Friday, July 13, 2018

ट्रेकर्सना खुणावत असलेले भीमाशंकर

⛰भीमाशंकर ट्रेक⛰
⛳ आयोजक :- शिवप्रेमी गडयात्री⛳
मोहीम प्रमुख :- अमोल राऊत
मोहीम कार्यवाह :- निकेत राऊत
दि. १०-११-१२/०८/२०१७
सस्नेह जय शिवराय मित्रहो...
____मी ट्रेकची सुरवात केली ती मुळातच भीमाशंकर ट्रेकने. आणि माझ्या अंतरातील आसुसलेल्या भटक्याला या वाटांनी मोहिनी घातली. तदनंतर माझ्या आयुष्यात रान वाटांच्या भटकंतीचे एक नवे पर्व, उशिराने का होईना, पण चालू झाले. आकालनिय सौंदर्याच्या मोहात मी पडलो. आणि या सौंदर्यवती वसुधेची अनेक रूपे मला पहावयास मिळाली. तिने माझ्या आयुष्यातील शीण नाहीसा केला. मला एक नवी उभारी दिली, माया दिली. अन मी ही तिच्या समवेत वाहवत गेलो. कधीही न पाहिलेलं सुख, मजा अनुभवता आली. प्रत्येक ट्रेक दरम्यान एक आल्हाददायक, रोमहर्षक असा अविस्मरणीय अनुभव मी गाठीशी बांधू लागलो. त्याचा खूप परिणाम माझ्या अलिप्त राहू पाहणाऱ्या देहावर झाला. निसर्गाच्या रूपाने मला आजीवन असा साथी मिळाला,  त्याच्या सानिध्यात जाण्याची मला नेहमीच मुभा असेल. आणि मी कधीही एकटेपणा वाटून घेणार नाही.

"रानवाटा रानवारा, मोहिनीचा हा पसारा
आभाळाची माया त्यावर, शिल्पकार तोच त्याचा"

____भीमाशंकर अभयारण्यात ही माझी दुसरी पदभ्रमंती. बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे स्थान असलेले सुप्रसिद्ध असे भीमाशंकराचे मंदिर या पर्वत शिखरावर आहे. दोन वर्षांपूर्वी मी ही भटकंती केली होती. जवळपास साडे तीन हजार फूट उंच असलेले हे शिखर मी चढून जेव्हा खाली उतरलो, तेव्हा मागे दिसणारे ते अभयारण्यातील महाकाय शिखर सर करून आलो यावर माझा विश्वास बसला नाही. पण मी समीट  करून आलो होतो. आणि आज पुन्हा त्या दिशेने जात असतांना माझे मन त्या समवेत व्यतीत केलेल्या भूतकाळात रमले होते. त्या अनुभूतीतून बरच काही शिकलो होतो.

सारं काही सोपं असतं कठीण होईपर्यंत
आणि एकदा कठीण झालं
की सोपं अस काहीच उरत नाही
उरतो तो केवळ संघर्ष
जो कुणासही चुकत नाही

____तारीख वेळ ठरलेली होती. महिन्याभरापासून नियोजन चालू होते. चर्चेतून एकवाक्यतेकडे आम्ही पोहचल्यानंतरच इतर मुलांना मोहिमेची रूपरेषा कळवली. आणि साऱ्यांची मते जाणून घेऊन नेहमीप्रमाणेच रात्री आम्ही चौतीस जणांनी बसने खांडसकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी श्रीफळ फोडून श्रीगणेशा केला. पावसाची हलकी रिपरिप चालू होती. वातावरणात थोडासा गारवा होता. रस्त्यावर अंधुक प्रकाशात गाडी जरा दमानेच चालत होती. रस्त्याच्या दुतर्फा तृणावर पावसाचे थेंब चमकून मागे सरत होते. मेघांतून येणारे काही थेंब गाडीच्या काचेवर आदळून आपले अस्तित्व संपवत होते. किर्रर्र अंधारात आम्ही तेवढा प्रकाश घेऊन पुढे चाललो होतो. रात्रीच्या प्रवासाचा दांडगा अनुभव गाठीशी होता, म्हणूनच आजही वाटेत काही अकस्मात दिसून धडकी भरू शकते यावर चर्चा रंगत होत्या.

ती दिसते खिडकीतून... अनोळखी अशी... शुभ्र वस्त्रात
नथ नाकात... अंधाराला घाबरवणारी...
कधी तोही दिसतो... किर्रर्र रानात...शुभ्र वस्त्रात...
वावळीचा घोट घेणारा
आम्हीही सारे... थांबतो कधी... किर्रर्र रानात
भर रस्त्यात... अंधाराच्या जोडीला
कुणीच नसते... तेव्हा तेथे... टपटपणारे...
फक्त थेंब मोठे... आमच्या वाटेला.

