Sunday, November 10, 2019

देवरूपा ट्रेक


ट्रेक देवरूपा
हिमालय
महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया
उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया
फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्या वनांमधून
पक्षांच्या गाण्यांमधून संगीत ईश्वरी ऐकूया
तिन्ही वेळेच्या रवीकिरणांतून अलंकारिक श्रुंगारातून
प्रसवणाऱ्या जलधारातून सुवर्णसोहळे पाहूया
विश्व छताच्या निळाईतून रंग बदलत्या आभाळातून
रूप बदलत्या पावसातून झरझर सुमने झेलूया
हिमशिखरांच्या खांद्यावरून स्रोत नद्यांचे येति उतरून
खळखळणाऱ्या नदीमधून सेवेचे व्रत पाहूया
नक्षत्रांच्या प्रकाशातून चंद्रमाच्या चांदण्यातून
अमावस्येच्या काळोखातून कथा जीवनाची ऐकूया
सौंदर्याच्या अंतःकरणातून निसर्गाच्या व्यासंगातून
अध्यात्माच्या अनुभवातून गूढ रहस्य जाणूया
©___नित

पालघर ते रुमसू बेस कॅम्प( हिमाचल प्रदेश)     मागे सलग दोन वर्षे हिमालय ट्रेकींग केले होते. सारपास आणि हमता पास. यावर्षी कामानिमित्त विदेशात जावं लागेल आणि ह्या वर्षी माझ्या वहितील देवभूमीचं पान कोरं राहील अशी शंका होती. हिमालयीन ट्रेक करणे तसं आर्थिक दृष्ट्या परवडणार काम नाही.  म्हणून वर्षभरात अतिरिक्त मेहनतीने साठवण करून वर्षातून एकदा हिमालयीन ट्रेक करायचा हे पहिल्या वर्षीच ठरवून झालं होतं. कामानिमित्त बाहेर जाण्याचा विषय दोन तीन महिन्यासाठी टळला होता. अशात देवभूमीकडे मनाचे पक्षी उडणार नाहीत असं कसं होईल..! मे ते ऑक्टोबर हा कालखंड खरा हिमालयीन ट्रेकसाठी सोयीचा असतो. सप्टेंबर महिन्याच्या मध्यंतरी हिमालयात बर्फ पडायला सुरुवात होते. त्यात जून पासून आपल्या कणखर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, वरुण देव पर्जन्यपुष्प उधळू लागतो. आणि गड-किल्यांवर, डोंगर-कड्यांवर, दरी-खोऱ्यात सलग पाच सहा महिन्यासाठी हिरवं उधाण येतं. रानोमळी धबधब्याच्या लकेरी जागृत होतात. त्या लकेरी डोळ्यात साठवत, पर्जन्य पुष्प अंगावर घेत, हिरव्या उधाणात विहार करण्याची मौज काही औरच असते. ते चुकू नये म्हणूनच मला हिमालयीन ट्रेकची वेळ ही मे जून महिन्यात योग्य वाटते.

     यावेळेस बरीचशी माहिती गोळा करून शेवटी हिमालयातील पीर पंजाल पर्वतशृंखलेतील, एक काहीसा अपरिचित असा ट्रेक करायचे नक्की झाले. पीर पंजाल पर्वत शृंखला हिमाचल प्रदेश पासून जम्मू कश्मीर ते अगदी पाकव्याप्त कश्मीरपर्यंत पसरलेली पर्वतरांग आहे. ही पर्वतशृंखला आपल्या एका बाजूने व्यास आणि रावी नदी तर दुसऱ्या बाजूने चेनाब नदीला खाली घेऊन येते. या पर्वतारांगेत सर्वात उंच पर्वत २०४१० फूट उंचीचा इंद्रसन पर्वत आहे तर त्या खालोखाल १९६६८ फूट उंचीचा देवटीब्बा पर्वत आहे. हे दोन्ही पर्वत जवळ जवळ आहेत. आम्हीही त्यांच्या जवळच पण अलीकडे खालच्या बाजूस पश्चिमेकडे असलेला देवरूपा ट्रेक करणार होतो. ज्याची उंची त्या मानाने फक्त १३८०० फूट होती.


     तर... हो नाही म्हणत तारीख ठरली होती १७/०६/१९. यावेळेस दोन अतिरिक्त दिवस जोडून रेल्वेने दिल्ली गाठायचे नक्की झाले होते. मी, परेश, अमूल, अमोल, सुशांत आम्हा पाच जण आणि वेबसाईटवर बुकिंग केलेले अतिरिक्त ट्रेकर यांच्यासाठी kailashrath treks ने हा ट्रेक अँरेंज केला होता. खास आमच्यासाठी यासाठी की ऑफबीट ट्रेक असल्यामुळे १३ मे ही वर्षातून एकच तारीख या ट्रेकसाठी असते पण या वेळी आम्ही हा ट्रेक निवडला होता म्हणून १९ जून ही तारीख त्यांनी उपलब्ध करून दिली होती. पालघरहून ३.५५च्या दादर लोकलने बोरिवली गाठली. स्टेशनहून माणसांच्या गर्दीने गच्च भरून जाणाऱ्या मुंबईच्या लाईफलाईनची आवाजाही पाहून आजही मला धडकी भरते. मुंबईला नेहमीच ये जा असली, तरी लोकलमध्ये चढ-उतर करण्याऱ्यांची झुंबड पाहून भीती वाटतेच. जराही विलंब न करता वेळेत अगस्तक्रांती फलाटावर आली, आणि आम्ही आमच्या आरक्षित बोगीत चढलो. १३५० किमीचा प्रवास करून ती आम्हाला दिल्लीला सोडणार होती. प्रवासात वातानुकूलित डब्यातली शांतता मला सहन होत नव्हती. आपापसातही किती मोजके बोलतात लोकं..! आम्ही मात्र पाच जनांनी ती शांतता भंग करत, राजधानीतील फुडचा मनमुराद आनंद घेत हा प्रवास पूर्ण केला. सडे दहा वाजता आम्ही निजामुद्दीन स्टेशनला उतरलो.

     कडकडीत उन्हातून पूर्वेस अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले निजामुद्दीन मेट्रो स्टेशन गाठले. वाया INA विधानसभा तिकीट काढले. बहुतांशी जमिनीच्या आत या मेट्रोचे जाळे पसरलेले आहे. रंगावरून मेट्रोचे रूट ठरवले गेलेत. आकाशी, हिरवा, भगवा, लाल, जांभळा, पिवळा, गुलाबी आणि जलद(गर्द निळा) मझेंटा अशा नऊ रंगात रंगलेले हे जाळे जिथे पाहिले तिथे अतिशय देखणे वाटत होते. जमिनीच्या आत खाली तीनतीन मजले आहेत... आम्ही गुलाबी रेघेवर प्रवास करत INA स्टेशनवर पोहचून मेट्रो चेंज केली आणि पिवळ्या रेघेवरील विधानसभा स्टेशनवर उतरलो.

     अडीच किलोमीटरचा रिक्षाने पल्ला गाठला आणि मजनू दा टिला येथे पोहचलो. बसची चौकशी करून जेवण केले. इथे मजनू दा टिल्ला म्हणून एक ऐतिहासिक गुरुद्वारा आहे. गुरू हरगोविंदसिंह याची आज जयंती, त्यानिमित्त मोठ्या उत्सवाचं आयोजन इथे होतं. तिथे फ्रेश झालो, आराम केला आणि सायंकाळी सात वाजता वातानुकूलित पाल ट्रॅव्हल बसमध्ये बसून मनाली कडे प्रस्थान केले. वाटेत रात्री कुरुक्षेत्र च्या पुढे स्वागतम हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण उरकले. बसमधली सीट मागे ढकलली आणि दिली ताणून. प्रवासात झोप येणे कठीण पण ताणून दिलेली बरी. बस रस्त्याला उजेड दाखवत वेगात सुटली. रात्री दोन वाजता बसने सोलन मागे सोडलं आणि घाट चढायला सुरुवात केली. नभात द्वितीयेच्या चंद्राशेजारी चांदणीचे रूप खुलून दिसत होते.
त्याच्या अगदी खालून काही भुरट्या मेघांना घेऊन, वारा त्यांच्या दिशेने वर त्वरे येऊ लागला होता. त्याच वेळी आमच्या बसने वर चढण्यास नकार दिला. ड्रायव्हरच्या अथक प्रयत्नानाही यश आले नाही. त्यात दुसऱ्या बसची व्यवस्था होणार नाही म्हंटल्यावर काय करता..!! घाटात धूसर चांदण्यात बसून चंद्र न्याहाळत बसची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
चांदणे पडल्यास उगा 
अंधारात बसायचे नसते.. अन
चंद्राजवळच्या चांदणीला 
संशयानेही पहायचे नसते

      पहाटे साडे चार वाजता वातानुकूलित सेमी स्लीपर बस सोडून, हिमाचल परिवहन मंडळाच्या बसने आम्ही मंडी पर्यंत प्रवास केला. सकाळचे साडे आठ वाजले होते. फ्रेश झालो, गरमागरम परोठे खाल्ले. पुन्हा बसमध्ये बसून कुल्लू, कुल्लूहून नग्गर, नग्गरहून रुमसू ..!! एकूणच सकाळी दहा वाजता पोहोचणारे आम्ही, बेस कॅम्पला दुपारी दोन वाजता पोहोचलो...

