Thursday, October 19, 2017

पहिली साहित्यिक भेट

गेट टू गेदर १६.८.२०१५ , आज पालघर जिल्ह्यातील कवी ,लेखक, whats app group चे पिकनिक केळव्याच्या निसर्गरम्य समुद्र किनारी कोकनट व्हँलीमध्ये आनंदाचे क्षण चित्रे कवयित्री नम्रता माळी पाटील ताई, निकीता किनी,ताई विना शिंदे ,ताई .कवी,डॉ .अविनाश पाटील,सर सुहास राऊत सर प्रमोद शिंदे,जतिन संखे, सोहम, अक्षय देवरे, राहूल आणि मी नितेश

Monday, October 2, 2017

#फोंडा_गोवा

#फोंडा_गोवा

माझी ही कर्मे मला दाविती वाट
इतरांचे काय हो... निमित्त सारी
माझिया मनाच्या आजोळात गर्दी
विचारांची चाले चढाओढ भारी

____माझ्या कर्माचे रस्ते मला कधी कुठे कसे नेतील याचा काहीच नेम नाही. सकाळीच फोन वाजला आणि दुपारी फोंडा (गोवा) येथे प्रस्थान करण्याचे निश्चित झाले. कामानिमित्त... दोन दिवसाचे काम उरकून माघारी परतणार होतो. ऐतिहासिक घडामोडींचा वारसा असलेले फोंडा हे गोव्यातील तालुक्याचे गाव. या गावाचा इतिहासात बराच उल्लेख आलेला मी वाचला होताच. पण आज प्रत्यक्ष भेट देण्याची संधी चालून आली होती. परिसर फिरणे जरी दुरापास्त असले तरी गतकाळाची उजळणी मात्र होणार होतीच.

____राज्यभिषेकानंतर महाराज जेव्हा रायगड सोडून कोकणाकडे निघाले, तेव्हा महाराज्यांच्या सेनेनं गोव्या जवळील फोंडा किल्ल्याला वेढा घातला. १६७५ साली मराठयांनी फोंडा किल्ला जिंकून घेतल्यामुळे पोर्तुगीजांना त्यांची दहशत बसली. महाराज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी धन्य झाली. पण पोर्तुगीज मात्र धास्तावले. त्यांनी अण्णाजी दत्तो यांच्याशी बातचीत चालू केली. अण्णाजी दत्तोना इतिहास चांगलाच जाणून आहे. १६७४ साली अन्नाजीनी फोंडा किल्ला घेण्याचा अपयशी प्रयत्न देखील केला होता, पण बहुदा किल्लेदार मोहम्मद खानच्या लढवय्ये पणामुळे हा किल्ला अन्नाजीना घेता आला नाही. १६७५ मध्ये महाराजांनी स्वताः फोंडा किल्ल्याची मोहीम फत्ते केली तेव्हा अन्नाजी महाराजांसोबत होते.

____शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर संभाजीराजे गादीवर आल्यावर त्यांनी डिचोली येथे दारूगोळा व तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला, पण लवकरच त्यांचा पोर्तुगीजांबरोबर झगडा सुरू झाला. पोर्तुगीजांच्या आतून औरंगजेबाला मदत करण्याच्या दुटप्पी धोरणामुळे संभाजीराजांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीजांच्या चौलच्या किल्ल्याला वेढा दिला, तेव्हा पोर्तुगीजांनी संभाजीराजांचे लक्ष विचलित करण्यासाठी फोंडय़ावर हल्ला करून बरीच नासधूस केली. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी संभाजीराजे गोव्यावर चाल करून आले आणि पोर्तुगीजांची राजधानी सोडून संपूर्ण गोवा जिंकून घेतला. या अवधीत इ. स. १६८३-८४ सालात संभाजीराजांनी फोंडा किल्ला नव्याने बांधून काढला आणि त्याचे नाव ‘मर्दनगड’ असे ठेवले.

