Saturday, February 11, 2017

गड कसा पाहावा - एक तंत्र

*गड कसा पाहावा-एक तंत्र*
___नमस्कार गडेहो... 🙏🙏
सस्नेह जय शिवराय🚩🚩
___खरंतर "गड कसा पाहावा-एक तंत्र" या शिर्षकाला साजेस लिखाण व्हावं, इतकं लेखन कौशल्य, आणि शब्द सामर्थ्य माझ्याकडे नाही. तेवढा अभ्यासही नाही. पण आजवर जे पाहिलं, वाचलं, अनुभवलं त्यातून विषयाला धरून काही शब्द लेखात गुंफण्याचा हा माझा प्रयत्न... तत्पूर्वी मी संतोष दादा ज्यांनी मला बा रायगड परिवारात स्थान दिले, आणि त्यामुळे मला सतिष दादा, ज्यांनी मला इतिहास नुसता पाहून नव्हे तर अभ्यासून कसा जगावा... हे निदर्शनास आणून दिले त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञपूर्वक आभारी आहे. प्रपंचात गुंतलेल्या या जीवाला मी नक्कीच त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीन.
____या जगात सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल तर तो माणूस. त्याने या पृथ्वीतलावर अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षास कुठलीही तमा न बाळगता आपलं सर्वस्वही झोकून देण्यास त्याने मागेपुढे पहिले नाही, पाहत नाही. काही जीवांना त्याचं देणंघेणं नसतं तो भाग अलाहिदा. आपण जन्माला आलो कशाला ! करायला काय पाहिजे !!  आणि करतोय काय !!! याचं भान त्यांना राहिलेलं नाही. फक्त "मी" आणि "माझं", यातच तो गुरफटला आहे. असो...
___पण इतिहास साक्षी आहे. या अनादी अनंत काळाच्या ओघात त्या काळाचा वेध घेणारे, आणि आपली छाप सोडणाऱ्या धेय्य वेड्या थोर महात्म्यांची, या भारतवर्षात, महाराष्ट्रात तरी नक्कीच कमी नाही. माणसाने जर ध्यास घेतला तर तो आपल्या आणि विश्वाच्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकतो. पण त्यासाठी निस्वार्थी प्रयत्न आणि धेय्य सातत्य याची कमतरता येता कामा नये. आज आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कैक थोर इतिहासमहर्षीनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी, संकलकांनी पायाचे खळू घासून धुंडाळून काढला. उन्हात निथळत्या घामाची शाई करून, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात, कडे कपारी गुहेत, गड किल्यांवर दाही फिरून, आपले थिजलेले ठसे उमटवत आपल्या समोर, शिवस्वराज्याच्या ज्ञात अज्ञात अवशेषांचा इतिहास आपल्या सकुशल शब्दकुंचल्यानी आपल्या समोर मांडला.
____हे त्यांचे अनंत उपकार आपल्या माथी आहेत याची जाण फक्त माणसाची व्याख्या समजणारा माणूसच जाणू शकतो. पण त्यातही सातत्य शोधण्याआधी शब्दांचा विपर्यास करून म्हणा किंव्हा काळाच्या ओघात दडलेल्या इतिहासावरची धूळ न झटकता, तिथे शर्थीने त्या धुळीपर्यंत पोहचणाऱ्या अवलीयास कसे नमवावें म्हणून कळीचे मुद्दे वर काढणारी व जळाऊ वृत्तीची जमात अजून हयात आहे, हि शोकांतिका आहे. या बाबतीत जनलोकांसमोर सत्य आणू पाहणाऱ्या अवलीयास  एक गोष्ट मात्र वाटत असावी... *"जगी माझे व्हावे भले , चिंतितो कोण हिच खंत, जगी अशा विभूती तीन , आई वडील संत आणि भगवंत."