      वेळोवेळी कैलाशरथ ने आमची अपडेट घेतली होती. दुपारच्या जेवणाची सोय आमच्यासाठी करून ठेवली होती. इतकंच नव्हे तर आमच्यासाठी ते ही जेवायचे थांबले होते. बालजीत भाई आणि पुष्कर भाईची भेट घेऊन, जेवणाचा आस्वाद घेतला. काही वेळ विश्रांती घेतली. कॅम्पवर हमतापास साठी आलेली बॅच होती त्यांच्यासोबत ट्रेकचे नियम, वरील हवामानाची माहिती पुष्कर भाऊंनी शेअर केल्यानंतर आम्हाला देवरूपा ट्रेक संदर्भात माहिती पुरवली. या ट्रेकसाठी फक्त आम्ही पाचच जण असल्याचे त्यावेळी आम्हाला समजले. उद्या ट्रेकसाठी आमच्यासोबत गाईड म्हणून ट्रेकच्या पायथ्याशी असलेल्या मलाना या ऐतिहासिक गावाआधी असलेल्या पीनी गावातील तेजराम सोबत असणार होता. कुक म्हणून जवळपास वीस वर्षांपासून अनेक ट्रेकर्सना आपल्या हातानी जेवण करू घातलेले अनुभवी रामू काका सोबत असणार होते. तर आमचे टेंन्ट, जेवणाचे साहित्य, इत्यादी सर्व आम्हा सर्वांच्या सोयीसाठी वर प्रत्येक कॅम्प साईटवर पोहचविण्यासाठी नेपाळमधील रामबहादूर, धिरेंद्र, लक्ष्मण, हिंमतभाई, हरीश असे पाच पोर्टर्स असणार होते. एकंदरीतच हा ट्रेक अविस्मरणीय होणार यात शंका नव्हतीच.
संध्याकाळ रात्रीच्या कुशीत विरघळून जाण्यास आतुर होती. त्यात मेघांचे हलक्या पावलांनी बरसणे चालू होते. चहा, भजीचा आस्वाद घेतला. रात्रीचे जेवण उरकून दोन दिवसाचा प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी खोलीत निद्रिस्त झालो.
रात्रीच्या कुशीत शिरते 
आतुर संध्याकाळ
चांदणदिवे विझवती 
मेघ गुणी लडिवाळ

रुमसू ते मलाना ( हिमाचल प्रदेश)

      पक्षांच्या सुमधुर संगीताने सुदिन सुवेळी सकाळी साडे चार वाजता जाग आली. रात्री मेघांच्या गर्दीत हरवलेल्या चांदण्या निरभ्र आकाशात दिसत नव्हत्या. कशा दिसणार म्हणा..!! सूर्य पृथ्वीवरील सौंदर्य न्याहाळण्यासाठी आतुर होता. तो दिसत नसला तरी, या डोंगरांच्या गर्दीत पूर्वेला लाली दिसत होती, धरतीला जाग आली होती. डोंगर घाटीत रात्री लुकलुकणारे दिवे आता विझले होते. घरांची छपरे न्हाऊन निघाली होती. थंडी मात्र आपल्याच धुंदीत मस्त होती. सुचीपर्णी वृक्षांची थरथर स्पष्ट दिसत होती. जर्दाळू आणि सफरचंदाच्या झाडावर हिरवी फळे, पानांवरचे पाण्याचे थेंब टकमक पाहत होती. पक्षांची किलबिल वाढली होती. अंगणात दाणे नसताना साळुंक्या ते वेचण्याचा निरर्थक प्रयत्न करत होत्या. अशा शीतल शांत सौंदर्य स्थळी पहाटेच्या प्रहरी हातात वाफाळता चहाचा कप घेऊन, निरभ्र झालेल्या छताखाली बर्फफाच्छादित डोंगर माथे न्याहाळत होतो. इतकी उंची गाठून कुठल्याही परिस्तिथीत हे इतके शीतल कसे राहिलेत याचा विचार मनात घोळत होता. त्या विचारात असतांना चहा कधी गार झाला ते देखील कळलं नाही. त्या वातावरणातील शीतलता आणि निरागसता किती मोहक होती...
गेली सरून रात्र 
पक्षी गाती चाहूल
शृंगार करते धरणी 
सूर्याचे पडते पाऊल

     तातडीने सूर्य निघाला होता, दऱ्या-खोऱ्यांतील अंधार नाहीसा करण्यासाठी. आम्हांसही आता भाग होते पुढे मार्गक्रमण करण्यासाठी. तोच नाश्त्याचे बिगुल वाजले. भरभर नाश्ता करून, दुपारचे डबे आताच भरून घेतले. आम्हास मार्गस्थ करण्यासाठी बलजित भाई गावाच्या वेशीवर आले. आम्ही ठीक आठ वाजता जीपमधून मलाना डॅम कडे रवाना झालो. पर्वतरांगांच्या शृंखलेतून नदीच्या किनाऱ्याने वरच्या बाजूस असलेली चढउताराच्या वाटेने प्रवास करताना, मनमोहक सौंदर्य भारावून टाकत होते. मधेच पर्वतांवरून कोसळणाऱ्या दरडीमुळे आणि पाझरणाऱ्या पाण्यामुळे रस्ते काही ठिकाणी खराब असले, तरी दऱ्या खोऱ्यातील सौंदर्यापूढे ते जाणवत नव्हते. एक मात्र प्रत्येक वळणावर जाणवत होतं. सह्याद्रीचा कणखरपणा या शिखरांमध्ये नाहीच. आणि कसा असणार..!! सौंदर्यवती वसुंधरेच्या शिरस्थानी असलेल्या शिखरांच्या डोईवर बारमाही हिमाचा मुकुट. त्या मुकुटातून स्त्रवलेले पाणी अखंडित वाट मिळेल तसे सागराच्या ओढीने, त्या शिखरांचा कणखरपणा सौम्य करत जनकल्याणासाठी धावत असते.
सेवेचे घेऊन व्रत 
अखंड स्त्रवतो धारा
शिरावर हिमाचा ताज 
दिसतो भव्य पसारा

     आमचा प्रवास व्यास नदीच्या किनाऱ्यावरून सुरू झाला. भुंतरला व्यास आणि पार्वती नदीच्या संगम स्थानी, व्यास नदी उजव्या हातावर सोडून पार्वती नदीच्या वरच्या दिशेने आमची जीप वर चढत होती. तेवीस किलोमीटर पुढे जाऊन जरी गावात, जिथे मलाना नदी पार्वती नदीत आपली धारा समर्पित करते, तिथे पार्वती नदीच्या पुलावरून आमची जीप आता आम्हाला घेऊन, मलाना नदीच्या डाव्या बाजूने वर चढत होती. जरी ते मलाना गावाच्या वेशीवर पोहोचण्यासाठी आम्हाला, अवघे पंधरा किलोमीटर अंतर असूनही पाऊण तास घाट रस्त्याशी सलगी करावी लागली. एकेरी रस्ता, रस्त्यावर एखाद्या वळणावर जणू गंजलेल्या पाषाणावरून नदीच्या ओढीने अलगद खाली कोसळणारा झरा, देवदार वृक्षांच्या सावलीत खोल दरीतून खळाळत वाहणारी मलाना नदी, मनात धडकी भरवत वर चढणारी घातक वळणे मागे सोडत आम्ही मलाना गावाच्या कमानीजवळ पोहचलो होतो.
येऊन नद्यांना भेटती 
पाण्याचे किती स्रोत
शेवट सागरात होतो तरी 
सरिता असते धावत

      कमान इथे असली तरी गावात जाण्याचा मुख्य मार्ग मात्र चार किमी पुढून मलाना डॅमच्या पुलावरून पलीकडच्या बाजूने होता. अर्थात तिथूनही पायवाटेनेच जाता येते. कारण पुढे दरड कोसळून नदीच्या वरच्या आणि खालच्या दिशेचे दोन्ही रस्ते पूर्णतः नष्ट झाले होते. या गावासही पूर्वीपासून तसे वेगळे राहण्याची आवड होती. रंगीबेरंगी छपरांची दोनउतार असणारी टुमदार घरं या गावात नजरेस पडतात. जवळपास दीड हजार लोकवस्तीचं हे गाव आहे. या गावाचे स्वतंत्र नियम आहेत, त्यानुसारच त्यांचा कारभार चालतो. त्यांचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी त्यांना सरकार अथवा पोलिसांचा हस्तक्षेप नको असं त्यांच्या गावप्रधानाचं म्हणणं आहे. या गावाबद्दल आणखी जाणून घेताना जी माहिती समोर आली ती म्हणजे, या गावात मोठ्या प्रमाणात भांग पिकवली जाते. हे गाव तसे नशेसाठी सुद्धा चर्चेत असते. त्यांच्या उपजीविकेचे मोठे साधनच ते आहे. तसेच जंगलातील औषधी वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो. या गावातील बहुतांशी लोकं "कनाशी" भाषा बोलतात, जी भाषा गावाबाहेर कोणासही ठाऊक नाही. आणि परिसरातील कोणत्याही भाषेशी यांचा मेळ बसत नाही. या भाषेत संस्कृत आणि तिबेटमधील भाषांचे मिश्रण आहे. हे गाव मुळात कसे वसले याबाबत दोन तीन आख्यायिका ऐकायला मिळाल्या. या गावाची स्थापना ग्रीक राजा अलेक्झांडरच्या सैनिकाकडून करण्यात आली असे सांगण्यात येते. माघारी फिरताना काही सैनिक थकले असता इथे थांबले आणि त्यांनी या गावाची स्थापना केली. म्हणून इथली लोकं स्वतःला अलेक्झांडरचे वंशज समजतात. पण त्याचा त्यांच्याजवळ काही ठोस पुरावा नाही. तर दुसरे म्हणजे फार वर्षांपूर्वी या गावात नव्हे तर पूर्ण व्हॅली मध्ये भुतांचा वास होता. तेव्हा जमलू म्हणजे जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्याकडून गावाचं संरक्षण केल्याचं सांगितलं जातं. आजही या गावात जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचं मंदिर आहे. आई एकविरेची आठवण झाली. या मंदिरांना बाहेरील व्यक्तीने स्पर्श केल्यास साडेतीन हजार रुपये दंड आकाराला जातो. तसा मंदिराबाहेर बोर्डच आहे. गावातील देवीचं मंदिर वर्षातून एकदा ठरावीक दिवशी उघडलं जातं. त्याच वेळी मंदिरात वर्षातील एकमेव पूजा केली जाते. देवीला स्नान करण्यासाठी देवरूपा या पवित्र स्थानी नेण्यात येत असल्याचं म्हंटल जातं. येथील भाषा, वेशभूषा, व्यवस्था खूप वेगळी आहे. या गावातील लोकं बाहेरच्या लोकांचा स्पर्श कटाक्षाने टाळतात. या गावात बाहेरील लोकांना फक्त दिवसाच प्रवेश दिला जातो, रात्री थांबण्याची मुभा नाही. एकंदरीतच या कमानीजवळ छोटेखानी हॉटेलात सूप पिताना बरीच माहिती आम्हास कळली. आणि ट्रेकदरम्यान घ्यायची काळजीही आमच्या ध्यानात आली.
रूढी परंपरेचा 
नक्कीच जपावा वारसा
ज्ञानातून मानवतेचा 
ठोस उमटुदे ठसा