____फोंडय़ाचा सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मोठा गौरवपूर्ण, स्फूर्तिदायी असा आहे. पश्चिमेचा अथांग समुद्र, निसर्गरम्य किनारा आणि पूर्वेचा अद्भुत ज्यावर शिवरायांनी अधिराज्य गाजवले, स्वराज्याचा पाया रचला, आणि स्वराज्य स्थापन करून दिनदुबळ्यांचा कैवार नाहीसा केला अशी सह्याद्री यांच्यामध्ये फोंडे शहर वसले आहे. मात्र इथले घनदाट झाडीने दाटलेले डोंगर सह्याद्रीच्या मुख्य रांगांशी अधिक जवळीक साधणारे असल्याने नैसर्गिक संरक्षण आपोआप लाभले आहे. बंगलोर, कर्नाटक, कारवार, साष्टी, मुरगांव, पणजी आणि उत्तर कोकणातील मुंबई-सावंतवाडीहून येणारे मार्ग फोंडय़ात एक होत असल्याने शिवकाळात फोंडे शहराला अतिशय महत्त्व आले होते. शिरशीच्या सौंदे संस्थानचे संवदेकर, विजापूरचे आदिलशहा, पोर्तुगीज आणि मराठे यांचे राजकीय हालचालींचे हे मुख्य शहर असल्याने यावर ताबा मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न या सर्वानी केले.

____१५ व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाची सत्ता फोंडय़ावर होती. इ. स. १५४९ साली डोम जो दी केस्ट्रो याने फोंडय़ावर हल्ला करून तो कब्जात घेतला, तेव्हा त्याने किल्ला जमीनदोस्त करून टाकला. पुढे मे १६७५ मध्ये यावेळी त्यांनी येथील मशीद किंवा दग्र्याच्या देखभालीसाठी सनद लिहून दिल्याची नोंद गोवा गॅझेटियरमध्ये पाहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि त्यानंतर पेशवे यांच्या कारकीर्दीत फोंडे ही दक्षिणेकडील मराठय़ांची जवळजवळ दुसरी राजधानीच झाली होती असे म्हटले तरी चालेल.

कथन करावे काही प्रमाण द्यावे लागते
सत्य असत्याच्या तराजूत तोलावे लागते

स्वराज्य एक त्यावरीच निष्ठा होती तयांची
दोन्ही सोडून का मग भलतेच गुंतत जाते

मला कळाले जितके माझ्या परीने मी करणार
दिन जनांच्या सेवेसाठी स्वराज्य घडले होते

आदर्श कोण कुणाचा हा प्रश्न ज्याचा त्याचा
सुखे वाटणारी वाट हरेक मला गोड वाटते

____तर वाड्यावरून दोन वाजता निघालो. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. नभात मेघांची तुरळक गर्दी होती. पण सूर्यास त्याचा मोह नव्हता. ऊन सावलीच्या खेळात, हिरवाईने नटलेले डोंगर मात्र आम्हावर खळखळून हसत होते. गर्द हिरव्या झाडांखाली प्रसवलेले पोपटी तृण मोहक वाटत होते. रस्त्यातील खड्यांनी गाडीचा वेग मंदावला होता. वाऱ्याने आमच्याशी वैर तर घेतलेच होते. त्यात गाडीचा ac राहून राहून थांबा घेत होता. नाईलाजाने खिडकीतून येणारे उष्ण वाऱ्यांचे चटके प्रेमळ मानून,
खड्यांच्या गर्दीतून वाट काढत मंद गतीने पुढे जात होतो.

