासाठी शेकडो गाड्यांची गर्दी तिथे रुळलेली दिसते. पण त्याच्या मुळ आजाराकडे दुर्लक्ष करून,  जो तो त्याच्या डोईवर स्पर्श करून काढता पाय घेतो. आम्हीही तेच केलं. पुढे डाव्या हातावर ठाण्याकडे आमची बस एक सदस्य आणखीन घेऊन मार्गस्थ झाली. एक छोटासा घाट उतरून ठाण्यात प्रवेश केला. गाण्यांची मैफल चांगलीच रंगात आली होती. त्यामुळे ठाण्यातील सिग्नलचे दिवेही, स्वस्थ न बसता थिरकत होते. आधी हवेत गारवा जाणवत असला तरी तो इथे वरमला होता. अंगातील नृत्य पेशी जागृत झाल्याने देह घामाने भिजली होती.

___नवी मुंबईत प्रवेश केला, रात्रीचे दोन वाजले होते जुही स्टेशन लगत बसने थांबा घेतला आणि मोहीम प्रमुखांसोबत अजून चार सदस्य सोबत घेऊन, एक्सप्रेसवे वर आमची बस धाऊ लागली. पण तो संग काही फार काळ टिकणार नव्हता. पुढे जाऊन शेडुंग एक्झिट मारला आणि एक्सप्रेसवे सोडला. पुढे खड्यांचा प्रवास करण्यासाठी खोपोली टोल भरला. आणि अजिवली वरून लेफ्ट मारून बेलवली च्या सिंगल गाव रत्यावर आमची बस पुढे निघाली. गावं अगदी शांत सुख निद्रेत निद्रिस्त होती. खांब लाईटीहि झोपल्या होत्या. दुतर्फा रस्त्यात पिकल्या फुलगवतांचे अंग शहारून निघत होते. त्या शहारल्या वातावरणातून रेल्वे ब्रिज क्रॉस करून बेलवली गाठली. तिथून राईट मारून अगदी बस जाईल इतक्या मोजक्याच वाटेवरून ठाकुरावाडीत पोहचलो.


___पहाटेचे तीन वाजले होते. हवेत कमालीचा गारवा दृढ होत चालला होता. गाव निद्रावस्थेत असलं, घरांची सर्व दार बंद असली तरी, देवाचे दार मात्र सताड उघडे होते. दर्शनीच तुळशीचे वृंदावन पहाटेच्या थंड झुळकेसरशी थरथरत होते. दसऱ्याचे लावलेले तोरण दाराला अजून खिळ करून बसले होते. सभामंडपात एकामागोमाग तीन घंट्या शिस्तीत दर्शनासाठी न जाणो किती काळापासून उभ्या होत्या, १५*१५ फुटांचा सभामंडप, सहा चौरस खांबांच्या खांद्यावर उभा होता.  १०*१० च्या गाभाऱ्यात निरव शांततेत तेवत असणाऱ्या समईच्या ज्योतीने लख्ख प्रकाश पसरला होता, ओळखीचा सुगंध सभोवती पसरला होता. त्या प्रकाशात मारुतीराया हाती पर्वत घेऊन उभे होते. तुमचे मन निर्मळ असेल तर, हि मोहीम फत्ते झालीच म्हणून समझा, अशी ग्वाही देत होता. या जगाच्या पाठीवर असे एकही गाव नसेल जिथे भाव नसेल. आणि आपल्या महाराष्ट्रात तर, मारुतीरायाच स्थान नसेल अशी गावं क्वचित सापडतील. आम्ही १२ जनानी सभामंडपातच अंग टाकले. बाकीचे बसच्या सीटांवर घोरले.