मलाना ते बेहाली बेस कॅम्प

        जीपने आम्हाला चार किलोमीटर पुढे मलाना डॅम वर नेऊन सोडलं. दुपारचे 12 वाजले होते. इथून आमचा ट्रेक सुरु झाला. बंधाऱ्याला पार करून लोखंडी गजाची शिढी चढलो, आणि वर चढणाऱ्या, गाड्यांसाठी बंद असलेल्या जुन्या रस्त्यावरून आजची पहिली कॅम्प साईट बेहाली च्या दिशेने निघालो. दुपार मात्र आमच्या मागून खाली उतरू लागली होती. दऱ्या-खोऱ्यांतून शुभ्र मेघांचे पुंजके हळूहळू वरच्या दिशेने नभात गर्दी करू लागले होते. सूर्य त्यांच्याशी लपंडाव खेळत होता. मलाना डॅमच्या पाण्यात देवदार वृक्ष आपली प्रतिमा न्याहाळत होते. त्यांचा गर्द हिरव्या रंगातून पाण्याने फिक्कट हिरवा रंग मिसळून घेतला होता. त्यावर ढगांचे वर्ण उठले होते. पुढे एकमात्र असलेला डायगंज गेष्टहाऊस आपल्या तिसऱ्या माडीवरून व्हॅलीतील खालच्या बाजूने ते सौंदर्य न्याहाळत होता. आम्ही त्याला पार करून पुढे सरलो. मलाना नदीचे दृश्य अदृश्य रूप मोहक वाटत होते. अधून मधून तिच्यावर बर्फाचे पांघरूण दिसत होते. त्या पांघरुणात ती मावत नव्हती. वाटेत बकऱ्या मेंढाऱ्यांचे कळप सुस्तावून बसले होते. त्यातून वाट काढत आम्ही पुढे सरलो. मॅजिक व्हॅली कडून येणारी काही मंडळी वाटेत भेटत होती. त्याच प्रमाणे येणारे काही ओढे पार करावे लागत होते. पावसाची रिपरिप आता सुरू झाली होती. सर्वांनी रेनकोट घातले. तरी मेघांची गुरगुर काही थांबली नाही. झिम्माड पावसात, भिजलेले निसर्ग सौंदर्य न्याहाळत सोबत आणलेले जेवण फस्त केले आणि पुढची वाट धरली.
ताठ उभे काठावरती 
झाडाचे हिरवे अंग
प्रतिबिंबेची ओढ अनावर 
पाण्यात मिसळती रंग

      हिमालयात दुपारनंतर येणारा पाऊस रात्र पाहिल्याशिवाय माघारी फिरत नाही, हा अनुभव आम्हाला यापूर्वी ट्रेकला आलाच होता. म्हणून लगबगीने पुढचा टप्पा गाठून बेहाली पोहचणे गरजेचे होते. शिवाय या वेळेस जागेवर जाऊन टेंन्ट उभारावे लागणार, आयती आवाभगत होणार नाही हे जाणून निश्चित स्थळ गाठण्यासाठी पुढे निघालो. मागून आमचे पोर्टर्सही सामान पाठीवर घेऊन आले आणि सोबत चालू लागले. बेहाली पोहचल्यानंतर कॅम्प नदीच्या पलीकडे लावण्याचे निश्चित झाले. नदी ओलांडण्यासाठी तिच्यावर सुस्त पहुडलेल्या बर्फावरून अंदाज घेत नदीपार पोहचलो. सपाट जागा पाहून रिमझिम पावसात टेंन्ट उभे केले. अगदी जवळून पहाडावरून येणाऱ्या अमृततुल्य पाण्याची वाट होती. वाट पसरू नये म्हणून तिच्या बाजूने पिवळ्या, निळ्या फुलांनी आपली लांब हातांची ओंजळ धरून ठेवली होती. सॅक टेंटमध्ये ठेऊन फ्रेश झालो. सायंकाळचे चार वाजले होते. किचनच्या टेंन्ट मधून चहाचा सुगंध आला. टेंटमध्येच चहाचे कप आले. पावसाची रिमझिम आता थांबली होती. चहा पिऊन बाहेर पडलो. पिवळ्या फुलझाडांच्या बागेत फुलांबरोबर गप्पा केल्या. दूर झाडांच्या मधून बर्फाचे डोंगर दिसत होते. खालून मलाना नदी खळखळून वाहत होती.
अंगावर पांघर घेऊन 
बळेच केले ढोंग
होतेच अवचल क्षणिक 
उघडकीस येते सोंग

     पारा बऱ्यापैकी खाली उतरला होता. हिमालयातील थंडी जाणवू लागली होती. थंडीला दूर सारण्यासाठी कुक काकांनी सुपचे कप हातात दिले. सूप पीत असतानाच झाडांच्या गर्दीतून एक चमक डोळ्यांवर आली. साऱ्यांच्या नजरा तिथेच खिळल्या. हिमालयाच्या डोंगरमाथ्यावर सूर्याने जाता जाता वरच्यावर एक तिरपा कटाक्ष टाकला होता. डोंगरमाथा सोनपिवळ्या उन्हाने झगमगू लागला होता. ते दूर दिसणारे मनोहारी दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी सर्वांची एकच धडपड झाली. असे आल्हाददायक दृश्य नजरेस पडते म्हणून तर हिमालयाची ओढ लागते. काही क्षणातच मेघांनी ते दृश्य आमच्यापासून हिरावून घेतले. सूर्य पर्वतांच्या खाली उतरला. रात्रीचे जेवण उरकून गप्पांची मैफल जमली. इतक्यात पाऊसही आपले स्वर घेऊन टेंटवर सहभागी झाला. मेघांना कदाचित त्याचा राग आला असावा त्यानेही गुरगुरायला सुरवात केली. दिवसभराचा थकवा आलाच होता. थंडी वाढू लागली होती. पुढे तीन दिवसांचा ट्रेक बाकी होता म्हणून त्यांची संगत न करता आम्ही स्लीपिंग बॅगला शरीराची ऊब देण्यासाठी त्यात घुसून निद्रिस्त झालो.
नकोच पाहू तिरकस 
होईल माझी मूर्ती
क्षणिक सुखाची लालसा 
उगाच पसरेल कीर्ती

      नदीची खळखळ चालूच होती. रात्री एक वेळेस उठून चांदण्यांचा खेळ रंगला असेल, ते पाहण्यासाठी टेंट बाहेर आलो. पण मेघांनी त्यांच्यावर मायेने पांघरून घातलेले दिसले. गारठा बाहेर राहू देईना, म्हणून पुन्हा येऊन निद्रिस्त झालो. सकाळी पक्षांचे सुमधुर संगीत कानावर पडले आणि जाग आली. टेंटबाहेर आलो. तर सृष्टीने जणू सोन्याचे दार उघडले होते. नदीच्या दोन्ही बाजूला डोंगर शोभून दिसत होते. झाडांच्या भिजून निथळत असलेल्या कोवळ्या पानांवर सोनेरी ऊन बागडू लागले होते. हातात सुवर्ण अलंकृत पुष्पफुलांच्या माळा घेऊन, सुचिपर्णी वृक्ष पहाटेच्या घरातून बाहेर नदीच्या बोहल्यावर वधूवरासम उभे होते. धुक्याचा तरल पडदा नदीच्या वर निळाईने धरला होता. नभात मेघांची शुभ्र फुले अक्षता टाकण्यास सज्ज होती. पायाखाली रंगबेरंगी फुलांचा सडा पडला होता. पक्षांनी सनई सुरांची तान धरली होती. सोहळा सुमंगल पार पडला आणि सूर्याने कोवळ्या किरणांना दडवून वर येत सर्व आवरून घेतलं.
ओढ्यांचे घेऊन हार
वधूवरास हिरवी शाल
पायाखाली विविधरंगी
फुले ओवती नक्षी माळ
धरला अंतरपाट धुक्याने
मेघफुलांच्या घेऊन अक्षता
निळाईचे उंचच हात
घोर लागला उभयंता
सुवर्ण शृंगार करतो सूर्य
सुचिपर्णाची मेहंदी खास
मान नदीला बोहल्याचा
मोत्यांची रचली आरास
पक्षी गाती सुगम संगीत
दगड गोटे जणू चौघडा
नदी चालवी चाल सप्तपदी
शोभून दिसे डोंगर जोडा
सौंदर्याचे पैलू घडले
पार पडला लग्नसोहळा
आभाळाने अश्रू ढाळले
आवरून घेतो भास्कर भोळा
©____नित


बेहाली कॅम्प ते मोठाग्रहण कॅम्प

       आज ट्रेकचा दुसरा दिवस. आज प्रवास काही फारसा लांब नव्हता. म्हणून सोबत जेवणाचे डबे घेतले नाहीत, कॅम्पवर पोहचूनच गरमागरम जेवण करायचा आज कुकने बेत आखला होता. आठ वाजता आम्हीही सारं आवरून निघालो. नदीवर अजूनही बर्फाचे पांघरून तसेच होते. त्यावरून सावधपणे नदी क्रॉस केली. आणि मोठाग्रहण च्या दिशेने निघालो. अवघ्या एक तासात दोन ओढे पार करून छोटा ग्रहणला पोहचलो. पिवळ्या फुलांनी ग्रहणचे उतरते पठार फुलून गेले होते. हिमाच्छादित पर्वत आता जवळ येऊ लागले होते. बुरांसची झाडे आता अधून मधून दिसू लागली होती. वेळ न दवडता दमछाक करणारी चढण चढलो. मागे वळून पाहिले तर अजूनही मलाना गाव नजरेस पडत होते. गावातील एखाद दुसरा कोणी वाटेत भेटत होता, पण त्यांच्याशी सावध असा... त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका ही गाईडने दिली सूचना आम्ही विसरलो नव्हतो. ते गाईडशी मात्र बोलत असत, त्याच्याशी हात मिळवत असत, पण आम्ही कोणी हात पुढे केला तर हात न मिळवता नमस्कार करत. एकंदरीतच मसला असा होता. पुढे बरीसशी सुचिपर्णी वृक्ष उन्मळून तर काही मोडून पडली होती. बर्फाचा भार त्यांना सहन झाला नव्हता. या वर्षी इथे जवळपास आठ ते दहा फूट बर्फ पडले होते. आता त्याची पुसट पावले सोडली तर बाकी सारे वितळून मलाना नदीला समर्पित झाले होते. जवळपास अडीच तास चढाई करून आम्ही नयनरम्य अशा मोठा ग्रहण या जागी ठीक साडेदहा वाजता पोहचलो होतो.
मीच वाहतो भार मिरवतो
भ्रमात या असतात काही
कुणी वहावा भार कुणाचा
नियतीच ठरवते सर्व काही