____तोच ढोलकीच्या तालावर सुमधुर संगीताची नेहमीप्रमाणेच मैफिल चालू झाली. गीत वाद्य झंकारू लागले. यावेळेस ट्रेकला सारेच शिवप्रेमी गडयात्री समूहाचे महानुभाव (अनुभवी) उपस्थित होते. काही नविनही होते. ताल सूर लय या साऱ्यांचा अनोखा मेळ जमून आला होता. बस पालघर, मनोर, वाडा, तानसा, आठगाव, शहापूर, साथगाव, किन्हवली, सरळगाव, मुरबाड, म्हसा, ऐनाची वाडी, बलीवरे, मार्गे नांदगावला सकाळी पोहचली. तिथे चौकट मामा कड़े चहाची चुस्की घेऊन खांडस कड़े रवाना झालो. खांडस सोडून गणेशघाट आणि शिडीघाट यांच्या सुरवाती संगम पुलावर आम्हाला बसने सोडले. तिथेच शरीरशुद्धी उरकून ओळखपरेड घेतली.


_____सर्वानाच पुन्हा प्रत्यक्षात सूचना केल्या गेल्या, आणि त्याचं तंतोतंत पालन व्हावं त्यासाठी पहिले, मध्य आणि शेवटी अशी प्रत्येकी दोन स्वयंसेवाकांची निवड केली गेली. तसे पाहायला गेले तर आम्ही सारेच नवीन. मी, सुदेश, अजय, अक्षय, मनीष आम्ही फक्त एकदा या अभयारण्यातील पाऊस अंगावर घेतला होता. पण मुख्य मार्गदर्शक म्हणाल तर अमूल आणि त्याचबरोबर परेश, यांना या अभयारण्यातील पदभ्रमंतीचा दांडगा अनुभव. खरंतर त्यामुळेच आम्ही हा ट्रेक करण्याचे योजिले होते. ट्रेक करतांना अनुभव आणि त्याहून अधिक अनुभवी माणसांची संगत असणे अनिवार्य असते. सोबतच लागणारी सर्व साधने असायला हवीत. तशी रस्सी आणि दूरभाषयंत्र आमच्याजवळ यावेळेस उपलब्ध होतीच.

_____पावसाने दडी मारलेली असली तरी उजव्या हातावर पदरगड मात्र मेघांसोबत लपंडावात रमला होता. डाव्या हातावर भीमाशंकर शिखरमाथा लपुन बसला होता. पायथ्याशी भाताची शेतं वाऱ्याने फरफरत होती. वनराईचे अंगण हिरव्या नवपर्णानी सजलेले दिसत होते. सकाळचे कोवळे ऊन त्यावर बागडत असतानाच मेघ मधेच खोडा घालत होते. दूर डोंगरउतारावर चाललेला ऊन सावलीचा खेळ मोहक वाटत होता. पुलाखालून नितळ ओढा आपल्या धुंदीत खळखळून वाहत होता. मधेच दगडावर आदळून उसळत होता. त्या उसळणाऱ्या पाण्यात उगाच बुडबुडे तग धरन्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. पुलाच्या डाव्या बाजूला खाली बैलांची आंघोळ घालण्यात एक आजोबा व्यस्त होते. त्यांना मात्र त्या बुडबुड्यांचे काही घेणेदेणे नव्हते. कदाचित ते नलेशजींच्या,  टिंब पाण्याचे झेलीत, पान फुटले वेलीत, किती दिसांनी ओढा, मंजुळ झाला गs झाला गs पाऊस आला गs आला गs... हे गीत गाण्यात रमले असावेत.


____खांडस गाव आता पूर्णतः झोपेतून जागे झाले होते. रस्त्यावर माणसांची तुरळक वर्दळ चालू झाली होती. आम्हीही आमचा मोर्चा कच्च्या डांबरी रस्त्याने पुलाच्या डाव्या बाजूने शिडी घाटाकडे वळवला. पाऊस नसल्याने दमछाक होणार होती हे अटळ. मात्र चित्र तितकंसं वाईट नव्हतं. आशेचे मेघ आकाशातुन अधून मधून बरसत होते. मातीचा ओलावा, गवतावरचे थेंब, पाऊस पिऊन नवीन झालेली वृक्षवल्ली न बोलताही बरच काही सांगत होती. पाऊस नुकताच पडुन गेलेला. श्रावणातील निळ्या मेघांचा वर्षाव अधून मधून चालूच होता. आणि वर पाऊस असणार याची तर खात्री होतीच. पाऊले झपझप पुढे पडू लागली. 


