Thursday, June 29, 2017

सारपास ट्रेक हिमाचल प्रदेश sarpass

सस्नेह जय शिवराय मित्रहो...

____ट्रेक सारपास ( कुल्लु, हिमाचल प्रदेश,  देवभूमी )
आयोजक :-  #शिवशौर्य_ट्रेकर्स  -  #कैलास_रथ     
मोहीम प्रमुख :- नितीन अपस्तंभ (नाशिक)
मोहीम कार्यवाह :- संघमित्रा मेंगळे (मुंबई)
                
उंच शिखरांचा नाद 
कुणास नसतो... 
थकून जातात वाटा...
तिथे श्वासही कोंडतो... 
अलंकारण्या परी मज... 
तोच भूषण वाटतो...



____हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पार्वती व्हॅली मध्ये समुद्र सपाटीपासून १३८५० फुट उंचीवर असेलेले हे नितांत सुंदर सौंदर्य स्थळ. देवभूमी हिमालय. येेथे पृथ्वी आणि अग्नीच्या समागमातून उत्कट झलेल्या तप्त निखार्यांनी इतकी उंची गाठलेली आहे कि त्यावर हिम वृष्टीचा नित वर्षाव होत असतो. त्या उंचीवर बर्फाच्छादित डोंगर माथ्यावर गोठलेले सरोवर पास करणे म्हणजे सारपास ट्रेक. अर्थात त्याची खोली किती हे सांगणे कठीण.
      
 आणि त्यात हि आमची पहिलीच हिमालयीन ट्रेक. त्यातून आलेला अतीव आनंददायी, रोमहर्षक, अविस्मरणीय, अवर्णनीय आणि काहीसा थरारक असा अनुभव शब्दात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. हा अनुभव  लिहित असताना आजचे जग हे पृथ्वीवरून आकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राहून जलद गतीने प्रवास करत आहे याची जाणीव असली तरी मोजक्या शब्दात हा अनुभव बंधिस्त करणे उचित ठरणार नाही. हल्ली थोडं आणि गोडं याची चटक लोकांना लागलेली आहे हे नाकारता येणार नाही. म्हणूनच कदाचित माणसाच्या आयुष्यात सुखाचे क्षण थोडकेच असतात. नाहीतर सततची त्यांंची धावपळ चालू असते.

____हा ट्रेक २०१७ मे महिन्यातील १८ तारखेला चालू होणार असला तरी लगबग मात्र २०१६ वर्षाअखेर डिसेंबर महिन्यापासून चालू झाली होती. ट्रेक संबंधीचे महितीपत्र आणि त्यातील अटी वाचून मी कामानिमित्त सिक्कीमला असतानाही लगेच होकार दर्शवला होता. तोवर उशीर झाला असला तरी मोहीम कार्यवाह संघमित्रा ताईंची बोलून तेवढ्या एका जागेची संमती मिळवली आणि त्यांनीच मुंबई ते दिल्ली विमानाचं जाण्यापरतीचं तिकिट बुक करून दिलं. पुढच्या दोनच दिवसात परेशनेही सोबत येण्याचा हट्ट धरला. आणि हो नाय करता त्याचंही बुकिंग झालं. सह्याद्रीची नाळ जुळलेली माणसं आम्ही. हिमालयाच्या पायवाटा तुडवण्यास सज्ज असलो तरी सह्याद्री आठवतच राहते.  सह्याद्री हे नावच इतकं दमदार आहे की, त्याचं  नाव घेताच आपल्याला ज्ञात तिच्या अंगाखांद्यावर घडलेले प्रसंग गत कप्प्यातून आपल्या समोर जिवंत होतात. सह्याद्री आणि शिवरायांचं नातं अतूट आहे हे सांगायची गरज नाही. जसं सागर आणि लाटांचा नातं. शिवरायांनी त्या रौद्र सुंदर सह्याद्रीवर अधिराज्य गाजवलं.  सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील सह्यकडे मला नेहमीच खुणावत राहिले.

_____एकूणच शिवशौर्य ट्रेकर्स सोबत ट्रेक करण्याची ही माझी दुसरी वेळ. प्रथम मराठेशाहीच्या झंझावाती इतिहासात अजरामर झालेल्या, सह्याद्रीतील पन्हाळगड ते पावनखिंड विशाळगड या ऐतिहासिक वाटेतील, शौर्य अभ्यासत, केल्या गेलेल्या मोहिमेत सहभागी झालो होतो. तदनंतर आज त्यांच्यासोबत सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांची नुकतीच ओळख करू पाहणारा मी हिमालयाच्या कुशीत जाऊन ते सौंदर्य जगण्याचे स्वप्न पाहू लागलो. सह्याद्रीत रायगड, रतनगड, हरिचंद्रगड, राजगड, भीमाशंकर असे ट्रेक करताना बरेच अनुभव गाठीशी बांधले. आणि काही अंशी शब्दबद्ध करण्याचा प्रयन्त केला.  तत्पूर्वी निसर्ग आणि भटकंतीची ओढ होतीच, परंतु ट्रेकच्या मळलेल्या रानवाटातील पावलांचे ठसे जवळ करत दिसणारा निसर्ग आणि डांबरी रस्त्यांवर रबरी चाकांवरून पळत असताना दिसणारा निसर्ग या दोघांचाही आस्वाद भिन्नच. निसर्ग म्हणजे भाबडी माया, काट्याना मिळणारी फुलांची छाया. ती अनुभवावी लागते.

____जसजसे दिवस जवळ येऊ लागले तशी उत्सुकता आणखीनच ताणली जाऊ लागली. समूहावरील चर्चेची व्यापकता वाढू लागली. कुठलेही कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ असले तरी त्यासाठी अचूक नियोजन असणे अनिवार्य असते. हि शिवचरित्राची शिकवण कधीही न विसरता येणारी. शिवचरित्रातील, स्वराज्यातील प्रत्येक घडलेल्या प्रसंगात महाराजांनी अचूक नियोजन केलं होतं. म्हणूनच त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करता आलं. स्वराज्यावर चालत आलेल्या प्रत्येक संकटाना तोडीस तोड उत्तर देता आलं. आणि हि तर हिमालयीन मोहीम. इथे तर नियोजनाशिवाय थाराच नाही. एक चूक आणि आयुष्य कायमचं गोठण्याची शिक्षा. पाऊस पाडणे हे जरी त्या अदृश्य शक्तीच्या हाती असले तरी बीज आपल्यालाच पेरून त्याची मशागत करावी लागते. तरच आपल्या पदरात त्याचे फळ पडते हा निसर्गनियम आहे. बिना लागवडीच्या झाडांची फळं ही आपल्या पदरात पडतीलच असं नाही. आणि चर्चा, संवाद म्हणजे तरी काय..!! अनेक वाक्यांतून ज्याची एकवाक्यता होते आणि ते वाक्य सार्थकी लागते तेव्हा त्या चर्चेचा विजय होतो. अन्यथा ती चर्चा वायफळ.

____तत्पूर्वी दादरमधील शिवाजी पार्कच्या ओसरीत दोनदा  प्रत्यक्ष चर्चासत्र घेण्यात आले. पोहचाताक्षणी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंना विनम्र अभिवादन करून चर्चा स्थळी पोहचलो. त्यात सदस्यांची ओळख, ट्रेक विषयीच्या शंका, सोबत न्यावयाचे साहित्य, त्या वातावरणात स्वतःला ढालण्यासाठी करावयास लागणारा शारीरिक व्यायाम अश्या बर्याच गोष्टींवर मुद्देसूद चर्चा झाली. त्या वेळी तिथे  मोहीम कार्यवाह संघमित्रा मेंगळे (ताई) आणि शिवशौर्य ट्रेकर्ससे संस्थापक अमित मेंगळे (दादा)  उपस्थित होते. त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. आपल्या शिवप्रेमी गडयात्री समूहातून आम्हीच पहिल्यांदा हिमालय ट्रेक करणार होतो म्हणून आपल्या समूहानेही आमचे कौतुक करून ट्रेक साठी सस्नेह शुभेच्छा सहित ट्रेकसाठी कामी येणाऱ्या भेटवस्तू दिल्या. आपण एखादी अवघड मोहीम हाती घ्यावी आणी आपल्या स्नेहीजनांची मनापासून कौतुकाची थाप पाठीवर पडावी याहून दुसरे सुख ते काय..!! तिथेच तुमची मोहीम फत्ते झाली समझा.

पालघर ते हिमाचल ( देवभूमी )

____आणि दिवस उजाडला बुधवार १७ मे २०१७ वैशाख कृ. सष्ठी. लग्न सराईचा महिना, त्यामुळे रात्री वेळेवर पाठ पिशवी भरली. पहाटे सव्वा तीनला आईचा आशीर्वाद घेऊन घर सोडलं. परेश,मी सोबत अजय आणि सुदेशने पालघर पर्यंत साथ दिली. पृथ्वीने सूर्याला आडोशाला ठेवले होते तरी पहाटेच्या प्रहरी गरमीचे वर्चस्व जाणवत होते. मंद वार्याची एक झुळूक उच्च कोटीचा गारवा देऊन जाई. तोच रूळ प्रकाशात समांतर बघत सौराष्ट्र जनता येऊन थांबली. जनरल डब्यात पहाटेच्या साखर झोपेची झिंग चढलेल्या अस्तव्यस्त गर्दीच्या गराड्यात आम्ही शिरलो. कुणी कुणाच्या मांडीवर तर कुणी खांद्यावर डोक्याचा भार दिलेले, कुणी पायाखाली तर कुणी सामान ठेवण्याच्या बाकावर रेळलेले, कुणी दोन माणसांची जागा अडवलेली तर कुणी जागेसाठी सीटच्या कोपर्यावर शर्थ करणारे, कुणी गीत श्रवणात गुंग तर बरेच निद्रेत व्यंग. असे असताना गाडी मात्र आपल्या तालात पळत होती. पळताना सार्यांना हलवून जागे करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.

___पण जो तो आपल्या थांब्यावर मात्र बरोबर उतरत होता. सव्वा पाच वाजता आम्हाला गाडीने अंधेरीला सोडलं आणि ती निघून गेली. पुढे लोकल पकडून विलेपार्ले आणि तिथून वाटेत एक चहाची चुस्की घेऊन पायी छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १ ला पोहचलो. आमच्याजवळ बराच अवधी असल्याकारणे बाहेरच डाव्या हातावर कॅन्टीन मध्ये नाश्ता हाणला आणि मग आतमध्ये प्रवेश केला. विमानातळावर काही विकत घेऊन खाणे सामान्य माणसाला परवडन्यासारख नाही.  बोर्डिंग पास घेऊन बॅगा रवाना केल्या आणि आम्ही चेक इन करून त्या लखलखीत कृत्रिम प्रकाशात गेट नं १५ च्या आवारात प्रवेश केला. तिथेच जयेश, प्रशांत दा, गोडांबे काका भेटले जे आमच्या सोबत प्रवास करणार होते. विमानात बसलो. तशी माझी हि विमानात बसण्याची पहिलीच वेळ नाही. पण मी जेव्हा जेव्हा बसतो, तेव्हा ते एवढं मोठं धूड आकाशात कसं झेप घेत याचं राहून राहून आच्छर्य वाटत राहत. आणि ते विसरून मग ओळखीची ठिकाण शोधण्याचं काम चालू होते. काही क्षणातच ते इतकी उंची गाठते कि खाली काही दिसेनासे होते. ३०००० फुटांचा टप्पा पार करून ते अग्रसर होते. मग मेगांचे अगणित अस्थिर डोंगर दिसू लागले. त्या डोंगारातून जेव्हा विमान वाट काढत जाते तेव्हा आपल्याला या रस्त्यातही खड्डे पडल्याचा अनुभव येतो. पावून तासाचा अतिरिक्त वेळ दिल्लीभोवती फिरून शेवटी खाली उतरते आणि आम्ही सुस्कारा सोडतो.

____तशीही आमची पहिलीच फ्लाईट असल्याकारणे शेवटच्या म्हणजेच १ वाजेपर्यंत आम्हास वाट बघावी लागणार यात शंका नव्हतीच. वाट बघावी लागणं हा प्रकार खूपच त्रासदायक असतो नाही..!! पण पर्याय नसेल तर मात्र झुरत रहावं लागतं ते चुकत नाही. तोवर रिकाम्या वेळात पोटकावळ्यांची भूक शमविण्यासाठी गोडांबे काकांनी आणलेला डबा आणि मी आणलेला भाकरी अन ठेचा आम्ही फस्त केला. समूहातील सारे येणाऱ्या फ्लाईट नुसार जमा झाले. विमानतळाबाहेर निघालो दिल्ली त्यामानाने आज काहीशी थंडावली होती. मे महिन्याच्या मध्यान्ही दिल्लीचा पारा उतरला होता हे विशेष. शेवटी वातानुकुलीत बसमध्ये बसलो आणि अडीच वाजता ४४ नं. चा हायवे पकडून दिल्ली सरकारच्या वाहतूक नियमांचं पालन करत आमची बस कुल्लुच्या दिशेने रवाना झाली. तत्पूर्वी जेवण करता करता दिल्लीतच आम्हाला पाच वाजले आणि बस चंडीगडच्या दिशेने रवाना झाली. रात्री साडे अकारा वाजाता हरियाणामधील पलस्रा  येथे पाल पंजाबी धाब्यावर जेवण उरकून पुन्हा रात्रीचा प्रवास चालू केला

गुरुवार १८ मे २०१७ मंडी ते रूमसु 
___रात्रभर प्रवास करून सकाळी हिमाचलमधील मंडीला फ्रेश झालो. पुन्हा तोच बसचा प्रवास. मंडीवरून डोंगर उतारावरच्या खड्डेमय रस्त्यावरून,  रोहतांग वरून वाहत येणाऱ्या व्यास नदीचे सौंदर्य न्याहाळत आमची बस पुढे मार्गस्थ झाली. हि या प्रदेशाची मुख्य जीवनदायिनी नदी आहे. कुल्लू पर्वतीय क्षेत्रातून हि दक्षिणेकडे वाहत जाते. तिथून पश्चिमेस मंडी हून वाहत जाऊन पंजाब मध्ये हार्की जवळ सतलज नदीला मिळते  या पर्वतीय क्षेत्रात प्रवास करताना आपल्याला नित नद्या, उपनद्यांच्या किनार्यावरून प्रवास करणे चुकत नाही. आणि त्याचमुळे या पर्वतीय क्षेत्राचे सौंदर्य कायमच हिरव्या वन सृष्टीने बहरलेले असते.नदी आपल्याला संकेत देत असते.
ऊन सावलीच्या खेळात मी रंगून जाते
भर उन्हातही मी शीतल वाहत जाते
असतील कितीही अडचणी रस्त्यात माझ्या
मिच रस्ते कसे माझे बघ जोडत जाते

म्हणूनच इथली माणसं डोंगर उतारावर नदी किणारी शर्थ करत असलेल्या वस्तीत आपले बस्तान मांडून जगत असतात. बाकी सपाट प्रदेश इथे नाहीच हाही मुद्दा आहेच म्हणा. तिथून पुढे बाली चौकीचा रस्ता उजव्या हातावर सोडून आमची बस तीन ते चार किलोमीटर असलेल्या औट बोगद्यातून कुल्लुकडे मार्गस्थ झाली. चढ उतार,वळणाच्या वाटा जवळ करत बसने कुल्लुमधील भुंतर येथे होणार्या व्यास आणि पार्वती नदीच्या संगम पात्रावरील लोखंडी पुलावरून आत प्रवेश केला.इथे एकाच प्रवाहात आपल्याला दोन वेगवेगळे प्रवाह पाहायला मिळतात.