      विस्तीर्ण अशा पठाराच्या उतरणीवर, मऊशार हिरव्या तृणाचा गालिचा अंथराला होता. त्या गालिच्यावर पिवळ्या फुलांनी भंडारा उधळला होता. इतर विविधरंगी फुलांनी त्यात आपली कांती मिसळली होती. मलाना नदी पठाराच्या खालच्या अंगाला खोल दरीतून वाहत होती. तिचा आवाज मात्र आमच्यापर्यंत पोहचत नव्हता. नदीच्या पल्याड दोन विशाल बर्फाच्छादित पर्वत मेघ सोबत घेऊन खेळू लागले होते. त्यांच्या उतरणीवर गुलाबी बुरांसच्या जणू कृत्रिमच बागा, गुलाबी तोरा मिरवत ऐटीत बसल्या होत्या. या फुलझाडांना पहाडाची उंची खुप आवडते. दहा हजार फुटाच्या खाली जमीन धरून राहणे त्यांना मान्यच नव्हते. जिथे वृक्ष आखुडपणा स्वीकारतात तिथे ही झाडं मिरवतात. या पठारावर बारा ते पंधरा स्थानिक लोकांचे टेंट दूर अंतराने वसलेले होते. ट्रेकर्स म्हणून आम्ही सोडले तर बाकी कुणीच नव्हते. त्या मनोहारी निसर्गरम्य वातावरणात अगदी मध्यभागी आमचे टेंन्ट उभे केले. आधी सूप बनवून आज पुलाव करायचा बेत कुक काकांनी आखला. 

     टेंटच्या अगदी समोरच नदीच्या पल्याड, बुरांसच्या गलिच्यात आपले पाय रोवून वर मान उंचावणाऱ्या दोन पहाडांचा मेघांशी चाललेला खेळ पाहण्यात आम्ही रमलो. तशी त्यांची ख्यातीही मोठीच होती. दोघातला एक पापसुरा २११२७ फूट उंचीचा तर दुसरा धर्मसुरा २१०६२ फूट उंचीचा. दोन्ही तोलामोलाचे... क्लायंबर्सना खुणावणारे. पीर पंजाल पर्वत शृंखलेला वेगळे करणारे. हिमाचलला हिमालयाच्या विस्तारातून अलग करणारे. यांच्यावर चढाई करण्यासाठी यांच्या पलीकडे असलेल्या तोष गावात याचा बेसकॅम्प लागतो. १९९२ साली यांच्यावर क्लाइम्ब करताना दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यातला एक न्यूझीलंडचा तर एक दक्षिण भारतातील गिर्यारोहक होता. तदनंतर सोळा दिवसानंतर त्याच मोहिमेच्या तीन टीमने हे शिखर सर केले होते हे विशेष. ही शिखरं तशी एकमेकांच्या बाजूलाच आहेत. दोन्ही पर्वत एकत्र चढता येत नाहीत. १९४१ मध्ये धर्मसुरा हे शिखर ब्रिटिश गिर्यारोहकानी प्रथम सर केले तर १९६७ मध्ये पापसुरा हेही शिखर प्रथम ब्रिटिश गिर्यारोहकानी सर केले होते. हा इतिहास जाणून घेताना कुकरच्या शिट्या वाजून थांबल्या होत्या. हातात गरमागरम पुलावाची थाळी आली आणि आम्ही जेऊन त्या निसर्गरम्य वातावरणात स्वर्गानुभूती घेण्यासाठी पठारावर फेरफटका मारण्यासाठी निघालो.

       सूर्याने डोकं वर काढलं की ऊन घेण्यासाठी असंख्य माशा गवतातून बाहेर पडायच्या. ऊन गेले की लगेच दिसेनाशा होत होत्या. मलाना गावातील काही मुले इथे आली होती. ज्यांचे आईवडील काही दिवसांपासून इथेच राहत होते. ही मंडळी आपल्या बकऱ्या, मेंढ्या यांना दरवर्षी चार-सहा महिन्यासाठी इथे घेऊन येतात. या नयनरम्य परिसरातील गवत खूप पौष्टिक असते असे त्यांचे म्हणणे. सोबतच जंगलातील वन औषधी शोधण्याचा त्यांचा नित्य दिनक्रम. जवळपास ३०० प्रकारची औषधी या परिसरात जमिनीच्या आत हिरव्या गलीच्याखाली दडलेली असते. ती औषधी शोधून जमा करून नंतर ती गावात नेऊन विकून आपली उपजीविका चालवतात. विशेष म्हणजे येथे महिलांची उपस्थिती जास्त होती.

      इथे पिकनिक साठी आलेली मुले क्रिकेट खेळताना पाहून आम्हालाही मोह आवरला नाही. पावसाची रिमझिम चालू झाली होती. त्या पावसात त्यांच्यासोबत काही वेळ क्रिकेट खेळताना खूपच दमछाक झाली. दुपार टळू लागली होती. हिमालयातले वातावरण दुपारनंतर कुठले रूप धारण करेल सांगता येत नाही. पाच वाजले होते. म्हणूनच वर जंगलात गेलेली लोकं आता माघारी परतू लागली होती. बकऱ्या, मेंढी कळपाने डोंगरउतार होत होते. महिला कनाशी भाषेत मोठयाने एकसुरात गाणे गात एका लयीत नाचत, त्यांच्या टेंटकडे माघारी आल्या होत्या. दिवसभरात हुडकलेली औषधी त्यांच्या पाठीवर दिसत होती. आमच्याकडे पाहून गाईडजवळ चौकशी करत होत्या. त्यांच्याकडे पाहून ती मंडळी नशा करत असावीत असे वाटले. त्यांच्यात पहाडी लोकांमध्ये असतो तसा आपलेपणा जाणवला नाही. का कुणास ठाऊक पण एक वेगळ्याच भीतीचा अनुभव येत होता.

     त्या पठारावर असणाऱ्या सर्व टेंटमधून आता धूर निघू लागला होता. पहाडांच्या कोंदणातून मेघांचे लोट वरच्या दिशेने आकाशात रंगकाम करू लागले होते. तो कुंचला धरणाऱ्याचे हात मात्र दिसत नव्हते. पश्चिमेला पृथ्वीने सूर्यास आपली जागा दाखवण्यास सुरवात केली होती. दिवस आणि रात्रीला कैचीत धरणारी संध्याकाळ आमच्या चोहोबाजूने व्हॅलीत पसरली होती. धर्मसुरा आणि पापसुरा शिखरसमूहातून मेघांचा धूर निळाईच्या प्रांगणात पसरू लागला होता. इतक्यात मागून वाऱ्याने सूर्याला थोडी मोकळीक दिली. वरच्यावर किरणांची एक लकेर थेट येऊन शिखरसमूहाच्या गाभाऱ्यात शिरली. विस्तवावर फुंकर घालावी आणि राख पांघरलेल्या विस्तवाची राख वरच्यावर उडून विस्तव उघड्यावर पडावा, हवेत धुरांचा लोट उसळावा, असेच काहीसे चित्र आमच्यासमोर निर्माण झाले. आग न लावता निसर्गाने एवढी मोठी चूल सचेत केली होती. त्यातूनच मेघांचे थवे आकाशात उंच भरारी घेत होते. वारा त्यांना घेऊन आमच्यापाशी आला होता. या धरतीला चिंब करण्यासाठी ते मेघ आता बरसू लागले होते. समोरची चूल विझून पाऊसधारा शिखरांच्या अंगाखांद्यावरून खाली नदीच्या दिशेने येऊ लागल्या होत्या. मधेच त्यांना थांबवण्यासाठी बर्फाने अडथळे निर्माण केले होते. पण नदीच्या ओढीने, पाण्याने बर्फाखालून प्रवास करत आपले उद्दिष्ट साधले होते. संध्याकाळ रात्रीच्या कुशीत शिरली होती. चांदण्यांचा नभात मागमूसही दिसत नव्हता. रात्रीचे जेवण उरकून टेंटमध्ये शिरलो.

     मध्यरात्री आसपास कुत्र्यांच्या भानगडीमुळे जाग आली. ते अगदी आमच्या टेंटपाशी येऊन मस्ती करत होते. ते थांबले आणि काही वेळातच दोन महिलांचं संभाषण चालू झालं. बहुदा खूप लांब असाव्यात. एकीचा आवाज खालच्या दिशेने तर दुसरीचा वरच्या दिशेने येत होता. वातावरणात गारवा असला तरी गंभीरता आली होती. उगा गारव्याला कशाला चॅलेंज करा...!! म्हणून बाहेर पडलो नाही. काही वेळात सारं शांत निवांत झालं. दोन वाजता टेंटच्या बाहेर आलोच. कानोसा घेतला, आजूबाजूला पाहिलं पण कुत्रे काही दिसले नाहीत. समोर धर्मसुरा आणि पापसुरा या शिखरांच्या मध्ये दोन तारे अधिकच तेजस्वी दिसत होते. त्यांना पाहून उगाच त्या मृत गिर्यारोहकांची आठवण आली. बाकी वर तारे आपल्या मस्तीत डोळ्यांची मंद उघडझाप करत होते. चांदण्या शांत होत्या. भलतीच गर्दी त्यांनी काळ्या पडद्यावर केली होती. फार काळ बाहेर राहणे सोयीचं नाही म्हणून आत शिरलो आणि झोपी गेलो.

मोठा ग्रहण कॅम्प ते बोगडी

       आज ट्रेकचा तिसरा दिवस. पाच वाजता वेकअप कॉल आला. आतील सर्व आवरून बाहेर पडलो. चहाचा कप हातात घेतला. तोच हिमशिखरांवर सोनेरी झळाळी दिसू लागली. रात्रीच्या अंधारात ढगात लपलेले, तदनंतर चांदण्यांशी गुजगोष्टी करणारे शिखर माथे, पहाटेच्या प्रहरी सूर्य तेजाच्या सोनेरी झळालीत चमकत होते. दूरवर हिमशिखराच्या शृंखला दृष्टीस पडत होत्या. त्यातील सूर्य तेजात न्हाऊन निघालेले माथे अगदी बावनकशी सोन्यात मढलेले, प्रत्यक्ष सोन्याचेही अलंकारिक सौंदर्य फिके पडावे असे देखणे दिसत होते. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती ती म्हणजे... सूर्य प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्या हिमशिखरांनी इतकी उंची गाठली होती की सूर्य तेजाचे कोवळे सोनेरी ऊन, त्यास न्हाऊ घालत होते. आणि त्या सोनेरी किरणांचा अभिषेक होत असतांना, त्याचे विविध पैलू आमच्या नजरेला सुखावत होते. माथ्यावरून सोनेरी झळाळी निथळत होती.