____तीन वाजता भिवंडीच्या बकाल नदीच्या पुलावरून
प्रशस्थ उड्डाणपुलावर प्रवेश केला, पुढच्या दुसऱ्या उड्डाणपुलावरून डाव्या हातावरून कल्याणकडे रवाना झालो.
सांडपाणी कचरा वाहून नेत असलेली उल्हास नदी पार करून जात असताना, तिची दोन्ही तटे टीवरीच्या गर्द झाडांच्या गर्दीत, दुर्गंधीतून मोकळा श्वास घेण्यासाठी वर पसरलेल्या अथांग निळाईकडे आशेने पाहताना दिसत होती. डाव्या हातावरून मुंब्र्या कडे रवाना झालो. आणि मुंबईच्या ट्रॅफिकने रंग दाखवायला सुरवात केली. ट्रक, ट्रेलरच्या गर्दीतून डाव्या हातावर खाली वसलेले मुंब्रा शहर अनेक लहरींवर तरंगताना दिसत होते. आणि उजव्या हातावर हिरवाईने नटलेले, पाझरत्या पाषाणाचे डोंगर मन मोहून टाकत होते.

धूळ चढलेली असते निसर्गावर, कोणी झटकत नाही
शहरात कुणी झटकले तयाला, कुणी खेटत नाही
शहरांची संपते जिथे वाट, निसर्गाची तिथेच चालू होते
गावांच्या वेशीवर रांगता रांगता, अधिकच दाट होते

____ट्राफिक आणि खड्यांच्या गर्दीतून शेवटी सव्वापाच ला एक्सप्रेस वेवर पोहचलो आणि सुस्कारा सोडला. गाडी पळू लागली, अगदी सुसाट वेगात. आणि अवघ्या काही मिनिटांतच पहिला बोगदा पार केला. बाहेर चाफ्याच्या दरवळ धुंद करत होता. रस्त्याच्या कडेला रंगबेरंगी फुले मागे खूप वेगात पळत असतांना, ती ओंजळीत यावी ऐसा मोह झाला नाही तर नवलच. पिवळ्या फुलांनी दुतर्फा टेकड्यांवरही गर्दी केली होती. पळता पळता दुसरा बोगदाही पार केला. खोपोली टोल भरून पुढे मार्गस्थ झालो. संध्याकाळ जमू लागली होती. उन्हे तिरपी झाली होती. भले मोठे असूनही पाषाण पाझरतांना दिसत होते. तापत्या उन्हाच्या झळा आता काहीश्या शमल्या होत्या.

दाह निवून गेला तरी सल कायम राहते
पाषाण असला तरी त्याला पाझर फुटते

____थंडावा जाणवू लागला होता. चढ चढताना ट्रक मात्र थकत होते. त्यांचीच जास्त गर्दी दिसून राहिलेली... नियमांचे तीन तेरा वाजवत ध्येय गाठण्यासाठी ते आसुसले होते. पुढे एक गोल गिरकी घेऊन बोगदा पार केला, आणी लोणावळा खुणावू लागला. मेघांसोबत शिखरांचा खेळ चालू होता. त्या खेळातून प्रसवलेली शीतलता दिवसभराचा शिण दूर करत होती. दर्या डोंगराच्या खाई, मधेच निसटून मागे पळत होत्या. लोणावळा पार करून बोगद्यात शिरलो. बाहेर निघताना डोंगरावरून थोडं पाणी, गाडीच्या छपरिवर राहण्याच्या निरर्थक प्रयत्नात, घरंगळुन गेलं. लागलीच थोड्या अंतरावर मोकळा श्वास घेऊन पुन्हा बोगद्यातून पुढे निघालो.

