Monday, August 8, 2016

पन्हाळगड पावनखिंड विशाळगड

पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड ट्रेक
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित पदभ्रमण मोहीम
शिवप्रेमी गडयात्री पालघर
सस्नेह जय शिवराय मित्रहो.. 

सौजन्य शिवशौर्य ट्रेकर्स
आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. ६००  बांदल वीरांनी लढवलेली ऐतिहसिक पावनखिंड. अवघ्या २१ तासात ६१ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि मोहिमेत धारातीर्थी पडलेले मावळे यांच्या बलिदानाला ३५६ वर्षे पूर्ण झाली. एकंदरीतच हा ज्ञात इतिहास. नरवीर बाजीप्रभू देशपांडे ३५३ वि पुण्यतिथी, आषाढ वद्य प्रतिपदा, शिवशक ३४३, बुधवार दि. २० जुलै २०१६. पन्हाळगड पावनखिंड विशाळगड पदभ्रमण मोहीम १७ जुलै ते २० जुलै.

सौजन्य शिवशौर्य ट्रेकर्स
त्याच तिथीला शिवशौर्य ट्रेकर्स गत सहा वर्षापासून काहीएक त्याच वाटेवरून, शेजारून  ऐतिहासिक पदभ्रमण मोहीम आयोजीत करते. पन्हाळगड पावनखिंड विशाळगड. त्या मोहिमेमधे यावेळेस उर्वरित ९३ जणांच्या सोबत आम्हीही सहा जणांनी सहभागी होऊन मराठेशाहीच्या झंझावाती इतिहासात अजरामर झालेल्या पावनखिंडीत नतमस्तक झालो. सिद्धीच्या वेढ्यातून रात्रीच्या अंधारात, मुसळधार पावसात, जंगलातून गाठलेली विशाळगडा नजीक असलेली घोडखिंड, शिवाजी महाराजांचे आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याचे प्राण वाचवताना स्वतःचे बलिदान देणारे, नरवीर शिवा काशीद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे, त्यांच्या सहित ३०० बांदल वीरांच्या रक्ताने लिहिला गेलेला इतिहास. स्वामी, स्वराज्यनिष्ठेपाई धारातीर्थी पडलेल्या, लढलेल्या मावळ्यांचा इतिहास. २१ तासांच्या जीवघेण्या पाठलागाचा इतिहास.  त्याच ऐतिहासिक पावन,पवित्र वाटेवर (दिवसा) पाऊसात निसर्गाची संग करत त्या पावनखिंडीत पोहचलो, जिथे मृत्यू थांबला होता.... तोफांचे आवाज ऐकण्यासाठी ! धन्य ती निष्ठा...दंडवत ......तो अनुभव शब्दरूपात मांडण्याचा छोटासा प्रयत्न.

सोबत इतिहास अभ्यासक श्री. श्रीदत्त राऊत, नरवीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभु यांची सध्याची पिढी मोहिमेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभागी होती. वाटेत भरारी सोबत मोहिमेत सहभागी असलेले इतिहास अभ्यासक आप्पा परब यांचं ही मार्गदर्शन लाभलं.

सौजन्य शिवशौर्य ट्रेकर्स
खरतर पावन खिंडीचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे जो प्रचलित आहे.  तो पुन्हा होणे नाही म्हणण्यापेक्षा ती स्वामीनिष्ठा, ती स्वराज्यनिष्ठा पुन्हा होणे नाही. तो थरार आपण फक्त ऐकायचा, त्या भानगडीत पडायचंSSSS नाही. पण तो थरार ऐकताना, त्या इतिहासाच्या वाटांवर पाऊल ठेवताना तुमच्या अंगावर काटा उभा राहत नसेल तर तुम्ही शिवभक्त कसले..? आज इतिहास अभ्यासकांची कमी नाही. प्रत्येकाचा आपला एक अभ्यास, पुरावे यानुसार ते इतिहास आपल्या समोर मांडत असतात. त्यात बरीचशी तफावत असते तो भाग वेगळा. चांगल ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं असं म्हणतात, पण चांगल प्रोत्साहित करणारं तेच सांगावं आणि वाईट संभ्रमात टाकणारं सांगू नये हा हि विचार करायला हवाच कि...!! निदान इतिहास उकरून नवीन काहीतरी उभं करण्या पेक्षा जे आहे त्यातूनच समाज प्रबोधन आणि नवीन पिढीस समाजहितपयोगी असं त्याचं आचरण, ती निष्ठा, याचं ज्ञान देणं गरजेच आहे.  बाकी अभ्यासाने सिद्ध करून नंतर प्रदर्शित करावं.

आपण जेव्हा एखाद्याला, किव्हा समोरच्याला एखादी गोष्ट पटवून देतो तेव्हा, आपण आधी  ती गोष्ट आपल्या मनात, आपल्या सोयीनुसार, आपण मिळवलेल्या ज्ञानानुसार पक्की केलेली असते. पण ती गोष्ट नक्की करत असताना, ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश जितका दिसतो तितकाच नसून तो अनंत आहे, हि गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. ढगांच्या गर्दीत हरवलेला सूर्य कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकतो, पण रात्रीच्या कुशीत निजलेला सूर्य सकाळ झाल्याखेरीज दिसू शकत नाही. दुसरा मुद्दा असा कि नदीचा महापूर जेव्हा ओसरतो, तेव्हा नदीपासून लांब दूरवर त्याच नदीच पाणी, नदीपासून विभक्त असं एका डबक्यात साठलेलं असतं. ते पाणी पुन्हा नदीत मिळविण्यासाठी, ते सुकण्याच्या आत तसाच महापूर यावा लागतो किव्हा नदी आणि डबक्यामधील अंतर कमी करावं लागतं. पण अंतर कमी करण्यातही पाणी सुकण्याचाच धोका जास्त असतो. म्हणून... ज्या जर तर च्या गोष्टी आहेत, वादग्रस्त  मुद्दे आहेत, ते राहूद्या कि बाजूला. माणसाने नेहमी सकारात्मक जीवन जगलं पाहिजे. अर्थात तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा...!! असो...

पन्हाळगड ते विशाळगड वाया पावनखिंड (६१ किमी.) या ऐतिहासिक वाटेवर पदभ्रमण करीत असताना त्यास, ट्रेक किव्हा मोहीम न म्हणता या सह्याद्रीच्या वाटा, ज्या शिवप्रभूंच्या, निष्ठावंत मावळ्यांच्या चरण कमलांनी पवित्र झालेल्या आहेत त्या वाटांना स्पर्श करण्याचा, त्यांचा मागोवा घेण्याचा पुसटसा प्रयत्न आपण करीत आहोत. आणि त्यांचा सन्मान आपण राखलाच पाहिजे हे ध्यानात असणं गरजेच आहे. माझी नियमित सवय आहे, ट्रेकला गेलो कि त्या ट्रेकचे आलेले अनुभव शब्दरूपात बंदिस्त करून मुक्त उधळायचे.

गड पदभ्रमंती करणे म्हणजे एक पर्वणीच. इतिहासाच्या, शिवप्रभूंच्या, सह्याद्रीच्या गडकोट किल्ल्यांची भ्रमंती, त्या पावन वाटांची संगती, क्या कहने... तशी फार केली नाही म्हणा..! पण जी काही केलयं त्या अनुभवातून आता ओढ लागलीय, चटक लागलीय त्या निसर्गाची. माणसाला भौतिक सुख मृगजळासमान असले, भौतिक सुखाचे पडदे फसवे असले तरी ते हवेसे वाटतात. न मिळणारे असले तरी निरंतर पाठीमागे पाळावं लागतं, दुःखाच्या वाटेवरून सुखाच्या शोधात. प्रत्येक सुख माणूस रुपये देऊन मिळवण्याच्या प्रयत्न करतो पण निसर्गाचं तसं नाही तो प्रतिक्षण मुक्त, मोफत उधळत असतो, ते पाहण्याची नजर आणि साठवण्याची कुवत तुमच्यात असायला हवी.

या मोहिमेत शिवशौर्य ट्रेकर्स सोबत जाण्याचा योग आला. शिवशौर्य गत सहा वर्षांपासून आणि संस्थेचे संस्थापक अमित मेंगळे सतत, गत वीस वर्षापासून हि मोहीम करतात. या मोहिमेबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि आम्हास सामावून घेतल्याबद्दल विशेष आभार... या मोहिमे अंतर्गत  नविन माणसं, नवीन अनुभव यांचा प्रत्यक्ष खूप चांगला प्रत्यय आला तो शब्दरूपात मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. आमच्याबद्दल म्हणायचं तर गतवर्षी पासूनच आम्ही डोंगरयात्री समूहा सोबत भीमाशंकर ट्रेकने ट्रेकचा श्रीगणेशा गेला तत्पूर्वी आमचा शिवप्रेमी गडयात्री समूह प्रतापगड मशाळमहोत्सव, शिवराज्यभिषेकोत्सव रायगड या सोहळ्यास जात होतो आणि राहील. आतापर्यत आम्ही रतनगड, हरीचंद्रगड, राजगड आणि आता हि पावन पवित्र मोहीम. शिवशौर्य ट्रेकर्सचं आमच्या सारख्या उदयोन्मुख ग्रुप  आणि ट्रेकर्स ना भविष्यात तुमचं असंच अमूल्य मार्गदर्शन मिळत राहील यात दुमत नाही, पुनःश्च शिवशौर्य ट्रेकर्सचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार...

बरं काही काव्य पंक्ती सुचल्या त्याही नमूद केल्या आहेत. चूकभूल माफ असावी.

सर्वप्रथम बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद आणि धारातीर्थी पडलेल्या सर्व मावळ्यांना शिवशौर्य ट्रेकर्स आणि शिवप्रेमी गडयात्री पालघर परिवाराचा मानाचा त्रिवार मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम !!

व्यर्थ न हो...
मुक्त उधळतो निसर्ग,
मी भौतिक सुखात गर्क.

              आयुष्य कितुके आपुले,
                जाणावे जीवनाचे मर्म.

अंतिम सत्य मरणे
सांग जगतो कोण किती,

            हाती न काहीच आपुल्या,
            मागे उरते फक्त कीर्ती

कीर्तिवंत ते शिवराय, मावळे,
न व्यर्थ साजरावे तयांचे सोहळे,
 
             पाऊले नित चालावी,
             त्या पावन गड वाटांसी,

पाने, फुले, डोंगर, दऱ्या
ऐकावी त्यांची गर्वार वाणी.

             झटले, जगले, मृत्यूस भिडले
            आजमितीस जे तसभर न ढळले

जाण ठेऊनी शिवचरित्राची
चालावे तैसे, वंदावी वाणी
...नित

फेसबुकच्या जगात कुबेर नावाचं एक वटवृक्ष आहे, साहित्य, कला, क्रीडा, समाजसेवा सर्व क्षेत्रात अग्रेसर. खरेखुरे कुबेर त्या समूहात स्तिथ आहेत.  आणि त्या समूहाचा मी सदस्य आहे हे माझं भाग्य. फेसबुक आभासी जग आहे असं म्हणतात हे कुबेर समूहाच्या कुठल्याही सदस्याला पटणार नाही. त्याच कुबेर समूहाचा दुसरा वर्धापन दिन सोहळा १६,१७ जुलै रोजी मोठया थाटात पण शिस्तीने नाशिक येथे संपन्न झाला. आणि त्या वर्धापन दिनाची दोन दिवसाची बुकिंग मी केली होती. तोच काही दिवसांनी या मोहिमेबद्दल कळलं. क्षणाचाही विलंब न करता मनात पक्क केलं कि आपल्याला या मोहिमेवर जायायचं आहे. आणि कुबेरचे संस्थापक संतोष लहामगे सरांना तसं कळवलं तेव्हा ते म्हणाले, अरे हरकत नाही...उलट तू जिथे जात आहे ते शिवमंदिर....आपली काशीमथूरा....संमेलनापेक्षाही ते महत्वाचे. आणि मूठभर मास अंगावर चढून गेलं.

पहिला दिवस
चार दिवसाची मोहीम आणि येणे जाणे असे आणखीन दोन दिवस. सर्वांनाच इतकी रजा मिळणं शक्य नव्हतं. आम्ही आठ जण मात्र तयारीत होतो. सुदेश, जितु, अजय, अभिनेष, निखिल, चिंटू, मी आणि परेश. पण परेशच्या समोर त्याच्या वडिलांना घेऊन, दवाखाना खीळ मांडून बसला. त्याचं येणं तिथेच थांबलं. आणि चिंटूचही वेळेवर काम निघतचं. रेल्वेची येण्याजाण्याची दोन्हीकडली तिकीटं आरक्षित असताना देखील आम्ही गाडीने (तवेरा) जाण्याचा निर्णय घेतला. आषाढ शु. द्वादशी १६ जुलै २०१६. दिवस धावपळीचा, पण संध्याकाळ मात्र सरता सरेना. एका ऐतिहासिक अभूतपूर्व, काहीश्या कठीण अश्या मोहिमेवर जाण्याची वेगळीच ओढ होती. 