___पण प्रवासात इतकी दमछाक झाली होती कि ते रूप डोळ्यात साठविण्याचे राहून गेले, मात्र परतीच्या प्रवासात तो तीन धारी एकच प्रवाह बघून मन प्रसन्न झाले.  असे असले तरी तिने थांबून तिचे रूप पहिले नाही. ती सतत वाहत होती.  आम्ही एकाच अवस्थेत अधिक वेळ राहू शकत नाही. आणि आम्ही जेवणाचा वेळ सोडला तर मागील २० तास निव्वळ बसमध्ये बसून प्रवास करत होतो. आणि ड्रायवर काका चालवत होते. तत्पूर्वी काल पाहटे ३ ला सुरु झालेला माझा आणि परेशाचा  प्रवास वेळ धरला तर विमानात येऊन सुद्धा तब्बल एकतीस तासाच्या प्रवासानंतर आम्ही कुल्लुच्या पुढे नग्गर गावी आमच्या सामानासोबत बसमधून सारेच उतरलो होतो.

___तपत्या मैदानाच्या गर्मितून आता आम्ही देवभूमिच्या शीतल पटांगणात प्रवेश केला.  आणि त्या हिरव्या पहाडी सौंदर्याचे रुप पाहताच  प्रवासातील थकवा पळून गेला हे विशेष. पाठीचा भार सोसत असलेल्या  कमरेने सुस्कारा सोडला, आणि ते कार्य पायांवर सोपवले. पुढे अर्धा तास खडतर रस्त्यांवरून छोट्या गाड्यांमध्ये प्रवास करून आम्ही रुमसू येथे ''कैलास रथ'' या संस्थेच्या तळ ठिकाणावर पोहचलो. जेथून नितीन सरांसोबत ते आम्हाला पुढचे पाच दिवस मार्गदर्शन, रसद आणि ट्रेक पूर्णत्वास नेण्यासाठी सोबत असणार होते.

_____ सह्याद्रीच्या दर्याखोर्यात फिरणारे शिवप्रेमी आज, शिवशौर्याची गाथा सांगत, हिमशिखरांचा नाद करण्यासाठी, महाराष्ट्रातील सर्वात उंच ५४०० फुट कळसुबाई  शिखर खाली सोडून, दिल्ली पार करून,  कुल्लुमधील ६७३२ फुटावर असणाऱ्या रुमसू गावी दाखल झाले होते. आमच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या तंबूचा आम्ही ताबा घेऊन, आत्ताच फळू लागलेल्या सफरचंद आणि जर्दाळूच्या, गोंडस सुवासिक फुलझाडांच्या, गर्द हिरव्या  बागेतून समोरच दिसणाऱ्या हिमाशिखराना न्याहाळत, रुचकर जेवणाचा आस्वाद  घेतला. साधी माणसं, साध राहणीमान, साधी पण आकर्षक घरे असलेले हे गाव. जिथे पहावं त्या पर्वतांवर आपल्याला देवदार वृक्षाची अरण्ये दिसतात. नागमोडी वळणे घेत
वाहणारी व्यास नदी. आणि प्रत्येक सूर्योदय व सूर्यास्ताबरोबर नजरेचं पारणे फेडून टाकणारी सोनेरी हिमशिखरं हीच खरी कुलूची ओळख. इथलं सौंदर्यच अवर्णनीय आहे. माणसंही लगेच हाकेला ओ देणारी.


____इथला निसर्ग सर्वांसाठीच आहे, तुम्हा, आम्हा, वन्य जीवांचाही आहे, यावे तुम्ही स्वचंद बागडावे, फिरावे, निसर्ग नियमांचे तुम्ही पालन करावे. म्हणूनच तेथे रुळण्यासाठी, अभिमुख होण्यासाठी पाठपिशव्या पाठीवर घेऊन छोटेखानी ट्रेक करण्यात आला. सोबत जवळपास ८० फुट उंचीवरून सुरक्षा किट वापरून रॅपलिंग केली. हा एक आमच्यासाठी नवीन अनुभव होता. नव्या ट्रेकर्सना एक नवीन कलेशी अवगत करून देण्याच हे कार्य कौतुकास्पद होते. माणूस हा निच्छितच भीती बाळगणारा प्राणी आहे. पण जोवर त्या भीतीशी तो सामना करत नाही तोवरच ती भीती आपले वर्षस्व गाजवते. एकदा का तुम्ही तिचा धैर्याने सामना केला कि ती खाजिल होऊन निपचित पडते. आणि त्याच धैर्याचं इथे लहान थोरांनी कसब दाखवलं.

_____कॅंम्प वर परतलो. मेघांचे गरजने, सोबत हलके बरसणे चालू होते. तंबूत पाठपिशव्या म्यान केल्या. चहा, भजीचा आस्वाद घेतला. काही वेळातच कैलास रथच्या कम्प लीडर कडून सारपास वरील हवामान आणि परिस्तिथीत रुळण्यासाठी महत्वाच्या सूचना आणि पुढील पाच दिवसांचा दिनक्रम समजून घेतला. रात्रीचे जेवण उरकून दोन दिवसाचा प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी तंबूत निद्रिस्त झालो.

शुक्रवार १९ मे २०१७ बेसकॅम्प ते कसोल ते ग्रहण 
____पक्षांच्या सुमधुर संगीताने सुदिन सुवेळी सकाळी साडे चार वाजता जाग आली. शरीर शुद्धी उरकून घेतली. आज इथे आम्हा बहुतांशी ट्रेकर्सच्या आयुष्यातील हिमालयीन ट्रेक करण्याची हि पहिलीच वेळ होती. आणि त्याची सुरवात आज होणार होती. उत्साह शिगेला पोहचला होता. रात्री मेघांच्या गर्दीत हरवलेल्या चांदण्या निरभ्र आकाशात दिसत नव्हत्या. सूर्य पृथ्वीवरील सौंदर्य न्याहाळण्यासाठी आतुर होता. तो दिसत नसला, या डोंगरांच्या गर्दीत पूर्वेला लाली दिसत नसली, तरी धरतिला जाग आली होती. डोंगर घाटीत रात्री लुकलुकणारे दिवे आता विझले होते. घरांची छपरे न्हाऊन निघाली होती.  थंडी मात्र आपल्याच धुंदीत मस्त होती. सुचीपर्णी वृक्षांची थरथर स्पष्ट दिसत होती. पक्षांची किलबिल वाढली. अंगणात दाणे नसताना शाळुंक्या ते वेचण्याचा निरर्थक प्रयत्न करत होत्या. अश्या शीतल शांत सौंदर्य स्थळी पहाटेच्या प्रहरी हातात वाफाळता चहाचा कप घेऊन, निरभ्र झालेल्या छताखाली बर्फफाच्छादित डोंगर माथे न्याहाळत होतो. इतकी उंची गाठून कुठल्याही परिस्तिथीत हे इतके शीतल कसे राहिलेत याचा विचार मनात घोळत होता. त्या विचारात असतांना चहा कधी गार झाला ते देखील कळलं नाही. त्या वातावरणातील शीतलता आणि निरागसता किती मोहक होती

_____तोच हिमशिखरांवर सोनेरी झळाळी दिसू लागली. रात्रीच्या अंधारात ढगात लपलेला माथा, चांदण्यात न्हाहून निघालेला माथा, पहाटेच्या प्रहरी सूर्य तेजाच्या सोनेरी झळालीत चमकत होता. दूरवर हिमशिखराच्या शृंखला दृष्टीस पडत होत्या. त्यातील सूर्य तेजात न्हाहून निघालेले माथे अगदी बावनकशी सोन्यात मडलेले, प्रत्यक्ष सोन्याचेही अलंकारिक सौंदर्य फिके पडावे असा देखणे दिसत होते. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती ती म्हणजे... सूर्य प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्या हिमशिखरांनी इतकी उंची गाठली होती की सूर्य तेजाचे कोवळे सोनेरी ऊन, त्यास न्हाऊ घालत होते. आणि त्या सोनेरी किरणांचा अभिषेक होत असतांना, त्याचे विविध पैलू आमच्या नजरेला सुखावत होते. माथ्यावरून सोनेरी झळाळी निथळत होती. 

_____तातडीने सूर्य निघाला होता दऱ्या, खोऱ्यांतील अंधार नाहीसा करण्यासाठी. आम्हांसही आता भाग होते पुढे मार्गक्रमण करण्यासाठी. तोच नाश्त्याचे बिगुल वाजले. भरभर नाश्ता करून, दुपारचे डबे आताच भरून घेतले. बाकी मागे चिल्ल्या पिल्ल्यांची फौज, त्यांच्या सोबत संघमित्रा ताई, आणि आम्ही बत्तीस जण नितीन सरांसोबत, मार्गदर्शक बलजित भाई असे तेहतीस जण साऱ्या गरजू आयुधांसह छोट्या गाड्यांमधून कसोल कडे रवाना झालो. हा गाड्यांचा प्रवास काही संपत नव्हता. वेडीवाकडी वळणं, डोंगर घाटांचे खड्डेमय रस्ते, खाली घळीतून वाहणारी सरिता, वर अंगावर येणारी शिखरं, त्यांवर लटकलेली उंच वृक्ष, बंद काचेतून आत बोचणारी थंडी, आणि नशिबाने मोबाईलवर बोलत गाडी चालवत असलेला ड्रायवर. म्हणजे जीव मुठीत घेऊनच बसावं लागलं गाडीत. प्रवास चालू झाला तो व्यास नदीच्या उंच तिरावरून. भुंतर पर्यंत परतीचा प्रवास करून आमच्या गाड्या डाव्या हातावर कसोल कडे रवाना झाल्या. नदीचे नाव मात्र आता बदलले होते. पार्वती डोंगर घाटावरून खाली खळखळत वाहणारे पार्वती नदीचे पात्र न्याहळत प्रवास चालू होता. डोंगरावर वसलेली गावं मन मोहून टाकत होती. डोंगरघळीतून रोपच्या साहाय्याने सामानाची दळणवळण करणारे पिंजरे शिस्तीत येजा करत होते. खड्यातील रस्त्यांनी जीव नकोसा केला होता. पण देवगिरी वृक्षांच्या अरण्यात प्रवेश केला आणि हायसं वाटलं.


____ते सारं समेटून पहाटेच्या तंद्रीतून एकदाचे सकाळी ९.२० ला कसोलला गाड्या सोडल्या, आणि हुश्श केलं. चार दिवसांसाठी गाड्यांना रामराम केला. समुद्र सपटीपासून ५२१४ फूट उंचीवर असलेलं सौंदर्याने ओतप्रोत असं हे गाव. चांदीसारखे चमचम करणाऱ्या बर्फात झाकलेल्या शिखरांच्या कुशीत वसलेले अगदी मनमोहक. दुरून दिसणारी सरिता आता अगदी जवळ आली होती. उंच उंच वृक्षांच्या सावलीत खळखळून हासत होती. आणि तिच्याच किनारी काही अंतरावर गरम पाण्याचे कुंड. त्या नदी किनारी डोंगर उतारावर केसाळ बकऱ्यांचे चरत असलेले कळप. मधेच त्या डोंगरांना अगदी खालपर्यंत स्पर्श करण्याच्या मोहात आलेले गोरे, सावळे, काळे मेघ.  म्हणूनच कसोलचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. त्यात रमावे म्हणताच अतिरिक्त सामान तिथे ठेऊन ट्रेक सुरू करण्याची बिगुल वाजली.

_____दोन दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजता अनुक्रमे दुचाकी, ट्रेन, विमान, बस, जीपमधून सुरू केलेला प्रवास आज संपला होता. ज्या क्षणाची उत्कटतेने वाट पाहत होतो तो क्षण अगदी समीप होता. ट्रेक सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त सामान कसोलला जमा केले. वैविधतेने नटलेल्या दानशूर निसर्गात पदभ्रमंती करण्याची आतुरता शिगेला पोहोचली होती. उंचच उंच सुचिपर्णी वृक्षांच्या सावलीत खळखळणारी पार्वती आमच्या स्वागतास आसुसलेली होती. या विश्वात देणं म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर निसर्ग सानिध्य हा एकमेव मार्ग आहे. स्पर्धेचं आयुष्य बाजूला सारून आपल्याला त्या निसर्गाने उधळलेल्या प्रत्येक रूपाचे सौंदर्य जाणायला, सोबत जपायला आलो  होतो. प्रपंचाच्या मोहतून मुक्त होऊन निसर्गात रममाण होणार होत. म्हणजे निश्चितच आपल्याला सुखाची अनुभूती येणार होती. पण हिमालयीन ट्रेक म्हंटल की त्या नावानेच छातीत धडकी भरते. त्यातच आम्हा बहुतांशी निसर्ग वेड्यांची ही पहिलीच हिमालयीन ट्रेक. आणि त्याचा प्रत्येय आम्हाला पुढच्या चार दिवसात येणार होता. अतिरिक्त सामान कसोलला सोडून आमची ३१जणांची फौज मोहिमप्रमुख नितीन सर(नाशिक), मुख्य मार्गदर्शक बलजीत भाई(रुमसू), सहायक मार्गदर्शक सुरेश आणि संजू(ग्रहण) यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या रिलीफ कॅम्प ग्रहण कडे रवाना झालो.
____प्रथेप्रमाणे गणपती बाप्पा, आई भवानी, छत्रपती शिवराय यांचा जयजयकार, नदीच्या मंजुळ स्वरात मिसळून आसमंती दुमदुमला. शून्य मनाच्या घुमटात ऊर्जेचा स्रोत घुमला. सह्याद्रीचे रौद्रसुंदर सौंदर्य, तिच्या प्रत्येक वाटांचे शौर्य, इतिहास अभ्यासू पाहणारे शिवप्रेमी, आज शिवशौर्याच्या ऊर्जेने, एका शिस्तीत पार्वती नदीच्या कसोल स्थित पुलावरून, एका रांगेत पुढे निघालो. पाठीवर पाठ पिशव्या, काहींच्या हातात वॉकिंग पोल, सोबत चित्रखेचक यंत्र घेऊन पाऊले एका मागोमाग चालू लागली.  पूल संपताच डाव्या हातावर वळून सारितेच्या बाजूने, भल्या मोठ्या वृक्षांच्या खोडांतून वळसे घेत जाणारी रानवाट धरली. उजव्या हातावर सत्तरच्या कोणातील उतरणीवर केसाळ मेंढ्या, बकऱ्यांचे कळप कोवळ्या उन्हात चरत होते. त्यांची ऊर्जा पाहून एक उर्मी चढली. पावसाने भिजलेली धरा काळीशार दिसत होती. सूर्यप्रकाश जमिनीवर पोहचत नसलेल्या जागी धरा अजून ओलीच होती. काही वेळातच चढण चालू झाली. वन्य प्राणी मंडळाचे काही सुचनापर बोर्ड वाटेत पाहायला मिळाले.