___आमची पोहोच देण्यासाठी मोहीम प्रमुखांनी ठाकूरवाडीतील धर्मा दादांना फोन (8424995011) केला. त्यांच्याकडेच आमची सकाळी चहा नाश्त्याची सोय होती. त्यांना तो पाचला तयार ठेवायला सांगीतले. झोप येत नव्हती म्हणून मी बाहेर पडलो. अंधाराची श्यामल छाया धरतीने पांघरून घेतली होती. चंद्रही केव्हाच झोपी गेला होता. चांदण्या नभात अजून खेळ खेळत होत्या. उजडताच त्या झोपायला जाणार हे निच्छित होतं. आणि आता अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे काही स्तब्ध शांत भासत होत्या. जवळच कुठेतरी पाण्याचा सौम्य मंजुळ स्वर कानी येत होता. कलावंतीणच्या डोंगरकुशीत विजेऱ्यांची हरकत जाणवत होती. बहुतेक रात्री वस्तीला गेलेले ट्रेकर्स वरच्या दिशेने प्रस्थान करत होते. काही वेळ डोळ्यांना आराम मिळावा म्हणून माघारी फिरलो. मोहीम प्रमुख जागेच होते मग काय... गप्पांचा फड रंगला आणि पाच कधी वाजले ते सुद्धा कळल नाही.

___दूर कुठेतरी दुसऱ्या गावातून भजनाचे सुमधुर स्वर कानी पडू लागले होते. त्यात तल्लीन होता असतानाच इथे कोंबडे आरवू लागले होते. काही मोबाईल मधेही आरवून थकले पण आमचे वीर काही उठले नाहीत. चहा नाश्ता तयार होता तसे काका येऊन सांगून गेले. शरीरशुद्धी उरकली. बाहेर पडलो. मंदिराचा कळस स्पष्ट दिसू लागला होता. आकाश उजळू लागले होते. नभातील चांदण्यांनी उजेडाचा आडोसा घेतला होता. आणि त्या संध्याकाळपर्यंत आता त्याच्या आडोशाला निपचित पडून राहणार होत्या. पूर्वेस नभात अभ्रांची खवले एकवटलेली दिसत होती. कलावंतीण, प्रबळगडाच्या माथ्यावर अभ्रांनी आकाशाला उचलून धरलं होतं. पण जसं एका आईच्या पायावर मुलांनी त्यांना उचलावं म्हणून, साद घातलेले असंख्य हात तिच्या पायाला बिलगले असावेत असेही केविलवाणे दृश्य मला दिसत होतं. हळुवार त्या अभ्राना सोनेरी रंग चढू लागला होता. आणि त्या अभ्राना नेमकी तीच संधी साधायची होती. कार्तिक मध्यंतरी आला होता. त्या संधीच सोनं लपेटून ते पसार होणार होते. आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा माझा काही मानस नव्हता.
___सारे नियोजित वेळेत उठले. शरीर शुद्धी उरकून चहा सोबत लिंबू मारून कांदापोहे फस्त केले. आणि ओळख परेड घेतली. मोहीम प्रमुख शैलेश सावंत सोबत अमूल यांनी सर्वाना मार्गदर्शन आणि महत्वाच्या सूचना करून कलावंतीण च्या दिशेने ६.३० वाजता प्रस्थान केले. वाटेत गावातील महिला विहरीवरून पाणी आणण्यात व्यस्त होत्या. डोईवर चार हांडे अन हातात एक भरलेली कळशी लीलया वाहत होत्या. वाटेच्या शेजारी उमललेली पांढरी फुल उमलून जमिनीवर रेंगाळत होती. डांबरीवर खड्यांचे खेळ चालू होते. काही अंतरावरच उजव्या हातावर प्रबळमाचीच्या  रस्त्याकडे वळलो. कोपऱ्यात सुचदर्शक फलक लागलेले आहे. यावर प्रबळगड विषयी माहिती आहे. माथेरान डोंगर रांगेतील २३०० हजार फुट उंचीचा हा किल्ला. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहात दिलेल्या २३  किल्यांमध्ये याचा समावेश होता. कलावंतीण बद्दल या फलकावर माहिती नाही.