धनसार हुन आठ वाजता प्रस्थान केले. आई भवानीचे दर्शन करून पुढचा प्रवास चालू केला. पालघरला, उद्या चालू होणाऱ्या सुदेशाच्या नवीन स्वस्तिक फूड्स कॉर्नर ला जाऊन गाडीची वाट पाहत बसलो. आता जो पर्यंत ती येत नाही तोपर्यन्त पुढची सूत्र काय हालायची नाही, हे मात्र पक्क झालं. त्यातच आमच्यासोबत ड्रायवरही येणार नसल्याचं कळलं, आता गाडी चालवायची जबाबदारी मात्र जितु आणि सुदेश वर येऊन पडली. एकंदरीतच मी कुबेर वर्धापन दिन बाजूला सारला, परेशचे वडील दवाखाण्यात भरती, चिंटूने वेळेवर रद्द केलं, ड्रायवर नेही हात वर केले, सुदेश च्या दुकानाचे उद्या उदघाटन अश्या गोष्टी योगायोगाने झोळीत पडल्या. तरीही सुखरूप जाऊन आलो बरं का..शेवटी सोबत घेतलेले जेवणाचे डबे तिथेच उघडले आणि फस्त केले. आणि साडे दहाला पालघराहून प्रस्थान केले. चिंटूही वशीपर्यंत सोबत होताच. सव्वाएक च्या सुमारास वशिला पोहाचलो, चिंटूच्या घरी. उगाच आईंना त्रास द्यायला. मग काय !! पाय मोकळे केले, मस्त चहा हाणला आणि निघालो पुन्हा एक्स्प्रेस हायवे च्या दिशेने, धरलेले रस्ते मागे सोडत.

बरंच काही मागे सुटत असतानाही पुढे जाण्याची ओढ होती. पहाटेच्या तीन वाजता खंडाळ्याची वाट डावीकडे सोडून पुण्याकडे मार्गस्थ झालो. पाच वाजता पुणा सोडून सातारा हायवेला गाडी ठरवल्या दिशेने जात असतानाच, गाड्या गर्दी करू लागल्या, रस्त्याचा सहवास गाड्यांच्या चाकांना आवडू लागला, काही वेळ तिथेच रेंगाळून पुणे-सातारा हायवे वरचा शिवापूर टोल नाका सोडून नरसापुर फाटा जवळ करताना, राजगड ट्रेकची आठवण जागी झाली. गेल्या मार्च महिन्याच्या तेरा तारखेला याच वाटेवरून स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड येथे जाण्याचा योग आला होता. सात लाख दगडांच्या राजगडाच्या पद्मावती,सुवेळा, संजीवनी या तीन माच्या, तो अभेद्य बालेकिल्ला आणि सारच डोळ्यासमोर तरळून गेलं.

त्याच ओढीने पुढच्या वाटेला दिवा दाखवत आमची सवारी पुढे निघाली. पृथ्वी सूर्याच्या दिशेने ढळू लागली. सूर्य नारायण मात्र अजून निद्रिस्त होते, आपले तेज आकाशात पसरून. सकाळच्या प्रहरी गाडी खंबातकी घाट चढू लागली. सकाळचे सहा वाजले होते तरी भोवतालचे सर्व डोंगरमाथे धुक्याची चादर घेऊन अजूनही निद्रिस्त होती. पूर्वेस लाली आणि अथांग आकाशात सोनेरी माशांची खवलं विखुरली होती, गावावरची धुक्याची चादर गावावरून डोंगरमाथ्यांवर जाऊन पहुडली होती. घाट खाली उतरून गाडी सातार्याच्या दिशेने निघाली. वाटेत सुर्यनारायण भेटले आता त्यांचा संग संध्याकाळ पर्यंत असणारच होता. सातारा सोडून कऱ्हाडच्या वेशीवर कोयनेला मागे सोडून, शनिवार पेठेच्या कोल्हापूर नाक्यावर, डाव्या अंगाला संगम हॉटेलमध्ये शरीरशुद्धी करून, चहा नाष्टा आणि खासकरून संगम स्पेशल दहीचा मनमुराद आस्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. या रस्त्याने प्रवास करणार असाल तर येथील दहीचा आस्वाद नक्की घ्या.

आता थेट कोल्हापुरास ज्योतीबाच्या दरबारी. ज्योतीबाच्या डोंगराकडे गाडी मार्गस्थ झाली. आजचा दिवस पन्हाळ्यावरच वस्ती असल्यामुळे मोहिमप्रमुख सौरभना कळवून आम्ही ही वाट धरली होती, म्हंटल जोतीबाच्या नावानं चांगभलं करून, ज्योतीबाचं दर्शन घेऊनच पुढे जावं. कोल्हापूरात काही दिवसापूर्वीच कृष्णेला आलेल्या उधानामुळे हिरव्या शेतांवर लाल रंगाची ओढवलेली चादर अजूनही हटली नव्हती. या निसर्गापुढे कधीच कुणाचं चाललं नाही, चालणार नाही. गाडी जशी वरच्या दिशेने जात होती तसे आकाशातील ढग आमच्या जवळ येत होते. सूर्यनारायणाचा प्रवासही ढगांच्या कुशीत चालू होता. रस्त्याच्या दुतर्फा झाडांबरोबर ढगांचे खेळ चालू होते. हवेत धुंद गारवा पसरला होता. ज्योतीबाचा डोंगर पन्हाळ दुर्गापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते.

त्या चैतन्यमय वातावरनात साडे नऊच्या सुमारास मंदीराकडे पोहचलो. मंदीर खाली काही अंतरावर असल्याने ते हि दिसेनासे झाले होते. बर्यापैकीच भक्तजनांची वर्दळ चालू होती. निळसर गुलाबी गुलालाच्या रंगात लांबून मंदिराची शोभा अवर्णनीय होती. पण...हा पण जिथे येतो ना तिथे गोंधळच असतो. आज तिर्थक्षेत्रांचं नेमकं प्रयोजन काय तेच मला कळत नाही. अजानतेपणाने सर्व तीर्थक्षेत्राना धंद्याचं स्वरूप आलं आहे. आज बघा देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा VIP लाईन असते. असो तो आजचा विषय नाही. तिर्थक्षेत्राच्या आजूबाजूला पसरलेली घाण, खासकरून पावसाळ्यात त्यातून येणारा उग्र वास. अहो तुम्ही मानणार नाहीत, ज्योतिबाच्या मंदीरात रांगेत घालवलेला अर्धा तास कोणत्या परिस्तिथीत घालवला. त्या निळसर गुलालाबरोबर उधळलेले खोबर्याचे तुकडे पाऊसपाण्याच्या  सानिध्यात येऊन अक्षरशः सडून गेले होते. मंदिराशेजारी साचलेल्या पाण्यात तो गुलाल अन ते खोबर्याचे तुकडे दूरवर पसरले होते. त्यातून येणाऱ्या उग्र वासानेच बहुदा भक्तगण, ईश्वराच्या ओढीने कमी आणि त्या परिसरातून निघण्यासाठी पुढे जाण्याची धडपड करीत असावेत. शिव आणि सूर्याचे रूप असणाऱ्या जोतिबाच्या मंदिराच्या परिसरात, ढगाळ वातावरणामुळे ते तेज लोप पावले हेच खरे.

तसही बहुतांशी लोकं स्वतःच्या समाधानासाठी मंदीरात जातात. ईश्वराच्या आवडीचं तिथे काहीच नसतं, असते ती फक्त रांगेतून पुढे जाण्याची ओढ. त्या ओढीने तुम्ही ईश्वराच्या मूर्तीजवळ जाल, पण ईश्वरापर्यंत तुम्हाला पोहचता येणार नाही. माणूस हा प्राणी मला अजून समजलेला नाही , ज्या देवांची तो पूजा करतो त्याचं आचरण मात्र करीत नाही. आता विष्णुभक्त प्रल्हाद कुठे मंदिरात फिरला होता, रामभक्त हनुमान तो कुठे रांगेत उभा होता. कृष्ण भक्त अर्जुन कुठे उपासनेला बसला होता. तरीही त्यांना ईश्वर प्राप्ती झाली. कारण त्यांचं आचरण धर्माच्या बाजूने, जनहिताच्या कल्याणकरिता होते. त्यांच्या कडे ईश्वराप्रती निस्वार्थ भक्ती होती. ईश्वर भक्ती आणि भाव यांचा भुकेला असतो. स्वच्छता हि आंतर मनाबरोबरच बाह्य परिसरात, क्षेत्रातही असणे गरजेच आहे. मंदिर प्रशासनाबरोबरच भक्तांनीही मंदिरातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात स्वच्छतेसाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. 

सचिन मधुकर परांजपे...पालघरमधील ज्योतिष, वास्तुशास्त्र, भाग्यरत्न मार्गदर्शक. मुक्त आध्यात्म प्रसारक, विवाह समुपदेशक, लेखक व समीक्षक आहेत त्याचंही या विषयावर परखड मत आहे कि "देव सर्वत्र आहे, चराचरात व्यापलेला आहे" असं आपलाच हिंदु धर्म म्हणतो. देऊळ किंवा मंदिरातील विशिष्ट स्पंदने व शुभत्व याचा अनुभव घेण्यासाठी आपण अधुनमधुन देवळात जात असतो, मनोभावे दर्शन प्रार्थना करत असतो. अशावेळी आलेल्या भक्तांची सोय करणे, काळजी घेणे, स्वच्छता ठेवणे ही मंदिर प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. एखाद्या "जागृत"(?) देवस्थानात किंवा प्रसिध्द तीर्थक्षेत्रात भक्तांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाखो-करोडॊ रुपये, सोनेनाणे जमा होत असते अशा ठिकाणी तर पंचतारांकित शौचालयांपासून वातानुकुलित रांगांपर्यंत सर्व व्यवस्था टापटिप असायलाच हव्यात....भक्तांनी जर देवळात जाणेच बंद केलं तर अशी प्रशासने वठणीवर येऊ शकतील. देवळात जायचं नाही, लांबून बाहेरुन दर्शन घ्यायचं, एक दमडाही पेटीत टाकायचा नाही असं ठरवलं तर मंदिर प्रशासनाची मस्ती उतरेल असं माझं स्पष्ट मत आहे. यापुढे जिथे गर्दी, हजारोंच्या रांगा आहेत व जिथे गलथान कारभार, अस्वच्छता आणि घाण आहे, जिथे भक्तांची काळजी घेतली जात नाही तिथे, त्या देवस्थानात पाऊलही न टाकण्याचा मी आजपासून निश्चय करतो आहे....ज्यांना शक्य आहे त्यांनी या निर्णयाला पाठिंबा द्या, ही पोस्ट शेअर करा, व्हॉटसपवर फिरवा...काय वाट्टेल ते करा. पण आता मंदिर प्रशासन या मस्तवाल यंत्रणेला जाग यायलाच हवी....चराचरात व्यापलेल्या आणि माझ्यापुरता प्रामाणिक असलेल्या देवाला मी कुठेही भेटीन...

असो विषयांतर नको. तिथून बाहेर येऊन पुन्हा वर येवून खालच्या अंगाला यमाई देवीच दर्शन घेण्यास खाली उतरलो. पायऱ्या उतरत असताना खाली वासुदेवाचं दर्शन झालं जे कि आता आमच्या कोकणात दुर्मिळ झालाय.  मला आजही आमच्या दारी आलेला वासुदेव पुसटसा आठवतोय. वासुदेव आला हो वासुदेव आला म्हणत एका हातात चिपली, दुसर्या हातात टाळ, मधेच पावा वाजवीत अंगणात वासुदेव आलेला असायचा, गळ्यात कवड्याची माळ, डोक्यात उंच मोरापिसानी सजवलेली टोपी, अंगात घोळदार झगा , पायात घुंगरू, काखेत झोळी, खांद्यावर शेला अश्या सुरूप दर्शनाची आज पुन्हा आठवण आणि वासुदेवाचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन धन्य जाहलो. दान पावलं....   आपल्या संस्कृती जपणाऱ्या लोककलेला तोड नाही पण त्या संघणक युगात लोप पावत चालल्यात.  पटण्यासारखं नाही पण अज्ञानात बरंच काही चांगलही असतं नाही..? वासुदेवास मनसोक्त डोळ्यात साठवून, यमाई देवीचं दर्शन घेऊन गडावरून खाली उतरलो.