निरर्थक काय असते या दुनियेत म्हणा
शेष होईपर्यंत जगावे लागतेच साऱ्यांना

___पितृ पक्षात विनवण्या करूनही न येणारे कावळे मात्र आता काकुळतीला आले होते. त्यातच चहाची तळपही आसुसली होती. प्रशस्थ अशी मोकळीक असल्या जागी चहा नाश्त्याचा बेत आखला. त्यांचा विचार करून गाडी धाब्यावर थांबवली. आम्लेट पावची ऑर्डर दिली. आणि पावसाने छपरिवर गुरारायला सुरवात केली. आता याचं काय बिनसलं ते मात्र कळलं नाही. पण मृद्गंधाची कैफ चहाच्या नशेहून मादक भासत होती. शरीर शुद्धतेचा महत्वपूर्ण अध्याय पूर्ण करून निसर्ग सौंदर्याच्या पावसाळी शृंगाराची लूट लुटण्यासाठी, पुन्हा सज्ज जाहलो. संध्याकाळच्या कवेत स्वतःला ओढवून घेतलेल्या, धरत्रीच्या मानवनिर्मित तापलेल्या रस्त्यांवरून, वाफांचे सौम्य तरंग वरच्या दिशेने जाऊ लागले. बरसत्या पावसात ते मिसळू लागले.

नशा म्हंटली की मदिरेचा जाम साफ खोटे आहे
निसर्गाची कैफ अशी तिच्या समोर सारे थोटे आहे

____सात वाजले होते. संध्याकाळ रात्रीच्या मदनगृहात जाण्यास व्याकुळ होती. गाडीच्या प्रकाशमय डोळ्यांतून एक्सप्रेसवे उजळला असला, तरी पावसाच्या अगणित सुयांनी पाणावलेला भासत होता. गाडीचा प्रकाशही पाऊसात भिजून शहारला होता. दोन रस्त्यांमधील झाडांवर, रस्त्यावर चढलेली धूळ रस्त्याच्या कडेला चिंब भिजून पहुडली होती. नियमांच्या जणीवदृष्टीने रेखाटलेले सफेद पट्टे अधिकच रेखीव दिसत होते. कडेला लाल, पिवळे संकेतचिन्ह भराभर पुढे धावत होते. एक वेगळीच चमक त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. दोन रस्त्यांच्या मध्यस्ती, गाड्यांच्या नियमबाह्य वेगातून, झडप घालणाऱ्या वाऱ्याशी संघर्ष करणाऱ्या हिरव्या झाडांवर हळद चढत होती. वेग मर्यादेचे आकडे त्यासमोर फिके दिसत होते.

हळद लागली लागली, हिरव्या झाडांना
पिंगा घालतो घालतो, पवन दिवाना
स्पर्श मखमली फुलांचा, जीव गुंतला
धाव घेतली जोराची, प्रकाश खुंटला
झाड पेचात पडले, काळोख दाटला
गेला प्रकाश निघून, पवन राहिला
झाली लगीनघाई, चांद दिमतीला
आल्या वर्हाडी चांदण्या, तारे संगतीला
तोरण बांधले बांधले, काजवी दाराला
सनई वाजली वाजली, किर्रर्र रानाला
झाला सोहळा संपन्न, साथ युगांची
झाड पवन नांदतो, गाथा प्रेमाची

___तळेगाव डाव्या हातावर मागे सोडून शहरी भागात प्रवेश केला. देहूरोडच्या आधी असणारे क्रिकेटचे स्टेडियम अंधारात विसावले होते. एक्सप्रेसवेची साथ सोडून आता पुन्हा NH48 वर गाडीची चाकं रेंगाळू लागली. पुणे डाव्या हातावर वसले असले तरी गाड्यांची गर्दी विशेष होती. रस्ता सोडण्यापूर्वी पुन्हा मॅप चाचपून पहिला. हा रस्ता आम्हाला बेळगाव पर्यंत अगदी बिन दिक्कत सोडणार होता. अट खड्यांची नाक खुपसनी मधे नाही झाली तर. शेवटी राजापूर कणकवली सावंतवाडी रस्ता म्हणूनच आम्ही बाजू सारला होता.