____ गाव जसे मागे पडू लागले तसे दुतर्फा रस्त्यावर घरांची जागा फुलगवतानी घेतली होती. त्या सजलेल्या रस्त्यावरून आम्ही पुढे सरू लागलो. यावेळेस सोबत तीन छोटे पण आमच्याहून उत्साही आणि चपळ होते. ते म्हणजे श्रीहान शैलेश सावंत (वय वर्षे साडेतीन), श्लोक स्नेहल राऊत (वय वर्षे सहा), श्रीयांस शैलेश सावंत (वय वर्षे आठ). श्रीहान बाबांच्या पाठीवर बगेत आणि बाकी दोघे आपल्या नाजूक पायांना दरडावत पुढे चालत होते. गावातून सरळ जाणारी वाट प्रबळगडावरून आलेल्या ओढ्याच्या पुलावरून आम्ही मेन पार्किंगची जागा गाठली पण आमची बस आम्ही मागेच सोडली होती. इथे गावाची वेस ओलांडून रानवाटांच्या सानिध्यात प्रवेश केला.

____ वाट तशी रुंद आहे. आजूबाजूला पावसाळ्यात विराजमान झालेल्या झाडींची, वृक्षांची आता पान गळतीस सुरवात झाली होती, पण पावसाळ्यात भरपूर ओलावा धरून असलेल्या वृक्षांनी नवपालविला जन्म दिलेला असतो. तिरप्या किरणांच्या स्पर्षाने ती शहारली होती, आपल्या माना त्यांनी खाली झुकविलेल्या होत्या. त्या दाटीतून पलीकडचं चित्र मात्र अगदीच दिसत नव्हतं. अर्धा तास तशीच पायपीट करून, डाव्या हातावरून येणारा, तूर्तास कोरडा असणारा ओढा, पाईपांद्वारे अर्धवट रस्त्यावरून खाली उतरला होता. त्या ओढ्याला क्रॉस करून पुढे निघालो. पायाखाली डांबरीचे अवशेष, इथे वर जाणारा डांबरी रस्ता होता याची ग्वाही देत होते. पुढे डाव्या हातावर वळून एक विसाव्याची जागा आहे तिथे थांबून इतर सदस्यांची वाट पाहिली. सारे जमताच पुन्हा मार्गस्थ झालो.

कई लहारोंसे सामना करता किनारा एक है
मंजिले कठीण हि सही 
होंसलो का जमावडा यहा बहुत है
___थोडी चढ चालून मागे वळून पाहिलं. आता गाव नजरेस पडत होतं. हिरव्या दुलईवर नक्षीदार घरांची आरस शोभून दिसत होती. दूर मागे रसायनी जवळ हवेत धुक्याचा पदर संथ गतीने पश्चिमेकडे सरकत होता. तर पूर्वेस कलावंतीण सुळक्यावर भगवा ध्वज वाऱ्याने फरफरताना दिसत होता. सूर्य आपली लाली सोडून आता वर आला खरा, पण सकाळच्या गर्दी केलेल्या अभ्रांत तो गुरफटला होता. नभातील मेघांचा साज आता उतरवून ते उजळ चेहऱ्याने दूर फाकू लागले होते. त्याला पाठ करून आम्ही शिवकृपा ढाबा (7045791232) गाठला. इथे नाश्ता, पाणी करून उजवीकडची वाट धरली. डाव्या हातावर माचीवरून येणारा ओढा कोरडा ठाक पडला होता. दगड गोट्यांच्या पाठीवर पाण्याचे वर्ण, सुकूनही वाळत पडले होते. हिरव्या रंगात नटलेली किनार कावीळ झाल्याप्रमाणे, पिवळी धमक होऊन निपचित पडली होती. वर्षाचे सौंदर्य शरदाने खुलवले आणि ते हेमंताने हिरावून घेतले होते. आणि त्याच्या दुःखात भर म्हणून आम्ही त्यावर चाल करून पुढे सरलो.