काट्यावर काटा चढून मावळतीच्या दिशेला वळला होता. आता पोटोबा करणे अनिवार्य होते , सो खाली हॉटेल अमर मध्ये जेवणाचा कार्यक्रम पार पाडून दीड च्या सुमारस पन्हाळ गडाच्या पायथ्याशी नेबापुरात. जेथे आमचा आजचा मुक्काम होता, तेथे दाखल झालो. आमचे मोहीम प्रमुख सौरभ केळस्कर तिथे आमच्या स्वागतासाठी उपस्तीथ होते. त्यांच्याशी बातचीत करून आम्ही गड पाहण्यास वर गडाच्या दिशेने निघालो.जेथे आधीच बाकीचे शिवप्रेमी गेले होते. विशाळगड चार हजार फुट उंचीवरील गिरिदुर्ग. स्वराज्यातील थरारक, ऐतिहासिक निष्ठेने न्हाऊन निघालेल्या पराक्रमाचा साक्षीदार. स्वराज्यात सामील झाल्यावर अवघ्या चार महिन्यातच महाराज गडावर असताना सिद्धी जोहरचा वेढा पाडला. मावळ्यांची निष्ठा आणि पराक्रम यामुळे महाराज या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. पण बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, शिवा काशीद यांसहित तीनशे बांदल वीर स्वराज्यासाठी कामी आले.

आज गडावर वस्ती आहे म्हंटल्यावर धास्ती आलीच. आज माणूस स्वच्छतेच्या क्षेत्रात बर्याच अंशी मागे पडलेला दिसतो. आणि जेथे स्वच्छतेचा अभाव असेल त्या वस्तीला बकालापनाचं रूप येतें. आज बर्याच ठिकाणी तिच परिस्तिथी आहे. गडावर वाहने अगदी आरामात ये जा करू शकतात इतकच नव्हे तर प्रत्येक स्मृतीस्थळांजवळ तुम्हाला तुमची चारचाकी नेता येते. पन्हाळगड आता एक किल्ला नसून गडावर घरे, हॉटेल, दुकाने यांनी गजबजलेल एक गाव आहे, त्या गावात इतिहासाची साक्ष देणारी काही स्थळं आहेत. इतिहास कालीन जो राजवाडा आहे तेथे आज नगरपालीका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बॉईज होस्टेल आहेत. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर सज्जाकोठीची इमारत दिसते. बालेकिल्यावर अंबारखाना आहे.. याच्या सभोवती खंदक. येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारेआहेत. यात वरी, नागली आणी भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचे-या, दारुगोळा अणि टाकंसळ होती. आता तो इतिहास पुन्हा उजागर करावा लागेल. ती कोठारे पाहण्यासाठी आत प्रवेश केला आणि पावसानेही दमदार सुरवात केली. हि कोठारे पाहताना त्या कुशल कारीगारीचा हेवा वाटला, दगडाच बांधकाम असूनही त्या छतातून इतकी वर्ष सरून सुद्धा धान्य साठविण्यासाठी केलेल्या झरोक्या व्यतिरिक्त पाण्याचा थेंबही गळत नाही.  नाहीतर आमची छतं, काही वापरा गळायची थांबत नाही. आपल्यासाठीच साठवायचं म्हंटल्यावर काय होणार. असो सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर रामचंद्रपंत अमात्य व त्यांच्या पत्नीची समाधी आहे. तीन दरवाजा, चार दरवाजा, धर्मकोठी, महालक्ष्मी मंदिर आणि बरच काही असतानाही  मात्र गडावर वसलेल्या गावात ते सारं हरवल्यासारखं वाटतं. बाकी प्रशासन कसं असत हे कुणाला नव्याने सांगायची गरज नाही.

या सर्वात मात्र बाजूलाच म्हणजे, पन्हाळगडाला लागुनच असलेला पावन गड. पन्हाळगडावरून तीन दरवाजातून लता मंगेशकरांच्या बंगल्याकडे एक रस्ता जातो. त्याच रस्त्याने पुढे पावनगडाला जाता येते. वाटेत गर्द झाडी, जुनी मंदिरे पहावयास मिळतात. पावनगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली अर्जोजी यादव व हिरोजी फर्जंद यांनी बांधला. याला पावनगड असं स्वरूप येण्यापूर्वी मार्कंडेय ऋषीचा डोंगर म्हणून तो अस्तित्वात होता. ज्यावेळी सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला, त्या वेढ्यात तीन महिने शिवाजी महाराज पन्हाळ्यावरच अडकून पडले. त्या वेळी सिद्धी जोहारने या मार्कंडेय ऋषीच्या डोंगरावरून समोर पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला. त्यामुळे पुन्हा पन्हाळा किल्ल्यासमोरच असलेल्या या डोंगराचा शत्रूने आधार घेऊ नये म्हणून शिवरायांनीच पन्हाळ्याचा एक भाग म्हणून पावनगड तटबंदीने बांधून घेतला. पहिल्या दिवसाची संध्याकाळ. गड भ्रमंती करून नेबापुरात रात्रीच्या वसतीस्थानी गणेश सभागृहात परतलो.

आज या ऐतिहासिक मोहिमेचा अनुभव लिहित असताना, प्रथमतः आजमितीस आपल्या मुलांवर शिवासंस्कार कसे व्हावेत हे प्रथमदर्शनी नमूद करून तदनंतर पुढचा अनुभव लिहू म्हणतो.

त्या जिवंत ऐतिहासिक वाटांचा मागोवा घेत असताना आज विशेष उल्लेख करावा वाटतो तो सावंत दांपत्यांचा. जेव्हा पन्हाळगडावर वसतिगृहात विसाव्यासाठी पहिल्या दिवशी थांबलो होतो तेव्हा हे दांपत्य आपल्या दोन मुलांसह आत प्रवेशले. आणि भुवया उंचावल्या. ६१ किमीची पायपीट, ती सुद्धा भर पावसात, नदी, नाले, पुर ओलांडून, रानवाटा, शेतं, चिखल, जंगल आणि बरच काही जे खडतर आहे, ह्या सर्वांचा सामना हि दोन मुलं कशी करतील आणि त्या मुलांप्रती आईवडिलांना काहीच कसं वाटू नये, असे असंख्य प्रश्न डोक्यात घर करू लागले. पण त्या प्रश्नाची उत्तरं इतिहासाच्या पाऊल वाटांचा मागोवा घेत असताना पुढच्या तीन दिवसात मिळणार होती.

संध्याकाळी ओळख परेड झाली तेव्हाही या दांपत्याबद्दल फारसं काही कळल नाही. पण शिवशौर्य ट्रेकर्स चे नियम इतके काटेकोर असतानाही या दांपत्यास अनुमती कशी दिली असावी हा हि प्रश्न होताच. त्याचं कारण असं कि एक साधारण सात वर्षाचा मुलगा आणि दुसरा अडीच वर्षाचा. पण त्याचा निर्णय आणि माझ्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरं लवकरच निकालात निघाली. आणि खरं म्हणावं तर आपण किती संकुचित विचारांचे धनी आहोत हे कळून आलं. या जगात आपल्या विचारांपलीकडेही एक जग आहे. आणि ते जग निश्चितच सर्वोपरी आहे.

रात्री जेवण उरकून शाळेच्या सभागृहात बसलो असता त्या दोघांकडे पाहून वाटलं, याचं हे दुनियेच्या परे निरागस खेळणे आपल्याला आता खेळता येईल का ? पुढे येणाऱ्या सुख दुःखाची थोडीही भनक नसताना जगता येईल का ? किती बरं झालं असतं नै ? असो पण लहान मुलांची एक वेगळीच दुनिया असते. आता आपणही कधी लहान होतोच कि. लहान मुलं खेळत असली मन ते बघण्यात रमून जातं. मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, अगदी तसाच हा अडीच वर्षाचा श्रीहान किती प्रयत्न केले पण जवळ काही येईना... 

त्याचप्रमाणे लहान मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात. परंतु जर त्यांना खेळीमेळीने आणि त्यांना रुचेल अशा पध्दतीने म्हणजेच गोष्टींच्या आणि खेळांच्या माध्यमातून शिकवले, तर हे संस्कार मुलांकडून लवकर आत्मसात केले जातात, मग हि मुलं  मुक्त अशा या निरागस स्वातंत्र्याचा पुरेपुर अनुभव घेतात, स्वतःच्या कला जोपासतात, सामुहिक खेळांद्वारे इतर मुलांशी मैत्रीचं निखळ नातं निर्माण करतात, मस्ती करतात, त्यांच्यात उपजत असलेल्या खेळकरपणाला आणि खोडकरपणाला अशा वेळी उधाणाच येतं, सुरवातीला अतिशय खोडकर असणारा मुलगा नंतर शांततेची गोडी चाखायला शिकतो, तर कधी अतिशय अंतर्मग्न राहणारा मुलगा शेवटी इतरांसारखाच दंगेखोर बनतो हा अनुभव आईवडिलांस येत नसावा, असं नाही. असो...बाकी पुढे त्यांचा उल्लेख होईल म्हणण्यापेक्षा करावाच लागेल.

संध्याकाळी पाचच्या सुमारास सर्वांची ओळख परेड झाली. काही मेंबर्स येणे बाकी होते. पण जे होते त्यात अडीच वर्षाचा श्रीहान सोबत दोन तीन आणखीन चिल्लीपिल्ली ते सत्तर वर्षांच्या उषाताई सोमण, साठी पार केलेले सहस्त्रबुद्धे काका, भावे आजी यांचाही समावेश होता. आम्हा सर्वाना ऐतिहासिक मार्गाचा आराखडा देण्यात आला. तदनंतर शिवशौर्य ट्रेकर्सची ओळख. आजच्या पिढीतील उदयोन्मुख इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सलग २० वर्षे पन्हाळगड ते विशाळगडाची वारी करणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित मेंगळे
यांचाही सत्कार करण्यात आला.त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भली मोठी प्रतिमा आणि सचित्र कप भेट देण्यात आला. यानंतर इतिहास अभ्यासक श्रीदत्त राउत यांनी इतिहासाचे मार्गदर्शन केले. तब्बल दोन तास त्यांनी इतिहासाचे दाखले सर्वांसमोर मांडले. ते आपआपल्या परीने आत्मसात केले. त्यांच्या व्याख्यानामुळे उद्या मार्गक्रमण करणाऱ्या वाटे बद्दल कमालीची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. मोहीम कार्यवाहक गुरुनाथ मयेकर आणि मोहीम प्रमुख सौरभ केळस्कर यांनी ट्रेक बाबत महत्वाच्या सूचना केल्या. मुंबई, वसई, नागपूर, पुणे, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, परभणी, रत्नागिरी,आणि आम्ही पालघरहून अश्या सर्व ठिकाणाहून लोकांनी सहभाग नोंदवला. आत्ता प्रतीक्षा उद्याची.

दिवस दुसरा  
निसर्गाचा अद्वत चमत्कार म्हणजे सह्याद्रीच्या पर्वत रांगा. आणि त्या सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारे श्री छत्रपती शिवराय आणि त्यांचे निष्ठावंत मावळे. आणि आता ते सौंदर्य धुळीस मिळवणारे अधर्मी डोमकावळे. 

​सोमवार दि. 18 जुलै 2016 ची सकाळ प्रसन्न आणि उत्साही. ढगांची चादर घेऊन निजलेला पन्हाळदुर्ग. पक्षांची किलबिल, गाई म्हशीचे हंबरने, कोंबड्याचे आरवणे. एकंदरीतच गडावर वस्ती असल्याची चाहूल. सकाळी लवकरच जाग आली. आमचीही सकाळ झाली, बाहेर पावसाची झिमझिम चालू होती. शरीरशुद्धी उरकताना साडे सात  वाजले. शरीर शुद्धी उरकून आमच्या आधीच छोटे वीर तयार होते.  आठ वाजेपर्यंत आमच्या मोठ्या सॅग त्या पुढच्या मुक्कामी वाहून नेणाऱ्या टेम्पोत टाकल्या. आमची गाडी इथेच तीन दिवस मुक्कामी लावली. मोहिमप्रमुखानी जय भवानीचा गजर करून हजेरीस सुरवात केली, सर्वांनी जय भवानी म्हणून आपली उपस्तिथी नोंदवली. पुढच्या प्रवासाला निघण्या आधी आम्हा सर्वांस त्या छोट्याच खुप आकर्षण होतं. मनात ठरवूनही टाकलं होतं कि नित त्याच्या सोबत चालणं. त्याच्या आई वडिलांबद्दल काय म्हणावं. छोट्याची बसण्याची व्यवस्थाही त्यांनी चोख केली होती. त्याच्या वडिलांच्या पाठीमागे मुलांना कॅरी करणारया बगेत हे महाशय अगदी निवांत बसले होते. आपल्या छोट्या मादक नजरेने सार्यांना न्याहाळत. आणि दुसरे थेट पुढच्या ध्वजापाशी. आता विषय असा आहे कि हा छोटा कार्टून किती वेळ त्या बगेत बसणार ?  . पन्हाळा अजून ढगांच्या कुशीतच होता, आई भवानी, शिवछत्रपती, शिवा काशिद, बाजीप्रभू आणि स्वराज्यास कामी आलेल्या त्या साऱ्याच मावळ्यांचे स्मरण करून ते गगनी भिडवून सारेच एका शिस्तीत पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नरवीर शिवा काशिद यांच्या स्मृतिस्थळावर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी निघालो. सोबत छोटे मावळेही होते, सर्वात लहान श्रीहान त्याच्या बाबांच्या पाठिवरल्या बेबी सॅग मध्ये निर्धास्त, हसतमुख बसला होता. सारेच त्याला कौतुकाने पाहायचे. आणि सोबतच श्रीदत्त राऊत अनवाणी चालत होते.