* आणि त्या तीन विभूतींना स्मरूनच तो पुढे निरंतर कार्यरत असतो. आता या तिघांच्याही व्याख्या आपल्या ज्ञान क्षमतेवर अवलंबून आहेत हा हि भाग ओघाने येतोच... आणि इतिहासाबद्दल म्हणाल तर... *"इतिहास खरा खोटा, पैलू तयाचे अनेक, शोधावे सत्य पहिले, कोण जाणतो हरेक."*
___गड दुर्गांचा भौगोलिक अन ऐतिहासिक पूर्व अभ्यास करताना सर्वप्रथम आपणास जाज्वल शिवचरित्राचा अभ्यास आणि ओढ असणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर अंकुरित झालेल्या, वेळीस त्या दऱ्या खोऱ्यांनी, कडे कपारी, माच्या, बालेकिल्ले, गुहांनी, उंच उंच कातळकड्यानी, सरताज किल्ल्यानी, अभेद्य तटबंदीनी, तटा बुरुजांनी, प्रत्येक वृक्ष वेली, नदी नाले, तळे, झरने यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या, तिच्या अंगा खांद्यावर बागडलेल्या संघर्षमय स्व-राज्याची माहिती असणे गरजेचे आहे.अन्यथा *"असती बहू गोटे दगड, साज सुंदर नटलेले देव, अदृश्य रूप शक्तीचे ठायी, मानावे तेच दगड देव..."*
____या जगात पर्वत शृंखलेची कमी नाही. सौम्यरौद्र अशी त्याची ख्याती आहे. आणि त्याचा सामना करण्याची ताकत माणसात नाही. *"उंच शिखराचा नाद सांगा कुणास नसतो, थकून जातात वाटा तिथे श्वासही कोंडतो."* म्हणून माणूस शर्थ करणे सोडत नाही. काही त्या शिखरांवर आपला ध्वज आमरण आरोहण करतात. महाराष्ट्रातील सह्यशिखरांवर काळाच्या प्रवाहात अनेक ऋषीवरांनी आत्मिक शांततेसाठी इथे आपली तपोभूमी निर्माण केली आणि कृतज्ञेपोटी स्थानिक लोकांनी, त्या सह्यशिखरांना त्या ऋषींची नावे दिली हा हि इतिहास मागे पडता कामा नये. *"धगधगते अग्निकुंड, तपोभूमी सह्याद्री. हर हर महादेव नाद गुंजला, स्वराज्य माऊली सह्याद्री "* आणि इतिहासाने त्यांची नोंद सुवर्णाक्षराने केलेली आहेच.
___ पर्वत हे निसर्गाचे अविचल रूप आहे. सह्याद्री आणि सह्याद्रीचा इतिहास हा जगावेगळा आहे. वंदनीय महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंनी सह्याद्रीचे वर्णन करतांना म्हंटले आहे *"अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!"* आणि म्हणूनच अशा या सह्य शिखरांवर गिरीदुर्गांवर आपल्याला भक्कमपणा, ठामपणा जाणवतो. अशा या रौद्रसुंदर सह्याद्रीवर श्री छत्रपती शिवरायांनी, संग निष्ठावंत ज्ञात अज्ञात मावळ्यांनी अधिराज्य गाजवले आणि स्वराज्याचे स्वप्न साकार केले. हि जगातील एकमेव घटना असेल. *"शून्यातून जग निर्माता, तोचि असे विधाता. ईश्वरास कुणी पहिले, माणसात अंश राहिले , देवाचे..."* आधी त्या ऐतिहासिक सह्याद्रीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि या रौद्रसुंदर सह्याद्रीच्या प्रांगणात जातांना या सह्याद्रीच्या पराक्रमाची शिदोरी तुमच्या सोबत असली कि त्या प्रांगणातील एकेक धूलिकण तुमच्याशी संवाद साधेल आणि त्या धुलिकणात मिसळून तुमची काया चंदनाची होईल, यात शंका नाही.