____पुणे तिथे काय उणे ही म्हण ट्रॅफिक साठी पण लागू होते बरं का..!! पण अंधाराची गनिमत ओढवून घेतलेली वसु निर्धास्त होती. अगणित दिव्यांचा प्रकाश तिला प्रकाशमय करण्यास असमर्थ होता. एक दिवा नभाचा अगणित वसुचे. अंधारात चाचपडणाऱ्या दिव्यांची धाव ती कितपर्यंत म्हणायची..!! समोर अगणित गाड्यांच्या लालम लाल प्रकाशाचे मोहक दृश्य पुढे धावत होते. तर उजव्या हातावर समोरून येणाऱ्या गाड्यांचे अगणित डोळे सुवर्ण तेजाने लकाकत होते. आठच्या सुमारास आंबेगाव पार केले आणि गाड्यांची वर्दळ कमी होऊ लागली. आणि प्रवेश केला नवीन प्रशस्थ अश्या कात्रज बोगद्यातून. टोल भरून पुढच्या प्रवासाला निघालो.

अंधारात दिवा एक उजेड त्याचा फार
दिव्या दिव्यांची माळ मज दाविते वाट

____पेट्रोलचा काटा आता उभा राहण्यास तयार नव्हता. एकवेळ आम्ही सहन करून पुढे प्रवास करू शकत होतो. परंतु त्याच्या पोटात जर दाना नसेल तर तो कदापि पुढे जाणार नाही या वृत्तीचा. म्हणूनच खंडाळा घाट चढण्यापूर्वीच त्याची टाकी फुल केली. आणि गाडी घाटावर चढण्यास सज्ज झाली. वातावरणात हलका गारवा होता पण धुक्याचे सावट मात्र नव्हते. यापूर्वीही मी जेव्हा जेव्हा इथून प्रवास केला तेव्हा धुक्यात जरा मंदावलो होतो. आज सनाट चढून खाली उतरलो. पुणे सातारा हायवेच्या टोल भरला. रस्ता बाकी ढासू होता. पण पावसाचे थेंब तुरळक येऊन काचेवर आदळत होते. म्हणजे पुढे पाऊस असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

बाजूस सरले होते धुके वाट मोकळी होती
पाहण्यास सख्या सजनाला आसुसली होती

____दहा वाजता सातारा गाठला. आणि अवकाशात समोर विजांचा खेळ चालू झाला. पाऊस मात्र नव्हता. पण पुढे पाऊस असेल ही शक्यता नाकारता येत नव्हती आणि अवघ्या वीस मिनिटातच पाऊस चालू झाला. रस्त्यांच्या मधोमध झाडांमुळे समोरूम येणारी गाड्यांची लाईट डोळ्यांना त्रास देत नव्हती खरी. आणि पाऊसही कमी झाला. हवेत गारवा संचारु लागला. त्या गराव्याचा आस्वाद घेतच कृष्णेचे पात्र डाव्या हातावर सोडून तासवडे टोल भरला. कराडला पोहचताच पुन्हा पाऊस बेफाम सुटला. अंधाधुंद गोळ्यांचा वर्षाव गाडीवर होऊ लागला. वायफराचाही जीव रडकुंडीला आला होता. सारं समेटलं तरी पुन्हा भरून येत होतं. मधेच वीज चमकून रस्ता दाखवण्याचं खोटं नाटक करीत होती. अगणित थेंबातून पाऊस रस्त्यावर आदळत होता. लागत नसेल का, तरीही खळखळत होता. रस्त्या मधल्या लाल पिवळ्या फुल झाडांतून, बरेच झरोके बाहेर येऊ पाहत होते. पण त्यांच्या मखमली स्पर्शात तिथेच घुटमळत होते.
अश्यातच समोरून रिवसला येणारा ट्रक अचानक मागच्या हेडलाईट मुळे डोक्यात गेला. पण थांबायची वेळ नव्हती.
पाऊसही लपंडाव खेळण्यात मग्न होता कधी दिसे तर कधी नसे.