_____दगडांवर रस्त्याच्या दिशेने दाखवलेल्या बाणाच्या दिशेने आम्ही पुढे जात होतो. आम्ही सर्वच जाणत होतो कि, या वाटांवर चालणे आगळीक आहे, पण येथे  ठेवलेले हरेक पाऊल एक ठेव आहे,  तमा कसली सारेच सर्वगुण संपन्न, मिळणारा  आनंद येथे अक्षय आहे.  पुठे नाकात एक ओळखीचा दर्प  रेंगाळू लागला. पुढे जाऊन त्याची प्रचिती आली. जसा पहिल्या पावसात मृदगंध दरवळतो त्याच पद्धतीने हा सुकलेल्या लाकडांचा दर्प होता. निसर्ग कोपाने धारातीर्थी पडलेले बरेच वृक्ष आपल्या नजरेस पडतात. स्थानिकांनी त्याच्या विनियोग म्हणून फळ्या वेरून नेलेल्या, त्यातून जो भुसा जमिनीवर पडलेला असतो, तो पावसात भिजून एक ओळखीचा दर्प परिसरात वाऱ्याबरोबर खेळत असतो. आणि आपल्याला खुणावत असतो.

_____पुढे साधी सरळ जंगलातून वाट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष इथे पहावयास मिळतात. एक तर अगदीच वाटेत मधोमध उंचीवर दुर्मिळ असे काटकोनात वर गेलेले उंच जीर्ण झाड आपल्या दृष्टीस पडते. जणू काही आपल्याला सावली देण्यासाठी त्यांनी मध्यस्ती केली असावी. निसर्गाचा तो अभूतपूर्व आविष्कार आपली निसर्गाशी सलगी आणखीन वाढवते.  उंच वृक्षाच्या पायथ्याशी आपण इटूकले त्याला मागे सोडत पुढे जात असतो, आणि तो वर माथ्यावरून आपल्याला अगदी दूरवर बघत असतो. या पर्वतीय क्षेत्रात खडकांचे अनेक प्रकार दृष्टीस पडतात. त्यातील एक वेगळे म्हणजे जणू लोखंडावर चढलेल्या गंजाची परत असलेला एक पर्वतीय भाग. तसेच काही अंतर चालून गेले की, पार्वतीच्या पत्रात समिल्लीत होणारे ओढे तर कधी खुद्द पार्वतीचे पात्र ओलांडून पुढे जावे लागते. त्यासाठी त्यावर लाकडांचे पूल आपल्याला पहावयास मिळतात. एव्हाना आम्ही पोहचलो होतो, लाकडी पुलावरून नदीचे पात्र ओलांडण्यासाठी. एका मागोमाग अठरा फळ्यांचा हा पूल. खालून धवल कांतीत खळखळ वाहणारा ओढा. आम्हीही एकेक करून पार झालो आणि पुढची वाट धरली.

______काहीसे पुढे चालून गेले की उंच वृक्षांच्या वर एक कातळकडा जणू आपल्या अंगावर घडीत कोसळेल, असल्या प्रकारे लटकलेला आहे. त्याच्या खालून कोसळल्या दरडीने महाकाय वृक्षांना जमीनदोस्त केले आहे. तरीही त्याच वृक्षांनी तो कडा रोखून धरलेला दिसतो. मोठाली दगडे आपल्या वाटेत खिळून बसलेली दिसतात. आज माणसाने जर दगा दिला तर माणूस त्याचे चांगले चिंतीत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण निसर्गाची ही अनोखी खेळी आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढचा बरासचा भाग दरडी कोसळून मोकळा झालेला दिसतो. कातळात जागोजागी पोकळ्या निर्माण झालेल्या आहेत. या हिमालयीन पर्वत शृंखलेत आणि सह्याद्रीत एक महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे ही शृंखला सह्याद्रीच्या मानाने कणखर नाही ती ढिसुळ आहे. सह्याद्रीत दरडी कोसळण्याचे प्रमाण म्हणूनच कमी आहे. इथे प्रत्येक क्षण दरडीमुळे धास्तावलेला असतो. खासकरून माणसाने केलेल्या नदी तटाच्या वरच्या बाजूस डोंगर बसल्या भागात केलेल्या वाटांवर.



____पुढे क्षणभर विश्रांतीसाठी दोन ओढ्यांच्या संगमा जवळ थांबलो. काही चगळन मुखात घेऊन तदनंतर मुख्य प्रवाह डाव्या हातावर सोडून त्याला जोडणाऱ्या प्रवाहाच्या दिशेने कूच केली. प्रवाहा विरुद्ध प्रवाहात वाहने सोपी गोष्ट नसली, तरी बाजूने जाऊन, जिथे उथळ किंव्हा पूल पार करून, आपलं धेय्य गाठता येतं. नाही..!! असो... थकवा तसा काही विशेष वाटत नव्हता. वातावरणातील गारवा गरम झालेल्या शरीराला थंड करत होता. दुरून येणारी खळखळ आता जवळ आली होती. तोच नजरेस दुसरा एक लाकडी पूल पडला. ओढ्यापासून जवळपास वीस फूट उंची असावी, रुंदी तीन फूट आणि लांबी बावीस फूट अधांतरी. तर अखेर तो ओढा पारा करण्यासाठी आम्हास पुलाच्या निमित्ताने एक धागा मिळालाच. तत्पूर्वी रिकाम्या झालेल्या बाटल्या त्या ओढ्यातील मिनरल पाण्याने भरून घेतल्या. या पुलावरून आपण सरसकट सारे जण जाऊ शकत नाही. मार्गदर्शकाच्या निर्देशानुसार दोघे दोघे करून पुलावरून पल्याड पोहचलो. 

तोच लगेच उजव्या हातावर स्थानिकांनी/ट्रेकर्सनी(?) देवरूपाला आणलेले एक वृक्ष आपल्या नजरेस पडते. त्याला अनेक गजाचे त्रिशूल खोपून त्यावर भगव्या, लाल, हिरव्या रंगाचे नक्षीदार दुपट्टी वस्त्र लटकलेले आहेत. ट्रेकर्स / गावकऱ्यांच्या विश्वासाची ती खूण होती. म्हणूनच हिणवण्याचा करंटेपणा न करता आम्ही पुढे मार्गस्थ झालो.  
____तदनंतर पुन्हा काही वेळ चालून गेलो की आपण मुख्य प्रवाहाजवळ पोहचतो. इथे हा प्रवाह ओलांडण्यासाठी ट्रेकच्या पहिल्या दिवसातील हा तिसरा, दोन टप्प्यात असलेला, अगदी ओढ्यालगत असलेला लाकडी पूल आम्ही ओलांडणार होतो. मुख्य प्रवाहाच्या उजवीकडून करत आलेला प्रवास संपून आता डावीकडून चालू होणार होता. नदीचे पात्र अगदी आपल्याच धुंदीत खळखळून वाहत असते, त्याला कोण पार करतंय त्याच्याशी त्याला काहीएक घेणं नसतं.
म्हणूनच जी काही काळजी घ्यायची ती आपल्यालाच घ्यावी लागते. आयुष्यही काही वेगळं नाही. तर पहिला जवळपास पंधरा फुटाचा टप्पा पार करून पुढचा दहा फुटाचा पार करावा लागतो. आमच्या मागाहून निघालेले घोडे आणि खेचर आमची रसद घेऊन त्या जलद प्रवाहातून पार झाले आणि आम्ही काही जण थरथरत्या पावलांनी पार झालो. अगदी लगतच ऐंशीच्या कोणातली काहीशी चढण चढून पुढचा रस्ता धरला, या वाटेत संगमरवरी फरशिशी मिळतेजुळते दगड पाहायला मिळतात. वरून कोसळल्या दरडीतून ते छिन्न विच्छिन्न वाटेत पसरले होते. पाऊस पडून गेल्यामुळे त्यावरून पाय घसरत होते. इथे मातीवर पाय ठेवणे सोईस्कर अन्यथा पडणे आहेच. शेवटी माती ती मातीच. ती दगा देत नाही. या वाटेत आपल्याला बांबूचे नवखे पोगे पाहायला मिळतात. हिमालयात बांबू जास्त प्रमाणात आढळून येतो. दोन तासाची पायपीट करून आम्ही लंच पॉईंटला पोहचलो होतो. नदीची खळखळ सोबत होती. काही नवीन पक्षी येथे पहावयास मिळाले. जेवण उरकून दिड वाजता प्रस्थान केले.

_____हा प्रवास आपल्याला आपल्या शारिरीक क्षमतेची जाणीव करून देत असतो. म्हणायचं झालं तर जगणं म्हणजे घर आणि काम यातच बहुतांशी माणसं गुरफटलेली असतात. त्या चौकटीतून जो बाहेर येऊन निसर्ग सानिध्यात जगतो त्यालाच परम सुखाचा अनुभव येतो. तो शब्दात मांडता येत नाही. तो अनुभवावा लागतो. जिवा लावितो वेड ऐसे निसर्गाचे खोड, फुले चरणी वाहितो, फळे देई तो गोड. आणि तोच अनुभव घेत आम्ही पुढे वरच्या दिशेने सरकत होतो. डाव्या बाजूला कातळाच्या भिंती शेजारून गेलेली पायवाट चालत, उजव्या हातावर घळीतून, समोरून येणारा आखुडसा निर्झर प्रसवताना पाहून मनाला वेड लागुन जाते. मधेच दिसणारा बर्फाच्छादीत डोंगरमाथा पुन्हा पुन्हा शोधण्यात मन हरवून जाते. तोच उजव्या हातावर RS  कॅफे आपले मन पुन्हा जाग्यावर आणून ठेवते. इतक्या उंचीवर हे हॉटेल म्हणजे शर्थच. पण ते पहाडी माणसांचं शौर्य आहे. काही पाऊले तिथे आधीच वळलेली असतात. कसोल ते ग्रहण पर्यंत ट्रेक करणारी आसामी येथे जास्त असते. त्याच्या शेजारीच १००/१५० शेळ्या मेंढ्यानी आपले बस्तान मांडले होते. त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करत पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. आता मेघांनी नभात गर्दी करायला सुरुवात केली होती. पुढे एका वाटेतून दोन वाटा होतात. एक ग्रहण गावाकडे तर एक ग्रहण पुलगिकडे जी गावाच्या बाहेर निघते आम्ही त्याच वाटेने पुढे गेलो. उजवीकडे वळताच डोंगरातून पायाखाली जवळजवळ १५०फूट लांब पर्यंत पाणि प्रसवत असते, त्यातून वाट काढत पुढे निघतो. मग थोडीशी चढणपर केली की खाली उतरून पुन्हा आपण नदीच्या शेजारी पोहचतो.

____ या वाटेत विविध अभूतपूर्व जीर्ण वृक्ष आढळतात. काहींवर जणू कोरून नक्षीकाम केलेले तर काहींवर वरून साज चढवलेले. ते पाहण्यात मन गुंग होऊन जाते. तर वरच्या दिशेने जणू ढोबळ रीतीने रचलेल्या खडकांचे थर अंगावर येण्याची भीती वाटत राहते. सुखावर भीतीचे सावट नको असायला. पुढचा प्रवास शोठींच्या बागेतूनच होतो निळ्या फुलांनी सजलेली वाट पायाखाली तुडवत समोर दिसणाऱ्या, मेघांनी लपवलेल्या बर्फाच्छादित पर्वतांकडे निघालो होतो. तोच पावसाने झिमझीम सुरवात केली. आम्ही काही जणांनी सोडून सर्वांनी पावसाळी चिलखते बाहेर काढून परिधान केली. पण आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याने सर्वांचा भ्रमनिरास केला. काही क्षणातच उतरते ऊन अंगावर पडले. काहीही लागवड केलेली नसताना डोंगर उतारावर विलाथी तारांचे कंपाउंड पाहून अचंबित झालो. पण कदाचित ती लागवड समाजण्याइतपत आमच्या डोळ्यांना ज्ञान नसावे बहुदा. सुरवातीपासून असणारी नदीची खळखळ आता दूर गेली होती. वाटेत आज्जीकडून गुलाबी बुरांस या फुलाचे आल्हादायक सरबत पिऊन साडे चार च्या सुमारास, पर्वत शृंखलेशी तिच्या परिमाणात ढळून, तिचे सौंदर्य मनमंदिरी साठवून, ८४२० फूट उंचीवरील ग्रहण रिलीफ कॅम्प गाठले. तब्बल ३२०६ फूट उंची अवघ्या पाच तासात आम्ही चढून आलो होतो.

____मागे मार्गदर्शक बलजीत भाईला घेऊन चालणारेही काहीसे थकलेले पण आनंदी मुद्रेने कॅम्पवर पोहचले होते. न येऊन सांगता कुणाला आता मागे फिरणे नाहीच. पोहचताक्षणी कैलास रथ टीम ने स्वागत ज्युस दिले. भल्या डोंगराच्या पायथ्याशी, ग्रहण गावापासून लांब पण वेशीआताच तंबू आमच्या स्वागतास सज्ज होते. नितीन सर, बलजीत भाई यांनी साऱ्यांची चौकशी करून सर्वांचे अभिनंदन केले. 



रात्रीचे जेवण उरकण्या आधी गाव टेहाळणीसाठी बाहेर पडलो. पासशेच्या आसपास वस्तीचं असलेलं हे निसर्ग सौंदर्याच्या कुशीत वसलेले हे गाव. शेती, मजुरी आणि ट्रेकर्स साठी पोर्टर ची महत्वपूर्ण भूमिका ही या लोकांची उपजीविकेची साधने. येथील घरांची बांधणी बहुतांशी एकमजली आहे. तळमजल्यावर गुरांसाठी राखीव असते जागा. अत्यंत आकर्षक अशी ही घरे, खास त्यांच्या घरावरील छपरी म्हणजे फरशीचे नाक्षीकामच. इथे वाहने येण्याची वाट नसली तरी प्राथमिक शाळा आहे. पुढच्या शिक्षणासाठी भुंतर किव्हा कसोल ला जावं लागतं. पण शिक्षण घेऊनही इथल्या लोकांना बाहेरगावाचा मोह नाही. आपल्या मातीत जगणारी, स्वच्छंद बागडणारी ही भोळी माणसं. निसर्गाच्या प्रत्येक रुपात ढळणारी. रात्रीचे रुचकर जेवण लवकरच उरकून झोपी गेलो. 




शनिवार २० मे २०१७ ग्रहण ते मीनथाच 
_____सकाळी लवकर वाट धरायची होती. रात्री अचानक दोन वाजता पावसाने मुसळधार सुरवात केली. विजांनी आमचे टेंट उजळून निघाले. गरजणार्या मेघांमुले त्यांना थरकाप सुटला. इथून पुढे उद्या जाणं होईल की नाही या चिंतेच्या सरी कोसळू लागल्या. थंडी कडाडून आली, आणि आता इथेच सारं गोठतय की काय, पुढचा प्रवास आपल्या नशिबात न्हाय. अशी काहीशी गत झाली होती. झोप लागेना पण दया करून पहाटे चार वाजता पावसाने आटपतं घेतलं. मग निवांत झोपलो. साडेपाचला आमची सकाळ झाली. बाहेर निघून पाहतो तर आकाश जरी मोकळं वाटत असलं तरी खालून येणारे शुभ्र ढग आमच्या समोरून हिमशिकरांकडे प्रस्थान करतांना दिसले. जणू आम्हाला ते चुचवत होते की चला बिगी बिगी निघुया. आमच्या तंबूच्या अंगणात सुकलेल्या पानांसह मातीचे अंग भिजून काळेशार पडले होते. वर काल पेक्षा आज बर्फाचे अंगण जास्त पसरलेले दिसले. रात्री वर हिमवर्षाव झाला असल्याची ती खूण होती. रोहीत ने आम्हा सर्वांनकाडून कसरत करवून घेतली. ग्रहण गाव ही एव्हाना जागले होते. शरीरशुद्धी करून चहा, नाश्ता दुपारचं जेवण डब्यात घेऊन आम्ही सारेच सज्ज झालो. काही जणांच्या सॅग वर पोहचवण्यासाठी ज्यांनी पोर्टर्स घेतले होते ते इथून सोबत करणार होते. विशेष म्हणजे त्या साऱ्याच महिला होत्या. पुन्हा त्याच महत्वपूर्ण सूचना श्रवण करून प्रथेप्रमाणे श्री गणेश, आई भवानी,  शिवरायांचा गजर करून आजच्या दिवसाचा टप्पा गाठण्याच्या दिशेने आगेकूच केले.