या पावन भूमीवर मोहिमेची सुरुवात करताना सर्वप्रथम पाहायला मिळते ती म्हणजे नरवीर शिवा काशिद यांची समाधी. पन्हाळगडच्या पायथ्याशी नेबापूरच्या वेशीवर ही समाधी आहे. शिवरायांच्या आज्ञेवरून शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशिद यांनी महाराजांचे रूप घेतले आणि दुसर्‍या पालखीमध्ये बसून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी मलकापूरच्या मार्गाला लागले, पण दुर्दैवाने हा बेत फसला आणि शिवा काशिदांची पालखी पकडली गेली. सिद्धी जोहरच्या छावणीत नेईपर्यँत कुणालाही कळले नाही कि हे शिवराय नाहीत. सिद्धीच्या छावणीत त्याचबरोबर अफजलचा मुलगा, बाबाच्या वधामुळे संतापलेला फाजल  उपस्थित होता. अफजल वधावेळी तो तिथे उपस्थित होता. त्याला आपल्या वडिलांचा बदला घ्यायचा होता. शिवा काशीदला त्याने ओळखले, हा शिवबा नसून त्याचा एक मावळा आहे हे ध्यानात येताच त्याला आणि सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे. यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवा काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी  महाराज नाहिस तर कोण आहेस ? शिवा काशिद हसत म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे, त्यावर जौहर संतापला. तो तीक्ष्ण स्वरात म्हणाला, मला दगाबाजी करून तुझा शिवाजी माझ्या हातातून निसटला आहे. पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवा काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले, "आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे  तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत. आता हाती लागणे शक्य नाही. छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत. जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत." शिवा काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवा काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला. आणि शिवा काशिदांना वीर मरण प्राप्त झाले.

आम्ही जेव्हा त्या ऐतिहासिक स्मृतिस्थळाजवळ पोहचलो तेव्हा त्या स्वामीभक्ताच्या कर्तृत्वाचा एक एक प्रसंग अंगावर उभा राहू लागला.  एक पिढीजात  नाभिक असून आपला मृत्यू होणार हे निश्चित असूनही, केवळ स्वामिनिष्ठा आणि स्वराज्य निष्ठेपाई स्वतःला मृत्यूच्या विळख्यात झोकून देणं हि सोपी गोष्ट नाही. कोण मोठा पराक्रम, अतुलनीय..!! आज या जगात मतलबी दुनिया, संपला मतलब कि संपले सारे, निष्ठा तैसी होणे नाही आता, ईश्वराने  तैसे पुण्यात्मे बनविणे सोडले आता... त्या पुण्यातम्यास मानाचा त्रिवार मुजरा करून वरच्या दिशेने निघालो. गडावर चढताच नरवीर शिवा काशिद यांचा उजव्या हातावर भव्य पूर्णाकृती विटा शस्त्र धारण केलेला पुतळा पाहून पाय तिथेच थांबले, विट्या हे असं एकमेव शस्त्र जे पुढे टोकदार आणि अर्धा हात मागे शस्त्र चालवणाऱ्याच्या दिशेने वाळलेल्या तारांचा वर्तुळाकार झुपका असतो, त्याला लागलेली रस्सी शस्रधाऱ्याच्या हातात असते. लांब अंतरावरच्या शत्रूला टिपायचे तर भालाच चांगला, पण भालाफेक केल्यानंतर हाती शस्त्र उरत नाही. त्यामुळे मराठ्यांनी विकसित केलेले शस्त्र म्हणजे विट्या. अस्त्र आणि शस्त्र या दोन्ही प्रकारांत ते वापरता येतं. यात फेक अचूक लागते, अन्यथा ते भटकण्याची शक्यता असते. हे शिवकालीन शस्त्रभांडार जपले पाहिजे.

ऐतिहासिक  थरारक प्रसंगाचे शिल्प डाव्या हातावर साकारलेले आहेत. त्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन तिथूनच वरची वाट धरली. गडावर चढताच नरवीर शिवा काशिद यांचा उजव्या हातावर भव्य पूर्णाकृती विट्या शस्त्र धारण केलेला पुतळा पाहून पाय तिथेच थांबले, ते विट्या शस्त्र चालविण्यात पारंगत होते. 

तिथून पुढे पाऊले निघाली संभाजी मंदिराच्या दिशेने. वाटेत डाव्या हातावर इतिहासकालीन वास्तू नजरेस पडल्या, त्यावर वास्तुपुरुषाचं शिल्प कोरलेलं होतं, इतिहासकालीन प्रत्येक वस्तूला वास्तुपुरुषाचं शिल्प कोरलेलं असतं. नऊ वाजून गेले होते, आता पोटं कावली होती. मंदिरात पोहचलो, हे मंदिर संभाजी महाराजांप्रति १७ व्या शतकात कोल्हापूरकरांनी बांधलं गेल्याचा उल्लेख आहे. शिवशौर्य ट्रेकर्सनी मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या घरात चहा नाश्ता सोय केली होती, तो उरकून सोबत दुपारचा जेवणाचा डबा घेऊन गडावर असानाऱ्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याला पुष्पहार आणि वंदन करण्यासाठी बाजीप्रभूंच्या पूर्णाकृती दोन्ही हाती तलवार असलेल्या पुतळ्या शेजारी पोहचलो.

ते वीररूप आणि रणधुमाळीत बेभान झालेल्या अवस्थेतला पुतळा पाहून क्षणभर स्तब्ध झालो. डोळे मिटले गेले, त्या पावनखिंडीत रुतले, ओठ स्वतःशीच पुटपुटले... जगदंब...जगदंब...जगदंब. आमच्या सोबत होते, वीस वर्षापासून दरवर्षी न चुकता हि मोहीम पूर्ण करणारे अमित मेंगळे, इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत, सोबतच बाजीप्रभूंचे वंशज वैजनाथ देशपांडे. त्यांनी बाजीप्रभूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या ऐतिहासिक पावन परिसरातून पदभ्रमण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्रीदत्त राऊत यांनी पुन्हा आठवण करून दिली कि झालेल्या रणसंग्रामत, घोडखिंडीत बाजीप्रभूंनी एक वाक्य वापरलंय जे बखरी मधे नमूद आहे ते म्हणजे  "आम्ही साहिबे कामावरती सुखे मारतो.'' पण मला वाटतं "सुखे मरतो" या शब्दाची किंमत आपल्याला तात्पुरती कळू शकते. तो आपला घास नाही. वेळ आलीच तर आपण म चा मा मात्र करू शकतो. पण तो शब्द निष्ठावंत शूर वीराचा आहे. आणि तो त्यांनी जपला, म्हणूनच ते वंदनीय आहेत. किर्तिरूपी उरावे ते असे. त्या पाऊलवाटा चालत असताना इतिहासाची उजवी म्हणजेच खालची बाजू जिथे सिद्धी जॊहरचा वेढा होता आणि डावी म्हणजेच वरची बाजू त्या पावन डोंगर रांगा जेथून शिवराय नि मावळे सटकले या दोन्ही बाजूंचा अभ्यास करत पावनखिंड गाठायची होती. पुढे ध्येय मंत्र  म्हणून ( शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥ ) पाऊले महाराज ज्या मार्गाने निसटले त्या राजदिंडी मार्गाच्या दिशेने निघाली.
पन्हाळ्याहून निघाल्या दोन, पालख्या रात्रीस गुपचूप, 
एकात विराजमान राजे, दुसरी मृत्यूचे सदन, 
म्हसाई पठार केले जवळ, राजे सोबत सहाशे बांदल, 
मलखापुर दिशेने चालले, मृत्यू सोबत शिवा काशिद 


सारेच एका उर्मीत पुढे मार्गस्थ झाले. तिथे वाटेत एक फाटक लागलेच. त्यालाच लागून असलेल्या गोल फाटकातून सारे पुढे गेले. एकंदरीत गाडी जाण्यास मज्जाव होता. पण शैलेश दादाला श्रीहानला घेऊन पुढे जाता येणे कठीण होते, म्हणून श्रीहान बसलेली सॅग फाटकावरून पास केली आणि पुढे मार्गस्थ झालो.  पुसाटी बुरुजाच्या उजव्या अंगाला खालच्या बाजूस राजदिंडी मार्ग आहे. सकाळच्या सव्वा दहाच्या सुमारास आम्ही इथे पोहचलो. इथे भग्नावस्थेत स्थित एक नंदी आहे. आज इतिहासात काही ठिकाणी ज्यांचे पुरावे दिले जातात त्याच इंग्रज, डच लोकांनी आपल्या देवी, देवता, वास्तुशिल्प यांना तोडण्याचेही कार्य केल्याचे पुरावे इतिहासात नमूद आहेत. आता कोणी काय घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा..!! असो. त्या भयाण पौर्णिमा असूनही काळोख्या रात्री दोन्ही पालख्या इथूनच निघाल्या. मृत्यूचं घर असणाऱ्या पालखीत बसून  शिवा काशिदांची पालखी मलखापुराच्या दिशेने तर महाराजांची पालखी म्हसाई पठाराच्या दिशेने त्या दुर्गम वाटेवरून गेली. पावसाने कमालीची दडी मारली होती. जय भवानीचा गजर करून गडावरून खाली उतरण्यास सुरवात केली. डाव्या हाताला पुसाटी बुरुजावरुन किल्लेदार त्र्यंबक भास्कर आपल्यावर लक्ष देऊन आहेत, जसे महाराज्यांच्या वेळी होते. त्यांच्यावर सारं सोपवून निर्धास्त गर्द झाडी, दगडी गोट्यांची वाट पार करून तुरुकवाडी गाठली. काही मिनिटांचा डांबरी रस्ता तिथेच सोडून म्हाळूंग्याकडे मार्गस्थ झालो.

आता मात्र शेतातून, शेताच्या बंधातून, बांधाच्या ओढ्यातून वाट काढत म्हाळुंग्याचा डोंगर चढायला घेतला. पायातील बुटांनी माती खाल्ली. प्रत्येकजण पाऊले दमाने टाकू लागला. पावसाळी चिलखत आतून भिजू लागली. हळूहळू अंगातून कमरेला वेटाळून राहिली. काही अंशी अंगावरची चढण दमछाक करत होती. पण वरून येणाऱ्या अदृश्य झऱ्याच्या आवाजात ती दमछाक विरून जात होती. पण कसला झरा नि कसलं काय ? तो गर्द झुडपांच्या आडोशाला ओसंडून वाहत असावा..!! दिसलाच नाही. पण त्यासरशी वर मात्र येऊन पोहचलो होतो. पाठीमागे वळून पाहिलं तोच पुसाटी बुरुज धुक्यात लपला होता, त्याच्या शेजारी असलेले दोन खांबही अदृश्य झाले होते.समोर भात आणि नाचणीची शेतं वार्याने फरफरत होती. वरून दिसणारे निसर्गाचं ते अनोखं रूप डोळ्यात साठवून म्हाळुंगे गावाच्या शेत बांधावरून सव्वा आकाराच्या सुमारास गावात पोहचलो.
जुन्या वस्तींच गाव, जुनी घरं, 
माणसात माणुसकी असलेली माणसं.
टोकदार शिंगांची गुरं, 
दिसत्यात जिथं तिथं गोंडस मुलं
डोई कापडाची टोपी, त्याला कापडी फुलं,
सुवास प्रेमाचा तिथे दरवळं
हनुवटी, भाळी काजळाच टिकं 
अंगात उबं, दिसं रूप साजीरं
हाती मातीचं खेळणं, गजा धरीलं मुठीत








म्हाळुंगे गावाच्या वेशीपाशी थोडे वर चढले कि डोळ्यांसमोर अथांग मोठे पठार लागते. थक्क करणारं असं. तब्बल नवशे तेरा एकर मध्ये पसरलेलं मसाई पठार.

सह्याद्रीच्या कुशीत वसले, कोल्हापूरच्या ठाणी, 
म्हाळुंग्याच्या डोई सजले, पठार अथांग मसाई,
निसर्गाची  मोठी किमिया, हिरव्या रंगाची चादर,
शिव पावलांकरवीं फेरली, धवल फुलांची गुंफण..