___गिरीदुर्गांच्या जडण-घडणीत तेथील जवळच्या गावातील स्थानिक लोकांचाही मोलाचा वाटा आहे. आजही त्यांचे वंशज इमाने इतबारे गड कोट किल्यांची सेवा करीत आहेत. प्रथम प्राथमिकता म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यास ते इतिहासाची माहिती देत असतात. ती परंपरा शिवशंभुच्या जटातील गंगेप्रमाणे निश्चल निस्वार्थ वाहत आहे. त्या गंगेत पवित्र स्नान करण्याची द्यानत आपल्यात असायला हवी. आजही इतिहासाची साक्ष देणाऱ्या, गडकिल्यांसाठी झटणाऱ्या विभूती सह्याद्रीच्या रहाळात उभ्या आहेत. या गडदुर्गांसाठी झटणारे ते ज्ञात अज्ञात सारेच ज्यांचा सहवास जेव्हा प्रत्यक्षात लाभतो, तेव्हा जगण्याला एक नवी दिशा येते. त्यांच्या विचार धनात मन चिंब भिजून सह्याद्री सागराकडे प्रस्थान करते. आणि पुन्हा बाष्परूप होऊन धरेला सुखावते.
___क्रॉंक्रेटच्या कृत्रिम डबक्यात अर्धनग्न अवस्थेत डुबक्या मारन्यापेक्षा त्या पारंपरिक गंगेत अथवा गडकिल्यांच्या माथी नैसर्गिग तलावात संस्कृतीला जपून स्नान करणे केव्हाही चांगले. कोंक्रेटच्या जगात राहून कुंडीतील बाग सजवन्यापेक्षा गिरीदुर्गांच्या पायथ्याची डोंगरउतारावर संघर्ष करत असलेल्या झोपडीशी (ज्यात आजही उपेक्षित माणसं राहतात.त्यांची कदर आज माणूस म्हणवून घेत असलेल्या समाजास राहिलेली नाही. गिरिभ्रमण करणारे शिवप्रेमी त्यांची त्यांच्या परीने जी काही मदत करतील तीच.) संवाद साधला तर शिवशौर्याची गाथा अधिक उजागर होईल. त्या झोपडीत अजूनही इतिहास जगतो आहे. त्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात नक्कीच पडेल. आणि त्या प्रकाशात ती झोपडीही प्रकाशमय होईल.
___इतिहासाच्या वाटा प्रतिदिन मागे जातात. निसर्गाच्या सानिध्यात त्या लुप्त होतात. *जीर्ण पाचोळा त्यावर उदास पडलेला असतो. ते दुःख किती जनांस कळत असावे.!! जीर्ण पाचोळा आपणास का नकोसा होतो..!! विशाल तरुवरची हिरवी पाने त्याला पाहून का हसतात..!! त्या हसणाऱ्या पर्णास हे ज्ञात नसावे का, कि उद्या आमचीही हीच गत होईल. त्या जीर्ण पाचोळ्यानी भरलेल्या वाटांचा इतिहास, आपल्या आकाश श्रुतींनी आपण कानोसा देऊन ऐकणार आहोत का..!! त्याखाली धुळीतील चित्रे आपण आपल्या प्रकाश नेत्रांनी, पापणी उघडून बघणार आहोत का..!! कि फक्त कळीचे मुद्दे ताणून ओढून वर काढून आपापसात लढणार आहोत.!! एक दिवस असाही येतो की त्या वनात चौफेर एक क्षुब्ध वात येते आणि त्यांस वेढून उडवून नेते, वाट मोकळी होते.* तेव्हातरी आपण त्यांच अस्तित्व स्वीकारलं पाहिजे. पुन्हा हळू हळू त्या जीर्ण पर्णाच्या राशी जमा होण्याआधी आपण ती वाट नित चालती ठेवली पाहिजे. तिची खूणगाठ बांधली पाहिजे.