      देवटीब्बा शिखराच्या वरून देवरूपा दृष्टीक्षेपात घेऊन सूर्याची किरणे, मोठाग्रहनच्या पठारावर खाली उतरली होती. मेंढपाळानी आपले बकऱ्या, मेंढ्यांचे कळप वर शिखरांच्या रोखाने त्यांना दिशा दाखवली होती. महिला, पुरुषवर्ग खांद्यावर कुदळी घेऊन नयनरम्य शिखरांच्या पोटातली औषधी शोधण्यासाठी निघाले होते. आम्हीही टेंन्ट आवरून बोगडीच्या दिशेने निघालो. जिथे आमचा दोन रात्रीचा मुक्काम असणार होता. पठाराचे सौंदर्य मागे सोडून काही वेळ आम्हाला आता जंगलाची सोबत करायची होती. वाटेत वर औषधी शोधणारी काही पुरुष मंडळी भेटली. कुठे निघालात विचारले. गाईडने उत्तर दिलं.. "देवरूपा". त्यांनी आमच्याकडे साशंक नजरेने पाहिलं... आणि त्यातील एकजण म्हणाला.."शकल देखी है..!!" आम्ही काहीच न बोलता त्यांना पुढे जाऊ दिलं. शेवटी या वातावरणात वाढलेली जगलेली माणसं ती..! कदाचित मागे तेवीस जणांच्या बॅच मधून फक्त दोघांनीच समीट केलं, बाकीचे पहिल्या कॅम्पपासूनच माघारी गेले होते हे त्यांना माहीत असणार. असो आम्ही फार मनावर नाही घेतलं. कारण इथल्या निसर्गापुढे बाकी सारंच शून्य होतं. नदीची खळखळ ऐकत आणि अगदी पल्याड पण नजरेला खिळवून ठेवणाऱ्या बुरांस फुलांचा बहर बघत पुढे निघालो.

       काही अंतर चालून झाडांच्या वस्तीतून दगड गोट्यांची खडी चढण चढून काही वेळ विश्रांती घेतली. जसजसे पुढे जात होतो तस-तसे निसर्गाचे मनोहारी रूप अधिकच मनाला भुरळ पाडत होते. काही क्षण थांबून ते नयनी साठवण्याचा प्रयत्न करत होतो. हा टप्पा तसा सलग चढणारा नाही. चढ उताराची शृंखलाच आहे. मऊशार गवताच्या मखमालिवर पावलांचे ठसे उमटवत चालताना पायाखाली पडणाऱ्या रंगबेरंगी फुलांचे होणारे मर्दन पाहून जीवाला घोर वाटे. पण त्याला पर्याय नव्हता. हिमालयाने जणू आमच्या स्वागतासाठीच ही फुले इतक्या मोठ्या प्रमाणात सजवून ठेवली होती. आता आम्ही बोगडीच्या इतक्या जवळ आलो होतो. वरून खाली येणारा एक मोठा ओढा सावध पार केला. लगेचच अंगावरची चढण चढून पुढे वरून कोसळलेल्या दरडीच्या गराड्यात आम्ही येऊन पोहोचलो. आमचे पोटर्स पुढे गेले होते. त्यांनी टेंन्ट उभारण्यास प्रारंभ केला होता. काही वेळ आम्ही इथेच दगडांवर बसून विश्रांती घेतली. आणि पुन्हा एक खळाळत वाहणारा शुभ्र फेसाळ ओढा पार करून नियोजित स्थळी अकरा वाजता आम्ही बोगडी कॅम्प साईटवर पोहचलो.

        इथे आमचे टेंन्ट सोडले तर अतिरिक्त एकच टेंन्ट होता, तो ही खालच्या बाजूला. धर्मसुरा आणि पापसुरा शिखर आता अगदीच आमच्या समोर होते. मलाना नदीचा उगम खिस्का ग्लेशियर मधून होतो, इंद्रासन पर्वताच्या खोऱ्यांतून. जिथे आम्ही होतो तिथून तिचे उगमक्षेत्र, ती दिसत मात्र नव्हती, मात्र नदीला मिळणारे बरेच ओढे शिखरांवरून खाली उतरताना दिसत होते. खाली सखल प्रदेशातील भूमी समृद्ध करण्यासाठीच त्यांची धडपड असावी. कॅम्पच्या डाव्या हातावर बाजूलाच गुलाबी फुलांच्या ओंजळीतून निसटून खाली नदीकडे वाहत जाणारा ओढा होता. हा ओढा अधिकच शुभ्र आणि थंड होता. त्यातून बाहेर पडणारं संगीत कानाला सुखावत होतं. एक पन्नासेक छोटी छोटी बिन पानांची फुललेली गुलाबी फुल, खूपच आकर्षक दिसत होती. कितीतरी वेळ आम्ही ते दृश्य एकटक पाहत बसलो होतो.




        सूर्य माथ्यावर आला होता. जेवणासाठी गाईडने आवाज दिला. जेवण उरकून काही वेळ आराम केला आणि उद्या बराच पल्ला गाठायचा होता म्हणून नव्हे तर इथल्या सृष्टीचं ऐश्वर्य पाहण्यासाठी वरच्या दिशेने गेलो. एक, दोन, तीन अशा टेकड्या पार करून चौथ्या टेकडीवर जाऊन बसलो. उद्या देवरूपा समीट करण्यासाठी अशा बऱ्याच टेकड्या सर कराव्या लागतील अशी माहिती गाईडने दिली. रोजप्रमाणे आजही पावसाचे चिन्ह दिसू लागले. गेल्या पावलीच माघारी फिरलो. खाली असलेल्या टेंटच्या बऱ्याच लांबून चालत असलो तरी तिथे असलेल्या कुत्र्याला ते आवडलं नाही. म्हणून वरच्या वाटेने टेंटपाशी गेलो. पावसाची रिपरिप चालू झाली. पूर्ण व्हॅली ढगांनी भरून गेली. शिखरं, टेकड्या, झरने दिसेनासे झाले. काही वेळात वातावरण शांत झाले खरे पण कमालीचा गारवा जाणवू लागला. सूर्याने पावसाला गुपचूप आलिंगन दिले असावे म्हणूनच या गारव्यातही आम्हाला समोर इंद्रधनुष्याचे तोरण शिखरांना लगडलेले दिसले. हे मनमोहक सौंदर्य शब्दात सांगता येणे कठीणच. त्याच्या सान्निध्यात काही दिवस जगता आले हेच आमचे भाग्य. काही वेळाने इंद्रधनुचे तोरण मावळले आणि रात्र वस्तीला आली. ढगाळ वातावरणात चांदण्या दिसणार नव्हत्या. जेवण उरकून लवकरच आम्ही झोपी गेलो.

बोगडी कॅम्प ते देवरूपा

       आज ट्रेकचा चौथा दिवस, आज आम्ही समीट करणार होतो. हिमालयातील सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या सर्वांचं अपूर्व लावण्य शब्दात बांधता येणं शक्यच नाही. तसे आजचे सर्वच प्रहर आमच्यासाठी विशेष होते. प्रसन्न सकाळ, वातावरण अगदी शांत, निर्भेळ होतं. चहा नाश्ता आपोटून टिफिन सोबत घेतले. माघारी यायला उशीर होणार होता. जॅकेट आणि टिफिनसाठी फक्त दोन सॅक सोबत घेतल्या. जाताना वरच्या आणि येतेवेळी खालच्या वाटेने यायचा निर्णय गाईडने घेतला. वरची वाट म्हणजे जवळची पण खड्या चढाईची होती. खालची जरा दूरची असली तरी सोईस्कर होती. आधी लहान देवरूपा पाहून नंतर मुख्य देवरूपा कडे आम्ही पोहचणार होतो.

      सकाळच्या सूर्यप्रकाशात दिसणारी सर्वच हिमच्छादित शिखरे चंदेरी भासत होती. चालताना गवतावरचे पाण्याचे थेंब मोत्याप्रमाणे चमकत होते. ती झळाळी पावलागणिक पुढे पुढे जात होती. इथल्या हिमालयीन पर्वतराजीमध्ये अनंत प्रकारची फुले उमलली होती. कुठे कुठे सुंदर फुलांचे झेले फुलदाण्यांमध्ये रचून ठेवावित तशी पर्वतउतारावर दिसत होती. झाडं, रोपं नाहीत तर फक्त आपल्या बोटांच्या उंचीची देठं घेऊन, फुलेच हिरव्या गालिच्यातून मान वर करून आम्हास पाहत होती. एकेक रंग टप्प्या-टप्प्याने वरच्या दिशेने गर्दी करून शांततेत राहिले होते. वारा त्यांना हळुवार गोंजारत होता. त्या फुलांच्या ताटव्यात बसून आकाशाच्या निळाईत त्यांचा निर्माता दिसतो का पाहण्याचा निष्फळ प्रयत्न केला. सांगायचं झालं तर अशा वातावरणातील निरव शांततेत अंतर्मुख होऊन ध्यानास बसावे असे वाटले, पण देवरूपाचे पवित्र ठिकाण याहून अद्भुत असेल यात तिळमात्र शंका नव्हती, म्हणूनच पुढे चालत राहिलो.

       इथेही पाच-सात महिला आम्हाला आमच्या पुढे जाताना दिसल्या. पूर्ण बर्फानी आच्छादलेली ही शिखरं आता काही दिवसांपूर्वीच मोकळी झाली होती. म्हणूनच जास्तीतजास्त वर जाऊन जास्त औषधी हुडकून काढण्यासाठी त्या वरच्या दिशेने जात होत्या. वितळून गेलेले बर्फ कधीच नदीच्या पोटात शिरले होते. काही ठिकाणी अजूनही बर्फ तग धरून राहिले होते, परंतु सूर्यही हट्टाला पेटला होता. तग धरलेल्या बर्फातून पाण्याचा स्त्राव निरंतर ओढ्याच्या दिशेने चालू होता. वाटेत लागणाऱ्या बर्फाच्या बेटांवर मनसोक्त खेळून आम्ही पुढे जात होतो. आमचा गाईड मात्र पहाडी लसूण जमा करण्यात रमला होता. दोन तास चालून आम्ही छोटा देवरूपा गाठले. सपाट मैदानावर वरून बर्फ वितळून येणाऱ्या पाण्याने ओहळाच्या माध्यमातून एक आकृती निर्माण केली होती. निरखून पाहिले तर हुबेहूब गणेशाचा चेहरा दिसत होता. वरून उतरणारे पाणी त्याच्या सोंडेच्या दोहोबाजुनी, चेहऱ्याला स्पर्श करत, ओहळातून मागे डोक्याच्या मध्यस्थानी पुन्हा एकत्र होऊन, खाली नदीच्या दिशेने वाहत होते. पाप आणि धर्मसुरा मागून तटस्थपणे लक्ष देऊन ते दृश्य पाहत होते. बराच वेळ आम्ही तिथेच खिळलो. गाईडने वरून आवाज दिला, भाई चलो !! उपर और भी खूबसुरत नजारा है.