मसाई पठारावर पोहोचल्यावर डोळ्याचे पारणे फिटणारा हिरवागार गवताचा गालिचा पसरलेला हा सपाट प्रदेश अथांग सागरासारखा भासतो.अकरा चाळीसला या पठारी पोहचलो.पायी अंथरलेल्या जिवंत हिरव्या गालिच्यावर छोट्या धवल, पिवळ्या फुलांची नक्षी वाऱ्याने हेलकावे खात होती.तसं हे पठार पावसाल्यात ट्रेकर्स साठी धुक्याचं पठार म्हणून ओळखले जाते. पण त्या पठाराचं ते अनंत रूप याची डोळा पाहण्यासाठी नव्हे तर साठवण्याची आज आम्हास मुभा होती. ते निसर्गरम्य दृश्य डोळ्यात मावेना. मखमली हिरव्या चादरी पठारावरुन ओसंडून खाली वाहत होत्या. पायीचे सोडून त्या मखमली शय्येचा मोह धुंद करत होता. जागोजागी चहांचे हौद सज्ज होते, कधी उजव्या अंगाला तर कधी डाव्या अंगाला. लहान-मोठ्या किटकांपासून सरपटणार्‍या प्राण्यांपर्यंत, गाई बकरी म्हशी पासून ते गुरं हकणाऱ्या आजीपर्यंत, घोंगडीवाल्या काकापासून ते शिवरायांच्या मावळ्यापर्यंत, साऱ्यांची उपस्थिती त्याची शोभा वाढवत होती. अनेक प्रकारचे जीव या ठिकाणी दर्शन देतात. रंगीबेरंगी फुले, मधेच एखादं त्या भन्नाट वाऱ्याशी शर्थ करणारं झाड. त्या झाडापाठीमागे, अनंत आकाशाचं त्या हिरव्या गालिच्यावर बसणं, त्या जुळू पाहणाऱ्या नव्या क्षितीजाला, ढगांनी घेरणं, घेरता घेरून त्या झाडासही अदृश्य करणं. प्रतिक्षण बदलणाऱ्या त्या निसर्गात माझं रमून जाणं. हळकेच पढणाऱ्या पावसाच्या थेंबानी पुन्हा जाग्यावर येणं.
डाव्या अंगाला असणाऱ्या दोन टेकड्यांच्या घळीतून खालचं गावरान खुणावत होतं, त्या टेकड्यांवरून म्हसाईची चादर टप्प्या टप्प्याने खाली उतरत होती. पण ते तूर्तास बाजूला सारून आगेकूच केली. काट्यावर काटा चढून तो ही पुढच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता. इतकी चाल चालल्यानंतर पाय थोडेसे मंदावले, पण ते निसर्ग प्रेमाने. श्रीयांस मात्र आता थोडासा कळवळू लागला होता, लाख पटीची इच्छा असतानाही, त्याच्या पायातील बूटं त्याला साथ देत नव्हती, अनवाणी चालणं हि धोक्याचं होतं, कुणाला उचलू देत नव्हता, शेवटी बूटं पायातुन काढून तेलाने थोडी मालीश केली, सार्यांनी त्याला विनवणी केली. काही वेळ पायांना आराम मिळावा म्हणून फक्त दहा मिनिटांसाठी खांद्यावर घेतले. पुन्हा शेवटी तो चालू लागला. का तर त्याला ती मोहीम स्वबळावर पूर्ण करायची होती. आणि आमचे छोटे वीर श्रीहान त्या गुलाबी वातावरणात निवांत फुटाणे खात बाबांशी चर्चेत रमले होते. हे बळ कुठून येत असावं..?? मानो या न मानो, सब संस्कारोका खेळ है...जनम बादमें लेता है इंसान, गर्भ में सिखानेका भी एक रोल है.. 
बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. एव्हाना आम्ही मसाई पाठरावरल्या मसाई मंदिरापाशी पोहचलो, मंदिरावर माकडं बसली होती. घड्याळात एक वाजला होता, मसाई देवीचे पुरातन मंदिर वाटेत डाव्या अंगाला तर उजव्या अंगाला असणार्‍या पठाराच्या बेचक्यात बुद्धकालीन पांडवदरा लेणी आहेत. तिथे जाता आलं नाही, पण आहेत. याच मसाई मंदिराजवळून शिवाजी महाराज गेल्याचे सांगितले जाते. पुढचा आणि मागचा असे दोन्ही ध्वज मंदिराजवळ येऊन पोहचले.श्रीहानही हसतमुख सॅग मधून खाली उतरला, श्रीयांसच्या पायालाही आता काहीशी विश्रांती मिळणार होती. देवीची दिवाबत्ती करून आरती केली गेली. जेवणाचे डबे इथेच उघडून फस्त केले, पिठलं भाकरी आणि सोबत घेतलेला कांदा. जेवणानंतर गोड म्हणून ज्योतिबाच्या डोंगरावरून आणलेले राजगिरा आणि कुरामुर्याचे लाडू...

पहिल्या दिवसाचा अर्धा टप्पा पार झाला आणि मसाई पठाराने आपले रूप झाकण्यास सुरवात केली. दीडचा ठोका, भवानीचा गजर, मसाईला नमन करून पुढची वाट धरली. आम्ही धरण्याआधीच धुक्याने ती धरली होती. पठारावर वाऱ्यांसवे ढगांचे खेळ चालू होते. वीस पावलांवरचा माणूस अदृश्य होत होता, डाव्या उजव्या घळीतून येणारे ढग गर्दी करू लागले होते. धीम्या पावसानी अंग अंग शहारत होतं. पाऊलांचे वाटा तुडविणे मात्र चालूच होते. मसाई पठारावरून अभूतपूर्व निसर्गरम्य वनश्री न्याहाळत, प्रवास केल्यावर वेशीला येऊन सारेच थांबले. दुपारचे दोन वाजले होते. श्रीदत्त राऊत यांनी इथेही मार्गदर्शन केलं. इथून महाराज डाव्या हातावरून दिसणाऱ्या सलग डोंगर रांगा ज्या थेट पावनखिंडीशी पोहचतात, त्या वाटेने पावनखिंडी आधी असलेल्या पांढरपाणी गावापर्यंत गेले.

ती वाट सोडून आम्ही मसाई पठार उतरू लागलो. निलगिरीचा सुवास सर्वत्र दरवळला होता. म्हाळुंग्याहून आमच्या सोबत चालत असलेला एक कुत्रा आता लाडाला आला होता. साऱ्यांना सोडून माझ्या अंगावर प्रेमाने झेपाऊ लागला. मीही त्याला हाड हूड न करता ते करू दिलं... कशाला उगाच पंगा घ्यायचा ना...!! पावसाने पुन्हा दडी मारली. मजल दर मजल करत आम्ही पावनेतीन च्या सुमारास कुंभारवाडीस पोहोचलो. गावं तशी एकदम साधीच. कौलारू घरं, रस्ते म्हणाल तर पायवाटा, चिखल तुडवीत जाणाऱ्या रानवाटा. या गावातून पुढे खोतवाडीला जाताना डाव्या दिशेला महाराज गेलेली डोंगररांग दिसते. मसाई पठारानंतर पुढचा भाग कुंभारवाडी ते खोतवाडी सलग चीखलाचा रस्ता. हि वाट पार करणे म्हणजे शर्थच. पण नशिबाने यावेळेस मात्र या रस्त्यात दगडी खिपाच्यांचा भराव केल्याने सोयीचं झालं. डाव्या हातावर डोंगरमाथी न्याहाळत पुढचा रस्ता कापत होतो. या गावातून पुढे खोतवाडीला जाताना डाव्या दिशेला डोंगररांग आहे. या डोंगररांगेत नैसर्गिकरीत्या तयार झालेली कुंवारखिंड लागते. ऊन, वारा, पावसाच्या मार्‍याने माती वाहून गेल्याने डोंगरातील दगड मोकळे झालेला हा भाग एकावर एक रचलेल्या दगडांनी बांधल्यासारखा भासतो. त्यास वरातीचा डोंगर असेही म्हणतात. वरातीच्या माणसांची गर्दी जशी जमते त्याप्रकारचं ते दृश्य निसर्गाने साकारलं आहे. कुंभारवाडीतून दीड तासाची पायपिट करून सव्वा चारच्या सुमारास आम्ही आजच्या वस्तीच्या ठिकाणी खोतवाडीस पोहचलो.

पाहिलं मुक्कामाचे गाव खोतवाडी. महाराजाना मुक्काम करन्याची संधी नव्हती. पण त्यांच्यामुळे आज आपल्याला ती संधी आहे. आणि कलयुगात माणूस संधीचा फायदा घेतोच, नाही का ? खोतवाडीत आमचा मुक्काम, खोतवाडी विद्या मंदिरात केला होता. आम्हा सर्यांचीच बुटं माती खाऊन मातली होती. काहींना तर फेस आला होता. पाण्याची चिंता करण्याचं काही कारण नव्हतं. इथे गावात पावसाळ्यात वर पठारावरून आणलेल्या पाईपांना चोवीस तास पाणी असतं. मस्त त्या पाण्यात सर्वानीच पाय कमी आणि बूट जास्त धुतले. आमचा सॅगचा टेम्पो येऊन हजर होता. आम्ही आधी सॅग जागेवर नेऊन झोपवल्या, तदनंतर बुटांकडे वळलो. आज पायपीट झाली पण लवकर आटोपली म्हणून अजून पाचेक किमी व्हायला हवी होती अशी चर्चा आमच्या वर्तुळात सुरु होती. पण मसाई पठारावर जे धुकं दरवर्षी असते त्यामानाने धुकं तितकं नव्हतं म्हणून आणि कुंभारवाडीहून खोतवाडी मधल्या टप्प्यात चिखलाचा भाग कमी झाल्यामुळे दोन ते तीन तास वाचाले असं नियमित ट्रेक करणाऱ्यांच म्हणणं होत. जे कि रास्त आहे. सारे फ्रेश झाले. कुणीही पायपीटीच्या मानाने थकलेले वाटत नव्हते. चहाचा फड रंगला. श्रीदत्त राऊत, विवेक, गावातील मुलं यांनी शाळेच्या पटांगणात कबड्डीचा खेळ हौशीने खेळला. श्रीहान, श्रीयांस हेही एकदम टवटवीत होते. ते हि आपापल्या खेळात गुंग होते. सार्यांनाच त्या श्रीहानचं कौतुक वाटत होतं. दिवसभर पाठीमागे त्या बॅग मध्ये बसून हा मुलगा थकत कसा नाही..?? खरतर याचं नवल वाटत होतं.

दिवस अजून ढळला नव्हता. रम्य संध्याकाळी खोतवाडीचा परीसर नजरेत भरण्यासाठी बाहेर पडलो. डांबरी रस्त्यावरून वरच्या दिशेने निघालो. खोतवाडी डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं चढाव उताराचं गाव. वरून खाली कौलारू घरं एका शिस्तीत उभी होती. त्यांच्या डोई लाल रंगावर, हिरवा रंग चढलेला. त्या पलीकडे शेत्यांच्या खाली भल्या मोठया मैदानात गावच्या गावं वसलेली. मागे वळून पाहीलं तर मुंबईतील मरीन ड्राईव्ह सारखी लांब पसरलेली हिरव्या गर्द झाडाची, पठार सुळक्यांची पर्वत रांग दिसते. आता सूर्य मावळतीला अस्त झाला असावा, अंधाराने पांघरून आणखीनच दाट केलं. आम्ही परतून पुन्हा खोतवाडी विद्या मंदिरातील ६वी अ चा वर्ग, जिथे आम्ही साडे एकोणाविस जण थांबलो होतो, तेथे परतलो. आता हा अर्धा कोण ते त्या एकोणाविस जणांना चांगलं ठाऊक आहे. असो..आज आमच्या वर्गात श्रीदत्त राऊत आम्हाला इतिहासाचे शिक्षक म्हणून मार्गदर्शन करीत होते. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या सोबतच राहणार होते. त्यांनी वसई किल्ल्याची चालवलेली मोहीम, सुरवात, परिसरातील सारेच किल्ले श्रमदानाने कसे फुलवले, आणि ते करताना किती संघर्ष करावा लागला, हि आणि अशी बरीच माहिती त्यांनी आम्हाला दिली. ते थोडक्या शब्दात मांडणं योग्य ठरणार नाही त्यासाठी एक वेगळा ब्लॉग लिहीनच.

ते माहिती देत असताना सारेच ती ऐकण्यात मग्न होते. इतिहासाच्या पलीकडे जाऊन, संदर्भ देताना ते रामायणात शिरले. तोच एक हवेचा बाण सुटला आणि सर्वांची तंद्री भंग झाली, वर्गातील हवा दूषित झाली, नाकपुड्यातील केसांची तारांबळ उडाली, क्षणाचा काही दुर्गंध असला तरी सर्वांच्या हृदयातून त्याला लाखोली वाहिली गेली. आणि नाक फक्त श्वासोश्वास घेण्यासाठी असायला हवे, अथवा त्याला फक्त सुगंधच उमजायला हवा होता, असं राहून राहून वाटू लागलं. माणसाला सुगंधाचा हव्यास असला तरी माणूस दुर्गंधी निर्माण करतोच, नाही..?? पण ती दुर्गंधी इतर जीवांना त्रासदायक ठरणार असेल तर तिची विल्हेवाट यथायोग्य लावणे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. पण आज मर्यादापुरषोत्तम राहिले नाहीत. आता तुम्ही म्हणाल हा माणूस कुठचा विषय कुठे नेतोय..!! पण वस्तुस्तिथी नकारता येत नसते. असो...त्यांचं व्याख्यान पूर्ववत होऊन ते संपल्यानंतर जेवणाचा आनंद घेतला. पुलाव रस्सा आणि लोणच्यावर ताव मारला. सुरेख जेवण.