____आम्ही प्रबळगड माचीच्या अंतिम टप्प्यात पोहचलो होतो. वाटेत प्रबळगड कडे आणि कलावंतीण सुळक्याकडे, असे नामनिर्देश असणारे फलक आता दिसू लागले होते. वाटेत उजव्या हातावर दगडात कोरलेल्या मारुतीराय आणि गणेशाच्या सुरेख शिल्पाला माणसांनी देवत्व देऊ केलंय, त्याला नमस्कार केला आणि पुडे निघालो. थोडी चढण चढून प्रबळगड माची पठारावर पोहचलो. रात्री मुक्कामी असणाऱ्या ट्रेकर्सनी मुक्कामासाठी 10-12 टेंट लावल्यामुळे तिला एक एक छोटेखानी वस्तीचं स्वरूप आलं होतं. त्या वस्तीवर सकाळचं ऊन तिरपा कटाक्ष टाकून पसरलं होतं. एका दिवसात दोन्ही गड करायचे असतील तर येथे मुक्कामास राहणे अनिवार्य आहे. न राहून आंम्ही ती चूक केलीच होती. मनात निर्धार असला तरी, वेळेच गणित हे वेळच सोडवत असते. तो अधिकार आपल्याला नाही. त्या वस्तीतून पुढे सरलो.

____ठाकूरवाडीतून दिसणारे दोन v आता दूर असले तरी आमच्या जवळ भासत होते. यामध्ये एक डावीकडचा v मोकळा दिसत होता. जो दोन्ही शिखरांना एका बिंदूत जोडत होता. अनंत आकाशाची निळाई त्याच्या केंद्रबिंदुकडे आकर्षित झालेली दिसत होती. तर उजव्या हातावरील v कातळ भिंतीने बंधिस्त भासत होता. आणि या दोहोंच्या केंद्रबिंदुना जोडणारी कडा बालकनीची रेघ म्हणजेच, कलावंतीणच्या पायथ्याकडून प्रबळगडाकडे जाणारी वरची वाट आम्हास दिसत होती. माचीवर उजव्या हातावर असणाऱ्या जय हनुमान हॉटेल जेथे आपाची पूर्व निर्धारित जेवणाची सोय होती. त्यांना मोहीम प्रमुखांनी आमची नोंद कळवली. पुन्हा आम्हाला माहितीपर मार्गदर्शन दिले आणि आम्ही पुढे निघालो.


____दगडातून झिरपून येणारा ओलावा, वाटेत पायाखालुन खालच्या दिशेने जात होता.त्याच्या शेजारी गुलाबी फुलांचे पुष्पगुच्छ जणु आमच्या स्वागतासाठी ठेवले होते. त्यांचा निरोप घेऊन आम्ही गावाच्या दिशेने कूच केले. या माचीवर जवळपास वीस वस्तींच गाव आहे. चौकोनी कौलारू घरांच्या अंगणात लहान मुलांचा खेळ चालू होता. त्या गावातून वाट काढत आम्ही रानात प्रवेश केला. चढ थोडी जास्त असली तरी पायथा नजरेत होता. खरतर कलावंतीण हा दुर्ग नाही, तो एक बुरुज आहे. त्या बुरुजावर चढण्याची भीती, आपल्यला त्या संदर्भात विडीयो पाहिल्यानंतर नक्कीच जाणवते. आणि तीच भीती आम्हा सर्वांच्या र्हुदयात कुठेतरी घर करून होती. आम्ही बुरजाच्या पायथ्याला पोहचलो होतो. माथेरानच्या सौंदर्यवस्तीतून आपणास जो सूर्यास्त दोन शिखरांच्या मधोमध, उजेडाशी आपले नाते तोडताना, आपले अस्तित्व रात्रीच्या अधीन करतांना दिसतो, त्या तळाची उंची आम्ही सकाळी सव्वा नऊ च्या दरम्यान गाठली होती.

