Sunday, July 3, 2016

शिवराज्यभिषेक २०१६ शिवतीर्थ रायगड

सस्नेह जय शिवराय                                                                       नितेश पाटील ९६३७१३८०३१
                                                                                                      nitesh715@gmail.com  
शिवप्रेमी गडयात्री पालघर
रायगड गिरिभ्रमण (ट्रेक)१७/१८ जून २०१६
शिवराज्यभिषेकोत्सव सोहळा २०१६
शालिवाहन शके १५९६ जेष्ठ शु. त्रयोदशी. हिंदुस्थानाच्या, मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस... श्री दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडावर ३२ मनाच्या सोनेरी, रौप्य, हिरेजडीत सिंहासनावर, श्री राजे शिवछत्रपती सिंहासनाधीश्वर जहाले...या वर्षी त्या अविस्मरणीय सोहळ्यास ३४२ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही तोच उत्साह रायगडी जिवंत आहे... कसा नसणार..??? त्या दुर्गेश्वर रायगडाने तो याची देही, याची डोळा अनुभवला, नव्हे तो साकार केला.... जर तुम्हाला शिवचरित्राची जाण असेल तर तिथला प्रत्येक दगड सुद्धा... आजही रोमांच प्रस्थापित करणारा आहे. हीच त्या जगदंबेची देण आहे.
जेष्ठाची त्रयोदशी
दुर्गदुर्गेश्वर रायगडी....
सिंहासनी बैसले
शिवराय छत्रपती....
...नित
त्या जिवंतपणात दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवतीर्थ रायगड येथे शिवप्रभूंचा ३४३ वा शिवराज्यभिषेक सोहळा त्याच उत्साहात जेष्ठ शु.त्रयोदशी शनिवार दि.१८.६.१६ रोजी संपन्न होणार, आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आम्हास मिळणार...!! खरच एका शिवप्रेमीस आणखीन काय हवं...
आम्ही आता गड भ्रमंती करण्याचा व्रत हाती घेतलाच आहे. शिवप्रेमी गडयात्री शीर्षकाखाली शिवप्रभूंचे गड किल्ले जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आणि राहिलंच...तशात जर असे गडावर देदीप्यमान सोहळे असले कि एक अंगात ऊर्जा संचारते... गडदुर्गांच्या जिवंतापणात नवचैतन्य निर्माण होते... आणि अर्थातच शिवप्रेमींच्याही...
आम्ही ठरल्या प्रमाणे जेष्ठ शु. एकादशीस म्हणजेच गुरुवार दि. १६.६.१६ रोजी रात्री ११ च्या सुमारास आई भवानी, गणेशास वंदन करून, शिवछत्रपतीस मानवंदना देऊन पालघर(धनसार)हून प्रस्थान केले. सोबत युवक, युवती मिळून एकूण ४१ जणांची फौज होती. आणि आमची बस ४९ आसनी, अजूनही आठ जणांचा भरणा झाला असता बरं !! पण... हा पण जिथे येतो ना, तिथे काही वेळेस विषय सोडलेलाच बरा. असो... त्यात काही नविनही होते, जुने जाणतेही बरेच होते. म्हणून काळजी नव्हती. सारे एकत्र असले कि वेगळीच मजा असते, त्याहून अधिक तुम्ही कुठल्याही संकटाना सामोरे जाण्यासाठी तत्पर असता. सहा सात तासाच्या प्रवासात विचार विनिमय करू शकता जे कि आता संगणक युगात लुप्त झालंय. महाराजांनीही त्यांच्या उभ्या हयातीत सार्यांनाच एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही जण वेगळ्या मार्गानी गेले आणि त्यांचा फायदा वैऱ्यांनी करून त्यांना कपट नीतीने धुळीस मिळवले. शेवटी काळापुढे कुणाचंही काही चालत नसतं. अगदी नेताजी पालकरांसारखा सरसेनापती असला तरीही...


चांदण्या रात्रीत काळ्या डांबरी रस्त्यांना उजेड दाखवीत आमची बस मार्गस्थ झाली. पावसाची अजून हजेरी लागली नव्हती, हवेत उष्मा वरचढ होता. पण खिडकीतून येणारी दमट हवा काही प्रमाणात सुखावत होती. बसमध्ये गाण्यांची मैफिल सजली. रंग चढू लागला. त्या रंगात सारेच भान विसरून नाचू, गाऊ लागले. दोन, चार जणांचा तेवढा अपवाद... झोप सार्यांनाच आवरत नसते. आम्ही जरी एकाच जागी स्थित असू तरी बसने आम्हास शहरी भाग मागे सोडून सह्याद्रीच्या कुशीत प्रवेश केला. हवेत आता गरवाही जाणवू लागला होता. शहराचं काँक्रेटिकरण केल्याने तिथे कृत्रिम गराव्याची गरज असते. पण निसर्गाने मोफत देऊ केलेल्या देणगीचा जर माणसाने यथायोग्य सन्मान केला तर माणसाला कुठल्या कृत्रिम साधनांची गरज पूर्वी पडत नव्हती, आताही पडणार नाही. पण माणूस आज स्वार्थी झाला आहे, स्वार्थी माणसांचं तो अनुकरण करतो आहे. निसर्गाला तो आव्हान देत आहे. निसर्गाने मोफत दिलेल्या साधनांचा मोबदला तर सोडा, पण मुद्दल राखायची सुद्धा माणसांची द्यानत राहिली नाही. असो.... जसे करावे तसे भरावे म्हणतात ते उगा नाही..!!
चांदण्या रात्रीत, वाट भिजलेली
पाहते माझीच वाट, नाही झोपलेली...
थांबतो, थकतो माणूस त्या वाटेवरती 
तिचे मात्र चालणे, जोवरी माणूस चालती...

पहाटेचे चार वाजले होते. तरीही आमचा सुमधुर कल्लोळ चालूच होता. बस विश्रांती साठी मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे सोडून पाली फाट्यावर, चहाच्या टपरीपाशी थांबली. रात्रीच्या प्रवासात, सह्याद्री परिसरात जर तुम्ही चहाची चुस्की घेणार नसाल तर त्या प्रवासाला काहीच अर्थ उरत नाही. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चहाच्या टपऱ्या रात्रभर जाग्या असतात. त्यात स्टोव्ह वर चहाचे वाफाळते पातेले, त्यातून येणारा तो चहाचा मदमस्त करणारा सुगंध, चहाचा कप हाती घेतल्यावर त्या वाफाळत्या कपाचा तो जवळून येणारा सुगंध, वेड लावून टाकतो. तेथे चहाची चुस्की घेऊन आम्ही पुढे पाचाडकडे मार्गस्थ झालो.