जेवल्यानंतर पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. पौर्णिमेच्या रात्री, ढगांपल्याड लपलेल्या चंद्राच्या संधीप्रकाशात हलकी पावसाची झिमझिम चालू होती, बहुतेक ढगच खोतवाडीत उतरले होते. रातकिड्यांची किरकिर, काजव्यांचा उंच उडत जाणारा, मीनमीननारा धूसर प्रकाश, वरून पाईपांद्वारे येऊन ओसंडून वाहणाऱ्या खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज, आणि हवेतील गारवा, धुंद करत होता. आकाशी एकाही चांदणीचा मागमूस नव्हता, उजव्या हातावर खालच्या अंगाला, अथांग अश्या मैदानावर, अजून ढगांची चादर ओढवली नव्हती. असंख्य लुकलुकणारे दिवे जणू तारेच ते... वसुंधरेवर निजण्यासाठी आकाशातून खाली उतरले होते.व्हे त्यावेळेसही सिद्धीच्या सैन्याला गाफील ठेवण्यासाठी अनंत आकाशातील तारे खाली उतरले असावेत.

ते रम्य दृश्य डोळ्यात साठवून सहावी अ च्या वर्गात परतलो. रेलचेल चालूच होती, कुणी अजून निजले नव्हते. व्यक्तिगत चर्चासत्र चालू असतानाच संध्याकाळचा विषय पुन्हा जोर धरू लागला. आणी जे हसण्याचं सत्र चालू झालं ते थांबता थांबेना. आयुष्यात माणसाने नेहमीच हसत राहिलं पाहिजे. माणूस जेव्हा मनापासून हसतो तेव्हा तो तात्पुरता का होईना, साऱ्या वेदनांना विसरून जातो हे लक्षात घ्या. हसण्याचा कार्यक्रम चालू असतानाच ईश्वर कृपेने जी लाईट होती, तीसुद्धा गेली. वर्गात अंधार पसरला. त्या अंधारात वर्गात एका काजव्याने प्रवेश केला. कदाचित आधीपासूनच असेल, पण मोठ्या प्रकाशात लहान प्रकाश झाकला जातो, आणि अंधारात लहान प्रकाशसुद्धा तेजस्वी दिसतो. इतका लहान जीव आणि स्वयंप्रकाशित..!! काजव्यांचा प्रकाश असामान्य आहे. त्याचा उलगडा करायला हवा, त्याच्याकडे असणारी पावर बँक सतत चार्ज असते, तो असेपर्यंत. ती ईश्वरनिर्मित आह्रे. त्याचे चमकणे काही वेळ थांबले आणि लाईट आली. आता मात्र झोपेच्या कुशीत जाणे गरजेचे होते. सकाळी लवरकरच निघण्याचे ठरले होते, रात्री झोपेत दोन पायांच्या वाघांची संख्या वाढते, त्यातच बाहेर आमच्यातीलच तरुणांच्या गप्पा रंगल्या होत्या, आता बोलणार कुणाला ना...!! गुपचूप झोपी गेलो.

नेहमीप्रमाणेच सकाळ प्रसन्न , धुके जैसे थे, त्यात काहीच फरक नव्हता. रात्रीचे दिवे आता विझले होते. खालच्या अंगाला दिसणारं माळरान अगदी स्पष्ट दिसत होतं, जिथे सिद्धीचे पहारे होते. आणि वर डोंगर माथे ज्या मार्गाने महाराज गेले ते धुक्यात अदृश होते. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा सिद्धीचे सैन खालून वरच्या दिशेने पाहतील त्या वेळेस महाराज ज्या तिथीला पन्हाळ्याहून सुटले, तेव्हा भवानी कृपेने  डोंगरमाथे, रात्री तर सोडा, पण दिवसाही धुक्यात लपलेले असतील. आणि महाराज बिन दिक्कत सटकतील.  हा सुद्धा मोहिमेचाच एक भाग निश्चितच असेल. 

शरीरशुद्धी आपोटून चहा, नाश्ता करून सारेच पुढच्या मोहिमेसाठी सज्ज झाले. लहान विरही तयार झाले. कालप्रमाणे आजही जय भवानीचा गजर करून प्रत्येकाने आपली हजेरी नोंदवली. आणि पुढच्या प्रवासाला सुरवात केली. मागे वळून एकदा पाहिलं. आणि खोतवाडी विद्या मंदिरातील सहावी अ चा वर्ग मागे डाव्या हातावर सोडून खालच्या दिशेने मांडलाईवाडीकडे आठच्या सुमारास निघालो. इथून पुढच्या मोहिमेमध्ये शेतीमध्ये काबाडकष्ट करणारा शेतकरी आणि त्याचा परिवार दिसतो. बैलांची आणि रेड्यांची जोडी नांगराला जुपलेली, नांगरणीची, कामे करणारा गडी आणि भातलावणी करणार्‍या स्त्रिया लाल मातीत, त्या शेतीच्या कामात रंगून गेलेल्या  दिसतात. पावसापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर ‘विरलं’ घेतलेले ग्रामस्थ दिसतात. पण झाडांच्या पानांनी विणलेली विरली आता इथेही राहिलेली नाहीत. पुढे दगडी गोट्यांची वाट पार करून शेतांच्या बांधावरून खाचरात पाय देता पुढचा मार्ग जवळ केला. निसर्गाबरोबरच पिकांचेही नुकसान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तरच आपलेही नुकसान होणार नाही. या शेतातील वाटा पायदळी तुडवताना त्याचा असा अनुभव येतो जणू डेरी मिल्क वितळवून खाली सांडलेली आहे आणि त्यातून आपण चालत आहोत. नऊ वाजता मांडलाई वाडी सोडून एक ओढा पार करून मांडलाईच्या धनगर वाडीत प्रवेश केला. इथे विशेष म्हणजे प्रत्येक गावात एक धनगर वाडी आहे.

धनगरवाडी हलक्या पठारावर आहे. आणि त्यांची शेतं त्या पठाराच्या उतरंडीला आहेत, म्हणूनच त्या शेतांचे बांध हे दगडी रचून उभारलेले आहेत, दगडी बांधात, लाल मातीच्या उदरी, बीज हिरवे अंकुर काढते, रान फुलविते. इथे शैलेश दा आणि श्रीहान हि सोबत आले. श्रीयांस सर्वात पुढे होताच. गावातील लोकही श्रीहान कडे कौतुकाने पहायची. पण ते कौतुक होतं त्याच्या आईवडीलाचं. हे गाव सोडताना सरळ रस्ता सोडून डाव्या हातावर वळून करपेवाडीकडे मार्गस्त झालो.

लगेचच पुढे वाटेत डाव्या अंगाला विशाल आकाशात पसरलेलं आंब्याच वायोरुद्ध झाड नजरेस पडते. पण त्या झाडावर शेवाळाच आणि बटांगली नामक दुसऱ्या झाडाचं वर्चस्व पाहायला मीळत. आंब्याच झाड सर्वांनाच परिचीत आहे. आंबा या फळाची ऊपयुक्तता आणि मधुरता यामुळे त्याला आपण फळांचा राजा म्हणतो... आंब्याला मोहर येतो, बहर येतो, आंबे येतात त्याची मधुरताही भन्नाट...काही आंबटही असतात, कधी काळी फळं येतही नाही म्हणा...त्याला कारणीभूत सभोवतालची बदलती परिस्तीथी (हवा,पाणी,माती वैगरे) माणंसाचं तरी त्याहून काय वेगळं असतं ..

सारं काही मजेत चाललेल असतं.... अचानक काही दिवसांनी त्या झाडावर दुसरं एक झाड दिसू लागतं. ते हि सुंदर साजेसं. त्या विशाल वृक्षासमोर ते कुजगणतीतही नसतं. त्यालाही मधुर पण लहान फळं येतात त्याचा आस्वाद घेण्याचाही आपल्याला मोह आवरता येत नाही. म्हणून ती फांदी कापन्यास आपण कंटाळा करतो..... माणंसाचं तरी त्याहून काय वेगळं असतं .....

हळु हळु आंब्याच्या झाडावर आलेलं पण मातीशी ( जमीनीशी ) न जुळलेलं झाड आपलं वर्चस्व आंब्याच्या झाडावर प्रस्तापीत करतं आणि पाहता पाहता आंब्याचं अस्तीत्व नाहीसं होतं. त्या झाडाच रुपांतर एका वेगळ्याच झाडात झालेलं असतं. कालांतराने त्याची मुळं जमीनीशी एकसंध नसल्या कारणाने तेही उद्वस्त होतं.आता तो स्वत्ःही शेष होतो आणि आंब्यालाही शेष करतो. अशी कितीतरी झाडं मी शेष होताना पाहिलीत. माणंसाचं तरी त्याहून काय वेगळं असतं .....

शेवटी ईतकच म्हणेन की कुणिही आपल्यावर वर्चस्व गाजवता कामा नये. जे काही असेल तोडकं मोडकं आपलं असावं. दुसर्याचं कितीही मनमोहक असलं तरी आपल्या आवाक्याबाहेर असं आपण काहीच घेऊ नये...  जे आहे त्यात समाधानी असावं., तुम्ही कृतज्ञशील असावं पण समेरचा निष्ठावान असेल तर ....असो

पुन्हा थोडीशी चढण चढावी लागते. उजव्या हातावर खालच्या अंगाला चहुबाजूनी झाडांच्या मध्ये घेरलेलं एक तळ आहे. त्या तळ्यात आजूबाजूच्या डोंगर उतारीवरून चहाचे लोट येऊन तो हौद चहाने भरलेला भासतो. पुढे काहीशी पठाराची पायपीट करून गेल्यावर करपेवाडीची धनगर वाडी लागते. इथे साडे नौच्या आसपास आम्ही पोहचलो. गावातील मुलं वाटेत आपल्याकडे चोकलेट मागत असतात. पण ते मागताना ''विशाळगड गोळ्या द्या'' असा उल्लेख करतात. ज्यांना पटत असेल त्यांनी या ट्रेकला चोकलेट जरूर न्यावीत. कhi ट्रेकर्सनी आणलेले पेन ,पेन्सिल इत्याद्दी साहित्य जे शिवशौर्य ट्रेकर्स जवळ जमा केले होते, ते हि वाटेत गावातील शाळेत देत पुढे चालले होते. खोतवाडीतून निघाल्यापासून  आता आम्हाला श्रीहान दिसला होता, प्रसन्न आणि हसतमुख. सहा वर्षाचा असूनही त्याची ओढ अगदी मोठ्यांना लाजवणारी आहे. इथे काही वेळ थांबून खाजूर, बिस्कीट असा गजर,काकडी,शेंगदाणे जे श्रीहान च्या आईने आणले होते त्याचा आस्वाद घेऊन, पुढे निघालो. आता धुकं थोडंस जोर धरू लागलं होतं. अजूनही डाव्या हातावरचे डोंगरमाथे धुक्यात लुप्त होते.

दहाच्या सुमारास करपेवाडीत पोहचलो. करपेवाडी या प्रवासतील सर्वात मोठं गाव. इथे भरारी पथक आम्हास भेटले. या मोहिमेवर येण्याआधी भरारी पथकाचाही संदेश आम्हापर्यंत पोहचला होता. त्यांच्या सोबत मार्गदर्शन करताना  ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब याचं पहिल्यांदाच दर्शन झालं. एकदम साध्या देशी, साध्या वेशी मनमोकळेपणाने मार्गदर्शन करताना पाहून खरंतर नवल वाटलं, पण उरही भरून आला. कधी कधी नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. तो क्षण शब्दात मांडता येणं कठीण आहे. ज्याने शिवचरित्र जाणलं, अंतरी अनुभवलं, या रानावनात गीरीदुर्गात जगले. त्यांच्यासाठी  इतिहास म्हणजे केवळ गोष्टी नाहीत, तर राहायचे आणि वागायचे कसे इथपासून ते राज्य कसे चालवायचे इथपर्यंतचे मार्गदर्शन आहे. गड-किल्ल्यांमधून ते होते; परंतु गड आणि किल्ल्यांना भेट देताना क्वचितच त्यांचा इतिहास वाचायला मिळतो. त्यामुळे अन्य राज्यांतून आणि परदेशातून येणाऱ्या इतिहासप्रेमींना आपणच आपला देदीप्यमान इतिहास समजून घेण्यापासून रोखतो, अशी खंत मनात जोपासणारे, मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघात चौदाव्या गिरीमित्र संमेलनात गिरीमित्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले आप्पा परब.धन्य जाहलो ते व्यक्तिमत्व याची डोळा याची देही अनुभवून. क्षणात उमगावं असं त्याचं व्यक्तिमत्व. 