____पावसाळ्यात कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून चढाई करणे अवघड होईल, या विचाराने आम्ही पावसाळ्यात येथे येणे टाळले होते. पण आताही ती चढण सोपी भासत नव्हती. कातळातील बहुतांशी पायऱ्या जवळपास दीड ते दोन फूट उंचीच्या उभ्या आहेत. अशा जवळपास १३८पायऱ्या सर करून आम्ही एक पल्ला गाठणार होतो. पायऱ्यांवर एकावेळी दोघे जोडीने जाणे शक्यच नव्हते. साखळी पद्धतीने चढाई करणे अनिवार्य. वर पाण्याची सोय नाही. उन्हे वर चढू लागली होती. पाणी जपून वापरने गरजेचे होते. आमच्या सोबत तीन चिल्ले पिल्ले होते. श्लोक आणि श्रीयांस सहा ते आठ वर्षांचे. पण त्यांचा उत्साह आम्हाहून अधिक होता. श्रीहान सर्वात लहान, बाबांच्या सॅक मधून त्याने बरेच गड सर केलेत. एकंदरीतच आमच्यात बरेच जण नवीन असले तरी, छोटे ट्रेकर्स त्या मानाने अनुभवी होते.



____जवळपास दोन हजार तीनशे फूट असणाऱ्या कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर पोहचण्यासाठी, अति आकर्षित असणाऱ्या पायऱ्यांची संगत आम्हाला लाभणार होती. मागे वळून पाहिले असता प्रबलगडाच्या प्रबळतेची व्याप्तीही लक्षात येत होती. मोहीम प्रमुखांनी शिट्टी वाजवली आणि आणि आम्ही त्यांच्या मागोमाग वरच्या दिशेने कूच केले. पायऱ्या सुरू होण्याआधी काही अंतर पाषाणावर शर्थीने चढलो. मग सुरू झाला रोमांचकारी थरारक पायऱ्यांचा प्रवास. भीती तशी या पायऱ्या अगदी उभ्या अवस्थेत असल्यामुळे जाणवते, पण तितकी नाही जितकी माध्यमांमध्ये यांची चर्चा आहे. आमचा श्रीहान आणि श्लोक सुद्धा कुणाच्या मदतीशिवाय सहज चढाई करत होते. आपल्या आयुष्यात असे बरेच क्षण येत असतात जिथे आपण आपले शत प्रतिशत लक्ष केंद्रित केले पाहिजे, अन्यथा धोका संभवतो. त्यातलीच ही चढाई. बाकी विशेष नाही. एक १५ ते २० मिनिटात आपण तो टप्पा पार करून वरच्या, जवळपास वीस फूट रॉक पॅच च्या पायथ्याशी पोहचतो.

____हल्ली ट्रेकिंग म्हणजे, नाही म्हणता एक फॅड झालंय. यात कुणाचं दुमत नसेल. त्यामुळेच बऱ्याच अनपेक्षित घटना या क्षेत्रात घटतांना आपल्या निदर्शनास येत असतात. उठ सूट कोणीही उठतो आणि ट्रेकिंगची श्रेणी न बघता, सोशल मीडियावर वाहवाही मिळवण्यासाठी नामांकित असणाऱ्या, मग ती श्रेणी कठीण असली तरी त्या ठिकाणी गर्दी करत असतो. पण त्यातून त्याला स्वतःला आणि त्याच्यामुळे इतरांना त्याची किती झळ सोसावी लागते याचा त्याला अंदाज नसतो. आम्ही अवघे त्या पायत्याशी पोहचून जवळपास एक ते दीड तास खोळंबलो. त्याचं कारण म्हणजे एक समूह नवख्या मुलामुलींना घेऊन रॉक पॅच सर करत होते. आणि वर चढण्यासाठी एकच रस्ता आहे. आता काय करावे म्हणून आम्ही दोघे तिघे डाव्या हातावर असणाऱ्या काठावरच्या वाटेने मागच्या दिशेने सावध गेलो. पिकलेल्या गवतांनी वाट भरलेली होती म्हणून हिम्मत झाली, अन्यथा खाली जवळपास पाच सहाशे फुटाच्या खोलीने आम्हाला ते धाडस करू दिलं नसतं.