आता मात्र जसजशी पृथ्वी सूर्याच्या बाजूने ढळू लागली तसतशी सार्यांना पेंग चढू लागली. पण ती फार काळ टिकली नाही. आम्ही पाचाडच्या वेशीवर जे पोहचलो होतो. सह्याद्रीत पावसाची हजेरी लागून गेली होती. सारे रान हिरव्या शालूत खुलून दिसत होते. वरून खाली दिसणारी शेतं, मनाला भुरळ पाडत होती. तांबड्या मातीत केलेली उखळन, त्यात पेरलेले भात एका शिस्तीत वर डोकी काढून मनास खुणावत होते. जणू तांबड्या आणि हिरव्या रंगाचा बुद्धिबळाचा पट खाली अंथराला आहे, आणि आकाशातील ढगांची ऊन, सावली आपली चाल त्यावरती करणार आहे... रस्ते दवानी न्हाहून अगदी स्वच्छ काळे शार दिसत होते. राज्यभिषेकाच्या आधी निसर्गाने सारे रस्ते धुवून काढले होते. इतक्यात पाचाड डावीकडे सोडून आमची बस रोपवे च्या दिशेने निघाली. आधी काही अंतरावर पप्पू दादांच्या (मो. नं. +91 95277 58601) जय मल्हार निवासस्थानी थांबली. जिथे पूर्वनियोजित दोन खोल्यांची व्यवस्था होती. आमच्या पोहचण्याचा आधीच पालघराहूनच वैयक्तिक गाडी घेऊन निघालेले आमचे मित्र तिथे पोहचले होते. तिथेच शरीर स्वच्छता उरकून आम्ही चढाईस सुरवात करणार होतो.
सकाळचे सव्वा सहा वाजले होते. उजाडलं होतं, पण रायगड धुक्याची चादर घेऊन अजूनही जणू निद्रिस्त होता. इच्छा असतानाही तो नजरेस पडत नव्हता. सूर्य नारायण रायगडाच्या कुशीत उद्या होणाऱ्या सोहळ्याची चर्चा करण्यात कदाचित व्यस्त असावेत, म्हणून बहुदा ते बाहेर येण्यास उशीर झाला असावा. रस्त्याला गडाकडे येणाऱ्या वाहनांचा ओघ वाढला होता. शरीरशुद्धी, चहा, नाष्टा आपोटून आम्ही बाहेर आलो तोवर रोपवे चालू झाला होता. रोपवेला लटकलेली तीन पाळनाआसने धुक्यात रस्ता कापत वरच्या दिशेने कूच करत होती. सकाळ प्रहरी रात्रभर पांघरलेले ढग पिवळ्या झळळीने सोनेरी मुकुटात परिवर्तित झाले न् पुनः आपल्या लख्ख: देखण्या रुपानीशी गड नजरेस पडला. अंतःकरण प्रफुल्लित झाले. गडावर पायी चढणाऱ्यांचीही रीघ वाढली होती. महाराजांचा जयघोष, हाती भगवा ध्वज घेऊन धारकरी रायगडाची वाट खाली सोडून आगेकूच करत होते...
आमचाही जीव उतावीळ झाला होता. शिवकाळी शौर्याने गाजलेल्या जिवंत वाटा संग करन्यास पाऊले बेचैन होती. हे सलग तिसरं वर्ष असतानाही तीच ओढ कायम होती, नव्हे आणखीन वाढली होती. तत्पूर्वी रिंगण करून ओळखपरेड घेतली, सर्वांस अच्युतने शिस्तीचं मार्गदर्शन केलं. सर्वात पुढे (FV) सुदेश आणि अजय वाट चढणार होते, मागे(LV) मी आणि परेश, मधली धुरा अच्युत आणि जतीन असं नियोजन झालं. सर्वांनी आपापल्या सॅग उचलल्या, महाराजांची गगनभेदी आरोळी दिली आणि रोपवेच्या आधी घळीतून वर पाचाड रस्यास मिळणाऱ्या, काहीशी अंगावरची चढण असणाऱ्या रस्त्यावरून सकाळी सव्वा आठच्या सुमारास गड चढण्यास सुरवात केली. शिवतीर्थ रायगड म्हंटला कि स्वराज्य डोळ्यासमोर तरळून जातं. जवळजवळ सत्ताविसशे फूट उंचीवर स्वराज्यासाठी राजांच्या आज्ञेने हिरोजी इंदूळकरांनी बांधलेला प्रशस्थ गडकोट दुर्गदुर्गेश्वर गिरीदुर्ग. त्या आधी सभासद बखरीमध्ये केलेले रायगडाचे वर्णन ते असे.. “राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.
पाचाड हुन तशी चढण सोपीच पण आडवाट अवलंबिली असता चढण अंगावरची. आडवाट रस्त्याची काय नि आयुष्याची काय ? दिसायला जरी सोप्पी असली तरी ती अवघड आणि कष्टदायीच. ते पेलण्याचं विनाअहं सामर्थ्य असेल तरच तो मार्ग स्वीकारावा. अन्यथा भोळ्या वाटेने संग करावा. पाऊले झपाझप चालत होती. पण आमची डोंबिवली लोकल (डोंबिवलीकर) हिरवा दिवा असूनही रेंगाळली होती. त्यात नशिबाने पाऊस तितका झाला नव्हता म्हणून.. नाहीतर या वाटेने चढणे म्हणजे शर्थच.. अवघ्या काही वेळातच पाचाडहुन येणाऱ्या रस्त्यास मिळालो. सारे तिथे विश्रामास होते. काही क्षण विश्रांती घ्यावी म्हंटल.
काही प्रतिमेच्या दुनियेत काही व्यस्त होते. ती हल्ली काय म्हणतात... सेल्फी.....श काढण्यात गर्क होते. काही त्या रायगडाचं ते अनोखं रुपडं डोळ्यात सामावून घेत होते. घळीतून येणारे ढग सुखावत होते. त्यात भान हरपून गेले. सारा थकवा त्या ढगांबरोबर भुर्रर्र झाला. उत्तरेकडे नजर गेली आणि काळजाचा ठोका चुकविणारे भव्य टकमक टोक दृष्टीस पडले, काहीसे धुक्यात तरीही त्यावरचा भगवा ध्वज सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातील वाऱ्याला दिशा दाखवत होता. उजवा हात डाव्या छातीस लागला...मूठ
आवळली गेली... अंग शहारले...ओठातून "जगदंब" उच्चार आपसूकच बाहेर पडले. मनात असंख्य विचारांनी थैमान घातले. ते दृश्य पाहून शिवाचरित्रातील शिस्त, सुशासन आणि न्यायव्यवस्थेची आज नितांत गरज आहे हाही विचार मनात येऊन गेला. आणि साऱ्यांच्या मागे वरच्या दिशेने निघालो.