____आजचा मुक्काम मिन थाच. समुद्र सपाटीपासून १२५०० फूट उंचीवर. म्हणजेच आज ४०८० फुट ६०च्या कोणातील चढाई, दाट सुचिपर्णी वृक्षांच्या गर्दीतून झिकझॅक पद्धतीने चढून पूर्ण करायची होती. इथून मुख्य मार्गदर्शक बलजीत भाई सोबत आज सहायक मार्गदर्शक म्हणून ग्रहण गावातील अनंत सज्ज होता. आणि आम्हा बत्तीस जनांसोबत इथून तेहतीसवा मेंबर जोडला गेला होता तो म्हणजे शेरू. हरहुन्नरी कुत्रा. घड्याळात पावने नऊ वाजले होते. कॅम्पच्या शेजारीच नवे घर उभारणीचे काम अर्ध्यावस्थेत होते. लाकूड आणि दगड यांच्या अनोख्या संगमातून हे काम मनात घर करते. या कोंक्रेटच्या जगात सांधेभरणी साठी सिमेंट तर सोडा पण मातीचाही त्यात उपयोग केलेला नाही. आणि अशी शानदार वास्तू येथे नवे रूप घेऊ पाहते हे त्याचं वैशिष्ठ.

_____कॅम्प सोडताच चढाईस सुरवात होते. वाटेत सामान वर नेण्याचे काम करणारे खेचर/घोडे निवांतपणे चरताना दिसतात. डाव्या हातावर गावाच्या आधी याही कॅम्प आगेकूच करण्यासाठी धावपळीत दिसतो. आम्ही म्हणजेच कैलास रथ आणि याही या दोनच बॅच जोडीने सारपास सर करणार होते. काहींनी इथे हातमोझे अमुक तमुक घ्यायचे ते घेतले आणि वाट धरली. काल जी चाल केली ती चढ-उताराची, सतत नदीच्या आसपास, पण आज नादीचा मागमूसही नव्हता. आज फक्त आणि फक्त चढण होती.

_____या वाटेत सुंदर छोटी छोटी लहान फुलं आपले स्वागत करीत असतात. तरीही चढताना दमछाक होते बरं का..!! रात्री पावसात भिजून गेलेल्या लाकडी भुशाचा दरवळ या भागातही येतो. इथे नैसर्गिक आपत्तीमुळे धारातीर्थी पडलेल्या वृक्षांची वेराई भरपूर प्रमाणात होते. जागोजागी त्याचे अंश आपल्याला पाहायला मिळतात. ही चढण सलग आहे एकच डोंगर. जर वृक्षांचे दाट जंगल नसते आणि समोर चढाई दिसत असती तर शरीरापूर्वी मन थकून गेलं असतं हे मात्र नक्की. माणसाच्या वाटेत अडथळे आणि धेय्य दिसत नसले की माणूस तसा सुसाटच सुटतो म्हणा. कधी एकदा लक्ष गाढतो असं होते. पण एक वर्ग असाही असतो  तो काहीसा रेंगाळतो, खूप लांब आहे, चढण खूप आहे, कधी संपेल, मला नाही जमणार पण अंततः धावपळ करावी लागते ती काही चुकत नाही.

____ हा अजस्त्र महाकाय हिमालय त्याच्या सोबत घोंगावत असलेले अनिश्चित हवामानाचे सावट पाहता येथे आपल्या शारीरिक क्षमतेची खरी परीक्षा असते, सोबतच आपल्यामुळे आपल्या इतर सहकाऱ्यांवर  संकट ओढवून घेण्याची पाळी येऊ नये म्हणून फारच थोड्या, कमी अधिक फरकाने चालणे गरजेचे असते. नियोजित वेळेला कॅम्प गाठणे कधीही सोईचे. हिमालयाचे नियम हे तुम्हाला पाळावेत लागतात, अन्यथा या क्षेत्रात फिरकने म्हणजे धोक्याची घंटा. आणि याची वारंवार सूचना आम्हाला नितीन सर, बलजीत भाई करत होते. त्याच पद्धतीने आमचे चालणे अग्रेसर होते. म्हणूनच कडाडत्या थंडीतही अंग निथळत होते. पुढे दहा मिनिटांचा थांबा घेतलाच. चढ अतीच असल्यामुळे गुरुदादा गाईडला घेऊन कसाबसा धापा टाकत पोहचला. गाईड कमजोर... त्याला गुरू दादा काय करणार म्हणा..!! असो... आमच्या सर्वांच्या पुढे पोर्टर्स महिला येथे पोहचल्या होत्या. त्यांच्या मुखातून सुंदर स्वरांनी बद्ध झालेले त्यांच्या भाषेतील, त्यांच्या गावचे वर्णन सांगणारे गीत त्यांनी आम्हास गाऊन दाखवले. सूर ताल लय यांचा अनोखा संगम त्यांच्या वाणीतून झळकत होता. आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो. त्यांच्या मागे शेरू आम्हा सर्वांवर लक्ष देऊन होता.

_____इथून पुढची चढण तर आणखीन अंगावरची. ती पार करत पुढे निघालो. वाटेत सुर्यनारायनांनी येथे दर्शन दिलें. अवचित भेटतात ते कधी कधी. या गर्द दाट रानात आणि वर मेघांच्या बनात ते हरवून जातात. पक्षांचा सुमधुर आवाज आला की नजर त्याला शोधू लागते. आणि नजरेस पडतो तो डोम कावळा. याचा कसा आवाज सुरेल, कर्कश तो...  इतर पक्षापेक्षा यांचं प्रमाण इथे जास्त. जेवणाची वेळ जवळ आली. खलीपास दिसू लागला. उन्मलेल्या झाडांतून वाट काढत आम्ही लंच पोंइंटला पोहचलो. इथे जो स्थानिक गाईड असतो त्याचेच छोटेखानी तात्पुरते अल्पोहाराचे दुकान असते. मॅगी, ऑम्लेट, चहा, बिस्कीट तेथे उपलब्ध असते. बारा वाजता जेवण झालं. या वाटेत पाणी मिळत नाही म्हणून सोबत पुरेसे पाणी घेतले पाहिजे. काल नदीने साथ सोडली नव्हती मात्र आज ती येथे ऐकायला सुद्धा नव्हती. हे पहाडी आयुष्य असंच असतं. आपण आता बरीसशी उंची गाठलेली असते. थांबल्यामुळे चालून गरम झालेले शरीर आता थंड झाले. थंडी जाणवू लागली. थंडीचा पारा येथे १५℃ होता. जास्त वेळ इथे न दवडता आम्ही निघालो. त्याच खडतर चढणीच्या एकेरी वाटा पायाखाली तुडवल्या जाऊ लागल्या. आमची रसद पोहचविणारे घोडे, खेचरांचेही पाय डळमळू लागले. पण तो शेवट नव्हता, अजून आजच्या दिवसाची बरीच चढ बाकी होती. वाटेतील सौंदर्य त्या शर्थीवर फुंकर घालत होते. हिरव्या सुचिपर्णी वृक्षांनी असंख्य पोपटी टोप्या परिधान केल्या होत्या. पायी पिकल्या पानांचा, पावसात भिजून अगदी मुलायम झालेला गालिचा अंथरून ठेवला होता. त्यावर चालून पुढे जवळपास एक किलोमीटर पसरलेल्या माळरानात आम्ही प्रवेश केला. इथे वृक्षांची गर्दी नसली तरी हरित तृणाचे गालिचे इथे पसरले होते. उजव्या हातावर एक छोटासा निर्झर वाहत होता.

_____चढण अजून संपली नव्हती. वाटेत बरीच झाडे वीज कोसळून उभी चिरलेली तर काही धारातीर्थी पडलेली. त्यांना कुणी वाली नव्हता. काही जळून खाक झालेली. त्या अस्त व्यस्त पडलेल्या वृक्ष नगरीतून राज्य फुलाच्या नगरीत आम्ही प्रवेश केला. आणि संपूर्ण थकवा क्षणात नाहीसा झाला. गुलाबी बुरांस हे हिमाचल प्रदेशाचे राज्यफुल. यात साधारण तीनशे जाती आढळतात. आणि हा १५०० ते ३६०० मीटर उंचीवरच दिसणारा सदाबहार वृक्ष आहे. या फुलाचा विविध औषध बनण्यासाठी वापर केला जातो. तसेच याचे सरबत हृदय विकारांवर फलदायी असते. त्याच्या लाकडाचा वापर कृषिसाहित्य बनवण्यासाठी केला जातो. आणि आमच्या समोर जणू गुलाबी रान खिळले होते. वर खाली जिथे पाहावं तिथे गुलाबी फुलांची मैफिल सजली होती. गुलाबी थंडीसोबतच गुलाबी बुरांस येथे ठाण मांडून बसले होते. म्हणूनच की काय आपल्या कडे थंडीला गुलाबी थंडी म्हणतात, जी येथे वसते.

_____या वस्तीतूनच डाव्या हातावर आमचे लाल रंगाचे तंबू हिरव्या गालिच्यावर उठून दिसत होते. काही दूर अंतरावर काळ्या पाषाणावर हिमाच्छादित शिखरे   रुबाबात दिसत होती. आम्ही अगदी नियोजित वेळेतच दुपारी अडीच वाजता रिलीफ कॅम्प मिन थाच ला पोहचहलो होतो. इथे आसपास पाहिलं तर झाडे आखूड टप्प्याची दिसतात. जसजसे आपण वर जाऊ तसतशी झाडाची उंची कमी होत जाते. आणि पुढे झुडुपांचे राज्य येते. तदनंतर राहतो तो फक्त पायाखाली गवत. त्याहून उंची गाठली की पाषाण, बर्फ, मेघ, वारा, पाऊस, गारा यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

_____इथेही वेलकम ज्यूसने आमचं स्वागत झालं. सर्वांचच कौतुक मोहीम प्रमुख आणि मार्गदर्शक यांनी केलं. सर्वांची आपुलकीने विचारपूस केली. कोणाला काही त्रास होत असेल तर त्वरे कळवायला सांगितलं. सोपी गोष्ट नव्हतीच म्हणा... दोन दिवस सरले होते, तीन दिवसांचा कार्यक्रम शेष होता. आता खरी कसोटी येऊ घातली होती. थंडीने अंग थरथरत होते. चहाची चुस्की काही असर करत नव्हती. पाण्यात हात घालणे कुणालाच मानवत नव्हते. पण शरीर शुद्धीसाठी हे धाडस करावेच लागते. हिमाचल प्रदेशाच्या राज्य फुलांच्या बनात आमचे बस्तान मांडलेले. संध्याकाळ होत आली आणि वर मेघांची गर्दी होऊ लागली. झाडांची गर्दी कमी असल्यामुळे सारं अगदी सुस्पष्ट दिसत होतं. आज आम्हाला, वरचा उद्याचा लंच पॉईंट पण दिसत होता. उद्याचा मार्ग कमी असला तरी कातळकड्यांच्या वस्तीतून करावा लागणार होता. आणि पाऊस जर लागून राहिला तर ते अवघड होऊन बसेल यात शंका नव्हती. आज इतकी उंची गाठूनही अजून आम्ही बरेच खाली होतो हे समोर दिसत होतं

____लवकर पोहोचल्यामुळे आज आराम जरा जास्तीचा मिळणार होता. काहींनी तंबूत आपली आयुधं म्यान करून लंबी ठोकली तर आम्ही काही जण त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर हिरव्या गालिच्यावर खेचर आणि घोडे चरत होते. शेरूही निवांत येऊन बसला होता. त्यासोबत काही वेळ खेळून गवत फुले पाहण्यास खाली गेलो. जणू एखादा बुके ठेवावा असे सजलेले गवत फुलांचे झुपके बहरून आले होते. पावसाची झिमझीम चालू झाली होती. सूर्य मेघांपल्याड कधीचा लपवला होता. पावसाने जोम धरला. सर्वांनी तंबूचा ताबा घेतला. थंडी थरथरू लागली, सोबत आमचे तंबूही. काही वेळेत सारं निवांत झालं.

_____पाऊस, वारा कुठे गेला कुणास ठाऊक. बाहेर एक वेगळाच चैतन्यमय प्रकाश पडल्याची चाहूल लागली. त्या सरशी बाहेर पडलो. मावळतीला सूर्यनारायण उगवले. पडून गेलेल्या पाण्यावर सोनेरी झळाळी आली. रम्य अशी संध्याकाळ उदयास आली. झाडं, वेली, फुले, पाने, माती, पाषाण साऱ्यांवर सोनेरी साज चढला. आमचे तंबू लखलखू लागले. मागे सारपास च्या माथ्यावरील बर्फाच्छादित शिखर मोकळे झाले. काळ्या पाषाणावर बर्फाचे वर्ण मोहक दिसू लागले. त्यात भर म्हणूनच की काय इंद्रधनूची कमान त्यावर स्वार झाली. आणि दृश्य डोळ्यांत साठविण्यासाठी आमची धडपड चालू होती. काय ही निसर्गाची किमया. हिरव्या रंगाचा शालू परिधान करून, सुवर्णाभूषण अलंकार परिधान केलेली धरती, डोई इंद्रधनुचा ताज सजलेला जणू आम्हाला डोकावून पाहत होती. आम्ही इतक्या वर ट्रेकिंग साठी यावं आणि निसर्गाने चक्क आम्हाला स्वर्ण नगरी बहाल करावी. आणि तिच्यातील अप्सरा आम्हास खुणावत राहावी असंच ते रूप. अजून ते काय हवं..! आमच्या आनंदाचा पारावार उरला नाही.

रम्य संध्याकाळी झळाळी तिरप्या उन्हाची
पाण्यावरती नाचत जाते चमक सोन्याची...
डोंगर उतारावरची हिरवी पोपटी झाडी
न्हाऊन निघे घाटमाथ्यावर चढणारी वाडी...
तुषार उडवीत कोसळतो डोंगरावरूनी झरा
मोहरल्या पानावर तळपतो सोनेरी साज खरा...
नभात भरली सोनेरी मेघांची राजसभा
शिखरांनाही आज आहे वावरण्याची मुभा...
मिलाफ होता दोघांचा झाली मेघांची फुले
डोंगरावर साज चढविती सोनकीची मुले...
रोज उधळतो निसर्ग  ऐसे रूप सौंदर्याचे
सोनेरी चैतन्याने मढलेले प्रतीक प्रेमाचे...___नित

_____काही क्षणातच सूर्य अस्त झाला. थंडीने अंगात कापरे भरले. रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. अंततः बोनविटा चा कप हातात घेऊन चांद्रसोबत चांदण्यांनी केलेली गर्दी, आणि त्या प्रकाशात उजळून निघालेले बर्फाच्छादित डोंगर न्याहाळत हातातला कप संपवला. इच्छा नसतानाही ताट, डबे धुवून घेतले.  आणि तंबूत परतून स्लीपिंग बॅग मध्ये निवांत झोपी गेलो. शेरू मात्र रात्रभर जागा असावा. जो कोणी शरीर शुद्धीसाठी उठला त्याची सोबत त्याने केली. मग तो कुठल्याही तंबूतील व्यक्ती असो. जणू तो आम्हसोबतच लहानाचा मोठा झाला होता.