पाऊस गळतो गळतो, कुणास कळतो
सुखे हासतो हासतो, दुःखात रडतो
थेंब फुटतो सारखा, माती मिसळतो
सल त्याचिया मनाचा, कुणास कळतो


____दोन रस्त्याच्या मधोमध वडाचं एक झाड निथळत उभं होतं.
त्याच्या शाखातून जमिनीकडे धाव घेणाऱ्या पारंब्या चिंब झुळताना दिसत होत्या. त्यातून घरंगळणारे काही थेंब जमीन अलगद झेलून घेत होती, तर काही विसावल्या पुष्पांवरून जमिनीवर थेंब घरंगळत होते. त्या वटवृक्षाच्या छायेत विसवणारी फुलझाडे, आपला सुगंध सभोवताल पसरत होती. समोरून येणाऱ्या प्रकाशाला वाट करून देण्यासाठी धडपडत होती. पाऊस थेंबांच्या गर्दीतून, अंधार चाचपडत असलेल्या प्रकाशात ते दृश्य भलतेच मोहक वाटत होते. वायफराच्या तेजतर्रार काट्यातून जसे काचेवरचे पाणी बाजूला सरावे तसे ते दृश्य उजवीकडून मागे सरले आणि आमची गाडी किनी टोल बूथ पार करून साडे अकराच्या आसपास पुढे निघाली. आणि कविवर्य नलेश पाटलांच्या पाऊस पडावा म्हणून "तळ्याच्या पायाला किती या भेगा" या कवितेच्या स्मरणातून पाऊस पडल्या नंतरच दृश्य पाहून काही ओळी शब्दबद्ध झाल्या...

कुणा दिसल्या ढगाळ लाटा
अंधाऱ्या राती भिजल्या वाटा
पडत्या धारंला किती ह्या रेघा
जणू भासल्या लागल्या मघा
रेघा रेघांची धार होऊन
मला बी बरसू देदे रे देवा

निथळ्या काचेतून मी जेव्हा
पाहिले उभ्या पाराकडे
भिजल्या पारंब्या वाटल्या जणू
थेंबा थेंबाला घालती झुले
थेंबा थेंबाचा पाऊस होऊन
मला बी झुलू देदे रे देवा

छायेत त्याच्या फुले गोमटी
भिजून सारी घायाळ झाली
फुलफुलातून गंध उठला
झोपली धरा ईत्तर झाली
गंध गंधाचा सुवास होऊन
मला बी शिंपू देदे रे देवा

____पाऊस थांबला होता. चहाची चुस्की अनिवार्य होती. चहा घेतला, पाय मोकळे केले आणि पुन्हा भिडलो रस्त्याला. साखर कारखान्याची दुर्गंधी वाऱ्यासोबत येऊन श्वासनलिकेला रोखू लागली, आणि कोल्हापुरात प्रवेश केल्याची चाहूल लागली. काट्यावर काटा चढून गेला होता. कोल्हापूर सोडून कर्नाटकात प्रवेश केला. पावसाची रिपरिप बरीच मागे सोडली. कोरड्या रस्त्यावरून प्रवास चालू झाला. हत्तागी टोल भरून बेळगावी तुन मोबाईल बाईच्या सांगण्यावरून NH748 धरला आणि पणजीकडे रवाना झालो. बरसून गेलेल्या पावसाचे थेंब झाडांवरून गाडीवर झेलत, गतिरोधकांची शृंखला पार करत बेळगावीच्या निर्वाहान रस्त्यावरून आम्ही पुढे जात होतो. डाव्या हातावर झाडांच्या दाट गर्दीतून इमारतींच्या खिडक्यात दिवे लुकलुकत होते. एकाएकी ते चालू लागल्याचा भास झाला. काही क्षणातच कळले की ते दिवे चालत नसून बाजूने रेलगाडी खेटून चालली होती. या भ्रमविलाख्यातून बेळगावी सोडले.

