Wednesday, October 19, 2016

ऋषितुल्य आप्पा परब


#ऋषितुल्य_गुरुवर्य_आप्पा_परब

बा रायगड परिवारासोबत रायगड प्रदक्षिणा, स्थलदर्शन अभ्यास मोहिमेत सहभागी होण्याचा योग आला. आपला कट्टा समूह सोबत मार्गदर्शन करताना  ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब याचं पन्हालगडानंतर दुसऱ्यांदा दर्शन आणि मार्गदर्शन लाभलं. एकदम साध्या देशी, साध्या वेशी मनमोकळेपणाने मार्गदर्शन करताना पाहून खरंतर नवल वाटलं, पण उरही भरून आला. कधी कधी नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. तो क्षण शब्दात मांडता येणं कठीण आहे. ज्याने शिवचरित्र जाणलं, अंतरी अनुभवलं, या रानावनात गीरीदुर्गात जगले. त्यांच्यासाठी  इतिहास म्हणजे केवळ गोष्टी नाहीत, तर राहायचे आणि वागायचे कसे इथपासून ते राज्य कसे चालवायचे इथपर्यंतचे मार्गदर्शन आहे. गड-किल्ल्यांमधून ते होते; परंतु गड आणि किल्ल्यांना भेट देताना क्वचितच त्यांचा इतिहास वाचायला मिळतो. त्यामुळे अन्य राज्यांतून आणि परदेशातून येणाऱ्या इतिहासप्रेमींना आपणच आपला देदीप्यमान इतिहास समजून घेण्यापासून रोखतो, अशी खंत मनात जोपासणारे, मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघात चौदाव्या गिरीमित्र संमेलनात गिरीमित्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले आप्पा परब.धन्य जाहलो ते व्यक्तिमत्व याची डोळा याची देही अनुभवून. क्षणात उमगावं असं त्याचं व्यक्तिमत्व. 

ऋषितुल्य जीवन आप्पांचे


​तमा नसे ती प्राणांची,
हाकेसरशी धावून येतो
शिवनिष्ठेची हीच ग्वाही,
ऋण तयांचे फेडीतो

निष्ठावंत घडले मावळे,
इतिहास शिवरायांचा सांगतो
अस्तित्व राखून आजही,
मावळा तयांचा तो शोभतो

एक अवलिया आजही येथे,
रानवाटा तुडवित जातो
गडकिल्ल्यांच्या साक्षीनेच,
इतिहास शिवरायांचा सांगतो

इतिहासाचे बोलके पान,
साधी राहणी, उच्च विचार
शिवकालीन महतीचा वाणीतून,
बघा अखंड झरा वाहतो

दुबळी माझी झोळी तरी,
मज देत निरंतर तो राहतो
सह्यपर्वतातील अनामवीरांचे,
हुंकार तो मज एकवितो

सह्यगिरीच्या माथ्यावरून,
शिवरूपाने तांडव केले
न उलगडलेली अमुल्य पाने,
उलगडून तो मज दावतो

दुर्ग पंढरीचा निःस्पृह वारकरी,
शिवराय नित स्मरतो
सहयाद्रीचरणी ठेऊनी माथा,
सोनचाफा तो बहरतो

आयुष्याच्या खडतर वाटेवर,
काटेरी निवडुंग त्यांच्या तरी
धर्म इतिहास, दैवत शिवराय,
जात गडकिल्ल्यांची सांगतो

ऋषीतुल्य जीवन आप्पांचे,
ज्ञानयोग्याचा सहवास भाग्य माझे
प्रणाम माझा शत शत त्यांसी,
मुजरा मी त्यांसी मानाचा करितो
मुजरा मी त्यांसी मानाचा करितो
 ...नित

नितेश पाटील ( धनसार, पालघर ) ९६३७१३८०३१

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...