_____खांडस गावातील हनुमान मंदिरापाशी पोहचलो. या मंदिराचे अंगण भातशेतीने फुलून गेले होते. नभात श्रावणातील निळे मेघ वाऱ्याबरोबर खेळत होते. पण खेळताना वारा पाऊस घेऊन मंदिरावर शिडकाव करण्याचे मात्र विसरत नव्हते. राहून राहून तो आपले पुत्रप्रेम जाहीर करत होता.

हनुमंताच देऊळ जर्द हिरव्या रानात
देव एकटा देऊळी वर कळस नभात
गर्द हिरवे अंगण निळ्या नभाची छाया
श्रावण मासी भिजते पितापुत्राची माया



असचं काहीसं दृश्य डोळ्यासमोर होते. मागच्या वेळेस इथून आमचा ट्रेक चालू झाला होता. त्या आठवणी टिपत अंतरी मारुतीरायाचे स्मरण करून आगेकूच केली. पहिलीच लाल मातीतली चढण थकवून जागेवरच थांबली. आम्ही मात्र पुढे सरकलो. निथळत्या अंगाने छोट्या मोठ्या झाडांच्या वस्तीतून ओढ्यापाशी पोहचलो. या वेळेस तितका जरी नसला तरी बऱ्यापैकी ओढा खळखळून वाहत होता. साऱ्यांनीच तिथे मनोसोक्त आनंद लुटला. निसरड्या पाषाणावरून कित्येकजण वाहत्या ओढ्यात घसरून पडले. पण भिजून मौज करण्याची ओढ मात्र कमी झाली नाही.
चढ चढून थकल लाल मातीच पाऊल
अंग घामान भिजलं सर श्रावणी चाहूल
येई विसाव्याची कळ दिसे नदीचा ओघळ
निसरड जरी तळ केली साऱ्यांनी आंघोळ
_____ओढ्यापाशी नाश्ता करून पुढे मार्गस्थ झालो. लगेचच ओढा पार करून काही अंतर वर गेल्यावर, उजव्या हातावर पुन्हा दमछाक करणारी चढण लागते. इथे वाट चुकण्याची शक्यता असते. पक्षांच्या सुमधुर अशा संगीतमय जुगलबंदीने आपण त्यांना शोधण्यात व्यस्त होऊन जातो. साग, मोह, आंबा, जांभुळ, करवंदीच्या जाळीतून चढ उताराची वाट चालून आपण पुढे चालत असतो. एव्हाना आपण विहीर सोडून पुढे निघतो. आणि समोर भारदस्त अशा शिखरावरून कोसळणारे अनेक प्रपात मन मोहून टाकतात.

_____पावसाची बुंदाबुंदी चालू होऊन थांबलेली असते. पानांवर रेषा आखून डाव मांडलेले पाण्याचे थेंब वाऱ्याने छेड काढताच अलगद खाली पडत होते. ते अंगावर घेत शिड्यांखालची खडी चढण चढून शिड्यांचा थरार अनुभवला. पावसामुळे स्लीपरी पायरींवर जरा जपूनच पावलं टाकली. तसा दीड फुट रुंदीचा जिनाच म्हणावा लागेल पण एका वेळी एकच जण चढू शकत होता. शिडी थोडी हरकत ही घेत होती.

_____पहिली शिढी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारी जागा येते. तत्पूर्वी निसरड्या पाषाणावरून चढ चढावी लागते. उगा साधन असताना रिक्स नको म्हणून आम्ही वर जाऊन रोप खाली देतो, आणि एक एक करून वरच्या शिढीवरून रस्ता मोडत गुहा म्हणता येणार नाही परंतु उजव्या हातावर छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी. तिथे जमा होतो. येथून खाली शर्थ करणारी आमची मित्रमंडळी नजरेत असतात. पावसाची रिपरिप वाढली होती. वर कातळकड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या जाळीदार खिडकीतून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते .
थेंब थेंबात गुंफले वीण जाळीदार झाली
शृंगारन्या धरतीला सर पावसाची आली
_____एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो. पण खाली काही दिसत नव्हते, दिसले ते सगळे मेघांचे पांघरूण घेऊन सुस्त पहुडलेले.पावसाने पुन्हा आपली रिपरिप चालू केली होती. विसाव्याच्या जागेच्या उजव्या हाताला दुसरी शिडी आहे. ही शिडी त्याहीपेक्षा सांभाळूनच चढावे लागते, ती काही फिक्स नाहीये. ही शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत अशी चढाई येते जिथे दोरीने चढावे लागते. पुढे जाऊन रस्सी खाली टाकली जाते आणि एकेक करून सारे वरच्या दिशेने कूच करतात. रस्सी पकडून चढण्यात काय ती औरच मजा. पण पहिल्यांदाच ते साऱ्यांना तितकंसं जमत नाही. कारण रस्सीच्या साहाय्याने वर चढताना व खाली उतरतांना रस्सीवर आपला भरोसा पाहिजे.