पुढची चढाई तितकी कठीण नाही. पण ढग विरून गेले होते. सूर्यनारायणानी दर्शन दिलं होतं. थोड्या थकाव्यासराशी पायर्यांची वाट पकडून बेलाग अभेद्य अशा रायगडाचा महादरवाजा जवळ केला. पण जवळ जाईस्तोवर महादरवाजा दर्शन देत नाही. कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून जाताना अभेद्य महाद्वार कधी
जवळ आले कळलेच नाही. अखेर समोर गोमुखी पद्धतीच महाद्वार, नकळत त्याच्या पायरीवर मुजरे झडले... अंग शहारले... आई भवानीचा जयघोष, शिवाघोष आणि हरहर महादेव च्या गर्जनेत महादरवाजच्या शिळा हि समिल्लीत झाल्या. सॅग बाजूला ठेवून महादरवाज्याच्या वरच्या कमानीकडे तोंड करून पाहिलं त्यावरची कमळ फुले म्हणजे येथे लक्ष्मी अक्षय्य नांदते याचं प्रतीक. दिग्विजयी राजे शिवराय यांना मुजरा घालण्यासाठी येणारे लोक इथूनच गेली असतील, आणि ते पाहून या अभेद्य महादरावजाची छाती तेव्हा गर्वाने फुलली असेन नव्हे आजही तो गर्व मला दिसतो आहे... हा महादरवाजा किती नशीबवान की ज्याच्यावर शिवरायांच्या चरणधुळीचा अभिषेक झाला. किती थोर भाग्य.. युवराज संभाजी राजे इथून जाताना किती गोड हसला असेल हा महाकाय दरवाजा... आऊसाहेब इथनं गेल्या असतील तेव्हा अदबीने याने कमरेत वाकून इमानदार गड्या प्रमाणे त्या माउलीला मुजरा घातला असेल.. विचारांची नुसती गर्दी झाली.. वणव्यात रान पेटावं तसे विचार येत होते...आणि ते सारं थांबवून आत प्रवेश केला
स्वागता सज्ज भव्य रांगोळी दर्शनीच रेखाटली होती आणि तिचे शब्द राजांना गुणगौरवीत होते. कविराज भूषणांच्या शब्दांचा त्या रांगोळीला साज चढला होता. त्या रंगोळीतून येणारे शब्द अक्षरशः प्रत्येक शिवप्रेमीस चेतवीत होते...
इंद्र जिमि जृंभपर !
बाडव सु अंभपर !
रावण स दंभपर !
रघुकुल राज है !!
पौन वारि वाह पर !
संभु रति नाह पर !
ज्यो सहस वाह पर !
राम द्विज राज है !
दावा दृम दंड पर !
चिता मृग झुंड पर !
भूषण वि तुंड पर !
जैसे मृगराज है !!
तेज तमं अंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!
कवीराज भूषण यांची अजरामर कविता.ज्याचा अर्थ आहे... जृंभा सुरास जसा इंद्र, समुद्रास वडवानल, गर्विष्ठ रावणास रामचंद्र, मेघास वायु, मदनास शिव, सहस्त्रार्जुनास परशूराम, वृक्षास दावाग्नी, हरिण कळपावर चित्ता , हत्तिस सिंह, अंध:कारास प्रकाश, कंसास श्रीकृष्ण, त्याप्रमाणे म्लेंच्छकुळावर सिंहासमान शूर शिवराज होय. दगडनाही पाझर फुटवा अशी हि कविता आपण तर माणसं आहेत. ते शब्द अंतरी साठवून डावीकडे हिरकणी बुराजकडे धावत गेलेल्या तटबंदीवरील तोफा पाहून आम्ही पुढे प्रस्थान केले.
उन्हं वर आली होती. आमचे म्होरके कधीच पुढे जाऊन हत्तीतलाव बाजूस ठेऊन, शिकाई देवीचं दर्शन घेऊन, बाजारपेठेत जाऊन गडावरचं सौंदर्य न्याहाळत बसले होते. आम्ही मागोमाग हत्ती तलाव जवळ केला. वरुणराज्याने उशीर केल्याने तलावात पाणी नव्हते. आम्हीही त्याच्या उजव्या अंगाने वरचा रस्ता धरला. ढोल ताशांच्या आवाज रायगडास वंदित होता, आसमंत हर्षला होता. आज जेष्ठ शु. द्वादशी म्हणजेच शंभुराजांची जयंती.. काय योग साधून आलाय बघा... आज सूर्यपुत्राची जयंती आणि उद्या स्वतः सूर्य शिव छत्रपती शिवराय सिंहासनाधीश्वर होणार...शंभू राजांची मिरवणूक शिकाई देवी मंदिरापाशी असताना आम्हीही त्यात समिल्लीत झालो. अंगांगावर रोमांच उभे राहू लागले. इतिहास डोळ्यांसमोर तरळू लागला. एक महान मुत्सद्दी, धुरंधर, सेनानायक, संस्कृतपंडित, अजेय सेनापति , धर्मयोद्धा युवासम्राट् छ. श्री संभाजी महाराज यांची आज जयंती. काय अफाट कर्तुत्व सांगावे. एकाचवेळी पाच पातशाहया, मोंगल, इंग्रज-डच- पोर्तुगीज, सिद्दी आणि कमी की काय म्हणून आप्तस्वकीय यांच्याशी सर्जासम झुंज देणारा धर्मवीर योद्धा. मिरवणूक होळीच्या माळाकडून राजसदरेकडे वळली. आम्ही बाजारपेठेत सॅग ठेऊन राजदरबारी सदरेकडे गेलो.