उनाड वाऱ्यास कोठे कळते दुर्गंध अन सुगंध
जो मिळेल घेऊन सोबत वाहत असतो निर्धास्त

____खानापूर मार्गे रामनगर चेकपोष्ट वर पेपर पडताळणी पार करेपर्यंत रात्रीचे ३.२० वाजले होते. निर्वाहान एकेरी रस्ता दाट वन्यझाडांच्या दुतर्फा मैफिलीतून आमची गाडी पुढे दक्षतेने चाल करीत होती. त्यात जंगली प्राण्यांचे जागोजागी फलक पाहून नजर समोर हिरव्या रंगात मिसळणार्या पिवळ्या प्रकाशात रोखली होती. आणि प्राण्यांचे फलक का नसावेत शेवटी म्हादई गोव्यातील आणि भिमगड कर्नाटकातील वन्यजीव अभयारण्यातून आम्ही प्रवास करत होतो. म्हंटल एखाद तरी दृष्टीस पडावा. पण नशीब गांडू निघालं. या तिताई घाटात काही आढळलं तर नाही पण इतक्या पहाटे जंगलात रेल्वे फाटक बंद असल्यामुळे का होईना, थांबावं लागलं. गोवा एक्सप्रेस पास झाली आणि बरोबर चार दहाला गोव्यात प्रवेश केला. बीच साठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात भयाण जंगल घाट आणि नागमोडी रस्त्यांवरून आम्ही प्रवेश करत होतो. सकाळी पाच वाजता शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फोंडयात आम्ही पोहचलो. मुसाफिर हॉटेलमध्ये रुम बुक होतीच. निवांत झोपी गेलो. सकाळी उठून सलग दोन दिवस कामं आटोपली.

आतुर असा मी, रात्र ही एकटी, वाट तुझी बघताना
भंगले स्वप्न, पहाट कशी ती, छबी तुझी दिसताना

____गोवा तर सोडा पण फोंडयातही फारस कुठे फिरकता आलं नाही. फोंड्यातील चारशे वर्षाचा इतिहास असलेली साफा मस्जिद रस्त्यालगतच असल्यामुळे तेवढी न्याहाळली. तिचे वेगळेपण असे की तिला गोलाकार घुमट नाही. कौलारू चौकोनी छपरी आहे. चौरस छपरिवर कौलांची दिमाखदार अस्सल कोकणी ठेवण लक्ष वेधून घेते. हे तिचं वेगळेपण आपल्याला अधिक भावतं. तिच्या शेजारीच असलेलं पुरातन प्रशस्थ जलकुंड मोहक आहे. तूर्तास फार काही म्हणता येणार नाही , पण पुढच्या वेळेस वेळ काढून इथल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचे निश्चित केले आहेच. इथवर येऊनही गोव्यात सौंदर्यस्थळांना भेट देण्याचे तसे काहीच प्रयोजन नाही. चौपाटी त्याहून निर्मळ अगदीच माझ्या घराजवळ शिरगाव, माहीम, केळवे, चिंचणी येथेही रमणीय आहेच. पण शिवछत्रपती शिवराय, शिवपुत्र शंभूराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील श्रीक्षेत्री भेट देऊ शकलो नाही याची सल उरात राहीलच.

पावन झाल्या वाटा अन पावन झाली धरती
चरण कमलांनी नित ठेवले पाऊल स्वाभिमानी
ध्यास एक प्रत्येक श्वास होता स्वराज्यापाई
दिनजनांच्या सेवेची पाईक त्यांची जीवनी
शिवराय सुत शंभुची गाथा सूर्य जसा नभी
काळ लोटला शतके सरली आजही अभिमानी
आदर्श तयांचा आजही मज मी तितुके निभावें
ऋण फेडणे मागेच सरते काय गावे गाणे..!!

____काम आटोपून आलो त्या तिताई घाटातून न जाता, गोवा महाराष्ट्र कर्नाटक या तीनही राज्यांची सीमा ज्या ठिकाणी, सह्याद्रीच्या सह्यकड्यावर भिडतात अश्या चोर्ला घाटातून जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. लागलीच सायंकाळी पाच वाजता पणजी रोडने पुढे जाऊन उजव्या हातावर साखलीकडे रवाना झालो. आजही रात्रभर प्रवास आम्ही निश्चित केला होता. रात्रीचा प्रवास म्हणजे अंधाराला दूर सारण्याचा प्रवास. तात्पुरता हो... दाट वन्य अरण्यातील अंधार दूर सारायला काही ठिकाणी आजही त्या तेजोमय सूर्यासही जमत नाही. पण स्वराज्याच्या इतिहासाने त्याच काळोखावर तेजस्वी अक्षरांनी इतिहास नोंदवला आहे.