इच्छेवीन पुढचा प्रवास चालू केला. आणि आंबेवाडीकडे चालण्यास सुरुवात केली. या भागात दाट जंगल लागते. दिवसाही अंधार पडल्याचा अनुभव या ठिकाणी मिळतो. भीमाशंकराच्या जंगलाची हलकीशी आठवण येते.आता पावसाची रिपरिप हि चालू झाली होती. पण हे जंगल कृत्रिम असावं. या मोहिमेंतर्गत आढळणाऱ्या जळूचं या जंगलात दर्शन झालं. एका मुलीच्या पायाला तो चिकटला होता. रक्त मोक्षण करण्यात पटाईत असलेले जळू  साधारणतः ६-१०  सेंटिमीटर लांबीचा असतो.  जळूमध्ये प्रसरण पावण्याची क्षमता खूप जास्त असते. जळूच्या दोन्ही टोकांपाशी एक प्रकारचा चूषक असतो- ज्याच्या साह्याने जळू त्वचेवर वा इतर कोणत्याही आधारावर चिकटू शकते. जळूच्या संपूर्ण अंगावर गांडुळाप्रमाणे वलये असतात. रक्त पितो पण विषारी वैगरे तसा काही नाही. हल्ली माणसं जास्त विषारी झालीत, गोड बोलून कसा दंश करतील सांगता यायचा नाही. इथे काही वेळ आम्ही थांबलो बाकीचे मागून येईपर्यंत. जंगलात पक्षांची किलबिल, पानांची सळसळ, कोकिळेचे सुरात गाणे चालू होते. पावून तास पायी चिखल तुडवून , ते जंगल सोडून भात लावलेल्या शेतारणात पोहचलो. तिथे उजवीकडे एक शीळा आहे त्यावर बसून क्लिक मारले आणि पुढे आज पहिल्यांदाच इथून आम्ही गाण्याचे सूर त्या रानावनात धरले. महाराष्ट्र गीताने सुरवात केली. आंबेवाडी सोडून आता रिंगे वाडीकडे प्रस्थान केले. श्रीहान झोपी गेला होता. ते हि विशेष आहे त्याच्या बाबांचे चालणे, त्यामुळे त्याचे डोके सतत त्यांच्या पाठीवर आदळत असते, पण हे महाषय तरीही कसे झोपी जाऊ शकतात, न रडताही..!! कमाल आहे ब्वा. आता तो खाली मोकळा झाला होता पण त्याच्या चेहऱ्यावर थकवाही स्पष्ट जाणवत होता, कदाचित पुढचा टप्पा पार करूनच आपण विश्रांती घ्यायला हवी या विचारात तो मग्न होता.  मजल दरमजल करत आमची फौज १२च्या ठोक्याला रिंगे वाडीत पोहचली, तिथे डब्यातील पुलाव फस्त केला, सोबत दिलेली केळी मार्गी लाऊन पुढच्या मार्गाला निघालो. मागोमाग भरारी पथकही पोहचले होते.

पुढचा जवळजवळ एक किमी प्रवासकाळ्या रस्त्यानी केला, तदनंतर उजव्या अंगाला वळून, राणावत तुडवीत, १.२० च्या सुमारास पाटेवाडीत पोहचलो. आंबेवाडी सोडून पुढे पाटेवाडी लागते. या गावात असणारी बांधीव विहीर दिसते. पाटेवाडीतून पुढे सुकाम्याच्या धनगरवाड्याकडे जाण्याच्या वाटेवर दाट जंगल लागते. या झाडीतून जाताना मध्ये एका ओढ्यात निखळ पांढरेशुभ्र पाणी वाहताना दिसते. इथे या ठिकाणी मोहिमेतील सारेच जन मनसोक्त अंघोळ करतात. तत्पूर्वी पाटेवाडी आणि या ओढ्यादाराम्यान असलेल्या भयंकर घसरगुंडी आणि चिखलाच्या टप्प्यातून निघताना मशागत करावी लागते. इथे स्वयंसेवकाची नितांत गरज होती. पण काही ओढ्याच्या ओढीने आधीच पुढे गेले होते तर काही खूप मागे.मोहिमेवर जात असताना तुकड्या बनवणं गरजेच आहे , निदान विसेक माणसांसाठी दोन स्वयंसेवक असायलाच हवेत. त्या स्वयंसेवकांनी त्या वीस जणांची सोबत सोडता कामा नये. श्रीयांस आधीच पुढे गेला होता. शैलेश दादा आणि श्रीहान सोबत मी होतोच. त्या फुटभर चिखलातून जाण्याऐवजी दादाने वरचा मार्ग धरला पण घसरण इतकी होती कि, पुढे जाताच येईना. आणि मागेही येता येईना. विशेष म्हणजे मागे श्रीहान असल्याने जास्त काळजी होती. इतक्यात दादाचा पाय घसरला... ते सावरण्याआधी मी मागून त्यांना सहारा दिला. एक काका नि मी,  तो तीन मिनिटांचा थरार अनुभवून आम्ही चौघेजण कसेबसे बाहेर निघालो. पण मागे येणाऱ्या महिलांना हि वाट फारच अवघड होती.साडेतीन च्या सुमारास त्या ओढ्यापाशी पोहचलो. पण मागे सुदेश, जितु,अभी,अजय यांनी त्या टप्प्यात उभे राहून काही जणांना त्यातून पार करून दिले. आणि त्या जंगलाची वाट मागे सोडून ओढ्याजवळ आले. इथे वडापावची सोय आयोजकांनी केली होती.  त्याचा आस्वाद घेत घेतच पुढची वाट धरली. पुढे साडेचारच्या दरम्यान वडे खाऊन म्हालसवडे जवळ केले.
आता मात्र साऱ्यांची लगबग वाढली होती. पाच वाजता मान धनगरवाडा गाठला. इतक्या प्रवासात सर्वच धनगर वाड्यात पाहिलेल्या  शेळ्या काळ्या रंगाच्या होत्या, इथे मात्र सफेद रंगाच्या काही शेळ्या दिसतात. पांढरपानी जवळ आल्याची लक्षणं होती बहुतेक... थट्टा करतोय, मनावर नका घेऊ बर... पुन्हा ढगांनी आता जोर धरला होता. शालेतील मुलं गावाकडे पळू लागली होती. प्रत्येक शाळेत असणारा एक मात्र शिक्षकहि घराच्या दिशेने निघाला. आजची पायपीट जरा जास्तीची झाली म्हणायला हरकत नव्हती. उजव्या हातावर शाळा सोडून खाली अणुस्कुरा - मलकापूर रस्त्यावर खाली उतरलो, मलकापुरच्या दिशेने अर्धा किमी चालून पांढरपाणी फाट्यावर चहा पिण्यासाठी थांबलो. आप्पा परबही तेथे आमच्या मागोमाग पोहचले. त्यांना जवळ अनुभवताना खूप चांगला प्रत्येय आला.वाटेत येणारे अनुभव लिहिण्याचा सल्ला त्यांनी दिला. शैलेश दा ,नम्रता ताई, यांची आधीपासूनच ओळख होती. त्यांनी आणि श्रीहान, श्रीयांसने त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनीही मुक्त मनाने छोट्यांस आशीर्वाद दिले. पण या माणसाबरोबर चर्चा करायची असेल तर निच्छितच ओळखीची गरज नाही. पावसाची रिपरिप  चालू झाली. भरारी पथकाचा मुक्काम तिथेच होता. आम्ही मात्र पुढच्या दिशेने रवाना झालो. अजून बरेच अंतर कापणे शेष होते. हि सुद्धा आता डांबराची वाट होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडांसोबतच ढग सुद्धा सोबत चालत होते. मजल दरमजल करत दिवसभराच्या तीस किलोमीटर पायपीटीने का होईना, पण सुखरूप दुसर्या दिवसाच्या मुक्कामी मलाईवाडा येथे संध्या समई सात वाजता पोहचले होते. 

आज आम्ही एका विशेष दांपत्यासोबत राहणार असल्याने थकवा पळून गेला होता. रहायची सोय एका राहत्या घरात प्रशस्त अश्या ७०'*१०' च्या हॉल कम ओटीवर केली होती. सारेच फ्रेश झाले. श्रीहान खेळू लागला, श्रीयांस मात्र त्याच्या बाबांना आज मागे सोडलेल्या ऐतिहासिक वाटांची माहिती विचारात होता. इथे आत्ताची मुलं... मोबाईल आणि tv सोडणार नाहीत.लाईट ये जा करत होती, आणि मंदही होती. सोबत आणलेल्या टोर्च इथे कामी आल्या. सपाटून भूक लागली होती. पण मी कधीही खात नसलेला मिसळ पाव जेवणाच्या जागी मिळाल्यावर थोडा निराश झालो. नाईलाजाने तो प्राशन करावा लागला. तदनंतर चर्चेचा फड रंगला. आमच्यापेक्षा आम्हाला जास्त उत्सुकता होती ती श्रीहान बद्दल. पण जेव्हा त्यांची पार्श्वभूमी कळली तेव्हा सारेच संभ्रम दूर झाले. साधी आणि निसर्गाची, गीरीदुर्गाची  ओढ असलेली हि माणसं. निसर्गाची ख्यातीच तशी आहे म्हणा. वयाच्या चौदाव्या वर्षापासून हे ट्रेक करतात म्हंटल्यावर काय..? आतापर्यंत  किती ट्रेक केलेत हे सुद्धा त्यांना ज्ञात नाही. पण २००७ डिसेंबर ला अलंग-मदन-कुलंग ट्रेकला या दोघांची ओळख झाली. तदनंतर रोज रोपच्या नॉट प्रक्टीसाच्या निमित्ताने होणार्या भेटीत बंध जुळले आणि नोव्हेंबर २००८ ला दोघांच लग्न झालं. तेही सिंहगडावर बरं का ? श्रीयांस गर्भात दोन महिन्याचा असतानाच  रामसेजचा ट्रेक केला.  श्रीयांसच्या जन्मानंतर चार महिन्यातच पहिली  अलिबागची हाईक केली. अशी त्याची सुरवात. आणि श्रीहान गर्भात असताना सायकलवर मुंबईतील किल्ले पालथे घातले. रायगडावर राजसदरेत श्रीयांसचा वाढदिवस केला. बघा विशेष म्हणजे आता तर हा छोटा अडीच वर्षाचा आहे पण मागच्या वर्षीसुद्धा हे दांपत्य आपल्या दोन्ही मुलांसमावेत दोन मित्रांना घेऊन हाच ट्रेक दोन दिवसात पूर्ण केला होता. खरोखरच मुलांवर संस्कार घडण्यासाठी आधी आईवडिलाने संस्कारी होणं गरजेच असतं. त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. हे सर्व एकूण त्याच विचारात दादानीच आणलेला मॉंलिनी स्प्रे पायांना मारून झोपी गेलो.

२० जुलै बुधवार
दिवसभराच्या रीपरीपिला कंटाळून रात्रभर पावसाचे थैमान चालू होते, पाहाटे मात्र ओसरला होता. आज मात्र पाहटे पाच वाजताच कोंबड्याची देत आलेल्या स्वयंसेवाकाचा राग येऊन गेला. आणि तशीही इथल्या सर्वच गावात लाईटची बोंबाबोंब आहे. पहाटेच उठून शरीरशुद्धी उरकली. घरातील ओट्यावर ढग दडी मारूनच बसले होते. रात्रीची भूक अजूनच वाढली होती. जाऊन आधी चहा बिस्कीट खाऊन नंतर नाश्ता केला. अप्रतिम उपमा. आठवाजेपर्यंत सारेच जमले.आदित्य लेले यांचा आज वाढदिवस होता. त्यांना सोनपापडी भरवून तो साजरा झाला. आणि  पावनखिंडीकडे कूच केले. डांबरी रस्त्यानेच पुढचे अंतर कापायचे होते. म्हणूच बहुतेक वाटेत तो थरार जाणवला नाही. पण ती उत्सुकता ती ओढ आता संपणार होती त्या धगधगत्या रण क्षेत्रावर, पावन भूमीवर आम्ही पोहचणार होतो. 

सरकारने बांधलेल्या पायऱ्यावरून जवळजवळ चाळीस ते पन्नास फूट खाली आणि खिंडीतील पुलावारुन आम्ही परंपरागत खिंड म्हणून दाखवल्या जाणाऱ्या भागापर्यंत सकाळी साडे नऊला पोहचलो. आज पावनखिंड नेमकी कोणती, याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद असल्याचेही इथे कळले. पण याच भागात पावनखिंड असल्याचे समजते.आजवर पुस्तकात वाचलेल्या, एकलेल्या ऐतिहासिक पावनखिंडित आम्ही उभे होतो. हीच ती
पावनखिंड... युद्धावेळी पन्हाळगडावरून निसटण्यापूर्वी महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी हा मार्ग शोधून काढला आणि या मार्गावरून महाराज निसटले इथे नवीन्याने तयार झालेल्या पायऱ्यांमुळे, निदान त्या पवित्र पावन खिंडीत उतरण्याचा थरार, आता अनुभवता येत नाही. पण हीच ती पावनखिंड जिथे सहाशे मावळे महाराजांसहित रात्रीच्या अंधारात, धो धो पावसात, काटे कुटे-चिखलाची तमा न बाळगता, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या प्रहरपर्यंत येथे येऊन पोहचले होते.हीच ती खिंड जेथे स्वतंत्र सूर्याला प्रसन्न करण्यासाठी बाजीप्रभू लढले होते. हेच ते रणक्षेत्र जिथे कृष्णाजी बांदल, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू सहित तीनशे बांदल वीरांना हौतात्म्य आलं होतं, हीच ती शापित भूमी जिथे मृत्यू तोफांचे आवाज, म्हणजेच महाराज सुखरूप पोहचल्याची बातमी ऐकण्यासाठी थांबला होता. इथे सारेच नतमस्तक झाले.