      गाईडने आम्हाला आधीच काही पूर्वसूचना देऊन ठेवल्या होत्या. देवरूपा हे स्थानिक लोकांसाठी खूप पवित्र स्थान आहे. या व्हॅलीतील स्थानिक लोक वर्षातून एकदा देवरूपाच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी इथे घेऊन येतात. त्यामुळे इथे जोरात ओरडणे, कुठल्याही प्रकारची गैरवर्तणुक, घाण, कचरा मुळीच करू नये. या जागेच पावित्र्य सर्वांनीच राखणे अनिवार्य आहे. त्याचे तंतोतंत पालन करावेच लागेल. म्हणूनच बोगडीच्या वर कुठल्याही ठिकाणी टेंन्ट लावायची अनुमती ना स्थानिकांना आहे ना ट्रेकर्सना. या सर्व गोष्टी ध्यानात ठेऊन आम्ही इथून पुढे जो शेवटचा टप्पा होता तो उत्सुकतेने वर चढू लागलो. या टप्प्यात दगड गोटे खूप होते. पाण्याचाच हा रस्ता होता. छोट्या देवरूपात येणारं पाणी मुख्य देवरूपाच्या मैदानातून येत होते. अर्ध्या तासात आम्ही वर चढलो. चार-पाच फुटबॉलची मैदानं होतील एवढे मोठे पठार आमच्या समोर होते. पूर्ण बर्फानी आच्छादलेले.. समोर पूर्वेस मैदानाला बर्फानी अर्धवट नटलेली महाकाय पर्वताची भिंत होती. त्या पर्वताच्या शिरस्थानी एक भव्य पाषाणाचा तुकडा असा काही आकृतिबंध होता की जणू नागाचा फणाचा आहे. त्या भिंतीवरून खाली उतरणारे कितीतरी झरने खाली येऊन बर्फाच्छादित पठारात गुडूप होत होते. उजव्या हाताला धर्मसुरा आणि पापसुरा पर्वतांची शिखरे डौलाने उभी होती. ती आता अधिकच तेजस्वी दिसू लागली होती. डाव्या हातावर राक्षसरूपाच्या आसपासची बोडकी शिखरं हे सौंदर्य पाहून कदाचित हिरमुसली होती. मागे वळून पाहिले तर मलाना व्हॅलीचे सौंदर्य सूर्यप्रकाशात उजळून आले होते. एकामागोमाग असे कितीतरी हिरव्या गालिचाने नटलेले डोंगर पार करून आम्ही इथवर आलो होतो. तरी किंचितही थकवा आमच्या कुणाच्याच चेहऱ्यावर जाणवत नव्हता.
शुभ्र पठाराच्या मध्यभागी एक तीस-पस्तीस मीटरचा वर्तुळाकार गुलाबी भाग... त्याच्या मधोमध बर्फाचं छोटसं बेट आम्हास आकर्षित करत होता. तो पाहून महादेवाचं स्मरण केलं. आम्हास हे ठाऊक होते की कितीतरी वलयांकित ओहोळ या मैदानात आपलं अस्तित्व राखून आहेत. म्हणूनच त्या आकर्षित दिसणाऱ्या जागेवर पोहचण्यासाठी आम्हाला शर्थ करावी लागणार. माझ्या हातातल्या ट्रेकिंग पोलच्या साहाय्याने मी आणि गाईड आधी तिथवर पोहचलो. बाकी आमच्या मागून लगेचच तिथे पोहचले. अद्भुत, मनमोहक काय म्हणू..!! छे..!! शब्दच नाहीत. सारं काही अकल्पनिय, अवर्णनीय होतं. तरीही... सभोवताली दूरपर्यंत बर्फाने आच्छादलेला भाग... त्यामध्ये गुलाबी फुलांची एक नव्हे दोन वर्तुळं... त्या दोन वर्तुळांमध्ये नितळ पाण्याचे एक प्रवाही वर्तुळ... वर्तुळामध्ये एक बर्फाचं बेट.. बेटावर जाण्यासाठी त्या वर्तुळांना छेद करत एक बर्फाची गेलेली पायवाट... त्या पायवाटेने आत शिरलो. एक आध्यत्मिक आनंदाची अनुभूती आली. खाली बसून जून जुलै महिन्यात आठ ते बारा हजार फूट उंचीवर फुलणारी... बिन पानांची... गुलाबी रंगाची फुलं गोंजारून पहिली. त्यांचा स्पर्श शब्दात व्यक्त करता येणार नाही. तदनंतर तिर्थस्वरूप पाणी प्राशन केले... तृप्त झालो... ट्रेक सफल झाला... पाण्याच्या प्रवाही वर्तुळात मोत्यांचा किस असावा असे अगणित बारीक कण...पाण्यात न मिसळता संथ गतीने तळातून पुढे सरकत होते. एक रहस्यमय चमक त्यांच्यात दिसत होती.

        खरोखरच आम्ही खूप भाग्यवान होतो. यापूर्वी १७ मे २०१९ रोजी इथे दोन ट्रेकर्स आणि आमच्या सोबत असलेला गाईड यांनी समीट केले होते. परंतु त्यावेळी मोठाग्रहण पासूनच सर्व पहाड बर्फाने झाकलेले असल्यामुळे, आम्हास जे आता अवर्णनीय-अद्भुत असे लोभासवणी दृश्य पहावयास मिळाले, ते त्यांच्या पाहायला मिळाले नाही. देवरूपातील गुलाबी फुलांनी नटलेला थोडा का होईना पण अमृतरुपी प्रवाह आम्हाला पाहता आला. त्याच्या सान्निध्यात राहता आलं याहून दुसरं काय हवं होतं. पण आमचं मन भरलं नाही. हा प्रत्यक्ष इवलासा प्रवाह जर इतका लोभस असेल, तर देवरूपा पठारावरील पूर्णतः म्हणजे जवळपास एक किलोमीटर वलयांकित नागमोडी प्रवाही ओहोळ किती दैवी, देदीप्यमान दिसत असेल..!! त्याचे बर्फावर पुसटसे रेखांकित वर्ण आम्हाला दिसत होते. जणू शेष आपलं पूर्ण शरीर गुलाबी पुष्पजळात, बर्फाची चादर घेऊन दुमडून बसलेला आणि समोर पाषाणभिंतीच्या वर फणा काढून पीर पंजाल पर्वतरांग न्याहाळत आहे. तिथून त्याला इंद्रसन पर्वतही छोटा भासत असेल. भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम आणि त्याचे वडील जमदग्नी ऋषी यांनी हे क्षेत्र राक्षसांपासून, भुतांपासून मुक्त केले. जमदग्नी ऋषी आणि परशुरामाची आई रेणुका यांची आजही मलाना गावात मंदिरं आहेत त्यांची पूजा केली जाते. म्हणूनच भगवान विष्णूने हा शेष इथे प्राणिमात्रांच्या रक्षणार्थ नेमलेला असावा असा विचार डोक्यात येऊन गेला.

देवरूपा ते पालघर

       जवळपास एक तास आम्ही त्या आध्यात्मिक निसर्ग सौंदर्यात रमलो. सोबत आठवणीने नेलेला भगवा ध्वज फडकवून, इथे ओरडणे नियमाला अनुसरून नाही, म्हणून हळुवार "श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी ललकारी देऊन त्यांना मानवंदना दिली, बाबा बर्फानी शिव शंभुचा घोष केला, पुनःश्च त्या पवित्र धरतीला वंदन केले. मनसोक्त आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. गाईडने खाली जाण्याचे निर्देश दिले कारण सूर्य माथ्यावर आला होता. मेघ रोजप्रमाणे नभात जमू लागले होते. त्यांच्या सावल्यानी खाली मोठमोठे ठसे उमटवायला सुरवात केली होती. म्हणून मोठ्या कष्टाने तिथून काढता पाय घेतला. पंधरा मिनिटे बर्फावर चालत आम्ही उताराजवळ पोहचलो. शंभर फूट- पन्नास फूट असे टप्प्या टप्प्याने बर्फावरून स्लाईड करत आम्ही बऱ्याच अंशी खाली आलो होतो. बर्फाचे टप्पे आता संपले होते. वाटेत दृश्य-अदृश्य स्वरूपात वाहणाऱ्या ओढ्यांना फुलांनी सजवले होते. एका टेकडीवर बसून सोबत आणलेले टिफिन उघडून पुलाव फस्त केला आणि पुन्हा बोगडी कॅम्पच्या दिशेने खाली उतरलो. वाटेत उंच उंच पाषाणावर अगदी टोकावर जाऊन बकऱ्या आणि मेंढ्या निसर्ग न्याहाळताना दिसत होत्या. दुपारी सव्वादोन च्या सुमारास आम्ही सुव्यवस्थित तृप्त होऊन कॅम्पवर पोहचलो होतो.
काहीवेळ विश्रांती करून संध्याकाळचा चहा नाश्ता घेतला. आज पाऊस नव्हता. निळ्याभोर आकाशात मेघांची फुलं दूरवर पसरली होती. तिरप्या उन्हाने शिखरमाथा भलताच मोहक दिसत होता. ते दृश्य पाहून माझ्या कविमनाला सुचलेल्या काही ओळी....
मौनात सांगती फार हिमशिखरांची ख्याती
ऐकण्या आतुर जे जे गुण आवडीने गाती
डोकावत येता सूर्य उन्हाचे करती सोने
भंडारा लावला भाळी जणू शिव मल्हाराने
निळ्या नभाचा फेटा त्यावर चंद्राची कोर
इंद्रधनुष्याचा शेला गळ्यात शोभतो हार
त्याचा अंगरखा शोभे हिरवा गालिचा छान
रंगबेरंगी फुलांची नक्षी मिरविते मान
हिमवर पाषाणाचा नाहीच कुणाशी वाद
हृदय प्रसवतो नित मंजुळ पाण्याचा नाद
©___नित