चढ उताराची वाट आहे जंगल हे दाट
दरी खोऱ्यातून चढे घाटमाथ्यावर वाट
___पुढे निघतो तोच एक मोठे ठिगळ ओलांडून जावं लागतं ते करून हुश्श करेस्तोपर्यंत दुसरा एक अॅनाकोंडासारखा आ वासून उभा असतो. याचे वैशिष्ट्य असे कि हा नागमोडी आहे. इथे आपली पाठपिशवी आधीच पुढे किंवा मागे घेणे इष्ट. कारण ती त्या जबड्यातून शिरतांना आपल्याला धक्का देऊ शकते. आणि तिथून धक्का मिळणे म्हणजे सापशिडीच्या खेळात अगदी ऐशी वरून थेट विसावर आणून सोडले जाऊ शकते. आणि पुन्हा बोंबलायचीही सोय राहणार नाही की स्वतःच्या पायावर खालीही जाण्याची सोय उरणार नाही म्हणून दक्षता घेउनच पुढे सरकलो.
नागमोडी वळणांची वीण एकात गुंफते
धुके लाजुनिया जाता झाडा झाडांत बसते
येता पावसाची सर वारा करतो बोभाट
____पहिला टप्पा पार केल्यावर आपणास दोन दगडाच्या मधुन वाकुन उजव्या बाजुला वळायचं असतं. पहिला ठिगळ तुलनेने सोपा आहे. परंतु दुसऱ्या ठिगळच्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत. या दगडावर प्रत्येकी एक माणूसच राहू शकतो. इथे सौंदर्य पाहण्याची मुभा नव्हती. हा पॅच पार केला आणि मग हुश्श केलं. सांगायचं म्हणजे शिडी घाटाचा हत्ती आता सर झाला होता. शेपूट तेवढं बाकी होतं.

____ही शर्थीची चढाई केली की पुढे परत एक उजव्या हातावर धबधबा आपले लक्ष आकर्षून घेतो. तिथे मात्र भरभरून भिजलो. धमाल केली. साऱ्या सफरीचा शीण दूर झाला. येथे एक उदास झाड आपल्या नजरेस पडते. नि त्या झाडाच्या मागे धुक्यात लपलेला पदरगड शोधण्यात आपण व्यस्त होतो. इथली बहुतांशी झाडे शेवाळानी भरलेली आहेत. धुकं आणि पावसामुळे गारवा इथल्या नसानसांत भिनलेला आहे. आणि त्याचा प्रत्येय आम्हाला प्रत्येक  पावलागणिक येत होता. शिढी घाटाचा हत्ती आता पार झालाच होता.
येतो ओढा खळखळ अंगी मातीचं उटनं
शृंगारात रमलेली जाते भिजुनिया वीण
डंख सावराया आले मेघ काळोख करत

पुढे साधी चढण आहे. ती पार केली की थोड्याच अंतरावर गणेश घाटातून येणारी वाट इथे मिळते. ईथे एक चहाची टपरी आहे. मंदिराकडे जातांना शिडी घाटने आल्यास आपणास ही टपरी लागते. पुढे रस्ता फार अवघड नाही पण हा पार करतांना खरोखर अभयारण्यात आल्याचा अनुभव येतो . वाटेत पडलेली झाडे ओलांडताना चिखल रस्त्याच्या दोन्ही बाजुला महाकाय असं दाट जंगल. पर्णपालविच्या गर्दीतून मातीसाठी आसुसलेली किरणे इथे क्वचितच जमिनीच्या दिशेने येऊन निघून जातात. या ट्रेकला मोजकेच फोटो काढता येतात. कारण म्हणजे पाऊस नि धुके.