____वाट चाचपडत आम्ही मागच्या बाजूला पोहचलो. आणि समोर दिसणाऱ्या दृश्यात आम्ही स्वतःला हरवून, हिरव्या पिवळ्या तृणावर सफेद जांभळ्या पुष्पमैफिलीत बसलो. सौंदर्यवसुवर पुष्पसुमने मुखातून वर्षु लागली.
रान वाऱ्याने हालते
सोन पिवळे झुलते
निळा पदर उडतो
उंच गगना भिडतो...
              कडे कपारीच्या रेघा
              ऊन सावली विणते
              नक्षी त्यावर शोभते
              नवी किनार खुलते...
शालू हिरव्या नक्षीचा
डोई मुकुट सोन्याचा
तृण पायी मखमली
रान फुलांची जोडवी...
             ऐसे पाहता नजर
             होतो माझाच विसर
             येथे आनंद रमतो
             नित प्रेमात नांदतो...
____असल्या रमणीय सौंदर्याचे दालन सोडू वाटत नव्हते. पण माघारी फिरणे अनिवार्य होते. इथून थेट खाली मध्यावर दोन गुहा आहेत पण त्या ठिकाणी जाण्यासाठी rappelling चे साहित्य असणे गरजेचे आहे. यावेळेस आम्ही ती जोखीम घेणार नव्हतो. आल्या पावलीच आम्ही सावध माघे फिरलो. अजूनही चढ उतर चालूच होती. शैलेश दादांनी वेळेचं गणित पाहता एक दुसरा मार्ग तयार केला. वर जाऊन रोप खाली टाकला, आणि आम्ही एकेक करून वर चढलो. आम्ही आनंद शिखर गाठले होते. तीन लहाने आमच्या सोबत होते. माथ्यावर पोहचलो आणि चहुबाजूंनी नजर फिरवली. आणि खात्री पटली की कलावंतीण च्या माथ्यावर फडकत असलेला भगवा चौफेर पहारा देत आहे. या सुळक्याच्या सभोवती माथेरानचे पठार, चांदेरी, पेब, इर्शालगड, कर्णाला, मलंगगड आणि अन्यही किल्ले नजरेस पडतात. खाली पसरलेल्या सपाट भागात अनेक छोटी मोठी खेडी, खेड्यात कौलारू घरे, मधेच एखादा टुमदार बंगलो आपले लक्ष आकर्षित करून घेतात.

___आश्विन सरला की कार्तिक महिन्यात आपल्याला निसर्गामध्ये बरेच बदल दिसून येत असतात. माथ्यावरून ठिकठिकाणी खाली पाहता बरीच तळी आपल्या नजरेस पडतात. उन्हाच्या वाढत्या माऱ्याने, माळरानात घोंगावणार्या वाऱ्याने ती तळी थरथरायला लागली होती. आपलं आयुष्य आता फार नाही याची जाणीव त्यांना बहुदा झाली असावी. काहींच तर अस्तित्व शेष झालं होतं. त्यांच्या अंगणात धुळीचे भोवरे पिंगा घालतांना दिसत होते. तर संकोच पावून नाहीशा होत आलेल्या तलावांत पांढरी गुलाबी फुले आणि वाटोळी कमलपत्रे आता नावालाच उरलेली आम्ही जवळून पाहून वर चढलो होतो. हिरवळ अजून पूर्णतः ओसरली नसली तरी, पावसाळ्यात हिरव्या ओंजळीत धावणाऱ्या वाटा आता तांबड्या ओंजळीत हरवून जाऊ लागल्या होत्या. सकाळी जातो म्हणता रेंगाळलेली अभ्रे आता आकाशातून दूरवर पांगली होती.