_____या आल्हादायक वातावरणात वावरतांना ट्रेकर्स निसर्गाचे अलिखित नियम पाळतच असतात. कारण त्यांना निसर्गाची किंमत कळलेली असते. ट्रेकर्सना उतुंग शिखरांचा नाद उगाच नसतो. पहाटेच्या वेळी आपण एका उत्तुंग शिखरावर उभं असावं. सूर्याला जन्म देण्याआधी पृथ्वीच्या अंतरंगातून तिचे बाह्यरुप उजळून निघते. पूर्वेस रम्य सुवर्णाची छटा पसरते. नभात केशरी रंगाची मूठ उधळली जाते. सूर्य धरित्रीच्या आड असला, तरी त्याच्या परिसीमेतील अंधार तो चुटकीसरशी पळवून लावतो. अंधारातून मुक्त झालेल्या धरेवर आपली नजर फिरते. उंच ठेंगण्या, दूरवर न संपणाऱ्या पर्वतरंगांचेच अस्तित्व दिसते. त्यावर कंच हिरवा भरजरी शालू ल्यायलेली धरती, सकाळ प्रहरी सुर्यास ओवाळण्यासाठी आतुर असते. एक अद्भुत लावण्यांचा साज तिथे चढला जातो. थंडीने थरथरनाऱ्या अंगावर रोमांच उभे राहते. ते रोमांच धर्तीच्या अनोख्या लावण्य रूपाच्या स्वागतार्ह अंगावर उभे असते. सुर्यतेजाची गाथा तो अदृश्य असतानाही किती ओजस्वी आहे याचे जाण करून देणारे असते.

____धरती आणि अग्नीच्या समागमातून भयाण ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की, अनंत आकाशाला  गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगा, या धरित्रीच्या अंगाखांद्यावर शांत होऊन स्थित झाल्या. त्यातून असंख्य डोंगर- दऱ्या, कातळकडे, चिरे यांनी व्यापलेल्या असंख्य पर्वत शृंखलाच तयार झाल्या. त्यातील काहींनी इतकी उंची गाठली की, नित ते बर्फाच्छादित राहू लागले. त्यात मुकुटमणी शोभावे तसे सूर्य तेजात न्हाहून निघालेला माथे अगदी बावनकशी सोन्यात मडलेले, प्रत्यक्ष सोन्याचेही अलंकारिक सौंदर्य फिके पडावे असे देखणे दिसतात. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते ती म्हणजे... सूर्य प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्या हिमशिखरांनी इतकी उंची गाठली होती की सूर्य तेजाचे कोवळे सोनेरी ऊन, त्यास न्हाऊ घालतात. आणि त्या सोनेरी किरणांचा अभिषेक होत असतांना, त्याचे विविध पैलू आमच्या नजरेला सुखावतात. पिवळे, सोनेरी, केशरी असे विविध रंग उधळले जातात. त्याच्या सर्वांगातून सोनेरी झळाळी निथळत असते. हे सौंदर्य याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतेची परीक्षा देऊन लालसेपोटी इथवर येतो.

२१ मे २०१७ मिनथाच ते नगारू 
____सकाळ सौंदर्याचा मोह धरतीला असतो की सूर्याला हे सांगणे कठीण असले तरी आपल्याला तो मोह भुरळ पाडत असतो हे मात्र नक्की. आम्ही आमच्या लाल तंबूतून बाहेर प्रवेश केला.

आजची सकाळ प्रसन्न. उंच गिरीशिखरांवर दृश्य दिसती अनन्य. 
लालेलाल तंबूतून मुद्रा येई प्रसन्न, पाहण्यास वसुचे रूप अनोखे लावण्य. 

पलीकडील दऱ्यांचे सुरुंग पेरत... उंचच उंच हिमशिखरे... सोनेरी झळालीने सजलेल्या... ढगांच्या राजसभेत... डौलाने विराजित होती... आकाशातील नुकताच जागा झालेला... अथांग नीलिमा लोलुपतेन त्या दृश्यावर वाकला होता. आकाशीतल चांदण्या त्यावर अभिषेक घालत होत्या. त्या सोनेरी चैतन्याने सारं आसमंत मोहरले होते. काही क्षणातच ते सौंदर्य फिके पडू लागले. पूर्वेस डोंगर वस्तीतून सूर्य नारायण उदयास येऊ लागले. सूर्यमालेतील सारेच ज्याच्या सभोवती उत्कट प्रेमभावणेने मोहित होऊन, अनादी अनंत काळापासून अविरत चकरा घालत आहेत.

ऐसा तो भास्कर या धरित्रीच्या प्रेमात पडावा, 
आणि आपले तेज म्यान करून डोंगर कुशीत निद्रिस्त व्हावा. 
रात्रीच्या शीतल विश्रांतीनंतर, नुकताच जसा उदयोन्मुख व्हावा. 
तसा तो वर येतो.

_____असे ते सोज्वळ रूप आमच्या दृष्टीस पडू लागले. रात्रीस ताबा घेतलेल्या, तारे-चांदण्यांनी त्या तेजकुंभाचे स्वागत करून आपली जागा सोडली. संदिग्धतेच्या सांत्वनास येण्यासाठी रात्रीच्या प्रतीक्षेत ते आकाशात विलीन झाले. चंद्रानेही झोपेचं सोंग घेतलं आणि तो अदृश्य झाला. गारवा मात्र आम्हास अजून धरून होता. इतकं प्रेम कसं कुणी कुणावर करू शकतं..!! त्याच्या स्पर्शाने लटलटणारे देह मात्र त्यांस न जुमानता, सुर्योदयाचे ते रमणीय दृष्य पाहण्यात मशगुल होते. सूर्य क्षण प्रतिक्षण वरच्या दिशेने सरकत होता. गजरात सकाळ प्रहरीचे साडे सहा वाजले होते. अंधाराच्या विळख्यात बंदिस्त असलेले आकाश आणि धरती मोकळी झाली.

____पृथ्वीच्या गर्भातून जणू लालबुंद "सौम्य गोंडस" अशा सूर्याचा जन्म झाला, समोर असलेल्या हिमशिखराना सोनेरी ताज चढला, धरित्रीच्या भाळी सौभाग्याचं लेणं विराजमान झालं. हिरव्या शालू नेसलेल्या धारित्रीच्या पदरावर केशरी रंगाची झालर झळाळू लागली. कोवळ्या सोनेरी तिरप्या उन्हाने अगणित आभूषणे लखलखु लागली. सुचिपर्णी वृक्षांचे मनोरे सुंदर दिसू लागले. थंडीची तमा बाळगून त्या साऱ्यांनीच पोपटी टोप्या परिधान केल्या होत्या. रात्री विसवलेल्या सहस्त्र सावल्यांचा आता गराडा पडला होता. त्या आपसात भिडू लागल्या. परंतु ते तेज आमच्या नजरेत साठवण्याची आम्हास फार मुभा नव्हती. काही क्षणातच तो सूर्य तेजस्वी होतो. अंधारास जागवत असलेल्या वसुला प्रकाशाने आता मोकळीक दिली होती. त्याचे तेज आणखीनच प्रखर होऊ लागले.

____रानवाऱ्या सोबतच रान पाखरांनी आपल्या जागा सोडल्या. आसमंती असंख्य सूर निनादु लागले. दरी खोऱ्यातून रानवाटा जाग्या करत सोनेरी प्रकाश वाहू लागला. तो थेट घनघोर दऱ्यांच्या सदनात खोलवर शिरला. आज वातावरण अनुकूल असल्यामुळे त्या पाहण्याचं भाग्य आम्हास लाभलं होत. ते काही क्षणाचे अविस्मरणीय दृश्य मनमोहकच.....स्वर्गलोक जणू.... या भारतभूमीवरील तीसुद्धा निसर्गाची एक अद्भुत लीला आहे. असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे कन्याकुमारीमध्ये सूर्य नारायणाचा उदय आणि अस्त समुद्रामध्ये होतो. त्याचप्रमाणे इथे हिम पर्वत रागांच्या शृंखलेत होतो. अशी सौंदर्याची पखरण नयनी साठवून पुढच्या प्रवासाची तयारीत लागलो. आमच्या समूहात सात महिलाही होत्या, त्यातील एक दोघींची प्रकृती काल थोडी खालावली असली तरी आज ठीक होती. पुरुषही तसे सारे खंबीर नव्हते म्हणा..!! इतक्या उंचीवर वस्ती करणे म्हणजे शर्थ करावीच लागणार. पण आज सकाळी सारं ऑल इस वेल होतं. सकाळी बोचऱ्या गार वाऱ्यासोबत पाण्यात हात घालणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. तरीही शरीरशुद्धी आणि चहा, नाश्ता, डबे यासाठी ते यत्न करणे भागच होते. हिमालयात जर ट्रेकिंग करायची असेल तर सर्वात महत्वाचं काय असेल तर तो आहार. त्यात हलगर्जीपणा केला तर मोठं नुकसान ओढवू शकतं याची वारंवार आम्हाला ताकीद दिली जात होती. इच्छा नसली तरी बळजबरीने योग्य तो आहार घेणे अनिवार्य असते.


______आणि त्या नियमांचं तंतोतंत पालन करून आजचा कमी पण अति खडतर पल्ला आम्ही गाठणार होतो. तत्पूर्वी आज एक तक्रार नोंदवली गेली आणि मितेनला सर्वांसमक्ष उभा करून जाब विचारण्यात आला. थोड्याश्या बावरलेल्या प्रश्नार्थक भावमुद्रेत तो सामोरा गेला. सर्वजण अगदीच गंभीर मुद्रेत त्याच्याकडे पाहू लागले. वैरी मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि अनपेक्षितपणे केक भरवून त्याच्यावर त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. काही क्षण गंभीर असलेले वातावरण क्षणार्धात हर्षोउल्हासाने प्रफुल्लित झाले.

_____रोजप्रमाणे आजही काही महत्वपूर्ण सुचना केल्या गेल्या. आज पल्ला कमी असला तरी अति खडतर आणि रोज दुपारनंतर बदलणारे हवामान पाहता नियोजित वेळात नगारू रिलीफ कॅम्प गाठणे आवश्यक होते याची जाणीव करून दिली गेली. आज मोहीम प्रमुख नितीन सर, मुख्य मार्गदर्शक बलजीत भाई, सोबत ग्रहण वासी सहायक मार्गदर्शक चेतन आणि मुकेश यांच्या मार्गदर्शनाखाली नगारू गाठणार होतो. सकाळी साडे आठ वाजता चढाई चालू केली. काल सामान पोहचहवून खाली ग्रहण ला गेलेल्या पोटर्स महिला आज सकाळीच पुन्हा इथे हजर झाल्या होत्या. शेरू सुद्धा तयारीत होता.

______आज आम्ही हा दुसरा कॅम्प सोडत असताना काल संध्याकाळी पाहिलेलं ते निसर्गाचं अद्भुत नयनरम्य रूप नजरेसमोर तरळू लागलं. किती मनमोहक, शब्दात मांडता येणार नाही. पोटर्स महिलांनी वाट धरली. मागोमाग आम्ही. काल राज्यफुलांच्या वस्तीत आम्ही राहिलो, त्याच फुलझाडांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही चढ उताराच्या माळरानात पोहचलो. डाव्या हातावर याही कॅम्प आजही आमच्या माघूनच निघणार याची चिन्हे दिसत होती. हिमशिखरांवर हळूहळू मेघ जमा होऊ लागले होते. आजचा मार्ग ठेंगण्या वृक्षातून सुरू होऊन पुढे वृक्ष नगरी संपणार होती. काही झुडपे आणि काळा गर्द तांबूस कणखर वजा ढिसुळ दगडांच्या नगरीत आमचा प्रवास चालू होणार होता. कसलेल्या वाटा मागे सोडत काहीसे वर चढून आखूड झाडांच्या वस्तीतून दमछाक करत आम्ही नगारुच्या दिशेने, पुढे कोसळलेल्या दरडीच्या गाऱ्याड्यातून वाट काढत पुढे निघालो.

_____काळ्या कभिन्न पाषाणी, साज हिरवा चढतो, निसर्गवेड्या माणसाचा, तंबू त्यावर सजतो, पाऊल पुढे धेर्याने, नित अचूक टाकतो, शिवशौर्याच्या उर्मीने, हिमशिखरांवर चढतो.  एक निसर्गाची अद्भूत ठेवण मागे सोडून आपण प्रवास करत असतो. आता उन्हे वर आली होती. चढण अंगावरची असल्याने दमछाक पाचवीला पुजलेली. सह्याद्रीत जेव्हा आम्ही ट्रेक करतो तेव्हा पाऊस सोबतीला असला की हायसं वाटतं. पण इथे या उंचीवरच्या ढिसुळ डोंगरवाट सर करतांना तो नसेल तितकेच सोईचे असे वाटते. गारवा तर असतोच. काही चढण वर चढून गेलो की आपण अगदी तुडवल्या डोंगराच्या माथ्यावर पोहचतो.

_____या ट्रेक मध्ये असे बरेच डोंगरमाथे आपण पार करून आलेलो असतोच म्हणा..!! पण आज सारी वृक्षनगरी आपण मागे सोडलेली असते आणि म्हणूनच त्यांची जाणीव आणि दर्शन आपणास येथे होत असते. आपण त्यावर चढलो की उजव्या हातावर खाली हिरव्या गालिच्यावर मैदानात रत्तापाणीला विसावलेले टेंट मनात घर करतात. इथेच डाव्या हातावर एक देवडगड पुजलेला दिसतो, त्यावर बुरांशची फुले वाहिलेली, काही भगवे सोन झालरीचे वस्त्र. रत्तापाणीच्या वर सारपास माथ्यावरील हिमाच्छादित शिखर मोहून टाकतो.

_____इथून पुढची चढण थेट अंगावरची आहे. इथून नगारुचे शिखर जणू राजगडचा बालेकिल्लाच. तद्वतच अजून चढण किती याची अनुभूती येऊन जाते. आणि अश्या चढाईवर मात्र त्या पोटर्स महिला भरभर चालून पुढे जात होत्या. खरंतर त्यांचा हेवा वाटे. जिथे वृक्ष नांदत नाही तेथे श्वास घेणे थोडे कठीण जात होते. ऑक्सीजनची कमतरता भासत जाते.  वाटेत सतत काहींना काही चगळन, पाणी चालूच होते मात्र आजचा पल्ला कमी असूनही पावले रेंगाळत होती. त्यात वाट एकेरी.

_____तुम्हाला चालता चालता कुणाला मागे सोडून जाण्याची मुभा नाही. अश्यावेळी मागच्याने म्हणावं, चला की राव आता पुढे चला..!! तेव्हा जर सहजासहजी आपण पुढे गेलो असतो तर किती बरं झालं असतं नाही..!! पण रेंगाळणारा थकलेला असतो आणि सांगणारा जोश मधे. मग त्याला वाट करून दिलेली बरी शेवटी सर्वांचं ध्येय एकच असल्यामुळे कोण पुढे गेलं काय नि मागे राहिलं काय. मात्र मोहीमप्रमुख सर्वाना घेऊनच सोबत चालत असतो. हे वेळोवेळी नितीन सरांनी मागच्या दोन दिवसांत सिद्ध केलं होतं म्हणून कुणासही भीती वाटण्याचे कारण नव्हते. मी आजवर असेही प्रमुख पाहिलेले आहेत जे फक्त स्वतः आणि आपल्या भावकीच्या लोकांसोबत पुढे निघून बाकीच्यांना मागे सोडतात. ही वृत्ती ठीक नाही. आपल्याला जर स्वहित आणि सर्वहीत यातला फरक कळत नसेल तर असे पद भूषविण्याचा आपल्याला काडीमात्र अधिकार नाही.