रायगडाचा राजदरबार म्हणजे कुणा लुंग्या सुंग्याचा दरबार नाही. इथे वावरताना प्रत्येकास माणूस पणाची चाड असणं गरजेचं आहे. इथेच लाखो मावळ्यांनी आपली निष्ठा वाहिली. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच दरबारातून स्वस्थापित स्वराज्याचा कारभार पहिला जायचा. दिल्लीचा दरबार, ते तख्त, स्वतः जातीने तिथे हजर राहून हादरवून सोडणारा आमचा शिवाजी राजा इथेच अभिषिक्त राज्यकर्ता बनला. या विचारताच आमची स्वारी नगारखान्यालगत येऊन पोहचली. काय त्याची भव्यता..!! आज त्या भव्यतेच रूप हे असं कि नजर हटत नाही. तर साडेतीनशे वर्षांपूर्वी कोण रुबाब असेल याच्या कल्पना विश्वात रंगलो. मागून जेव्हा जय शिवाजीची आरोळी ऐकू आली तेव्हा जागेवर आलो. आपले शिर आदराने झुकवून, छाती अभिमानाने फुगवून, अंगावरचे काटे उभे असताना राजदरबारात आम्ही प्रवेश केला. समोरच मेघडंबरीच्या छायेत विराजमान, सिंहासनाधीश्वर महाराजांना तिथूनच हात जोडले. आणि अन्य मावळ्यांसोबत सदरेत टाकलेल्या तात्पुरत्या शेड मध्ये सौरभ कर्डे यांच व्याख्यान ऐकण्यासाठी स्थानापन्न झालो.
मिरवणुकीत सोबत असलेली शंभुराजांची प्रतिमा विधिवत महाराजांच्या आसनालगतच त्यांच्या उजव्या बाजूस ठेवली गेली. शंभू राजांनी दाखवून दिलं आहे, तसाच प्रसंग पडला तर मराठी राजमन साक्षात मृत्यूलाही कसं सामोरे जाऊ शकते, हे काळाला साक्षी ठेऊन आपल्या असंख्य जललहरींचे नेत्र करून ज्या इंद्रायणी आणि भीमेने तुळापुरी प्रत्यक्ष पहिले त्या आजही तो पराक्रम नव्हे मृत्यूला ताटकळत ठेवणाऱ्या शिवशंभुचा इतिहास कथन करतील. ज्या नादान गणोजी शिरक्यानी मुठभर जहागिरीसाठी आणि वितभर जमिनीच्या तुकड्यासाठी फितुरि केली, आज ना ती जहागीर आहे, ना ती जमीन. पण शिव छत्रपतींचा छावा आजही तमाम हिन्दु हृदयात क्षात्रतेजाने तळपत आहे. त्यांच्या जयंतीला देखील व्यख्यान करत्याने त्यांचे बलिदान उजागर करावे यापेक्षा जाज्वल्य धर्मभक्ति काय असू शकते. तदनंतर एकच जयघोष झाला सारी सदर त्या जयघोषाने मंत्रमुग्ध झाली. व्याख्यान चालू झालं, काही मुद्दे सोडले तर (माझ्या दृष्टीने) त्यांचं वक्तृत्व, इतिहासाचा अभ्यास सारंच अप्रतिम, उपस्थितांना मेजवानीच. ते संपल्यानंतर राज्याभिषेक समितीने भोजनाची व्यवस्था केली होती त्याचा आस्वाद घेऊन काही वेळ सदरेतच विश्रांती घेऊन नंतर गड भ्रमंती करण्याचं ठरवलं. पाऊसही हजेरी लाऊन गेला होता.
आम्ही मात्र राजदरबाराच्या सिंहासन चौथऱ्या मागील संपूर्ण बालेकिल्ला आणि परिसर पाहण्यास निघालो. अष्टप्रधान मंडळांची सदर, शिवरायांचे निवासस्थान, टांकसाळ, रत्नभंडार, पाण्याचा हौद, स्तंभ, राणीवसा, भंडार गृहे, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा, अंबरखाना या साऱ्यांचे भग्न अवषेश आजही इतिहासाची साक्ष देतायत. १८१८ मध्ये झालेल्या पेशवे आणि इंग्रजांच्या लढाईत इंग्रजांकडून झालेल्या भडिमारात गडावर जाळपोळ झाली. असो पण आज शिवचरित्राचे क्षण न क्षण उजागर करणारी हि भव्य वास्तू आजही सह्याद्रीवर अधिराज्य करीत आहे. नव्हे ती जिवंत आहे आणि त्या जिवंतपणात आम्ही वावरतो हे आमचं जिवंतापणाच लक्षण आहे. तदनंतर आम्हीं सारेच जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालो.
श्रीशिवरायाची राजधानी रायगडावरील होळीचा माळ. नगारखाण्याकडून आम्ही डावीकडे उतरून समोरच मोकळ्या जागेत येतो तोच "होळीचा माळ". जेथे शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसविलेला आहे. जो पुष्पहारांनी, सुशोभित केला होता, रांगोळ्यांचे सडे चौफेर खुणावत होते. त्या प्रतिमेस वंदन करून पुतळ्या समोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात त्या शिवकालीन बाजारपेठेत प्रवेश केला. बाजारपेठेच्या दोन रांगात प्रत्येकी बावीस दुकाने आहेत. दोहोंच्या मध्ये जो चाळीस फुटांचा रस्ता आहे
तो, आणि आजच्या आपल्या बाजारपेठेंचा जो चार फुटांचा रस्ता आहे त्यावरूनच आपल्या आणि महाराजांच्या राजकारभराची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. असो... त्या रस्त्याने ती वास्तू न्याहाळत आम्ही पुढे जात होतो. बाजारपेठ इतकी उंच आहे कि पूर्वी घोड्यांवरून तेथे खरेदी करता यावी. त्या बाजारपेठेच्या एका खांबावर नागाचे शिल्प कोरलेले दिसले. ते टिपून आम्ही पुढचा रस्ता धरला. रायगडची बाजारपेठ दूरगामी व्यवस्थापन, शिवरायांच्या व्यापारी धोरणची साक्ष देणारी किल्ले रायगडावरील जगप्रसिद्ध बाजारपेठत होती. आज तिचे पूर्ण अवशेषही नाहीत.