 निष्ठा ऐसी होणे नाही....
काट्या, कुट्यांची, गर्द झाडाची, एका मागून एक चौदा डोंगरांची, 
आषाढी पौर्णिमेच्या काळोख्या रात्री, भर पावसात, ढगांची वाट, तुडवीत गेले, 
कोट छातीचा करुनी पावनखिंडीत, बाजी बांदल वीर उभे ठाकले, 
महाराजांसी लाऊन मार्गी, मृत्यूस रोखून ठेविले, 
लाखांचे पोशिंदे महाराज, विशाळगडी सुखरूप पोहचले, 
होता तोफेंचे आवाज, साहेबी कामावर सुखे मारतो, म्हणत मृत्यूस कवटाळले.
ते शौर्य, ती निष्ठा आता होणे नाही. मृत्यू अखेर सत्य, तरी आपले भय संपत नाही.
 ...नित

सर्वांच्या चेहऱ्यावर मोहीम पूर्ण केल्याचं समाधान स्पष्ट दिसत होतं, पावनखिंडीत जयघोष केला, आसमंती जयजयकार झाला.  त्या पवित्र स्मृतिस्थळाची वैजनाथ देशपांडे यांच्या हस्ते आरती केली गेली.शुर बांदलवीरांना श्रद्धांजली अर्पण करून श्रीदत्त राऊत यांनी त्या पवित्र पावन भूमीची महती पुन्हा एकवार कथन केली. आणि ठोस सांगितलं कि याच परिसरात बाजीप्रभूंची समाधी "अज्ञात" स्थळी आहे. आणि दुसरी विशाळगडी असलेली महाराज्यांनी बांधलेली असल्याचही कळतं. स्मृतिप्रीत्यर्थ असणाऱ्या समाध्या अनेक ठिकाणी असू शकतात त्यात गैर नाही, पण तो इतिहास जागृत ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणे गरजेचे आहे. तदनंतरच श्रीदत्त राऊत आणि वैजनाथ देशपांडे यांच्या हस्ते प्रत्येकाचा शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे वायक्तीक सर्वांचा सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सावंत दांपत्य, श्रीहान, श्रीयांस,इतर लहान मुलं आणि ६५ वर्षाच्या भावे आजी,७० वर्षांच्या उषाताई सोमण आज्जी यांनीही हा ट्रेक ऊत्तम रित्या पूर्ण केला. त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
 पन्हाळ्याहून सुटले मावळे......
​बाल वयात ओढ कसली,

रान वाटा तुडविण्याची
श्रियांस म्हणतो मी चालेन,

नकोच मजला तुझी काठी
मजल दर मजल मज पुसती,

वाट शिवरायांची असे कोणती
शोध रनभूमींचा कैकांनी घेतला,

शंका उरी अजुन सलती
जाणे कोण? दावे, खरे कि खोटे,

म्हंटले तुलाच ते शोधवयाचे
या वाटा तुडवीत जाणे,

उजागर आपणच ते करावयाचे
श्रीहान बाबा पाठी बैसोनी,

हिंदोळ्यागत झुलत जाई
हेच गाणे म्हण तू बाबा,

शिवशौर्याची नवी कहाणी
सरले दिवस रात्र , 

न थकले करुनी पायपीट
पन्हाळ्याहून सुटले मावळे,

पोहचले पावनखिंडीत
कोण थरार असेल तेव्हा,

लढले बाजी, मावळे खिंडीत
झुकल्या येथे माना, 

जिथे मृत्यूही होता शापित
धरोनी उचलून बाळमावळ्यांना,

बाजीप्रभूंच्या वारसांनी
सन्मानित केले बाळ वीरांना,

शिवप्रभूंच्या मावळ्यांनी
सन्मान बाळ वीरांचा, 

त्याहून थोर आई वडिलांचा
संस्काराची लावूनी ज्योत, 

हाती दिला दिवा शिवप्रेमाचा
...नित

त्या स्मृती स्थळा पाठीमागेच जेथे एक नैसर्गिक घळ असणारे एक ठिकाण आहे. वरून येणारे पाणी तिथे 30 ते 35 फूट खाली कोसळते, आणि कासारी नदीला जाऊन मिळते.ढगांची गर्दी दाट झाली. पावसाने जोर धरला होता. उलचिक वर चढून घोडमाळ लागते, या पठारी नाचणी, भाताची शेतं धुक्यात, झिमझिम पावसात, वाऱ्याने फरफरत होती, उजव्या हातावर एक तळे तळ टाकून बसलेलं दिसत होतं, त्यातून रस्ता काढत भाततळी गावात पोहचून डांबरी रस्त्याला लागलो.काही अंतर कापल्यानंतर समोर डाव्या अंगाला खाली हिरव्या पठाराच्या कुशीत कासारा नदीचं अथांग पाणी पसरलेलं दिसत. पावनखिंडीतून येणारा ओढा एव्हाना खाली भव्य आणि वेगवान होऊन त्याला कासारा नदीचं रूप आलेलं असतं. ती पार करण्यासाठी शिवशौर्य ट्रेकसने उसपार रस्सी टाकून स्वयंसेवकाची साखळी तयार करुन प्रत्येकास काळजी घेऊन सुखरूप पार केले. काही अंतरावर आणखीन एक ओढा लागतो तो त्याच पद्धतिने पार करून वर पुन्हा विशाळगड डांबरी रस्त्याला लागलो.कासारा नदीच्य बंधाऱयाला वळसा मारून गजापुर जवळ केले. तीथे जेवण उरकून उजव्या हातावर कमरूनवाडी कडे रवाना झालॊ. काही तिथूनच वळले, तर काही गाडीने पुढे गेले. आता   आमचीहि पावलं झपाझप पढू लागली. शैलेश दा, श्रीहान आणि  बाकी पालघरकर आधीच पुढे गेले होते, मी आणि श्रीयांस मात्र रास्ता मोजत पुढे सरकत होतो.

पायथ्याशी पोहचण्याआधी वाटेतील दोन्ही बाजूस असलेली ढगांची खेळत असलेली पर्वतरांग, त्या पर्वतरांगा वरून अलगद घरंगळत येणारे कृष्णधवल धबधबे, उजवीकडून डाव्या हाताला खोल होत गेलेली उंच दरी मन मोहून टाकते. त्याच दारीवरून  गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. इथेच खिंडीतून पुढे आल्यावर स्वतः शिवरायांनी विशाळगडचा वेढा फोडून किल्ल्यात प्रवेश केला असावा. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर अंगावर येणाऱ्या पायऱ्यांची चढण सुरू होते. पायऱ्यांच्या खालीच एक सती शिल्प पहावयास मिळते. चढताना उजवीकडे वर ढासळलेला बुरूज दिसतो. साधारण अर्ध्या तासाच्या मशागती नंतर आपण गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो.गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फूलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी वरून डाव्या हातावर खालच्या अंगाला जवळपास दोन किमी अंतरावर दुरावस्थेत आहे.आम्ही जे इथे पोहचलो ते निव्वळ शैलेश दादा मुळे. इथपर्यंत येण्याचा रस्ता कुठेही चिन्हांकित नाही, हि शरमेची बाब आहे. वाट शोधत शोधत शेवटी आम्ही त्या पवित्र समाधी पाशी पोहचलो. एका खाचरात, आजूबाजूला झुडपं, बूट बुडतील येवढे  पाणी आणि चिखल, गवत या साऱ्यांची भरमार आजूबाजूला आहे. तिथे मानवंदना देऊन, खालच्या मानेने पुन्हा वर चढण्यास सुरवात केली.

किल्ल्याच्या खालून वर पर्यंतचा बकालपणा डोळ्यांना सलत होता, या विश्वात सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल तर तो माणूस. पण काही माणसांच्या वस्त्या इतक्या बकाल असतात कि स्वतःला माणूसपणाची लाज वाटते. खरंतर ऐतिहासिक वास्तूंवर माणसांच्या कायमस्वरूपी वस्त्या त्या वास्तुंच महत्व जपण्यापेक्षा त्यांना बकालपणाचं रूप आणण्यात धन्यता मानात असाव्यात का ? पण एकदा का तुम्हाला घाणीत रहायची सवय लागली कि संपल. या जगात कैक प्रकारची व्यसनं आहेत त्यातीलच हे एक. इथे आणि अन्यही गडांवर, तीर्थ क्षेत्रानावर मौजमस्ती करणाऱ्यांचा राबता जोपर्यंत असेल तोपर्यंत हे बकालपण नाहीसे होणार नाही.कुणीतरी म्हटलंच आहे, कोणालाही सौंदर्यदृष्टीकोण ठेवून, निसर्गाचे रक्षण करून, गडाच्या इतिहासाचा आब राखून विकास करावासा वाटत नाही. म्हणूनच स्वयंनिर्मित घाणीत राहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. गडकिल्ल्यांची हि दुरावस्था बघून मन व्यथित झाले.  आज विशालगडावर पायथ्याशी असलेल्या दरीत जर पूल बांधला नसता तर गडाच्या दुर्गमतेला सुरुंग लागला नसता. गडावर बकाल वस्ती निर्माण झाली नसती, गडावरच्या ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड झाली नसती. आज ट्रेक जरी संपन्न झाला असला तरी मनात असंख्य विचारांचे, वेदनेचे ढग निर्माण झालेत, या ढगातून अश्रूंचा पाऊस पडू शकतो, पण त्या पावसाचे मूल्य ते किती ?. या विश्वातून भौतिक सुखाच्या दुनियेत परतल्यावर त्याचेही भान राहणार नाही. आज शिवरायांचे स्वराज्य अस्तित्वात नसून भ्रष्टाचाराचा कळस झालेली लोकशाही माझ्या इर्दगिर्द आहे.आज निर्माण झालेल्या विचार, वेदनेच्या ढगांना,थंड हवा देण्याचा वेळही माझ्याकडे शिल्लक नाही. इतका सामान्य माणसाला व्यस्त करून ठेवणारे हे पर्व चालू आहे. एकंदरीतच सर्वच क्षेत्रात बट्याबोळ आहे. तुम्ही तुमचा पूर्ण वेळ समाजकार्यासाठी देऊ शकत नाही. (काही अपवाद वगळता) आणि म्हणूनच लोकशाहीत प्रशासनाची अहम भूमिका असते. तिलाही बकालपणा आला तर मग सारचं संपलं म्हणायला हरकत नाही.

सारेच खाली उतरले. खाली आप्पा परब यांची पुन्हा भेट झाली. त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पुढे जो तो आपापाल्या परतीच्या प्रवासाची तयारी करण्यात मग्न झाला. पाऊस चालू होता. अडीच वर्षाचा श्रीहान आता खाली उतरला होता. शैलेश दादाने त्याला निवस्त्र करून पत्र्याच्या पन्हाळीतून पडणाऱ्या पाण्याखाली ठेऊन त्याची आंघोळ घातली. विलसनीचे पाणी असूनही  हे महाषय मस्तीत हसत होते. ते म्हणतात ना जसं पेरावं तसं उगवतं , ते असं.. वयाच्या दुसऱ्या वर्षानंतरचा पन्हाळगड ते विशाळगड हा त्याचा दुसरा ट्रेक. त्या बाबतीत त्याच्या आईवडीलांच कौतुक करावं तितकं कमीच. शिवशौर्य टीमचे धन्यवाद मानून,  शिवशौर्यच्या हाकेला प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेले  ९९  मावळे आपापल्या घराच्या दिशेने रवाना झाले....आमची गाडी पन्हाळगडावर असल्यामुळे आमच्या सोबत सतत तीन दिवस स्वयंपाकी आणि आणि आमच्या saग त्यांच्या टेम्पोतून वाहणारे मुळचे नेबपुराचे कासम काका (९८९०८६३०२७) आणि श्यामराव काका (९९७०२२३००६) यांच्या सोबत आंबा, माकापूर मार्गे नेबपुरात परतून, मुक्कामी कोल्हापुरास गेलो.

गुरुवार २१ तारखेच्या सकाळी आई जगदंबा महालक्ष्मीचं दर्शन घेऊन, शाहूपलेस पाहून आणि वाटेत जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन रात्री अकाराच्या सुमारास सुखरुप घरी पोहचलो. या तिन्ही ठिकाणाचं सविस्तर वर्णन पुढच्या ब्लॉग मध्ये लिहीन. आता मात्र आवरतं घेतो.

|| जय शिवराय ||
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...