___पुढे अंगावर येणारी चढण चढून डोंगर उतारावरच्या सरळ जाणाऱ्या निसरड्या वाटेवरून, खाली पठारावरची दहा बारा कौलारू घरांची  वस्ती पाहताना, पाय जागीच खिळून राहिले. शेत शिवारात लावलेल्या भातशेतीमुळे रंगांच्या वेगवेगळ्या छटा नजरेस सुखावत होत्या. गर्द, फिक्या हिरव्या रंगात पावसाचे पाणी मातीत लोळून सुस्तावले होते. त्याची मरगळ दूर करण्यासाठी हिरवे रान, सुर्यकीरणाची आतुरतेने वाट बघत होते पण ते सावळ्या मेघांस मंजूर नव्हते. ते उन पडू नये म्हणून तो आपली भली मोठी छत्री घेऊन बसला होता. पण तो त्यांचा आपसी मामला होता. त्याच्यात न पडता मी पुढची धुक्यातली वाट धरली.
सारे निवळले वर खाली कोरडे पठार
रंग पाण्यात भिजले नाचे फुलले शिवार
छत्री उघडून मेघ उन्हे झाकतो नभात

भिमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे कळते. सिगारेटचा धुरही त्यात दिसणार नाही असं धुक्याचं साम्राज्य असतं. अखेर १च्या सुमारास आम्ही हनुमान तळ्यापर्यंत पोहोचलो. मागच्या वेळी इथे आम्ही थांबलो होतो. माणसांनी केलेल्या घाणीमुळे तेव्हा त्याचा श्वास उग्र घाणेरड्या वासात गुदमरत होता. पण या वेळेस मात्र तळ्याचा परिसर काटेरी कुंपणात बंदिस्त झालेला दिसला. "मोकाट माखण्यापरी मी बंदिवान चांगला.'' याचा प्रत्येय त्याला आलेला असावा. इथुन एकदा मागे वळून खाली पाहिलं. म्हंटल क्षणिक मेघ सरल्या खिडकीतून काहीतरी दिसेल पण नाही. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवली. तळ्यापासून अगदीच काही अंतरावर उजवीकडे धुक्यात लपलेली पुढची वाट धरली. धुके लाजून बाजूला सरत होते.

___ रस्त्यावरील धुक्यात कुंपणाच्या आत असलेले हनुमान तळे, उजव्या हातावर मागे सोडून आम्ही नागफणीच्या वाटेवर प्रस्थान केले. एक ते दीड किमी अंतरावर काहीसे खाली उतरून  सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर, तेथून काहीश्या अवघड वाटेने वर चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर(१२३० मीटर) गाठले. येथून धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान सौंदर्यवान दिसत होते. त्या माळरानातुन वर येणारा हवेचा दबाव प्रचंड होता. काही वेळा तो ईतका प्रचंड  असतो की रुपयाच नाणं देखील, खाली जात नाही असं म्हणतात, पण मी मात्र माझा रुपया खर्ची केला नाही. या उंच अशा शिखरावर खाली गावांच्या आजोळातून, घोंगावत येणारा मायेचा वारा. अन त्या वाऱ्याने नागफणीच्या डोईवरला हिरवा पदर, सावळ्या मेघांशी हितगुज करत असलेला. असं निसर्गरम्य वातावरण कोणास सोडून जावं वाटेल..!!!
अंग भिजले वाऱ्याचे त्याला होईना ग थारा
आजोळातून आला हिरवा कंच शहरा 
रान जोरात हलले मेघ भयभीत झाले
अडकले डोंगरात रिते बरसून झाले
___मला आठवतंय आजही याच उंचीवर मागच्या वेळी(२२/८/२०१५) मी इथे एक पण केला होता. माझ्या आयुष्यातील तो पहिला ट्रेक होता . म्हणूनच असेल. वेळ संध्याकाळची होती. इथून मी जेव्हा खाली पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की आपण खालती कुठल्या उंचीवर वावरत असतो...!! अन आयुष्य एका उंचीवर नेवून ठेवण्याच्या धावपळीत आयुष्य म्हणजे काय हेच विसरून जातो. त्यातून जेव्हा उसंत मिळेल तेव्हा मोबाईल मध्ये  कँडी क्रशचे टप्पे पार करत बसतो. पण मी ठरवलं' नव्हे तत्काळ मोबाइईल मधून कँडी क्रश बाद करून टाकला. 556 वा टप्पा क्षणात दिसेनासा झाला. आणि या पुढे सृष्टीने दिलेल्या सौंदर्याने ओतप्रोत असे जिवंत नैसर्गिक टप्पे पार करण्यात, आपल आयुष्य खर्ची घालायचा प्रयत्न करायचा, कारण या निसर्ग सानिध्यात परमसुख आहे. आणि ते प्रत्यक्ष अनुभवाने मी प्राप्त केलं होते. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. पावसाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. हा, ईथे नागफणीवर मात्र सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये. नाहीतर सेल्फी स्टीक वर आणि आपण कुठे घरंगळत जाऊ याचा पत्ता लागणार नाही...