पुढे डाव्या हातावर काही काळासाठी टकमक टोक बाजूला ठेऊन, उजव्या हातावरील शिबंदीच्या वसाहतींचे अवशेष पाहत, आम्ही जगदीश्वराच्या पश्चिम दरवाज्यापाशी पोहचलो. गडावर असताना महाराज रोज मंदिरात दर्शनासाठी येत. ते स्मरून आम्ही आत प्रवेश केला. जगदीश्वराचा अभिषेक चालू होता. मंदिराचा गाभारा माणसा, मंत्रांनी भरून पावला होता. स्वराज्यासाठी किती लेकरांच्या डोक्यावरचं छत्र निघून गेलं ते जगदीश्वराला चांगलंच ठाऊक..!! स्वराज्य रक्षणासाठी किती अभिषेक याला केले असतील त्यांची मोजदात नाही. पण आज तो त्या मंत्रांनी निश्चितच गौरांवित झाला असेल, ज्या राजांनी त्यास छत्र दिलं त्याचा मरणोत्तरही त्याला हेवा वाटत असेल. आज साडे तीनशे वर्षानंतरही हा अलोट जनसमुदाय राज्यभिषेकासाठी रायगडी येतो आणि माझाही अभिषेक त्या निमताने होतो.
रायगड हा निश्चितच गड नाही तो माझा, तुमचा, अन साऱ्यांचा अभिमान आहे. पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या पायरीवर स्थान मिळवणाऱ्या हिरोजी इंदूळकरांच्या नावाचा शिलालेख आहे. "सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर". या दरवाज्याच्या उजव्या बाजूस एक दुसरा सुंदर शिलालेख दिसतो, त्याचा मजकूर असा आहे... "सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदमान सवंत्सर चालू असताना सुमुहूर्तावर
निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजागृहे अशांची उभारणी केली आहे, ती सूर्य चंद्र असोतोवर खुशाल नांदो." आणि या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी काय मागावं तर शिवरायांच्या पदस्पर्श त्यांच्या नावाला प्रतिदिन व्हावा म्हणून जगदीश्वराच्या पायरीवर आपले नाव कोरण्याची त्यांनी आज्ञा मागितली. कोण निष्ठा हि ??, या निष्ठेचं मोल या जगात नाही. या अश्या निष्ठावंत मावळ्यांच्या जीवावर तर स्वराज्य उभं राहिलं आणि त्या स्वराज्याचे अधिपती शिवराय सिंहासनाधिश्वर झाले. जगदीश्वराच्या मंदिरासमोर नदीची भव्य व सुबक मूर्ती भग्नावस्थेत आहे.मंदिरात सभामंडपात भव्य कासव आहे. गाभाऱ्यात भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती आहे. आणि मध्ये जगदीश्वर विराजमान आहेत.

जगदीश्वर मंदिराच्या परिसराचा पूर्वेकडील दरवाजा ओलांडून या रायगडाचा, स्वस्थापित स्वराज्याचा सूर्य, आपले तेज निरंतर ठेऊन अस्त झाला आणि जिथे कायमचा निद्रिस्त झाला त्या महाराजांच्या समाधिकडे भाऊकतेने आमचे पाय वळले, आणि आम्ही सारेच मौनात नतमस्तक झालो. नयनकडा जड झाल्या, त्या तशाच सताड उघडया ठेऊन बाजू सरलो. महाराजांच्या शेवटच्या दिवसांमध्ये गडावरील जे इतिहासाने नोंदवून ठेवलंय ते सारं नजरेसमोर आलं, त्या दृष्ट व्यक्तींविषयी मनात चीड आणि घृणा उत्पन्न झाली. आजही असल्या माणसांची या जगात कमी नाही. पण जेव्हा आपलीच माणसं वैरी
होतात तेव्हा दोष इतरांना काय द्यावा...

महाराजांच्या शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे, जेथे आजही चौकी पहारे बसवले आहेत. असेल तो वादग्रस्त मुद्दा..! कदाचित त्या कुत्र्याचं वास्तव्य देखील नसेल गडावर, पण महाराजांच्या अंतसमयी काही दिवस आधी गडावर जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीला चोप देण्यासाठीची ती कुत्र्याची समाधी आहे हे नाकारता येणार नाही. अंतसमयी जे आप्तांना कळलं नाही ते त्या मुक्या जनावराने चितेत उडी घेऊन निष्ठा आणि प्रेमाचं उत्तम उदाहरण सार्थ करून दाखवलं असा त्या समाधीचा अर्थ आहे. नव्हे त्या कुत्र्याला जी जाण होती, ती गडाचे दरवाजे बंद करणाऱ्याला नव्हती, ती खलिते जागीच खिळं करणाऱ्याना नव्हती. असा त्या समाधीचा अर्थ आहे. अरे "स्वार्थाने बरबटलेला समाज उदे उदे करेल यात काय नवल आहे...!! पण मुक्या प्राण्यालाही सहज उमागवं आणि त्यांनी आपलं सर्वस्व राजांना अर्पण करावं, सर्वस्व नव्हे तर देहांत देखील..!! हा त्या समाधीचा अर्थ आहे. हे शिवरायांच चरित्र आहे. ते कपाळकरंट्या, लालची लोकांना काय कळणार..!! हे लोकांना सहज उमजावं म्हणून ती समाधी आहे. असो विषय भरकटतोय बहुतेक...
सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे. "क्षत्रियकुळावंतस श्री मन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शु.१५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बंधिलेला जगादीश्वराचा जो प्रसाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेरील दक्षिणभागी केले. येथे काळ्या दगडाच्या चाऱ्याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधले असून वरून फरसबंदी केलेली आहे.फरसंबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशीष्ठांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.
महाराजांच्या समाधीच्या पुढे पूर्वेकडे भवानी टोक, तर उजवीकडे बारा टाकी दिसतात. तेथे न जाता माघारी फिरून आम्ही उजव्या हातावर उत्तरेस कोळिंब तलाव पाहून, पश्चिमेकडे टकमक टोकाची वाट धरली वाटेत दारू कोठार (लढाईसाठी तोफेत भरली जाणारी दारू) पाहून टकमक वर पोचलो. इथे सारेच आपण कुठल्या ठिकाणी आहोत याचं भान विसरून प्रतिमेच्या विश्वात मशगुल झाले होते. आमच्यातलेही काही नवखे प्राणी होते जे साडे तीनशे वर्षांपूर्वी त्या जागेचा दारारा काय होता, यापासून बेखबर होते. शालेय शिक्षणातून शिवरायांचा इतिहास गाळून टाकल्यावर आणखी काय होणार म्हणा..!!