___शिखरावर डौलाने वाऱ्याने फरफरत असलेल्या भगव्या ध्वजासोबत काही क्षणचित्रे कॅमेर्यात कैद केली. आणि पुन्हा तोच थरार अनुभवत खालची वाट धरली. चढताना रोपची कमान मोहीमप्रमुख, आमचे सर्वांचे ट्रेकिंगच्या क्षेत्रात अनुभव संपन्न शैलेश दादा सोबतच अमूल आणि हरहुन्नरी विकास दादा ज्यांनी सुरवातीस आपल्या अवजड हाताची पायरी करून शिखर सुख दिले होते, त्यांच्याच मदतीने आम्ही खाली उतरलो. आमच्या आधी वर चढलेला समूह अजूनही रेंगाळला होता त्यासही मदत केली आणि खालची वाट धरली. समोर प्रबळ गड प्रबल दिसत असला तरी आता काट्यावर वरचे गणित फसले होते. तरीही खाली meetpoint ला पोहचुनच निर्णय घेण्याचे ठरले. पायर्या उतरतेवेळेस भीती वाटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती म्हणूनच साखळी पद्धतीनेच सुखरूप खाली पोहचलो. थकवा सर्वांनाच जाणवत होता. आठ पात्रांखाली विसावलेल्या लिंबू सरबताचा आस्वाद घेतला आणि सर्वानुमते काळी उतरण्याचा निर्णय घेतला.


____प्रबळगड आणि कलावंतीण च्या meetpoint ला आलो कि, इथून डाव्या हातावर जाणारी वाट कडेकडेने ३-४ मिनिट चालत गेलो कि एक ३ फुटाची गुहा आहे. ती बघणे राहून गेले. पण पुढची भेट हि प्रबळगड माचीवर वस्ती करून दोन्ही ठिकाणे अगदी आवर्जून पाहणार हा निच्छय मनाशी केला आणि उतरलो.  आरपार असलेली गुहा अन पाण्याचे टाके सोडले तर साधारण ५ तासांमध्ये आपण कलावंतीण पाहून पुन्हा पायथ्याला पोहचू शकतो. जर पहाटे सुरुवात केली तर एकाच दिवसात कलावंतीण आणि प्रबळगड हि दोन्हीही ठिकाणे अविस्मरणीय अनुभवासहित आपण पाहू शकतो. आणि म्हणूनच आज पहाटे गड वाटेवर विजेऱ्यांची रेलचेल दिसत होती. खाली माचीवर पोहचून फ्रेश झालो. चमचमीत जेवणाचा आस्वाद घेतला. आणि परतीचा प्रवास चालू केला. खाली उतरता उतरता सर्वजण घामाने डबडबले होते. गावातील विहरीवर आंघोळी केल्या. आणि बस पुन्हा आल्या मार्गानेच परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. नेहमीप्रमाणेच सर्वांनी आपापले अभिप्राय सांगितले.


___शैलेशदादांना समूहातर्फे एक आठवण भेट देण्यात आली. आणि अनपेक्षित मलाही माझ्या वयक्तिक लेखन क्षेत्रात दिवाळी अंकात एक लेख प्रकाशित झाला म्हणून मला भेटवस्तू देऊ केली त्याबद्दल मी समूहाचे आभार माणनार नाही. कारण याच समूहाने मला नियमित लेखानासाठी प्रोत्साहित केले आहे आणि त्यांच्या ऋणात राहणे मला जास्त आवडेल.

___शिवप्रेमी गडयात्री पालघर आयोजित कलावंतीण दुर्ग पायरपेट अगदी यशस्वी रित्या पूर्ण झाली. माथेरान रांगेतील हा दुर्ग चढाई साठी खूप कठीण असा मानला जातो. आणि त्याची प्रचिती आम्हा सर्वांस आली. कातळात कोरलेल्या १३८ खडतर चिंचोळी पायऱ्या आणि वर माथ्यावरील वीस फुटाचा रॉक पॅचचा थरार आम्ही अनुभवला. मोहिमप्रमुख शैलेश सावंत यांच्या जवळपास २००ट्रेकच्या अनुभवाची जोड आम्हास मिळाली आणि ही मोहीम यशस्वी रित्या पूर्ण झाली. त्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्व सहभागी सदस्यांचे कौतुक आणि अभिनंदन हे करावेच लागणार. शेवटी कोणतीही मोहीम हि कुणा एक दुकट्याच्या सहभागाने नाही तर निसर्ग नियमांच्या अधीन सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वास जात असते.