___तिथून खालची वाट धरली. सीताराम बाबंचा मठ पार करून, वर चढून मंदिराकडे प्रस्थान केले. शिवलिंग, त्रिशूलमध्यस्थी असलेल्या कमानी खालून दगडी चिऱ्याच्या पायऱ्यांवरून, खाली मुख्य मंदिराच्या दिशेने उतरलो. मुंबई डबेवाला वसतिगृहात राहण्याची सोय पूर्वनियोजित होती. तिथे पाठपिशव्या टाकल्या, चहाचे दोन घोट घेतले आणि अंधार दाट होण्यापूर्वी परतायचे म्हणून मंदिराच्या अजून खाली दाट जंगल वस्तीत नदीच्या पोटात स्वयंभू अवतरलेले गुप्त भिमाशांकाराचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झालो. भीमा नदीचा मुळ उगम ज्योतिर्लिंगात आहे असं म्हणतात.

मंदिराच्या डाव्या बाजूने एक पाण्याची वाट खाली उतरते. त्याचं वाटेने आम्ही खाली उतरू लागलो. वाटेत न धड जमीन दिसत होती न पाणी. अस्ताव्यस्त दगडांवर विखुरलेले निर्माल्य.  मंदिरात भक्तिभावाने चढवलेल्या फुल हारांना निर्माल्य हे नविन नाव देऊन, त्या पाण्याच्या वाटेवर विसर्जित केलं होत. मानवनिर्मितच कचरा आणि विष्ठेच्या पसाऱ्यात त्यांचा जीव गुदमरत होता. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू त्या पाण्यात मिसळून त्वरेने खाली उतरत होते, त्यांना तिथेच ठेवून. आणि ओढ्याच्या काठी झाडांवर, रान फुलांच्या पाकळ्यांवर, पानांच्या गर्दीतून वाट काढून, थेंबा थेंबावर अवतरलेले अंबर ते दृश्य जड अंतःकरणाने पाहत होते. आम्हीही त्याचं अवस्थेत खाली उतरलो.

फुल हारांची दुकाने देवळांच्या वाटेवर
दरवळतो सुवास गाभाऱ्यात पिंडीवर
वाट देवळाच्या पाठी ओढा मंजुळ वाहतो
देव पुजल्या फुलांचा घरी मुक्काम असतो
फुल देवास चढले त्याचा मुक्काम हलला
नाव गेले बदलून नदी ओढ्यात कुजला
झाले ओढ्याचे गटार नाही कोणाचा आधार
सारे फसवे देखावे सवालांचा भडिमार
मेघ बरसून रिते कुणा पुसावे उत्तर
भुई हळव्या मनाचे थेंबा थेंबात अंबर


संध्याकाळ जवळ येऊ लागली होती. घनदाट अभयारण्यात, डोंगर उतारावर दोन ओहोळ पार केल्यानंतर वीसएक मिनीटात आम्हास  धबधब्याचा मोठा आवाज कानी पडला. आणि गुप्त भीमाशंकराचे ठिकाण जवळ आल्याची चाहुल लागली. तत्पूर्वी एक उजव्या हातावर मंदिर लागते. त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरलो. काही क्षणातच डावीकडे एक धबधबा नजरेस पडला. त्याच्या वर वाहत येणाऱ्या पाण्यातून पलीकडे जाऊन खाली उतरलो. जिथे धबधब्याचे पाणी पडते. तिथेच एका बाजुला छोटे स्वयंभू / कोरलेले शिवलिंग आपल्या नजरेस पडते. त्याचे दर्शन घेऊन धबधब्याखाली अंग मोकळे केले. याची उंची सहा ते सात फुट आहे. धबधब्याचा प्रवाह मात्र खूप जोरात होता. मनसोक्त भिजून माघारी फिरलो. रानातल्या निर्जन वाटेवर असणाऱ्या गणपती मंदिरात दिवाबत्ती करून आरती केली. इथे मंदिराजवळ शेकरू हमखास दिसते असे ऐकून होतो. पंख असलेली मोठी खारुताई, अतिशय लाजाळु अशी... चौफेर भिजून चिंब झालेला निसर्ग न्याहाळून पहिला पण पदरी निराशा आली. प्रवाहाच्या उलट्या दिशेने माघारी वसतिगृहात परतलो.