_____आज आमची रसद पोहचविनारे घोडे आणि खेचर लंच पॉईंट पर्यंतच आमची साथ देणार होते. करण पुढचा मार्ग अति खडतर होता. नेहमीप्रमाणे आजही ते आमच्या पुढे निघून गेले. वातावरणात कमालीचा गारवा असल्यामुळे आम्हाला घाम निघत नव्हता मात्र पुढील डोंगरवटाना तो निघालेला दिसत होता. आणि म्हणूच वाटेत मधेच चिखल झाला होता. गवत फुले, विविध रंगबेरंगी फुलांनी वाटा सजलेल्या असतांनाही दमछाक होत होती. आणि बरोबर १०.५०ला पुढे नगारुवरून खाली कोसळल्यागत अलिप्त अशा बर्फास पाहून आपण हिमशिखरांच्या प्रत्यक्ष पायथ्याला पोहोचल्याची अनुभूती आली.

_____आता खरा हिमशिखरांचा प्रवास चालू होणार म्हणून उत्सुकता वाढली. ११.१०ला लंच कॅम्पला पोहचहलो. इथंही छोटेखानी अल्पोहाराचे व्यवस्था आहे. सर्वांनी आपले डब्बे रिकामी केले. कावलेल्या पोटाला आता तरतरी आली. अंगाची थरथर मात्र थांबली नाही, ती अजूनच वाढली होती. लवकरात लवकर नगारु कॅम्प गाठणे गरजेचे होते. आम्ही निर्देशानुसार पुढच्या प्रवासाला निघालो. चढणीचा सिलसिला चालू झाला. एक टप्पा पार करून दुसऱ्या दिशेला गेलो. डाव्या हातावर खाली खोल नजर रुतली. आमचा कालचा कॅम्प आमच्या नजरेत दिसला, त्याहून खाली खोल नजर गेली आणि ग्रहण गाव नजरेस पडले. म्हणजे एव्हाना आम्ही इतक्या उंचीवर आणि अशा ठिकाणी पोहचलो होतो. जेथून आमचे दोन्ही थांबे आम्हाला दिसत होते अगदी दूर खाली डोंगरांच्या कोंदणात खालच्या बाजूला. यावरून तुम्हाला कल्पना येईलच की ही बाजू किती खडतर होती.

_____पण प्रवास अजून संपला नव्हता. पुढची वाट अति कष्टाची होती. त्याहून अधिक ती सावधपणे चढणे अनिवार्य होते. चढणीमुळे धाप लागणे साहजिक होते. अशावेळी शक्यतो नाकाने श्वास घेणे हिताचे. इथल्या वाटाच मुळात दमछाक होऊ नये आणि आपण घसरू नये म्हणून नागमोडी वळणाच्या. पण म्हणून चढण चुकत नसते. उंच शिखरांचा नाद सांगा कुणास नसतो, थकून जातात वाट येथे श्वासही कोंडतो. तिथे आम्ही शर्थ करत होतो. जसजसे वर जाऊ तसतसे खलील दोन्ही कॅम्प ठिकाणे अधिक मोकळी दिसू लागतात. प्रत्येक पाऊल दगडांच्या गर्दीतून पुढे न्यावे लागते. कधी ठेंगणे तर कधी आपल्याहून उंच.

_____इथल्या पाषाणाला भेदत पिवळ्या फुलांचा साज त्यावर भलताच चढला होता. डाव्या हातावर सतत तत्पर असलेला भयाण खोल असा डोंगर उतार जो वृक्षांच्या गावात जाऊन वृक्षांवर उतरताना भासतो. त्यावर असलेले पिवळ्या गावतांचे पुंजके खाली गावाला डोकावुन न्याहाळताना दिसतात. पुढे जाताना मागे पाठीवरची बॅग कुठे लागत नाही याची सतत काळजी घ्यावी लागते. वर चालणाऱ्याच्या ध्यानीमनी नसताना अवचित एखादा दगड खाली येऊ शकतो हे ही पाहणे गरजेचे. चढण आता फारशी राहिली नसली तरी कधी एकदा कॅम्पवर पोहचतो याची ओढ लागते. वर कड्यावरून येणारा कावळ्यांचा कर्कश आवाज मनाला भिस्त घालतो. इतक्या उंचीवर गिधाडांसोबत डोम कावळ्यांचे अस्तित्व म्हणजे उगाच नाही हे सांगायची गरज नाही. नगारुचा डोंगर म्हणजे एक अजस्त्र किल्लाच जणू. त्याच्या जणू बांधलेल्या चिरा चिरातून पिकलेल्या गवताने आपले  संपूर्ण शरीर वाऱ्यावर फरफरत ठेवलेले. तुटललेला प्रत्येक भाग जणू आपल्या अंगावर झेपावलेला, तुटून पडलेली आपल्या बाह्यांगासाठी अंतरीचे शल्य प्रसवू पाहणारा. पाहावे तर थरारक तितकेच नयनरम्यही. त्याचे मोजमाप प्रत्येकाच्या नजरेतुन वेगवेगळे.


_____जसे पुढे जाल तसे आता दगडाशी हात मिळवण्याखेरीज पर्याय राहत नाही. त्याची हातमिळवणी करत करत वर चढायचे म्हणजे तो सोयीने वर घेतो. आणि आम्ही पोहचतो नगारु कॅम्पच्या शिखरावर. त्याचे सौंदर्य आणखीन खुलून दिसू लागते. चहूबाजूला ऊन सावलीच्या खेळात वसू गीत गात खेळताना दिसते, अगदी बहरलेली, नटलेली, सौंदर्यवती. कुठेच समान प्रदेश नजरेत पडत नाही. अपवाद आमच्या कॅम्प पर्यंतचा भाग सोडला तर. पर्वत शृंखलेशी मालिकाच चौफेर दिसते. सुचूपर्णी वृक्षांच्या सुव्यवस्थित रांगा. गर्द हिरवी झाडे, पाषाण अलंकृत, हिमाच्छादित तर काही नवतरु, पिकल्या गावतांनी गुंफलेल्या शिळांचे डोंगर अशी बरीच रूप आपल्याला पहावयास मिळतात.  आपण किती उंचावर आहोत याचा प्रत्येय इथे चांगलाच येतो. ज्या शिखरांना पाहून खालून धस झालं होतं ती गिरीशिखरं आम्ही येथून हुडकून काढत होतो. पाषाण शिखरावरून ओघळणारे बर्फ मानमोहित करत होते. पायी अंथरलेला गालिचा शय्येसम भासत होता. १३.३५ ला आम्ही वर पोहचहलो होतो. खाली डाव्या हातावर शीला गाव आणि गावातील रस्ते मनमोहक दिसत होते. मोबाईलने इथे घरघरायला सुरवात केली. जो तो आपली खुशाली आणि येथील सौंदर्य वर्णू लागला. आणि आम्ही ते सौंदर्य नजरेत सामावून घेण्यासाठी निसर्गाने अंथरलेल्या गालिच्यावर काही क्षण निवांत पहुडलो.

____मेघांनी भलतीच गर्दी केली होती. अगदी आमच्या जवळच ते खेळ खेळत होते. बोचरा वारा त्यांना खेळवत होता आणि आमच्या अंगावर रोमांच उभे होत होते. नगारु कॅम्पची उंची म्हणाल तर १३२०० फूट. अविश्वसनीय अशा उंचीवर आम्ही पोहचलो होतो. वातावरणात भलतीच शीतलता होती. त्या शितलतेतून त्याचा स्वभावही झळकू लागला होता. इथे वातावरण क्षणात बदलते. कुणाची गय करणे त्याच्या स्वभावातच नाही. म्हणूनच आम्हाला कॅम्प गाठण्याची सूचना केली गेली. गारांचा पाऊस चालू झाला. अगदी लहान म्हणजे जणू त्या बाष्परुप मेघांतून कच्चे साबुदाणे वसुवर कोसळू लागले. आमचे या पद्धतीने इथे स्वागत होईल याची कल्पनाही आम्हास नव्हती. भरभर आम्ही कॅम्प गाठून सारेजण म्यान झालो.

____तांबूस गावतांनी झाकलेल्या धरेवर शुभ्र साबुदाण्याची रांगोळी सजु लागली. वाऱ्याने ठेका धरला. पाहता पाहता त्यांच्या आकारात लक्षणीय वाढ झाली. जणू या शीतल वातावरणात वर कुणी कढई घेऊन बसला असावा आणि ते साबुदाणे त्यातून परतून खाली फेकत असावा. त्याचा आकार जरी मोठं असला तरी ते मात्र शीतल होते. दहा ते बारा mm आकारमानाचे गोळे दणादण आदळू लागले. टेंटवर कुणी अगणित संख्येने मारा करतोय असे भासू लागलें. बाहेर अक्षरशा त्यांचा खच पडला. बाहेर असंख्य शस्त्रांचा मारा होत आहे आणि आम्ही तंबूत म्यान होऊन असाह्य बसलो आहोत. निसर्गाची ही अद्भुत किमया बाहेर जाऊन पाहणे आम्हास धजावत नाही. अकल्पित होतं सारं.  पाण्यावर पडून जसे पावसाचे थेंब वर फेकले जातात आणि पुन्हा त्यात मिसळून जातात अगदी त्याच पद्धतीने हे गोळे धारित्रीवर खेळू होते. पहिल्यांदाच हा अनुभव घेताना एक विलक्षण अनुभूतीचा प्रत्येय येत होता. टेंटवर बर्फाची परत जमा झाली. टेंट झुकू लागले. कैलास रथ च्या जवानांनी ती परत काढून टाकली आणि पुन्हा टेंट पूर्ववत केले. अश्या वातावरणात वीस दिवसांपासून त्यांचा कॅम्प इथे ट्रेकर्सच्या सेवेसाठी सज्ज आहे हे लक्षणीय.

____जवळजवळ दोन तास हा गारांचा पाऊस कोसळला म्हणण्यापेक्षा वसू सौंदर्यात भर टाकण्यासाठी त्यांनी असंख्य यातना सहन केल्या असाव्यात आणि सौंदर्यवतीने त्या झेलल्या असाव्यात. ते गाणं आहे ना..! अरे संसार संसार... जवा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. सिद्धी हवी असेल तर सिद्धता अंगी असणे गरजेचे आहे. आणि अशा वसू मेघांच्या थरारक खेळात आम्ही टेंटमध्ये म्यान झालो असलो तरी दुसऱ्या समूहातील मागाहून येणाऱ्या ट्रेकर्सची काय परिस्तिथी असेल ही कल्पनाच भयावह होती.

____पण तदनंतर अगदी भुसभुशीत कापसासारखा बर्फ पडू लागला, जणू दिलेल्या जखमेवर मलम लावण्याचे काम मेघ करू लागले. आम्ही सर्वानीही टेंटचा ताबा सोडला. बाहेर पडलो, तांबूस वर्ण असलेली वसू आता बर्फाच्छादित झाली होती. पाऊले त्या बर्फात खोलवर रुतू लागली. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यात मनमौजी आम्ही बागडू लागलो. चित्र खेचक यंत्रात ते रूप बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू लागलो. अद्भुत, अवर्णनीय, अकल्पित यांचा त्रिवेणी संगम होता तो. जो शब्दात बंदिस्त करणे कठीण. पण तत्पूर्वी छातीत धस्स झालं होतं हे न विसरता येणारं सत्य आहे. १३२०० फूट उंचीवर आम्ही गिरीशिखरांच्या माथ्यावर, मेघांच्या गृहस्तीत इवल्याश्या तंबूत बसलोय आणि कानठळ्या फोडणारे आवाज करून मेघ विजेचा, गारांचा, पावसाचा प्रहार करून आम्हास भ्याव घालू लागले. हा अनुभव अविस्मरनियच. आज थंडी आपल्याशी कुस्ती खेळणार हे निश्चित असलं तरी आपण तिला हरवण्याचा नादात पडायचं नाही पण तिला जिंकूनही द्यायचं नाही ही खूणगाठ मनाशी बांधली.

_____आज हिमालयीन ट्रेकिंग म्हंटली की संपूर्ण जगातील व्यक्ती इथे ट्रेकिंग साठी येत असतात. आणि आम्ही आज त्यांच्याच पंगतीत बसलोय याच्या अत्यानंद आहे. ही सुरवात का असेना पण आम्ही आमचं पाऊल त्या दिशेने नेत आहोत जेथे स्वर्गानुभूती प्राप्त होते. असंख्य नैसर्गिक लीला येथे पहावयास मिळतात. आपल्या रोजमरे जिंदगीतून काही वेळ इथे देऊन उच्चकोटीचे समाधान आपल्याला प्राप्त होण्याचे नक्कीच हे ठिकाण आहे. महान ऋषीमुनीं, तपस्वी यांनी या जागेचं चयन उगाच केलेलं नाही. साधनेतून दैवप्राप्ती, समाधानी राहण्यासाठी त्यांनी या देवभूमीचा आसरा घेतला आणि ते महान झाले. म्हणूनच हिमालयाला देवभूमी असेही म्हटले जाते.

_____वातावरण काहीसे शांत झाले. एकावर सारे चहासाठी जमा झालो. सोबत नास्ता केला. नेहमीप्रमाणे सर्वांचे कौतुक केले गेले. एक दोघांना थोडसा त्रास झाला होता त्यांची विचारपूस केली. कॅम्प वर गेल्या आठ तारखेपासून इथेच असणारे कॅम्प हेड रिम्पू ठाकूर यांनी मार्गदर्शन केलं. पाटील काकाचं खासकरून कौतुक केलं. आखडू पाहणारा गारवा अंगाला झोंबत होता. पाच अंशावर पारा खाली उतरला होता. रात्री किती उतरेल याची भीती वाटून राहिली. तरीही आजूबाजूला असलेलं आल्हादायक वातावरण त्याहून जास्त मनाचा ताबा घेत होते.
   
काही काळ त्या गिरीशिखरांशी खेळणाऱ्या मेघांचे खेळ पाहण्यात दंग झालो. सोबत शेरू होताच. त्याने काही आमची साथ सोडली नव्हती. काही खाण्याची इच्छा नसतानाही काही वेळाने जबरदस्तीने रुचकर जेवणाचा स्वाद घेतला. बर्फानेच ताट धुवून घेतले. बोनविटा घेऊन उबेच्या पिशवीत घुसून निद्रिस्त झालो. आता फक्त एक रात्र आणि एक दिवस मग आपण आपल्या नेहमीच्या वातावरणात वावरणार होतो. उद्याचा दिवस जर नशिबाने चांगला असेल तरच आम्ही सारपास पार करू शकणार होतो. अन्यथा येथूनही परतीला गेलेली उदाहरणे आम्ही ऐकून होतो. बाजूच्या टेंटमध्ये गाण्यांची मैफिल सजली होती. या ट्रेकला वातावरण असे होते की कॅम्प फायर करायला वेळ साधता आली नाही. पण उद्याचा दिवस आणि मोहीम फत्ते, त्याच विचारात झोप लागली.