       तर अशी नयनरम्य संध्याकाळ अनुभवून रात्रीचे जेवण उरकून झोपी गेलो. सकाळी लवकर उठून मलाना डॅम गाठायचा होता. तीन दिवस केलेला प्रवास एका दिवसात नव्हे सायंकाळी चार च्या आत आम्हाला पूर्ण करायचा होता अन्यथा पुढचं सर्वच वेळापत्रक विस्कटल असतं. सकाळी सारे लवकरच उठलो. सात वाजता सर्व आवरून देवरूपाला नमन करून बोगडी कॅम्प सोडला. आलो त्याच वाटेने पुन्हा माघारी फिरलो. कधीच न अनुभवलेलं अकल्पनिय निसर्गसौंदर्याशी वार्तालाप करून अखेर आज आम्ही खाली उतरत होतो. मोठाग्रहणला आलो आणि त्या इसमाची आठवण झाली ज्याने म्हंटल होतं की चेहरे बघा आधी. इथे ओरडून सांगावसं वाटत होतं की आम्ही देवरूपाच्या पवित्र स्थानी नमन करून तिचा स्पर्श अनुभवून खाली सुखरूप उतरलो आहोत. पण असो... वाटेत मलाना गावातील लोकं वरच्या दिशेने चढत होती. काही मॅजिक व्हॅलीच्या दिशेने जाणारे तर काही खाली उतरणारे हौशी पर्यटक पाहिले. आम्ही वेळेच्या आधी बरोबर दुपारी 12 वाजता मलाना डॅमवर पोहचलो होतो. पुष्कर भाईने (kailashrath treks) गाड्यांची व्यवस्था इथे करून ठेवली होती. म्हणायचं झालं तर ट्रेक इथे संपन्न झाला होता. जीपने आम्हाला जरी गावात नेऊन सोडलं, जिथे मलाना नदीचा पार्वती नदीत विलय होतो. तिथून हिमाचल परिवहन मंडळाच्या बस मध्ये बसून भुंत्तर पोहचलो. पावसाची रिपरिप चालू होती. तीन वाजले होते. जिथे प्रायव्हेट बस थांबा आहे त्याच्या समोरच फ्लाईट व्ह्यूव हॉटेलमध्ये रूम घेऊन चार दिवसाची अंघोळ अर्ध्या तासात आटपून घेतली. फोन करून कैलाशरथचे सर्वांनी आभार मानले. 

      रात्रीचे जेवण करून पाल ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये चढलो. यावेळेस आधी बुकिंग असूनही आम्हाला शेवटच्या सीट दिल्या गेल्या. यापुढे कधीही पाल ट्रॅव्हल्सची बस बुकिंग करायची नाही आणि कोणाला करू द्यायची नाही, उद्या सकाळी दिल्लीत पोहचल्यावर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भुर्दंड वसूल करायचा यावर एकमत झाले. घाटरस्ते उतरून बस सकाळी नऊच्या सुमारास मजनु-दा-टिला या नियोजित स्थळी पोहचली. गुरुद्वाऱ्यात फ्रेश झालो आराम केला. दुपारनंतर पाल ट्रॅव्हल्सचे ऑफिस गाठले. हेल्दी संभाषणातून २६०० रुपये वसूल केले. मग जेवण उरकून विधानसभा मेट्रो स्टेशन गाठले. तिथून हजरत निजामुद्दीन. पुन्हा रात्रीचा प्रवास अगस्तक्रांती मध्ये केला. सुरतला सकाळी उतरलो, फ्लाईंग पकडली. पालघर सव्वा आठ वाजता पोहचलो. भोलानाथ मध्ये जाऊन वडापाव खाल्ले. सुदेश घ्यायला आला होता त्याच्यासोबत घरी परतलो.
...नित (नितेश पाटील) धनसार पालघर 

Friday, August 9, 2019

नाणेघाट भ्रमंती

#नाणेघाट_भ्रमंती #शिवप्रेमी_गडयात्री



चैत्रातच गुंफलेला वैशाख संपतो. फुलांचे बहर गळून पडलेले असतात. उन्हे जास्त तापून दिवस मोठे करून थकलेली असतात. तळ्यांच्या पायातील भेगा स्पष्ट दिसू लागलेल्या असतात. अशातच जेष्ठातले पांढरे भुरके ढग आकाशभर पसरू लागतात. काहीसे पाणी उरलेल्या धरणात, आपले प्रीतिबिंब न्याहाळून पाहू लागतात. थंड, ओलसर वाऱ्याचे मंडळ, पावसाळ्याचे संकेत घेऊन वसुंधरेच्या भेटीस येते. वसंताचे अल्लड वातावरण संपून प्रौढत्वाची सावली वसुंधरेवर पडते. रात्री नक्षत्रांची लुकलूक दिवासोदीवस झाकोळून जाऊ लागते. आणि अधीर झालेला पहिला पाऊस, आपली पर्जन्यपुष्प उधळीत वसुंधरेच्या भेटीस येतो. दोघांच्या तृप्ततेतून अगणित हिरवे कोंब उदयास येतात आणि वसुंधरेवर हिरवं उधाण येतं.

आपल्या वसुंधरेवर, कणखर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, वरुण देव पर्जन्यपुष्प उधळू लागतो. गड-किल्यांवर, डोंगर-कड्यांवर, दरी-खोऱ्यात, घाटरस्त्यांवर सलग पाच सहा महिन्यासाठी हे उधाण येतं. रानोमाळी धबधब्याच्या लकेरी जागृत होतात. तळ्यांच्या भेगा चिंब भिजून नाहीशा होतात. पुसलेल्या हिरव्या जागा चमत्कारिकपणे पुन्हा हिरव्या होतात, नदीच्या खोडलेल्या रेघां पुन्हा खळखळ हसून, लांबच लांब समुद्राच्या दिशेने वाढत जाताना दिसतात. सह्याद्रीच्या कणखरतेला अभिषेक करणाऱ्या असंख्य लहान मोठ्या लकेरी डोळ्यात साठवत, त्यांना बळ देणारे पर्जन्य पुष्प अंगावर घेत, हिरव्या उधानात विहार करण्याची मौज काही औरच असते.

या मोसमात ट्रेकची सुरवात म्हणून, आमची पहिली भ्रमंती आम्ही नाणेघाट ठरवली. मी हिमालयीन ट्रेक करून आल्याला तीनच दिवस झाले होते. त्यात दोन दिवस पाऊस अगदी मनसोक्त बरसत होता. बरसणाऱ्या पावसातच बस आम्हाला घेऊन नेहमीप्रमाणे रात्रीचा प्रवास करणार होती. आसपासचे अगदी मोजके किल्ले सोडले तर, आम्हाला तसे प्रत्येक भ्रमंतीसाठी एका बाजूने पाच ते सहा तास प्रवास हा ठरलेलाच आहे. दुसरा पर्याय नाही. म्हणूनच कामाचे दिवस वाचवण्यासाठी रात्री प्रवास करून सह्याद्री सानिध्यात जाणे हे आमचं नेहमीचंच.
रात्री दहा वाजता बस सर्वांना घेऊन निघाली. सुर्या नदीच्या गढूळ झालेल्या पात्रात, पुलाच्या दोन्ही बाजूने पावसाचे सहस्रावधी बाण आपली जागा मिळवून ठाण होण्याच्या प्रयत्न करत होते. नदी मात्र त्यांना नेऊन तिच्या बांधावरून खाली ढकलून देत होती. त्याची तडतड आमच्या बसच्या छापरिवर जाणवत होती. ती दुर्लक्षित करून बस पुढे निघाली. मनोरच्या आधी दोन जीर्ण विशाल गुलमोहराच्या कमानीतून घुसण्याआधी दुरूनच बसच्या उजेडात ती दोन्ही झाडं, आपापल्या हातात अगदी भली मोठी छत्री घेऊन उभी आहेत असे वाटले. पण जवळ जाताच त्याचे पान न पान पाऊस पिण्याच्या नादात पूर्णतः चिंब झालेली दिसली.

त्यांना मागे सोडून आमच्या बसने NH48 ची वाट धरली. "आधी पोटोबा आणि मग विठोबा" ही म्हण काही माणसांसाठी आहे असं नाही. ती गाड्यांसाठी आहे. म्हणूनच इंधन भरून आम्हास नियोजित स्थळी पोहचवण्यासाठी बस पुन्हा धावू लागली. काचेवर आदळणारे थेंब आता तिला थांबवू शकणार नव्हते. ते तितके प्रभावी नव्हते. रस्त्यावर सखल भागात थांबलेलं पाणी ती पायाखाली तुडवत निघाली आणि आम्ही निवांत होऊन ढोलकी बाहेर काढली. ढोलकीच्या तालावर श्रीगणेशा केला आणि गाण्यांची मैफिल सुरू केली. त्या मैफिलचा सूर नकळत विठ्ठलाच्या पंढरीस पोहचला आणि बसला जणू वारीचे स्वरूप आले. विठ्ठल स्तुतीने रात्रीची पहाट कधी झाली ते देखील कळलं नाही.