___ पण सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्य करणाऱ्या बऱ्याच वाटांना आता उसंत मिळाली आहे, कारण आज माणूस मळलेल्या वाटांवरच चालतो. पण दिसत नसणाऱ्या वाटा नसतात अशातला भाग नाही.   त्या उजागर करण्यासाठी इतिहास अभ्यासकांनी, दुर्ग संशोधकांनी आपल्या जीवाचे रान करून अनेक नकाशे, कागदपत्रे, बखरी, ग्रंथ अश्या अनेक माध्यमातून त्या वाटांवर, वास्तूंवर आपल्या अभ्यासू दृष्टीने प्रकाश टाकला आहे. शिवरायांनी घडविलेला जाज्वल इतिहास संशोधकांनी दिस रात एक करून टिपून ठेवला. निदान तो वाचायची तरी आपली द्यानात असायला हवी. आजही समाज सहज म्हणून जातो की फार वर्षांपूर्वी येथे वस्ती असावी, वाटा असाव्यात. पण असं म्हणताना बहुतांशी समाजाला कालगणनेची जाणीव नसते. कारण त्याचे जीवन गतिमान असते. मात्र काळाच्या ओघात घडलेल्या घटना आपल्या चिरशाश्वत स्मृती सोडून जातात. आणि त्या धूसर होत चाललेल्या शेष अवशेष वाटांचा, स्मृतींचा कुणी अवलिया मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हाच समाज त्याला वेडा संबोधण्यास मागेपुढे पाहत नाही. हि वस्तुस्तिथी आहे.
___एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आजही आम्ही जेव्हा ट्रेकिंगला निघतो तेव्हा आम्हालाही समाजातील काही करंटे वेड्यात काढतात , तिथे इतिहास वेड्या महर्षीना नावं ठेवली तर नवल ते काय.! पण त्याच इतिहास वेड्या महर्षींनी रेखाटलेले नकाशे, त्यांच्या अभ्यासू शब्दसुमनांचा वटवृक्ष जेव्हा, आपण सोबत घेऊन सह्यगिरीच्या परिसरात हिंडतो तेव्हा तेथील लुप्त झालेल्या वाटा पुन्हा चालू लागतात, गिरीशिखरांच्या उदरातील भग्न अवशेष पुन्हा बोलू लागतात, त्यांच्या उरात दडलेला इतिहास त्या आपणास सांगू लागतात, अशातच इतिहासातील एखादी नवीन अडगळीत पडलेली वाट, नवी वास्तू आपणासमोर येते, आणि तिचा इतिहास उजागर होऊ लागतो. गडकिल्ले फिरतांना येथिल ऐतिहासिक परंतु नवोदित वाटा आपल्या येणाऱ्या नवोदित पिढीसाठी आपणच सुसज्ज आणि बोलक्या करून ठेवणे गरजेचे आहे. ऐतिहासिक नकाशात, प्रत्यक्ष नमूद करून ठेवणे गरजेचे आहे.
___आजही वंदनीय थोर इतिहास संकलक श्री आप्पा परब यांच्यासारखे अनेक इतिहासप्रेमी गिरिप्रेमाणे भारावून गडदुर्गांचा इतिहास गड किल्यांच्या साक्षीने आपणास सांगतात हे आपलं परमभाग्य आहे. *"एक अवलिया आजही येथे,रानवाटा तुडवितो..,गडकिल्ल्यांच्या साक्षीनेच, इतिहास शिवरायांचा सांगतो.., शिवकालीन महितीचा वाणीतून, अखंड झरा वाहतो.., दुबळी माझी झोळी तरी, देत निरंतर मज राहतो.., सह्यपर्वतातील अनामवीरांचे, हुंकार मज एकवितो..."* त्यांच्या सहवासात साक्षात इतिहास कसा जिवंत होतो हे याची देही याची डोळा पाहता येते.तो अनुभव एकदा नक्कीच जगुन बघावा. मूर्तिमंत इतिहास कसा जागा होतो. आणि आपणहि सवे त्याच्या कसे जगतो याची अनुभूती येते. जगणे म्हणजे काय याची प्रचिती येते. अन्यथा व्यर्थ आपली पायपीट समजावी.