जेव्हा शंभूमहाराज दिलेर खानाच्या गोटातून भूपाळगडावर चालून आले तदनंतर गड फिरंगोजींनी त्यांच्या ताब्यात देऊ केला. जेव्हा ते रायगडी परतले तेव्हा याच टकमक टोकावर त्यांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा महाराजांनी सुनावली होती. एका निष्ठावंत मावळ्याला आपल्याच पुत्रामुळे आपण हि सजा सुनावली आहे, त्या चिंतेत रात्रभर महाराज अस्वस्थ होते. त्यातच पुतळाबाईंनी महाराजांना ती शिक्षा माफ करण्यासाठी विनवणी केली, आणि एक प्रश्न केला, जर उद्या शंभूराजे स्वराज्यात परतले तर त्यांनाही हीच शिक्षा करणार का आणि त्या निघून गेल्या. पहाट झाली पूर्वेला उजळू लागलं होतं पण स्वराज्याचा शिलेदार फिरंगोजींचा अस्त निकट होता, टकमकवर त्यांना तोफेच्या तोंडी बांधलं होतं. महाराज ते महालातून पाहत होते. न राहवून त्यांनी थेट टकमक टोक गाठला आणि ती शिक्षा रोखली, त्यावेळेस त्या तोफेस बांधलेले फिरंगोजीं, त्यांच्या ओठावरचे पिकले केस थरथरले, आणि ते उद्गरले "धनी का तसदी घेतली सा, हे पिकलं पान' ते कधीतरी गळणारच." असे कठीण प्रसंग या टकमक ने अनुभवले. आणि आम्हास त्याचा विसर पडला, आमच्या साठी ते सेल्फीस्टेशन व्हावे हि दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हे गड किल्ले हे शोभेची वस्तू नाही, इथला प्रत्येक कण न् कण शौर्याने जगलेला आहे. आणि अजून जाणनाऱ्यांसाठी तो जिवंत आहे.
तदनंतर आम्ही पुन्हा सदरेकडे जाण्यास वळलो. बाजारपेठेजवळ बसलेल्या आज्जीकडून रानाची काळी मैना म्हणजेच करवंदाचा आस्वाद घेऊन होळीच्या माळात पोहचलो. डाव्या हातावर कुशावर्त आणि वाघ दरवाजा बाजूला ठेऊन नगारखान्या जवळून पुन्हा राज सदरेत प्रवेश केला, तत्पूर्वी शिवतूला आटोपली होती. तिचा प्रसाद भक्षण करून स्थानापन्न झालो. आम्ही काही जण कारुळकर काकांसोबत राजवाडा सोडून रोपवे च्या दिशेने गेलो. तिथे बांधलेल्या काही वसाहतींमध्ये राहण्याची व्यवस्था करतो असं ते म्हणाले पण आम्ही राज सदरेतच राहणं पसंत केलं. तेथून रोपवे आणि खालचे त्यावेळचे चौकी पहारे असावेत असा अंदाज पण ती मनमोहक गावं न्याहाळताना मन तृप्त झालं. मागे वळलो तोच पायाखाली दारूची बाटली पडली होती. बाजूला विस्तारलेल्या काही फुटलेल्या काचा. अरे तुम्ही लोक कुठे येताय आणि येताना हे काय घेऊन येता ? या पवित्र रायगडावर चालताना, चप्पल घालून चाललो तरी मावळ्यांना पश्चाताप होतो अशा ठिकाणी तुम्ही सरळ दारू घेऊन येता. शिवराय शिवराय ओरडत तुम्हीच येता ना इथे सोहळे साजरे करायला, मग तेच शिवराय असताना ऐश्वर्यसंम्पन्न असलेल्या रायगडाची का तुम्ही पार रया बदलत आहात ? नसेल संवर्धन करायचे तर तुम्ही गडावर नाही आलात तरी चालेल. इथे शककर्त्या शिवरायांनी राज्य केलय, शेकडो न्याय निवाडे, पवित्र सोहळे केलेत. कोणावर जबरदस्ती नाहीच आहे इथे येण्याची.

येतील तर बुलंद रायगड अभ्यासायला या...
शिवचरित्र नसानसात भिनवायला या...
शिव शौर्याची गाथा, जनमानसात पोहोचवायला या...
नशा मावळ्यांच्या निष्ठेची चढवायला या...
या तुम्ही गड संवर्धनासाठी या...

मग आई जगदंबेचा पारंपरिक गोंधळ ऐकण्यासाठी आम्ही राजसदरेत दाखल झालो. गोंधळ चालू झाला. एक वेगळीच भारावलेली कैफ त्या वातावरणात चढली. न राहवून पायासह पूर्ण शरीर थरथरू लागलं. आपसूकच पाय त्या गोंधळात थिरकण्यासाठी सज्ज झाले. आणि सामील झालो, आम्ही सारेच, अंबे भवानीच्या गोंधळात, राजदरबारी... पण दुर्दैव हे कि अंबेचा गोंधळ असूनही काहीजण मात्र, आपण पायी जोडे घालून, कुणी शिट्या वाजवून, कुणी कुणाच्या खांद्यावर काय..!! आपण कुठल्या ठिकाणी, कोणत्या कार्यक्रमात सामील आहोत, आणि आपण काय करताहोत याची चाड ज्याची त्याला असायला हवी. हि कुणी सांगायची गोष्ट नाही. तो लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम नव्हता. पण काही जण मात्र त्याच अर्वीभावात वावरत होते, हि शरमेची बाब आहे. गोंधळ म्हणजे काय ?? महाराष्ट्रातील बहुतांश समाजांचा कुळधर्म-कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ. गळ्यात कवड्याची माळ घालून, प्रबोधन करणार्‍या कथा, देवीच्या महात्म्याच्या कथा, मध्ये मध्ये उत्स्फूर्त काव्य. त्याला वैशिष्ट्यपूर्ण चालीत बसवून संबळ, तुणतुणं आणि झांजेच्या तालावर सादर करणं, त्या जगदंबेस आळवीनं, गाऱ्हानं घालणं म्हणजे गोंधळ... त्या परंपरेची जाण नसेल तर मी म्हणतो अश्या व्यक्तींसाठी पार्टी समारंभ भरपूर असतात कि, तिथे आपली हौस पुरी करावी. का अश्या तीर्थ क्षेत्रावर येऊन त्या परंपरेला गालबोट लावावं..!! पण अश्या वेळेस माणसांचा एक सूर असतो...तुम्ही आम्हाला शिकवणारे कोण..?? सत्यच आहे ते... म्हणून तर आज समाज रसातळाला चाललाय. त्याचं कारण आहे आपण आपल्या पिढीसमोर जो आदर्श घालून देतो तो तद्दन चुकीचा आहे. आणि त्याचा प्रत्यय पावलोपावली येत असला तरी पद्धतशीर पणे त्याकडे डोळेझाक केली जाते... हल्ली व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर काहीही खपवलं जातं हो. माणसं सुशीक्षिती अज्ञानी होत चालली हि या देशाची शोकांतिका आहे. असो...