मंदिराचा कळस धुक्यात अस्पष्ट दिसत होता. फ्रेश होऊन मुख्य मंदिरात दर्शनासाठी गेलो. अगदी पायऱ्याशी रेंगाळत असलेल्या मेघांमुळे, दिव्यांचा प्रकाश अंधुक झाला होता. तरीही दुकानांच्या रांगेत काही ठिकाणी उब घेत असलेल्या, टोपलीतील मक्याच्या कणसातून निघालेल्या वाफा, अगदीच स्पष्ट दिसत होत्या. तूर्तास जड अंतःकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले असले तरी, ती उब घेण्यासाठी लाळग्रंथी आसुसल्या होत्या.  दिवसभराच्या भक्तांच्या पायपिटीने आणि वाऱ्याने फटकारलेल्या पावसामुळे, काळ्या पाषाणी पायऱ्या लाल रंगात भिजल्या होत्या. त्या भिजल्या पायऱ्यावरून पायतनावीण चालताना एक अद्भुत अनुभूती घेत मंदिरात पोहचलो. हे सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे जुने मंदिर. छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजन असलेली लोखंडी घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 अशी इंग्रजीत नोंद आहे. महादेवाच दर्शन घेवून सभामंडपात काही वेळ शांततेची अनुभूती घेतली. वस्तीगृहात परतून जेवण उरकले. गाण्यांची मैफल सजली आणि रात्र निद्रेच्या अधीन केली.


 सकाळ झाली आणि बैल घाटाचे वेध लागले. महादेवाला नमस्कार केला आणि चहा नाश्ता उरकून परतीची वाट धरली. पुन्हा सर्वाना सूचना केल्या गेल्या. मंदिर खाली सोडून वर कमानीजवळ चीत्रखेचक यंत्रात आठवणी साठवल्या. मेघांनी जणु प्रणच घेतला होता, की इथून हलायचं नाही. धुके अधिकच दाट झाले होते. सकाळचे नऊ वाजले होते. सूर्याचा दूर दूर कुठे मागमूस नव्हता. एक वीस फुट अंतरावरच काहीच दिसत नव्हत. भक्तांची वर्दळ चालू झाली होती. भीमाशंकर बसआगाराच्या पुढे डाव्या हातावर, झाडीतून एक चिंचोळी ओढ्याची वाट खाली मोठी मोठी होत जाते. तिच्या कडेकडेने तर कधी त्या मोठ्या होत जाणाऱ्या पात्रातून आम्ही खाली नांदगावच्या दिशेने उतरू लागलो. जसजसे खाली उतरत गेलो तसतशी मेघांची गर्दी वर सरकू लागली.


काही अंतर चालून लगेचच वरून भरधाव वाहत येणारा ओढा पार करावा लागतो. भल्या मोठ्या दगडाच्या कधी आडोशाला तर कधी त्यावरून तो खळाळून वाहत होता. दगडांचा मुळी त्याला अडसरच नव्हता. दुतर्फा पाऊस भिजल्या वृक्षांच्या भिंतीने त्यास आसरा दिला होता. पावसाचे थेंब त्याला न्हाउ घालण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. धुके मायेच्या स्पर्शाने त्याला गोंजारण्याचा प्रयत्न करत होते. पण कसलं काय..!! भाई थांबण्याच्या मुड मधे नव्हते. मग आम्हीही सावध पाऊले टाकून त्याचा पल्याड गेलो. पुढे वाटेत खाली उतरताना छोटे छोटे प्रपात मोहवीत होते. पावसात भिजत असलो तरी त्याखाली भिजण्याचा आम्हास मोह आवरता येत नव्हता. काही क्षण का होईना..!! त्याची थाप पाठीवर घेऊनच पुढे चाल करत होतो.


जसजसे खाली उतरत गेलो तसतसे धुके विरळ होत गेले. पावसानेही लपंडाव खेळण्यास सुरवात केली. भिजलेल्या दाटीतून खाली उतरणारी पायवाट दमछाक करत होती. मधेच विसावा घेऊन तिच्याशी सलगी करून पुन्हा खाली उतरताना ती आधार देत होती. मध्यंतरी एक चहाची टपरी लागते. तिथे चहाची चुस्की घेतली. चुस्की घेताना मनात विचार आला ह्या घाटाच नाव बैलघाट कुणी ठेवलं असावं. तसा ठळक नामनिर्देश कुठे नाही आढळला आणि बैल या घाटाने वर जाणे सोपे नाही. खरंतर ही धबधब्याची वाट इथून पावसाळ्यात फक्त उतरायचं. आणि चहा संपवून उतरायला सुरुवात केली. पावसात भिजत असलेलं सौंदर्य वर सोडून, खाली भिजून वाऱ्यावर सुकत टाकलेल्या सौंदर्याशी जुळवून घेतले. पायाखाली गवताची हिरवळ तुडवत... तर कधी चिखल पाण्याच्या लाल पायवाटेने... तर कधी जीर्ण गंजलेल्या पाचोळ्यावरून चाल करत असताना होणारे स्वरसंगीत ऐकत खाली मैदानी जागेत उतरलो.