२२ मे २०१७ नगारू  ते बिस्केरी थाच 
_____आज मात्र गाढ झोपेत असतांना पहाटे ४ वाजता वेकउप कॉल आला. पंधरा मिनिटे तसेच रेंगाळून शेवटी उठलो. शरीरशुद्धी आटपून चहा सोबत नास्ता घेतला. वातावरणात भलताच गारवा होता. अंग थरथरत होते. हलकासा स्नोफॉल चालू झाला होता. पण आज खरी कसोटी होती. सारेच सज्ज झाले. नितीन सरांनी आज फक्त आणि फक्त मुख्य मार्गदर्शक बलजीत भाईंच्या निर्देशानुसारच आजचा ट्रेक पूर्ण होईल हे निक्षून सांगितले. आजचा प्रवास हा जवळजवळ आठ ते दहा तासांचा होता. आणि त्यात हवामानाची साथ असणे नितांत गरजेचे होते. जोपर्यंत आपण सारपास पार करत नाहीत तोपर्यंत काहीही घडू शकते हे आम्हास सांगण्यात आले. मनात उत्सुकते बरोबरच एक सौम्य भीती जागृत झाली. पण जर आपण सारेच सोबत असलो तरी कुठलाही संघर्ष आपल्याला करता येतो आणि धेय्य गाठता येते. त्यासाठी सर्वांनी सोबत चालणे गरजेचे होते.

_____जे नियमित मागे राहिले ते आणि त्यांच्या पुढे आमच्या खांद्याला खांदा लावून सोबत चालणाऱ्या सर्व महिला सर्वांच्या पुढे असतील या हेतूने पुढची वाटचाल चालू झाली. सकाळी सहा वाजता आम्ही बर्फाच्या शय्येवरून चालण्यास सुरवात केली. प्रथम पोटर्स महिला, सोबत आज सहाय्यक मार्गदर्शक गगन, जिवा आणि राहुल जे ग्रहण गावचे रहिवाशी यांच्या संगतीने आम्ही प्रवास चालू केला. सर्वात मागे बलजीतजी उतार सांभाळत होते. एव्हाना याही ग्रुप ने चढाई चालू केली होती. आम्हीही त्यांच्या मागोमाग पोहचलो. खूपच अवघड अशी वाट. त्यात बर्फामुळे स्लीपरी झालेली. जसजसे ऊन पडू लागले तशी आणखीनच स्लीपरी होऊ लागली. पुढे जिवा त्या बर्फात वाट करत आगेकूच करत होता. मागोमाग आम्ही. पुढचा समूह जरासा स्लो असल्याने मागे आम्हाला बराच वेळ ताटकळत राहावं लागलं. शेवटी एक अगदीच अंगावरची चढण बर्फाच्छादित दगडांच्या बेचक्यातून त्यांची हात मिळवणी करत पार झालो.

_____हो नाय करता करता आम्ही तब्बल दोन तासाच्या शर्थीने सारपास माथ्यावर पोहचलो... (१३८४५ फूट) ते रुपडं पाहून सुन्न झालो. मी स्वतःला एक चिमटा काढून पहिला पण मी कुठल्या दुनियेत आता येऊन पोहोचलोय या तंद्रीत आताना मला तो जाणवला नाही. वातावरण शांत झाले होते... सर्वांनी एकच जल्लोष केला... घोषणांनी आसमंत दुमदुमले... आणि  माझी तंद्री तुटली. सर्वांच्या चेहऱ्यावर तृप्ततेची चमक दिसू लागली... काही महिन्यांपूर्वी स्वप्नवत असलेल्या डोंगरमाथ्यावर आज आम्ही आमची पाऊले रोवली होती. हा आमचा आत्मविश्वास आणि आमच्यावर मोहिमप्रमुख नितीन सर आणि संघमित्रा ताईंनी ठेवलेला विश्वास यांचा विजय होता. या सौंदर्यवती वसुच्या स्वर्गद्वारातून आम्ही प्रवेश केला होता...
प्रवेश द्वारापाशी असलेले सरोवर गोठले होते... 
तयावर पांघरली होती भुसभुशीत हिमाची सफेद चादर... 
सर्वस्व गमावून दिली मुभा त्यानी करण्या आम्हास वावर...
पावलांचे ठसे त्यावर उमटू लागले....
हर्ष मनाने गीत नवे गाऊ लागले...
बेधुंद होऊन पावले नाचू लागली...
रिंगण करून सौंदर्य पाहू लागली...
अनोखे लावण्य येथे बहरलेले...
सर्वांग आमचे आज मोहरलेले...
न जावे राहावे आम्ही इथेच वाटे...
गुज सृष्टीचे सारे जणू इथेच दाटे...
बदलाचे वारे येथे घोंगवू लागले...
मेघ नभात सारे गर्दी करू लागले...
चाहूल होती कसली जाणती सर्व...
ध्येय पूर्तीचा कसा तो स्पर्षेल गर्व...

 चारही बाजुंनी मनमोहक बर्फाच्छादित शिखरांची शृंखला रूपवान दिसत होती... त्याचे ओसंडून वाहणारे अलौकिक सौंदर्य एका वेगळ्याच दुनियेचा भास करून देत होते... फिल्मी दुनियेत पाहिलेले नरण्यमय दृश्य आज पुढ्यात जणू लोटांगण घालत होते... त्यात भासविलेला स्वर्ग जणू येथे अवतरीत झाला होता... ते सौंदर्य न्याहाळण्यासाठी निसर्गानेही आज आम्हास मुभा दिली होती.

हिमागीरींचा रुबाब जरी
भगव्याचा डौलच भारी
सर करुनी  सारपास
शिवशौर्याने दिली सलामी.


____तोच त्या सौंदर्यालाही ज्याची भुरळ पडावी त्यावर मुकुटमणी शोभावा असा तेजोमय भगवा ध्वज शिवशौर्यानी आसमंती फडकवला. मराठी अस्मितेचे प्रतीक असणारा हा भव्य ध्वज हिमगिरीच्या माथ्यावर लहरू लागला. वाऱ्याने सरसावून त्यास झेलून घेतले. उपस्थित सर्यांच्याच अंगात चैतन्य सळसळले. शिवस्तुस्तीसुमने मुखातून वदू लागली. ध्येयमंत्र, राष्ट्रगीताने ध्वजवंदना केली. हा केशरी ध्वज जेव्हा आसमंती लहरतो तेव्हा ऐक्याची उसळी उठते. बालकवींच्या भाषेत सांगायचे झाले तर, गुप्त रिपूचा जडला भिडला विराच्या हृदयाशी भाला... दबा धरूनिया बसला छावा वीर केशरी खवळुनी यावा... असे हे याचे सामर्थ्य. सोबतस याही समूहांनी तिरंग्यास मानवंदना दिली. आपल्या आयुष्यातले हे सोनेरी क्षण जो तो आपल्या चित्रखेचक यंत्रात टिपू लागला.

_____भय इथले संपत  नसले, वाटाही म्यान असल्या, तरी ओढ सौंदर्याची, मज पुढे नेत जाते. वाट इथे संपली नव्हती. इथून खरंतर सुरवात होते. हा बर्फाच्छादित सरोवर पार करण्याची. आणि इथले वातावरण कुणालाही जुमानत नाही. त्याच्या सापट्यात सापडलेला मग तो कुणीही असो त्याची खबर फक्त त्या निसर्गासच असते. म्हणून त्याचे रौद्र रूप धारण करण्याअगोदर इथून काढता पाय घेणे सोईचे असे सांगून मार्गदर्शकांनी पुढच्या वाटेकडे बोट दाखवले. पायी बर्फ तुडवत आम्ही मार्गस्थ झालो. पुढे काहीसा उतार लागतो. त्यावर दगडांची थोडी वस्ती, बर्फाची थोडी गस्ती, वर आमच्या पावलांची मस्ती करत आम्ही उतरलो. थोडीफार पावलं सरकत होती. पण सुव्यवस्थित कँटीन पाशी आम्ही पोहचलो.

_____काही वेळ इथे विश्रांती घेऊन पुढे निघालो. काही अंतर चालून गेल्यावर खाली बर्फाखालून वाहणारा एक गोंडस झरा आपली वाट रोखतो. तिथे रिकामी झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि चढणीला सुरवात केली. जिवा त्या बर्फात वाट करत पुढे चालत होता. तोवर वरून पोटर्स महिला लगबगीने पुढे जातांना दिसत होत्या. एक टेकडीवर पोहचल्यावर इथे सर्व येण्याची वाट पाहिली आणि सारे येताच पुन्हा मार्गस्थ झालो. वाऱ्याने आपले दार उघडले असावे बहुतेक गार वारा अंगाला बोचू लागला. शेरू आमच्या सोबतच होता.
पुढे बर्फाच्या उतरणीवरून मध्यात संघर्षमय वाट होती. प्रत्येक पाऊला सोबत विश्वास हवा होता.



___पण प्रत्येक पावलागणिक दिसणारे सौंदर्य काय वर्णावे...
रोज बहरतो ऋतू येथे, पाषाणाला पाझर फुटतो, 
त्या पाषाणावर हक्क माझा, उत्तुंग हिमालय नाद करतो... 
हलकेच जाता मी त्याच्यावर, मेघांसवे तो गजर करतो,
नाद खुळा रे शिवमावळ्याचा, उत्तुंग हिमालय तो सर करतो...     

___तत्पूर्वी वसुचे सुंदर रूप मन मोहून टाकत होते. हिरव्या गालिच्यावर बर्फाने सुरेख रांगोळी घातलेली. पण ही वाट साठच्या कोणावर मध्यंतरी वसलेली. इथून घसरले की थेट बर्फ़ाच्या वस्तीतून खाली वृक्षाच्या वस्तीत. आणि ते कुणालाच मानवणारे नव्हते म्हणून पावले अदबीने टाकणे गरजेचे होते.

आपण टाकत असलेल्या प्रत्येक पावलावर आपला विश्वास असला पाहिजे तरच आपण पुढे सरकू शकतो अन्यथा खाली. इतक्यात उन्हे ही बर्फावर खेळण्यास खाली उतरली. आजूबाजूचे सौंदर्य आणखीन खुलून दिसू लागले.
 
जसजसे पुढे जाऊ लागलो तशी वाट आणखीन अवघड होऊ लागली. उतार वाढू लागला आणि आम्ही उताराला कापत पुढे जात होतो. बर्फ वितळून गेलेल्या पायवाटांवर चालणे जितके मऊ वाटे तितकेच ते जिगरी काम होते. वाटाड्या वाट करून पुढे जातो त्याच्या पावलावर पाऊल ठेवणे सोईस्कर. हा पॅच खूप अवघड आहे तो पार केला आणि हुश्श केलं. मागच्यांची गती कमी झाली होती. आम्ही थांबून पुन्हा बर्फाच्या वाटेतून स्लाइडिंगकडे जाणारी वाट धरली. जवळजवळ सात इंच बर्फ होते. पुढे त्याची परत वाढत गेलेली . त्यातून वाट काढत वाटाड्या पुढे जात होता.

____एका पावलाची वाट. तिथून ढासळले की थेट साठ सत्तर फूट खाली. चालत असताना हलकेच बर्फ पडायला सुरुवात झाली. पुढे चालणारे काका घसरले, त्यांच्या पाठीच असलेल्या परेशने त्यांना अलगदपणे झेलून ठेवले. अन्यथा... जेमतेम सावरुन वर घेतले. बर्फाचा जोर वाढला. लगबगीने आम्ही पुढे जात होतो. स्लाइडिंगच्या शिखरावर पोहचण्याआधी एक अर्धवर्तुळाकार वळसा घेऊन चढण चढावी लागते. त्या चढणीच्या अर्ध्यात पोहचतो तोच मागे त्याच जागेत आमच्यातीलच एक मुलगी घसरली आणि कोलांट उड्या खात खाली गेली. त्याच गतीने मागे असलेले बालजीत भाई तिच्या दिशेने धावत गेले. आमच्या जवळून जिवा सुसाट धावत सुटला आणि तिला वर घेऊन आले. या क्षणाला हृदयाचे ठोके अति वेगात पळत होते. पण बर्फावरच घसरत गेल्यामुळे तिला दुखापत झाली नाही हे नशीब. पण या दरम्यान जी मार्गदर्शकांनी तत्परता दाखवली त्या तात्परतेला सलाम तर बनतोच. जिम्मेदारी या शब्दाला कसं जागावं हे त्यांच्याकडून शिकावं.

_____या बर्फनगरीत ट्रेक करणे म्हणजे तुमची शारीरिक क्षमता, सहनशीलता, जागरूकता, निर्भयता या साऱ्यांचेच गणित योग्य जुळले पाहिजे. तरच तुम्ही हा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण करू शकता. आणि या साऱ्यांची जाण प्रत्येकाला असते त्यानुसारच आपण हे पाऊल उचलले पाहिजे. फक्त भावनेच्या आधारे या विश्वातील कुठलेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यदाकदाचित आपल्या चुकीच्या निर्णयामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर असते. नसेल धावता येत म्हणून चालणे सोडू नये. शेवटी पोहचणे महत्वाचे असते थोडे उशिरा का होईना. आणि आमच्या समूहातील कोणीही अडचणी आल्या म्हणून चालणे सोडले नाही. बेबी स्टेप तर बेबी स्टेप चलते रहो.

___आणि अशा प्रकारे आम्ही स्लाइडिंग जवळ बरोबर बाराच्या ठोक्याला पोहचलो. गारांचा हलका पाऊस ही स्लाइडिंग जवळपास आठशे ते नऊशे मीटरच्या आसपास असावी. आमच्यातील पाहिले गृहस्थ ज्यांनी स्लाइडिंग केली, ते ज्या वेगात खाली गेले त्याच वेगात शेरूही खाली झेपावला त्याला वाटले कुणी खाली निसटलेच. दोन वेळा त्याने त्यांची बॅग धरून थांबवण्याचा प्रयत्न केला. कसे प्रेम असते ना..! सारे मग एक एक करून खाली घसरले. काही कोलांट उड्या खातही आले म्हणा. पण ती एक मौज आहे. आणि दुसरा पर्याय नाही. इथून जेव्हा आपण  स्वतःला  देतो तेव्हा येणारी मौज हि रिसॉटमधील स्लायडिंग पेक्षा कितीतरी पटीने आल्हादायक असते. वेगळ्याच  वेगळ्याच


हिमगीरींचा साज देखणा, धवल कांती,शीतल वारा
काळा कभिन्न पाषाण जरी, रूप बदलतो, निथळे धारा...
त्या धारेवर पाषाणातून, खळखळ जातो गात ओढा
रंग बेरंगी फुले देखणी, माळून शोभे तट  केवढा... 
हरित तृणाच्या मखमाळीने, शृंगार चढला धरतीला
रम्य अशा ह्या सौन्दर्यस्थळी, तव वाटे स्वर्ग हा वस्तीला...__नित                                                                                                                                                           

____ साऱ्यांनीच एक सौंदर्यवान तितकाच थरारक अनुभव गाठीशी घेऊन स्लाईड केली. एक दोघांना त्रास झाला पण चलता है... आणि खालची वाट धरली. इथे पाऊस रजा घेतो. आणि वाराही शमतो. हिमशिखरे मात्र ढगांची वस्ती करून नांदताना दिसतात. खाली दगडांच्या वस्तीतून खोल उतार उतरून लंच कॅम्पला आपण पोहचतो. सावधपणे उतरत असले तरी एक दोघे इथे घसरून पडतात. हिमशिखरातून प्रसवलेले गार निश्चल पाणी आपल्याला खाली वाहताना दिसते जे रमत गंमत पार्वतीच्या उदरात जाऊन मिळते. इथून आता पुन्हा नदीची सोबत होणार होती. ओढ्याशेजारी अगणित रंगबेरंगी फुले खुललेली आपणास पहावयास मिळतात. त्या शेजारीच असलेल्या लंच पॉईंटला दीड वाजेपर्यंत सारे पोहचले. जेवण उरकून, तृप्ततेचा ढेकर देऊन आम्ही बिस्केरी कॅम्प कडे रवाना होतो. आता चढण संपून उतार चालू होतो. माणूस एका विशिष्ठ ठिकाणी फार काळ राहू शकत नाही म्हणण्यापेक्षा काळ त्याला राहू देत नाही. खाली पुन्हा कॅम्पशेजारी राज्य फुलझाडांची वस्ती दिसू लागते. कॅम्प नजरेस पडतो आणि आम्ही सुखावतो. सव्वातीनच्या सुमारास आम्ही कॅम्प गाठला. येथूनही बर्फाच्छादित गिरीशिखरांचे सौंदर्य ओसंडून वाहताना चौफेर दिसत होते. खाली त्या साऱ्यांच्या मधोमध पायथ्याशी पुलगा, तोष, बरशैनी गावे छान दिसत होती.