____सह्याद्रीच्या परिसरातील राहणीमान अगदीच साध्या पद्धतीचं,  तशीच माणसं भोळी आणि साधी.पण सह्याद्रीच्या कुशीत त्यांच्या परिसरातील त्यांच्या सानिध्यात न येणारा, त्याची माहिती नसणारा भाग तसा कमीच. त्यांना हिनावणारी जमात अजून जिवंत आहे याचं दुःखं वाटते. गडभ्रमंती म्हणजे पिकनिक नाही. आज नवतरुणाईचा कल गड किल्ल्यांकडे वाढत आहे.पण इथे टिंगल टवाळी, अरेरावी, मद्यपान, नशा, यांना मुळीच स्थान नाही. सह्याद्री परिसरात वा ऐतिहासिक वास्तूंवर आपले मढे रेखाटण्याची तसूभरही आपली लायकी नाही, याची चाढ आपल्याला असणे गरजेचे आहे.महाराष्ट्राचा, स्वराज्याचा जाज्वल इतिहास आधी डोळ्यावरचे आधुनिक नशेचे लाल पडदे बाजूला सारून पाहणे गरजेचे आहे.
____आजही जेव्हा आपण गडभ्रमंती (ट्रेक) करतो तेव्हा त्याची निगा राखणे आणि ती अभ्यासु दृष्टीने करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.गड भ्रमंती हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून अतीव आनंदासह माहितीचा स्रोत आहे. आज माणसाचे जीवन अती गतिमान झाले आहे. त्याला वेळ पुरा पडत नाही. कारण तो समाधानी नाही. धकाधकीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारा एक मात्र उत्तम दुवा असेल, तर तो आहे निसर्ग सानिध्य. आणि गिर्यारोहक  या जगात मनमुराद जगत असतो. गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे, तो त्या बंदिस्त जगात वावरत नाही. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो. *"बिन पहाऱ्याची कैद हवी मला, नको चौकटीतले जीवन... निसर्ग सानिध्य हवे मला, नको रोज मरे जीवन..."*  असं म्हणत ही भटकंती सुरू असते, ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत. इथे लिहलेले नियम पाळले जात नाहीत. कारण *"हरवले ते स्वराज्य, मी 'माझ्यात' व्यस्त... येते जेव्हा माझी पाळी, जग ' त्याच्यात' व्यस्त..."* अशी गत होऊन बसलंय.  मात्र गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित गिरिप्रेमी मुक्त विहरतो.
____या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच, गिरिप्रेमाणे भारावून गेलेले दुर्ग प्रेमी, निसर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी आज बरेचसे समूह कार्यरत आहेत हि एक चांगली बाब आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण गिरीभ्रमण, दुर्ग संवर्धन करणे गरजेचे आहे. स्वराज्याचा जाज्वल इतिहासाचा दीप आपणच पाजळत ठेवला पाहिजे. गडा वरील एकेक वास्तूंचा, स्मृतिस्थळांचा, वाटांचा अभ्यास आपण केला पाहिजे.
_____या लेख प्रपंच्या अंती दुर्ग भ्रमंती (ट्रेक) करतांना काही पथ्य कटाक्षाने पाळली पाहिजेत ती खालील प्रमाणे... बरीचशी वर नमूद झाली आहेत.
१___ट्रेकला निघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखूनच ट्रेकिंगला जाण्याचे ठिकाण निवडले पाहीजे. जिथे जातील तिथल्या माहितीची शिदोरी सोबत ठेवावी आणि आपला दृष्टिकोन नित निसर्ग सहवास आणि अभ्यासू वृत्तीचाच असायला हवा. बाकी डोक्यातील हवा काढून टाकायची.
२___आपण पहिल्यांदाच जाणार असाल तर आधी एका दिवसाच्याच गिरिभ्रणासाठी गेलं पाहीजे. अनुभवी व्यक्तीं वा समूह यांसोबत अडचणी निभावून जातात. जर सारेच नवखे असतील तर गावातील स्थानिक व्यक्तीला वाटाडय़ा म्हणून सोबत घ्या. त्याच्याशी सौजन्याने वागलं पाहजे. ऐतिहासिक व वर्तमानातील, तेथील प्रत्यक्ष माहितीचा ते स्रोत आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथल्या मार्गाची माहिती आपल्याला असावी, सोबत त्या भागाचे नकाशे असावेत. त्यामुळे परतीच्या मार्गात जर काही अडचण आली तर पर्यायी रस्ता वापरता येऊ शकतो.