शहरं मागे सोडून बस टोकवाडे गावा नजीक तीन वाजता एका हॉटेलच्या परिसरात थांबली. फार जुने नाही, हॉटेल नवीनच होते. स्वच्छ आणि प्रशस्थ असे. रात्री विचारणा केली तर चहा मिळेल म्हणाले. पाऊस चालूच होता, म्हणून बसमध्येच सार्यांनी ताणून दिली. सहा वाजता उठून पडत्या पावसातच फ्रेश झालो. सकाळी चहा तर मिळाला पण नाश्ता मिळणार नाही असं कामगारांनी सांगितलं. तरीही आम्ही त्यांना विनवणी केली तुमच्या मालकांना फोन करून कळवा. सात ते आठ जण युनिफॉर्म मध्ये वावरणारे कामगार होते. पण मालक आणि कुकचा पत्ता नाही. सकाळी सात वाजता पन्नास वाटसरू तुमच्या दारात असताना त्यांना नाश्ता देणं नाकारणं हे धंद्याच्या दृष्टीने सोयीचं नाही. असो... सोबत ब्रेड, बटर, जाम होते ते फस्त केले. पुढे जाऊन हॉटेल समाधानला बस थांबली. मिसळपाव, पोहे खाऊन पायथ्याशी असलेल्या वैशाखरे गावाजवळ जिथून नाणेघाटाची वाट सुरू होते तिथे जाऊन पोहचलो....नित

पुढे माळशेज, नगरकडे जाणारा रस्ता भिजून निथळत होता. रस्त्याच्या बाजूलाच वनक्षेत्र टोकवाडे विभागाने लावलेले माहिती फलक, कमान पाहून बरे वाटले. पुढे रस्त्याला जागोजागी माहितीचे फलक मग त्यात घाटरस्त्याचा इतिहास असेल, वन्य पशुपक्षांची माहिती असेल, झाडांची माहिती असेल, असे फलक जागोजागी दिसतात. सोबतच विसाव्यासाठी काही अंतराच्या दुरीने बाकडे लावलेले आहेत. एकंदरीतच सारं समाधानकारक आहे. पण काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी त्यावर कुठे दगड फेकून तर कुठे आपली नावं लिहून त्याला नव्हे माणसांच्या सुशिक्षितपणावरच गालबोट लावलं आहे.

आम्ही काउंटिंग घेऊन भ्रमंतीस सुरवात केली. यावेळेसही आमच्या सोबत सहा छोटे ट्रेकर्स होते आणि आम्ही ४२जण. पाऊस थांबला होता. समोर धुक्यात की ढगात लपलेला नाणेघाट. एक दोन-अडीच तासांचा रस्ता आणि आम्ही थेट त्या ढगांना स्पर्श करणार होतो. उजव्या बाजूला जीवधन तर डाव्या बाजूला भैरवगड पलीकडे गोरखगड,मच्छीन्द्रगड, सिद्धगड, हरीचंद्रगड, कोकणकडा यांच्याबरोबर ढगांना वारा खेळवीत होता. पावसात भिजून अधिकच गहिरी लाल झालेली वाट धरली. मधेच कुठेतरी साचलेल्या पाण्यात आपले प्रतिबिंब पाहणारे भुरटे आकाश लालसर दिसत होते. वाटेच्या दोन्ही बाजूने हिरवाईने नटलेली झाडे निथळत होती. कुडीच्या झाडांवर पाने कुरतडत बसलेल्या विभिन्न रंगांच्या किड्या जणू पाने खाण्याच्या शर्यतीत होत्या. झाडांवर बहरलेल्या पांढऱ्या फुलांना स्पर्शही न करणाऱ्या, पण झाडांवर एकही पान पूर्ण न ठेवण्याची त्याची स्पर्धा असावी. हिरव्या तृणाच्या टोपलीत पावसाने झाडाखाली पाडलेली पांढरी फुलं काठ सोडून फाकली होती. कारवीच्या कोवळ्या पानांची छोटी छोटी झाडं आपल्या खरभरीत देहावर थेंबाना मिरवत होती. "जंगलाची मैना" ख्याती मिरवणाऱ्या, मैनेविन तरीही जागोजागी उभ्या असलेल्या करवंदीच्या जाळ्या प्रफुल्लित दिसत होत्या. आपले घर सोडून सोलार दिव्यांच्या आडोशाला आश्रयास असलेल्या टप्पोऱ्या मधमाश्या घट्ट चिटकून बसल्या होत्या. वाटेत अडथळ्यास असलेले नुकतेच सुरू झालेले सौम्य ओढे दगड गोट्यांना गोंजारत होते. झाडावरून गळून पडलेल्या सुकल्या पानांचा, ओढ्यातून निरर्थक खाली वाहत जाण्याचा प्रयत्न चालू होता.

हलकी चढण चढून मोकळ्या जागेत आम्ही पोहचलो. सोबत असलेला सुका खाऊ आपापसात वाटून खाल्ला. पुढे दगडांनी रचलेल्या वाटेवरून चढाईस सुरवात केली. डोंगरावरून खाली उतरणारे पुसटसे झरे खाली येताना दिसत होते. एक हलकीशी खळखळ ऐकू येऊ लागली होती. पावसाने पुन्हा आपली रिपरिप चालू केली. पावसाळी चिलखतं सॅक मधून आम्ही बाहेर काढली आणि अंगावर चढवली. रस्त्यावरून पाणी पायऱ्या उतरू लागले होते. आम्ही मात्र वर चढत होतो. खुबे, गोगलगायी संथ गतीने निवारा शोधत होते. तर खेकडे मात्र तरातरा आम्हाला पाहून अदृश्य होत होते. मधेच एखादा झरा आडोसा सोडून अगदी वाटेवर येत होता. रविवार असूनही वाटेत गर्दी जाणवली नाही. पण जसजसे ऐतिहासिक घाटाच्या जवळ आम्ही पोहचू लागलो तसतशी वर माणसांची वर्दळ स्पष्ट दिसू लागली....नित

दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण वाट दगड गोट्यांच्या पायऱ्यांनी रचलेली होती. साहजिकच थोडी दमछाक झाली असती. पण पावसाची सोबत असल्यामुळे निभावून गेलं. आणि आम्ही पहिल्या पावसाच्या साक्षीने हरीचंद्राच्या डोंगररांगेतील २७२४ फूट उंच असलेल्या जुन्नर ते कोकण याना जोडणाऱ्या ऐतिहासिक नाणेघाटात पोहचलो. मागे वळून पाहिले तर कोकणचा बरासचा सपाट प्रदेश नजरेत येत होता. इथे कातळात आजूबाजूला पाण्याचे बरेच टाके दिसत होते. वर्षभर या टाक्यांना पाणी असते. त्यात प्रशासनाने गप्पी मासे सोडलेले आहेत. काही वेळ त्या पाण्यात हात टाकून बसलो आणि न सांगताच माशांनी मसाज चालू केली. ती अनुभूती घेऊन, वर एक ५०जण मावतील इतकी कातळात कोरीव गुहा आहे. त्याच्या शेजारी आणि वरसुद्धा पाण्याचे टाके आहेत. गुहेत भिंतीवर ब्राम्ही लिपीत कोरलेले लेख आहेत. आता त्याची पडझड झाली आहे पण बऱ्यापैकी लेख दृष्टीस पडतात. त्यात अंकांचा समावेश जास्त दिसला. गुहेच्या वर एक प्रचंड कातळ भिंत दिसते यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात.
दुपार झालीच होती, पण पावसाळी. सोबत डबे होते. जेवून काही वेळ गुहेत आराम केला. आणि वरच्या दिशेने म्हणजे घाटरस्त्यातुन जुन्नरकडे आम्ही चढण्यास सुरवात केली. साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नळी आहे. पाऊस चालूच होता. धुक्यात घाटवाट अस्पष्ट दिसत होती. दोहो बाजूंच्या कणखर पाषाणाच्या भिंती आणि पायाखालाच्या पाषाणाच्या काळभोर गडद रंग पाहून हा रस्ता बनवणाऱ्यांची इच्छाशक्ती किती त्याच तोडीची नव्हे त्यापेक्षा बळकट असेल याची कल्पना करता येते. हा घाट चढून गेलो की अगदी समोरच पुढे सपाट मैदानात घाटाच्या तोंडावर, घाटघर जुन्नरकडे जाणारा डांबरी रस्ता नजरेस पडतो. डाव्या बाजूला एक चार फूट व्यास आणि पाच फूट उंचीचे दगडी रांजण नजरेस पडते. तर उजविकडे कातळात कोरलेले गणपतीची छोटी मूर्ती आहे त्याच्या काही अंतरावर डाव्या बाजूने वरून खाली वाहत येणारा पाण्याचा झरा वाहताना दिसत होता. तिथूनच नानाच्या अंगठ्याजवळ जाण्याचा मार्ग आहे. हा घाटरस्ता वापरणाऱ्यांसाठी पूर्वी जकात भरावा लागत असे. इथे ठेवलेल्या रांजणात तत्कालीन कर्षापण नावाची नाणी जकात स्वरूपात यात टाकली जात होती. म्हणजे त्यावेळचा तो टोल हा प्रकार होता.

आताही इथून उच्च दाबाची वीज वाहून नेणारे भव्य टॉवर जोडीने खाली उतरले/चढले आहेत. त्यावरून हे सहज लक्षात येते की हा मार्ग जुन्नर आणि कोकण यांना जोडणारा जवळचा रस्ता होता. पूर्ण परिसर धुक्यात हरवला होता. काही माजूरडी लोकं संगीताच्या तालावर आपापल्या गाडीसमोर नशेत कर्कश आवाजात ओरडत थिरकत होती. ते दृश्य व्यथित करनारे होते. याआधी इथे येण्याचा रस्ता फक्त घाटघर पर्यंत होता तेथून पाच किलोमीटर चालून नाणेघाटात येता येत होते पण आता थेट गाडी घाटाच्या तोंडावर येते. आणि हीच सोय घाटसौंदर्याच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. बहुतांशी अशा ऐतिहासिक ठिकाणी जिथे वाहनाने पोहचता येते तिथे निसर्गप्रतिमेला विकृत माणसांनी हानी पोहचवली आहे हे सांगायची गरज नाही. अशा वातावरणात निसर्गसौंदर्याशी ओढ असली तरी आम्हाला फार काळ तिथे राहता आलं नाही. आल्हाददायक वातावरणात असूनही त्या विकृतीची घुसमट होऊ लागली आणि आम्ही तात्काळ खाली उतरण्याचा निर्णय घेतला. पुन्हा काउंटिंग घेऊन दीड तासात खाली उतरलो. खाली छोट्या बंधाऱ्यावर पडत्या पावसातच दोनचार बुडक्या मारल्या आणि बसपाशी आलो. भूमाता वन धन विक्री केंद्रात विनंती केल्यास त्यांनी एक कंटेनर रूम आम्हाला फ्रेश होण्यासाठी दिली. फ्रेश होऊन रानात घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत पडत्या पावसाचे संगीत ऐकत सर्वांनी चहाची चुस्की घेतली. आणि आलो त्याच मार्गाने सुमंगल रात्री दहाच्या सुमारास घरी पोहोचलो. एकूणच या वर्षीच्या पहिल्या पावसात पहिल्या भ्रमंतीने ट्रेकिंगच्या पानावर आणखी काही आल्हाददायक आठवणी जमा केल्या, ज्या निरंतर जगण्याचे बळ देतात.
©___नित (नितेश पाटील)













देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...