सह्याद्रीच्या दरी शिखरांवर रंग केशरी उधळतो रोज
सह्यकड्यांना आळवितो अन नभात तारे सेवितो रोज
अंधार होता घनघोर किती वाट किती ती अवघड जरी
सूर्यही फिका पडला होता शिवतेजाने उजळली धरती

____तर संध्याकाळ जवळ आली होती. पृथ्वी सूर्यास मागे सोडण्यासाठी आसुसलेली होती. सरळ डोईवर पडणारी उन्हे आता दूर गेली होती. अंधारकडे वाटचाल करत असलेल्या धरेला ती तिरपी होऊन थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण आपल्याच ऐटीत असलेली धरा तोही क्षण अगदी मनसोक्त जगत होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काजूच्या बागा डौलाने सांजवाऱ्यात गुणगुणत होत्या. पिकल्या पानाला अधिकच तेज आले होते. नारळीच्या पात्यातून सोनकीरणे वाकून त्यांच्याकडे बघत होती. पाण्याचे बरेच तलाव झुकत्या आकाशाला साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात होते. आपापल्या घरी परातणारे पक्षी मधेच आथिर राहून ते मनोरम दृश्य न्याहाळत होते. लहान मोठ्या टेकड्या एकमेकींच्या सावलीत संधीप्रकाशाकडे झुकत चालल्या होत्या. आणि सांज सुर्यधामाला निघाली होती. कवी ग्रेसने म्हंटलंच आहे.

कोणी बांधिले कवच, कर्ण घेतो बदनामी...
चंद्र ओशाळतो जेव्हा, सांज होते सुर्यधामी...

___आम्ही त्या वळपिळ घेणाऱ्या वाटांवरून, झाडांच्या गर्द सावलीतून आम्ही पुढे जात होतो. आणि चुकलोच वाट... पण प्रवासाची झिंग असली तर रस्त्यांची लिंक असतेच. आणि पुन्हा पूर्ववत झालो. काही किलोमीटर चालून, अंजुम डॅमच्या बाजूने म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश केला. रात्र झाली. गाडीचे डोळे वाट दाखवू लागले. बाकी किर्रर्र अंधार. रातकिड्यांची किरकिर. आणि सात वाजता चोर्ला घाटात महाराष्ट्रात प्रवेश केला. वाट भयाण एकाकी होती. पण आम्ही तिच्या सोबतीला होतो म्हंटल्यावर तिला भ्यायचं कारण नव्हतं. त्या भयाण वन्यजीव अभयारण्यात इतक्या उंचीवरही महाराष्ट्र चेकपोष्ट वर शिपाई कार्यरत होते हे विषेश. त्याही पुढे जाऊन एक दुसरी कर्नाटकची चेकपोष्ट लागते. तिथे आमची सोडून गाडीची झडती घेतली. ते बतल्यांच्या शोधात होते. आणि आम्ही रस्त्याच्या. सारं काही सुरळीत पार पडलं आणि पुन्हा बेळगावी जवळ बेंगलोर सातारा पेक्षा मुंबई राष्ट्रीय महामार्ग 48 वर पोहचलो. पेटपूजा आपोटून सकाळपर्यंत गाडी हाकली. पहाटेच्या वाशी ठाण्याच्या ट्रॅफीक मधून नऊ वाजता पालघर गाठले.

वाट जरी असली बरोबर प्रवास चुकत नसतो कुणाला
रेंगाळला जर तिथेच कुणी कोणी पुसत नसतो कुणाला

___नित (नितेश पाटील) धनसार, पालघर ९६३७१३८०३१

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...