गोंधळात मंत्रमुग्ध, तल्लीन होऊन आई जगदंबेस शुभाषिश मागून बाहेर पडलो. शिवराज्यभिषेक समितीने गडावर आलेल्या सर्वच शीवप्रेमींची दोन दिवसासाठी जेवण, चहा, पाणी सर्यांचीच व्यवस्था अगदी चोख केली होती. गडावर आलेल्या महिलांची राहण्याची सोय देखील केली होती. त्याबद्दल त्यांचे सर्वानीच कृतज्ञता पूर्वक आभार मानायला हवेत. पुन्हा रात्रीचं भोजन आपोटून आम्ही राजदरबारी परतलो. जेवण बाकी लय झकास. तो आस्वाद घेऊन तृप्त झालो.
राजदरबारी आता सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले होते. महाराष्ट्रभुषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती नाटकातील शिवराज्यभिषेक सोहळा लहान मुलांनी सादर करण्यात केला. अवघ्या साडेतीन वर्षाचा मुलगा शिवरायांच्या भूमिकेत होता. हा सोहळा अप्रतिम आणि नेत्रदीपक असा होता. शिवराज्यभिषेका आधी पाऊसाने वर्षाव केला आणि शाहिरांनी साज चढविला. वा-या पावसात बेभान होऊन शाहीरांची पोवाड्याची बरसात चालु होती. त्यांचा उत्साह वाढवित शिवभक्त जयघोष देऊन सहभाग दर्शवीत होते, प्रचंड गर्दी ने राजदरबार भरला होता. पहाटे तीनच्या सुमारास शाहिरांनी रजा घेतली. सारा गड न्हाऊन ढगांच्या कुशीत शांत
पहुडला. सोनेरी पहाट जगण्यासाठी. आम्हीही तिथे स्वप्नसोहळ्या रात्री इतिहासात विलीन झालो.
आणि ज्याची रायडच नव्हे तर सारा हिंदुस्थान साडेतीनशे वर्षांपूर्वी वाट पाहत होता आणि आजही ज्याची गरज आहे ती पहाट उजाडली. पहाटेच छान पारंपरिक कपडे, फेटे बांधून राजदरबारात शिवप्रेमी हजर झाले. ध्वजारोहण जोशपुर्ण वातावरणात पार पडला. नगारखान्यासमोर भगवा ध्वज दिखमात फडकु लागला. नगारखान्याजवळचा परिसर, होळीचा माळ, राजदरबार पुन्हा एकदा शिवभक्तांनी फुलुन गेला, सोबत ढोल, नागरे, लाठिकाठी, तलवारबाजी, अश्या कित्येक शिवकालीन प्रत्यक्षिकांनी सारा परिसर गजबजून गेला. मेघडंबरीत वेदाचार्यांची लगबग सुरू झाली. तत्पूर्वी पावसाने अभिषेक करण्यास सुरवात केली. संपूर्ण रायगड धुपाच्या मांत्रिक धुरात आधीच तल्लीन होता. संपूर्ण राजदरबार " छञपती शिवाजी महाराज की जय " या जयघोषाने दुमदुमुन गेला.
पावसाचा अभिषेक चालू असतानाच सौरभजी कर्डे यांच्या व्याख्यानाची सुरूवात झाली. त्यांच्या धारदार विचारांनी टाळ्यांचा कडकडाट, कवी कलशांच्या कवितेतुन महाराजांचे वर्णन आणि शिवप्रभूंचा जयघोष यांनी वातावरण शिवमय झालं. शिवराज्यभिषेक हा फक्त सोहळा नाही किंवा संस्कार नाही उभ्या मराठी मुलखाला नव्हे तर भारतवर्षातील स्वधर्मीयांना आपल्यातल्या स्वत्वाची जाणीव करून देणारा हा सोहळा होता आणि आजही आहे. हिंदूस्थानाच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस.
जंगम उपाध्यायांनी साडे सहा वाजता अभिषेकास प्रारंभ केला. शंखनाद झाला... हिंगोलीच्या विश्वनाथ स्वामींनी, जो शंखनाद केला..... आह्हा.... लाजबाव.... अप्रतिम.... एकदा वाजवला की दोन मिनिटे शंखनाद चालूच रहायचा... इतका जबरदस्त. ती ताकत त्या जागेची असावी, समोर बसलेल्या शिवसागराची असावी... शिवरायांच्या मूर्तीवर श्री १०८ नीळकंठ  शिवाचार्य धारेश्वर महाराज, वाईकर महाराज, रायपाटणकर महाराज यांच्या उपस्थितीत अभिषेक चालू झाला. अंगावर रोमांच बहरले. या निसर्गाने जणू हिमवर्षाव केला, एकेक ढग महाराजांचे चरण स्पर्श करून वाऱ्याशी संग करु लागले. या ढगांच्या गर्दीतून सुर्यासही हा शिवसुर्याचा सोहळा पाहण्याचा मोह आवरता आला नाही. गडाचे वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळा स्वराज्यातील प्रत्येक मातीच्या कणाकणाने, वृक्षवेलींने, वाऱ्याच्या झोक्याने, सुर्यकिरणांने, सागराने, आकाशाने, देवदेवतांनी मनोभावे अनुभवला असेल, आणि आजही त्या सोहळ्याचे हे साक्षीदार आपल्या सोबत आहेत, आजचा हा थाट पाहून प्रथम शिवराज्याभिषेक सोहळा कोण थाटात झाला असेल याची अनुभूती येते. एक दिड तास वेद मंञोच्चारानंतर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
स्वराज्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांना मानवंदना म्हणजे हा शिवराज्याभिषेक सोहळा. श्री दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडावर ३२मणाचे सिंहासन उभे राहीले. शिवराय सिंहासनाधिश्वर झाले. सर्वत्र आनंद, जल्लोष. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी...दहा दिशांच्या हृदयामधूनी अरूणोदय झाला... या पवित्र सोनेरी सोहळ्याला ३४३ वर्षे पुर्ण झाली. इतिहासाच्या खूना जरी पुसट झाल्या तरी त्यांनी संस्थापिलेले स्वराज्य आजही कुणाचा घास नाही. याची ग्वाही हे गडकिल्ले अजूनही देत आहेत आणि राहतील...