______सारे नियोजित वेळेत आणि सुखरूप पार पडले त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले होते. विशेष म्हणजे साठी पार केलेल्या काकांनीही या वयात तरुणांना लाजवतील अशा प्रकारे हा ट्रेक पूर्ण केला होता. हे कौतुकास्पद आहे. अनुभवाबरोबरच शरीराने साथ देनेही महत्वाचे असते. पण सुरवातीस धाडसी वाटणारा निर्णय अंततः प्रसंसनिय वाटू लागला. आणि खरोखरच हिमालयात ट्रेकिंग करायची तर सर्वात जास्त किंमत असेल तर ती वेळेला. चला पण अंत भला तो सब भला म्हणतात ते योग्यच. नितीन सरांनी सर्वांचे तोंडभरून कौतुक केले. सर्वांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. एकंदरीतच सर्वांचा आनंद त्या हिमहिखरांच्या वर गगनाला भिडला होता. यात बहुतांशी असे होते ज्यांनी सह्याद्री सोडून कधी बाहेर ट्रेकच केला नव्हता. आणि अशांनी सारपास सर करणे म्हणजे निश्चितच कौतुकास्पद बाब होती. त्यासाठी सर्वांनीच शिवशौर्य ट्रेकर्स, नितीन सर, संघमित्रा ताई, आणि कैलाशरथ टीम यांच्या योग्य नियोजनामुळेच हा ट्रेक आम्ही यशस्वीरीत्या करू शकलो, कधीही न विसरणारे संस्मरणीय, रमणीय, मनमोहक असे क्षण आमच्या ओंजळीत पडले. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानले. चहा नाश्ता घेऊन नेहमीप्रमाणेच आमची वेगळी पडलेली चौकट तंबूत शिरली. आज सारपास पार करून आम्ही १०९९० फूट उंचीवर बिस्केरी थाच कॅम्पच्या टेंट मध्ये तृप्त मनाने त्याच आजच्या अविस्मरणीय क्षणांना गुंफत बसलो होतो. साडे सातला रुचकर जेवणाचा स्वाद घेऊन निवांतपणे झोपी गेलो.

२३ मे २०१७ बिस्केरी थाच ते कसोल ते मुंबई 


_____आजची सकाळ जरा उशिरानेच झाली. ध्येय प्राप्तीनंतर माणूस थोडा निवांत होतच असतो. साडेपाचला उठून शरीरशुद्धी उरकली. या जागेला  भारतातील  स्वित्झर्लंड का संभोदतात याची प्रचीती आली. चहूबाजूंनी बर्फाच्छादित डोंगर रांगा, त्याला अलगत झेलून असलेले हिरवे रान... काय वर्णावे..











कोण रम्याकार आहे हा चमत्कृतीकार
मेघ खिडकीतून पाहे सूर्य डोकावुन फार
गिरीशिखरांवर भव्य नांदतो हिम धवलकांती
वसंताविन वृक्ष नाचती येथे गार वाऱ्यासंगती...

तनामनातून निर्झर वाहतो, गीत गाते वसू
वृक्ष वेली डोलू लागले, तृण लागले प्रसू
ओवाळीती किरणे कोवळी, घेऊन सोनथाळी
साज चढतो कंच हिरव्या, झाडांना सोनसळी...

नभातून देती मेघ सावळे मायेची छाया
निळ्या नभाची दिसते तेथे अवचित ही काया
झरझर झरझर झरती सुमने मेघांतून खाली
झेलून साज चढवून नेई वसू सागराच्या काठी...___

____ऐसे हे मनोरम दृश्य डोळे साठवू पाहत होते. पण ते त्यांच्या आवाक्या बाहेर होते. शेवटी सारेच चहा, नाश्ता आणि जेवणाचे डब्बे घेऊन सात वाजता निघण्याच्या तयारीत होतो. इथे एक विशेष सांगावेसे वाटते कि अख्ख्या ट्रेक मध्ये कधीही जेवण उशिरा किवा कमी मिळाले असे झाले नाही. खाण्यापिण्याचे नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने केल्याबद्दल कैलाश रथ च्या स्टाफला सलाम!!. आम्हा बत्तीस जनांसोबत ग्रहण पासून सावलीसारखा सोबत असलेल्या शेरूला आम्हाला इथेच सोडून जाणे गरजेचे होते. अन्यथा खाली ईतर कुत्रे त्याला जगू देणार नाहीत असं आमच्या सोबत आज सहाय्यक मार्गदर्शक म्हणून असलेला प्रेम म्हणत होता. जो की खाली पुलगा गावात राहतो. त्याने शेरूला तिथेच बांधून ठेवले. शेरूचा आम्हा साऱ्यांनाच इतका लळा लागला होता की त्याला सोडून जाताना जवळजवळ साऱ्यांचेच डोळे पाणावले. शेरूही आम्ही दिसेपर्यंत आक्रोश करत राहिला. इथे स्थानिकांचे असे म्हणणे आहे की प्रत्येक बॅच बरोबर कमीतकमी एक कुत्रा हा सोबत असतोच असतो. जे ट्रेकर्स या मोहिमेत दगावले गेले त्यांच्याशी यांचा संबंध जोडला जातो. आणि आपल्याला काही दुखापत होऊ नये म्हणून अनोळखी असतानाही त्यांची आपल्या प्रति असलेली धडपड पाहून मन ते नाकारण्यास धजत नाही. असो... शेवटी म्हणतात ना मानो या न मानो. इथले सारेच नित स्मरणात राहील हे मात्र नक्की.



जे क्षण जगलो सवे तुझ्या मी, 
ओढ आणखी वाढली जगण्याची...
तूर्तास जरी मी चाललो परतीच्या वाटे, 
नित राहील झिंग बघ तुझ्या आठवणींची...
                                                                                                        



_____दवाने भिजलेल्या गवत गालीच्यावरून खालची वाट धरली. राज फुलांना नजरेत भरून घेतलं. कारण ती आता खाली दिसणार नव्हती. त्या वस्तीतून सुचिपर्णी वृक्षांच्या वस्तीत प्रवेश केला. हिमशिखरांवरून प्रसवत येणारे लहान थोर ओढे वाटेत निसरताना दिसत होते. आखूड उंचीची झाडे मागे सोडून आता भल्या मोठ्या वृक्षनगरीत आम्ही पोहचलो. डोंगर उतार पावलागणिक वाढत होता. गावांच्या वेसी बहुतेक इथे लागल्या असाव्यात. जंगलात गुरे हाकणारे गुराखी गाई म्हशी घोडे खेचर यांना चरवताना दिसतात. जागोजागी तारांचे कंपाउंड क्रॉस करून आम्ही पुढे जात होतो. हा उतार सावधपणे उतरणे भाग होते. खळखळणाऱ्या ओढ्याच्या सुमधुर आवाज कानी पद्धत होता. बरीच भली मोठी झाडे वाटेत उतार सांभाळत पडलेली दिसत होती.
तद्वतच पुढे...
काळ्या पाषाणावर सजतो धवलकृष्ण झरा
नादब्रम्ह तो सांगत जाई नदी मिळे सागरा...
घेउनी उडी कड्यावरुनी लोळत तो येई
तुषार उडवीत वेलींवर झुळझुळ गाणे गाई...
वृक्ष लाजरे अवचित काही शहारून जाती
कुणी हिरव्या माथ्यावर पोपटी टोपी घेती...
थरथरते अंग कुणाचे तरी झोका देई वारा
कृष्ण बासुरी सुरात नाचे हा जैसे रान सारा...
वाट अवघड असे खडतर तमा नसे काही
प्रेम देऊनी प्रेमासाठी तो नित निश्चल वाही...
पडता खाली वाहे बेधडक खळखळतो ओढा
मंजुळ स्वर पडते कानी पण वाटेत हा खोडा...
प्रेम झऱ्याचा ओढा असाहा मी पार करू पाहे
तुषार झेलत अंगावरती हे अक्षय गायन वाहे...___नित



____वरून काळ्या पाषाणावर लोळत कोसळणारा एक झरा लाकडाच्या पुलावरून पार करून आम्ही पुढे सरतो. तदनंतर एक निसरडी उतरण उतरलो की, वीस फुटाचा रॉक पॅच दोरीच्या साह्याने खाली उतरून, तीस फुटाच्या लाकडी पुलावरून मनमौजी भरधाव वाहणाऱ्या ओढ्यावरून आम्ही पुढे निघतो. इथे थोडी शर्थ करावी लागते. मग तितकीच अंगावरची चढण चढून आम्ही लंच पॉईंटला पोहचतो. जणू अगदी सुसज्ज बाग निसर्गाने  रेखीव काम करून येथे आमच्यासाठी सजवली होती.  तिथे निवांत विसावलो.ती सुंदरता पाहून मन प्रसंन्न झाले. आज टिफिन सोबत घेतला नव्हता. म्हणून गरमागरम मेगीचा आस्वाद घेतला.गावांच्या जवळ असलो तरी उतरण अजून संपली नव्हती. पण आसपासचे दृश्य पाहून मन गीत रचण्याचा प्रयत्न करू पाहत होते.



चौफेर जेथे नांदतो, हिमशिखरांचा मेला
नित तेथे वाहतो, निश्चल शीतल ओढा
रुबाब आहे तेथे, गर्द हिरव्या वनराईचा 
मिजास सौम्य बघा, पायथ्याच्या वस्तीचा...




_____ जेवण उरकून सव्वा दहा वाजता पुन्हा वाट धरली. नवनवीन फुले या वाटेत फुललेली पाहून मन सुगंधी झाले. आता नदीही तीनेकशे फूट खालून पण आमच्या सोबत चालत होती. तिची खळखळ स्पष्ट ऐकू येत होती. पुढे वाटेत एक त्रिशूल देवरूपात भूगर्भावर स्थायी उभे आहे. मनी शंभो म्हणून पुढे निघालो. पण खाली उतार इतका भयाण होता की पाऊल गुंतले की संपलेच. चढण जशी सोपी नसते तसा उतारही सोपा नसतो. त्याला कमी लेखून चालत नाही. त्या उतारावर जर आपण त्याचा मान राखून सहज उतरलो तर पुढची चढण चढून आपल्याला शिखरं गाठता येतात.
_____सारेच ती उतरण शिताफीने उतरले. आणि हिमालयीन ट्रेकमध्ये सारेच अनुभव आले. त्यात चर्चेतून एक गोष्ट निघाली ती अशी की, इथे मारून मुसलमान केलेलं ट्रेकर्स चालत नाहीत. आणि ते खरच आहे. निदान सह्याद्रीत तरी तुम्ही ट्रेक केलेले पाहिजेत. तडक उठून हिमालयीन ट्रेक म्हणजे तुमच्या सोबत इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो हे नाकारता येणार नाही.

____अकरा वाजता पावसाने हजेरी लावली आणि पसार झाला. तीन दिवसांची चढण एका दिवसात उतरायची म्हणजे विचार करा. आज आम्हाला ७२९३ फूट उंचीवर असलेले बरशैनी गाव गाठायचे होते. खाली झेपावत गेलेल्या उतरणीवरून आम्ही बरोबर बाराच्या ठोक्याला पुलगा गावात पोहचलो. दाट वस्तीचं हे गाव. घरे जुनी असली तरी खूप आकर्षक होती. घरांच्या शेजारीच गहूची हिरवी गार कणसं वाऱ्याने फरफरत होती. हिमशिखरांना नजाकतीने खुणावत होती. त्या गावातून वाट काढत आम्ही एक पूल पार करून बरशैनी ला पोहचलो. बॅगा जीपवर टाकल्या आणि जीप मध्ये बसून माणिकर्ण मार्गे कसोल गाठलं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे इथली लोकं चालून रुपये कमावतात आणि आपण अगदी त्याच्या विरुद्ध चालण्यासाठी रुपये मोजतो.

____दोन वाजता कसोलला पोहचलो. संघमित्रा ताई आणि सोबतचे आमचे प्रेमळ काही खोडकर चिल्लेपिल्ले आमच्या स्वागतासाठी येथे हजर होते. सर्वांचं त्यांनी अभिनंदन केले आणि आम्ही ताईचे मनस्वी आभार मानले. मागे सोडून ठेवलेले समान पुन्हा घेतले. कैलाश रथ ने ट्रेकपूर्तीचे अभिनंदन करून मानपत्र देऊ केले. घाई घाईने पुन्हा बसचा ताबा घेतला. थकलो असलो तरी उद्या सकाळी फ्लाईट असल्याने दुसरा पर्याय नव्हता. आदी सारखे तीन चार दिवस नाही पण निदान आजची रात्र कसोल नगरीत घालवली असती तर... अशी कुणकुण मनाशी करत, आलो त्याच मार्गाने दिल्लीसाठी रवाना झालो. बसमध्येच शिवाशौर्य ट्रेकर्स तर्फे सर्वांचे पुनःश्च अभिनंदन करून सारपास हिमालयीन ट्रेकपूर्तीचे मानपत्र सर्वांना देण्यात आले. पुन्हा तोच लांबचा कंटाळवाणा दिवस पूर्ण रात्र प्रवास करून दिल्ली एअरपोर्टवर सकाळी सात वाजता पोहचलो. येतेवेळेस सर्वात आधी असणारी माझी आणि परेशची फ्लाईट मात्र आज सर्वात शेवटी होती. साऱ्यांनाच जड अंतःकरणाने अलविदा केले. आणि शेवटी तीन च्या मुंबई फ्लाईटने आम्हास घेऊन वर आकाशात झेप घेतली. आणि  आजही पुन्हा  हे धूड आकाशात एवढे वजन घेऊन कसे उडते हे कुतूहल मात्र तसेच होते. मागच्या आठ दिवसात बरेच नवे सवंगडी जोडून, बरेच अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन, चार सुनेहरे दिवस व्यतीत करून, मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावर उतरलो. आणि सुखरूप पालघर स्वगृही पोहचलो.

___ हे संस्मरणीय क्षण मी प्रत्यक्ष अनुभवले. आणि त्या प्रत्येक क्षणी माझ्या सोबत असलेले माझे सर्वच स्नेही सहकारी मित्र आणि खासकरून शिवशौर्य ट्रेकर्स, मोहीमप्रमुख नितीन सर, मोहीम कार्यवाह संघमित्रा ताई, कैलास रथ टीम यांचे पुनःश्च आभार मानतो.


धन्यवाद 
नितेश पाटील ( धनसार, पालघर ) 
९६३७१३८०३१ #शिवप्रेमी_गडयात्री #सारपास_ट्रेक 


आपला अभिप्राय नक्की कळवा.....









देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...