३___जर गावाबाहेर किल्ल्यावर तुम्ही जाणार असाल आणि तिथे तुम्ही वास्तव्य करणार असाल, तेव्हा गावातील काही लोकांचे दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, तिथल्या पोलिस ठाण्याचा क्रमांक जवळ ठेवा. एखाद्या गावकऱ्याला तुमच्यासोबत न्या. जो त्या रानवाटा, वास्तू यांची विस्तृत माहिती तुम्हाला देईल. तुमच्याकडे त्या ठिकाणी चालणाऱ्या नेटवर्कचा मोबाईल जवळ असणे गरजेचे आहे. तिथे जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आधी घ्या. तसेच त्यांचा नंबरही सोबत ठेवावा. ट्रेक दरम्यान एखादी अडचण निर्माण झाली तर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
४____गिरीभ्रमण  करतांना कुठलंही व्यसन करू नये. (मद्यपान,अल्कोहोल,ई.) नाहीच राहवत असेल तर जाऊच  नये. इतरांना गडांवर तसं करू देऊ नये. पोकळ बांबूचे फटके द्यावेत. चुकीचं वर्तन करू नये, करू देऊ नये.
५___ट्रेकिंगला म्हणून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या सॅकमधे आपल्याला लागणारी औषधे असावीत. कोरडे खाद्य पदार्थ, कागदी पिशव्या, पेपर, खडी साखर, मीठ, लिंबू, छोटी बॅटरी( विजेरी), कॅमेरा सोबत नेणार असाल तर त्यासाठी लागणारी बॅटरी, पाण्याच्या दोन बाटल्या आणि सर्वात महत्त्वाचं एक कपडय़ाचा जोड, स्लिपर आणि रोप. या सर्व गोष्टी एक प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून सॅकमध्ये असुद्या. अथवा ज्या समूहाबरोबर आपण जाणार असाल त्यांनी आवश्यक ती साधने, उपकरणे सोबत घेतली आहेत ना! याची खातरजमा करून घ्या. रात्रीच्या मुक्कामात सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, स्लीपिंग बॅग घेतली पाहिजे. तसेच रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर त्या ठिकाणची स्वच्छता केलीच पाहिजे.दरम्यान तुमच्याकडे असलेला कचरा, खाद्यपदार्थाची वेष्टणे, फळांची साले, थंड पेयांचे डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद,निरुपयोगी वस्तू इकडेतिकडे फेकून दुर्गंधी करू नये. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा. तिथे पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावा.
६___गिरीभ्रमण करतांना शक्यतो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे तीन महिने टाळावेत. ट्रेक करताना ट्रेकिंग पँट, आणि पूर्ण बाहय़ाचा शर्ट घातला पाहिजे. सुती कपडे न घालता ओले झाल्यानंतर पटकन वाळू शकतील, असे कपडेच घालावेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पायात चांगल्या प्रतीचे सॉक्स आणि ट्रेकिंग शूज घाला. निसर्गाच्या दागिन्यासमोर आपल्या दागिन्याची किंमत शून्याहून कमी असते हि बाब लक्षात घेतली पाहिजे.
७___निसर्गाचे सौंदर्य कॅम-यामध्ये कैद करत असताना वेळेचेही भान असू द्या. एखाद्या अवघड जागी उभे राहून फोटो काढणे, दंगामस्ती करणे टाळा, सेल्फीश होऊन सेल्फीचा नाद करू नका. गड किल्ले आपल्या मालकीचे नाहीत. त्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिलंय हे लक्षात असुद्या/आणून द्या. तसे करणा-यांना त्यापासून प्रवृत्त करा. नसेल मानत तर चोप द्या. नियम प्रत्येक ठिकाणी मोडायचे नसतात हि जाणीव असुद्या. निसर्गाचे तर मुळीच नाही.
बहुत काय लिहणे...
___नित(९६३७१३८०३१)
नितेश पाटील(धनसार,पालघर)
Email - nitesh715@gmail.com

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...