श्री हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, गोब्राम्हण प्रतिपालक, स्वधर्म संवर्धक, भोसले कुलदीपक, म्लेंच्छ सैन्यसंहारक, विमलचरित्र, सेनाधुरंधर, राजनितीधुरंधर, शककर्ते श्रीमंत श्रीमंत श्रीमंत भूपती, नृपती, गजअश्वपती, गडपती, सुवर्णरत्नश्रीपती, महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय!

छत्रपती शिवरायांनी बुद्धीमत्तेने, पराक्रमाने, आपल्या सवंगडींच्या सहाय्याने आणि थोऱ्यामोठ्यांच्या व देवदेवतांच्या आशिर्वादाने म्लेंच्छांचा संहार करून ही वर्षानुवर्षे चालत आलेली गुलामगिरी लोकांच्या मनामनातून आणि जीवनातून मिटवली. देव-देश-स्वधर्म-स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावून लढणारे शुर योद्धे तयार केले. प्रत्येकाच्या मनात स्वतंत्र्याची ज्वाला प्रकट केली आणि स्वतःचे रयतेचे राज्य, श्री चे हिंदवी स्वराज्य संस्थापिले. आणि आम्ही आपापसात लढण्यात धन्यता मानतो, आज आमचा वापर, वरातींसाठी आणि मतांसाठी केला जातो इतके आम्ही षंढ झालो. आज या समाजात वर्चस्व कुणाचं आहे ? काही श्रीमंत आणि राजकारणी लोकांच, आज गरीब आणखीन गरीब होत चालला आणि श्रीमंत आणखीन श्रीमंत. याला जबाबदार कोण आहे..?? आजची पिढी नासवली कोणी ?? समाजात संस्कार राहिले नाहीत, हा समाज सुशिक्षित असूनही अज्ञानी का होत चालला ?? महाराजांच्या काळी जितकी निष्ठा होती आज तितकाच भ्रष्टाचार समाजात कोणामुळे फोफावला ?? हे प्रश्न आज स्वतःला करण्याची गरज आहे. बघा कुठे उत्तर सापडतंय..!! आणि असे असंख्य प्रश्न जर पडू नये असं वाटत असेल तर त्याला एकच पर्याय आहे... "शिवचरित्र"..!! आणि ते सार्थ नुसते जय शिवराय म्हणून होणार नाही, राज्याभिषेक करून होणार नाही, गड किल्ले फिरून होणार नाही तर ते शिवचरित्र आचरणात आणून निश्चित्तच होईल. आणि संकल्प करूनच इथून सारे शिवप्रेमी माघारी फिरले असावेत असा माझा अंदाज आहे.
खरचं हा स्वरज्याचचा सोहळा अवर्णनीय आहे. याचे वर्णन मज पामराने काय करावे..!!. आणि साडे तीनशे वर्षानंतर का होईना पण त्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हास लाभले हेच किती थोर. पुन्हा एकदा सांगतो पण नुसता राज्याभिषेक पाहून, अनुभवून जमणार नाही तर शिवचरित्र घराघरात पोहोचवायला हवं, बरोबरच ते आचारणातही आणायला हवं. आपल्याला सारं कळत असतं पण ते वळवताही आलं पाहिजे. तरच तुम्हाला शिवराय मिरवण्याच्या अधिकार आहे अन्यथा नाही.

आता आम्हाला परतीच्या प्रवासाला लागणं गरजेचं होतं. आम्ही निघालो... जसा आत शिवसागर होता तसा नगारखान्याजवळ, होळीचा माळ, ते थेट जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत शिवसागर ओसंडून वाहत होता. त्याच समयी सह्याद्रीत घोंगावणाऱ्या  वाऱ्यानी केलेली लगट, रिमझिमनारा पाऊस, गरजने मेघांचे न् ते ढोल ताशांचे, मनाला मिळालेला सुखद गारवा, उसळलेला भगवा जनसमुदाय, थिरकणारे धारकरी न् शिवबाचे वारकरी, अवर्णनीयच...मनमोहक दृश्य... शिवभक्तांचा "शिवमेळा" म्हणजे  साक्षात अवतरलेली पंढरीचं... आम्हालाही तेथे थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. होळीमाळातील राजश्रियाविराजीत सिहासनाधिश्व शिवारायांसमोर माथा टेकवून, शिकाई देवीचं दर्शन घेऊन, इच्छा नसतानाही आम्हास त्या अविस्मरणीय सोहळ्यातून काढता पाय घ्यावा लागला. पल्ला लांबचा गाठायचा होता. साडे दहाच्या सुमारास साऱ्यांना पुन्हा सूचित करून गड उतरण्यास सुरवात केली. पावसाची रिपरिप थांबली होती. हत्ती तलाव बाजूला ठेऊन महादरवाजा मागे सोडून आम्ही बाराच्या सुमारास
पायथ्याशी पोहचलो. तिथे शरीरशुद्धी आणि चहाची चुस्की घेऊन परतीच्या मार्गाने प्रवास चालू केला. गडावरची कैफ अजून उतरली नव्हती, नव्हे ती उतरणारच नाही. पुन्हा त्याच धुंदीत गाण्यांची मैफिल सजली. मध्ये थांबून अप्रतिम, चमचमीत भोजनाचा आस्वाद घेतला, आणि पुन्हा निघालो. पनवेल नजदीक केले. आशुने नाष्टा तयार ठेवला होता तो हि फस्त केला. आता सारे थोडेसे रेंगाळले होते. काहींनी माना टाकल्या. गाडीत इंदूरीकरांच कीर्तन ऐकत रात्री नऊ च्या सुमारास आई जगदंबेच्या कृपेने सुरक्षित घरी पोहचलो. ड्रायवर काकांचे आभार मानले. आणि पुन्हा त्याच गर्दीच्या, घड्याळाच्या सुईवर चालणाऱ्या विश्वात प्रवेश केला.









रायगडावरील मेघडंबरी ,राजवाडा, सिंहासनाधीश्वर राजे, राजसदर, बाजारपेठ, तलाव, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, शिकाई देवी मंदिर, बालेकिल्ला, बुरुज, भग्नावस्थेतील सारे अवशेष नव्हे रायगडीचा प्रत्येक कण नि कण शिवरायांची प्रेरणा देणारे स्पूर्तीचे जिवंत झरे आहेत.
आपला अभिप्राय नक्की कळवा....
|| जय शिवराय ||
आपल्याला रायगड पर्यटनाला लाख लाख शुभेच्छा
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...