निसर्गातच रमतो आम्ही
आईबाबांची आमच्या तीच कहाणी 
निरागसता जी आहे हसण्यात माझ्या 
जाणा निसर्ग आहे तैसाच गुणी
___या मोहिमेत विशेष दखल घ्यावी वाटते ती म्हणजे श्रीहान शैलेश सावंत (वय वर्षे साडेतीन), श्लोक स्नेहल राऊत (वय वर्षे सहा), श्रीयांस शैलेश सावंत (वय वर्षे आठ) या तीन मुलांची.  यांनीही ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. बरं ही यांची पहिलीच मोहीम नाही यापूर्वीही त्यांचा मोहिमेत सहभाग आलेला आहे. त्याबद्दल त्यांचे, सोबतच त्याच्या आईवडिलांचे अभिनंदन आणि विशेष कौतुक करावे तितकेच कमी आहे. आजच्या शालेय स्पर्धेच्या युगात त्यांनी आपल्या मुलांना निसर्गाच्या सानिध्यात जगण्याची जी मुभा दिली आहे ती कौतुकास्पद आहे. आपल्या मुलांची नेमकी आवड कोणती आहे आणि आपण त्यांना कोणता मार्ग दाखवतो किव्हा आपण त्यांना कोणत्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करतो या गोष्टीवर त्यांचं भवितव्य अवलंबून असते. निसर्गाच्या सानिध्यात जे सुख आहे ते या विश्वातल्या मायानगरीत नक्कीच नाही. पण त्याची जाण आधी आपल्याला व्हायला हवी.
___शिवरायांचा इतिहास तर सर्वानाच ज्ञात आहे. या जगामध्ये असे एकमेव राजे होऊन गेले ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि त्या स्वराज्याचे गतकाळातील गडकिल्यांचे अवशेष आज आपल्या इतक्या जवळ आहेत. आपल्याला त्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. शिवचरित्र वाचून मिरवून नाही तर ते आचरणातून आपल्याला  सिद्ध करता आलं पाहिजे. आज ही इवलीशी पाऊले उन्हा तान्हात न थकता गड चढून जातात आणि निळ्या आकाशात फडकत असलेला ध्वज उराशी कवटाळतात तेव्हा डोळ्यांची कड आपसूकच ओलावते. त्यांना योग्य ते सकारात्मक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली आहे. तर चला मग किल्ले पाहूया, किल्ले जपुया, प्रोत्साहित करूया, नव्या पिढीला, शिवरायांचा इतिहास जागता ठेवूया... एका कवितेने हा लेख प्रपंच संपवतो...
 #ध्वज
रानावनातून जाती 
तान्ही पाऊले गडास
कडे कपारीच्या वाटा 
घेती आलिंगन खास
              निळ्या नभात शोभतो 
              किती युगांचा प्रवास
              ध्वज देखणा भगवा 
              ओढ लागली आम्हास
प्रीत जडली त्यावरी 
वाटा असुदे कठीण
वसा घेतला हाती जो 
आता फिकीर कोणास
             केले स्वराज्य साकार
             शिवरायांचा प्रताप
             साऱ्या जगामध्ये एक 
             नाही जमले कोणास
गड किल्यांवर शोभे 
पहा शोभतो अजून
चंद्र सूर्याच्या साक्षीने 
दिशा दावितो वाऱ्यास
            शौर्य गाजवले भारी 
            वेळी रुधिर सांडले
            सारे इमानाचे खेळ 
            कीर्ती नाही ती उगाच
किती खांद्यावर झाला 
होतो प्रवास अजून
कळसावरी शोभतो 
सांगे निरोप देवास
___नित...  नितेश पाटील ( धनसार, पालघर ) ९६३७१३८०३१
⛳तुही गडयात्री..मीही गडयात्री⛳
 मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जुन्या पनवेल पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. तिथून ठाकुरवाडीत पोहचता येते.
ठाकूरवाडी बेस व्हिलेज धर्मा दादा ८४२४९९५०१८
जय हनुमान हॉटेल प्रबळगड माची ( ९२०९४६१४७४, ८६९७०८९४९१, ८०५६१८६३२१)

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...