मागे वळून पाहिलं तर विश्वास बसला नाही एवढा महाकाय असा पर्वत आम्ही चढून सुखरूप खाली उतरलो. ही त्या महादेवाची आणि बजरंगाचीच कृपा.... हुश्श करून सुस्कारा सोडला आणि काही वेळ न्याहळत राहिलो. इथली प्रत्येक वाट आम्हा भटक्यांना खुणावत होती. आम्हीही तिच्या कलेनेच चालतो हे खरं असलं तरी प्रत्येक वेळी तिचं सौंदर्य वेगळे भासत होते. हिरव्या वनश्रीसोबत काळ्या कातळावरुन उड्या मारत असलेले पाण्याचे प्रपात, मेघांनी मायेने दिलेले पांघरुन, त्याच्या कुशीत वसलेले डोळ्यांना तृप्त करणाऱ्या अशा आल्हाददायक निसर्गसौंदर्याची अनुभूती घेऊन आम्ही खाली उतरलो. पुढे अर्धा तास पायपीट करून नांदगावात पोहचलो. गावाच्या आधी एक बंधारा ओसंडून वाहत होता त्या वाहणाऱ्या पाण्यात  मनसोक्त आंघोळी केल्या आणि चौकट मामा च्या घरी जेवणाची व्यवस्था होती, फ्रेश होऊन जेवण केलं .अप्रतिम रुचकर अशा जेवणाचा आस्वाद घेतला. खासकरून तांदळाची भाकरी आणि ठेचा...

परतीची वाट धरताना पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिले. या अभयारण्यातून निसर्ग सौंदर्याची सलगी करून त्याचा मान राखत हा ट्रेक आम्ही पूर्ण केला आणि त्याने करू दिला याचा निश्चितच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. कुठलाही ट्रेक करतांना तो मनोरंजनासाठी करू नये. मनोरंजन हे माणसांनी निर्माण केलेल्या आधुनिक ठिकाणी सोईचे असू शकते, पण निसर्गापुढे अदबीने चालनेच सोईचे ठरते ही गोष्ट प्रत्येक ट्रेकर्स जाणतो. अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण स्वतः कारणीभूत असतो, इतर कोणालाही आपण दोषी ठरवू शकत नाही. आपली पायरी ओळखूनच आपण पाऊल टाकणे सोईचे असते. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे वागणे चुकीचे आहे याची जाणीव आम्हा प्रत्येकाजवळ असली की सर्व काही सुरळीत होते आणि झाले. माघारी फिरलो आणि पुन्हा त्याच वाटेने सुखरूप घरी पोहोचलो. हा ट्रेक आम्ही जवळपास अकरा महिन्यापूर्वी केला होता. आणि मी ब्लॉग आता काही दिवसांपूर्वी लिहायला सुरवात केली. म्हणून काही मुद्दे निश्चितच सुटले असतील. पण मी आज पुन्हा या ट्रेकची सफर केली, बघा तुम्हालाही झाली का ...!!!
धन्यवाद
___नित...  नितेश पाटील ( धनसार, पालघर ) ९६३७१३८०३१
⛳तुही गडयात्री..मीही गडयात्री⛳

पालघरहून भीमाशंकराला जाण्यासाठी मार्ग ब्लॉगवर नमूद आहे. मुंबईपुण्याहून कर्जतला यावे लागते. कर्जतहून खांडस या गावी यावे (३४ कि.मी.) खांडस गावातून शिडी घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते.उतरतेवेळेस बैल घाटाचा उपयोग करू शकता.

दुसरा मार्ग

माळेगाव बु|| (आंदर मावळ) -  नाकींदे पाणी (वांद्रेखिंड)-भोरी विहीर- रामखिंड-कळमजाई मंदीर-भीमानदी पात्र-अभयारण्य- श्रीभीमाशंकर.
कान्हे  (मावळातील)रेल्वे स्थानकावर उतरुन,
सावळा लालपरी (एसटी) ने माळेगाव बु|| अथवा खाजगी गाडीने माळेगाव बु|| येथे
येणे.
व जंगलवाटेने येथुन भिमाशंकर ट्रेक करु शकता.
पायथ्याशी राहण्याची व्यवस्था होईल
संतोष आलम फोन नं.९६८९४९१८९२



देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...